अनुग्रह कसा होतो?
मनाची अनुग्रह घेण्याची तयारी झाली व सद्गुरु भेटला तर असा भाग्यवान साधक सद्गुरुंना मनोभावे शरण जाऊन अनुग्रह देण्याविषयी विनवतो. गुरुंना पण असा आर्ततेचा व जिज्ञासु वृत्तीचा शिष्य पाहुन आनंद होतो व ते मोठ्या प्रेमाने शिष्यास नामरुपी अनुग्रह देतात. नाम हे निर्गुण परमात्म्याचे असल्यामुळे ते चैतन्यरुप व ब्रह्मरुप असे असते. नाम हे कधीच स्थुल, अचेतन व अंधकारमय तमोगुणी असे नसते. नाम हे शुद्धसत्वमय असे असल्यामुळे नामधारक हा शुद्धसत्वमय बनुन जातो. ज्याचे ज्याप्रकारचे चिंतन असते, त्यास त्याप्रकारचा अनुभव येतो. हा निसर्गाचा नियमच आहे. म्हणुनच म्हणतात की,
।।जसे ज्याचे चिंतन। तसे त्याचे होते मन।।
त्यामुळे निर्गुण परमात्म्याचे नाम घेतांना मन हे परब्रह्माशी तादात्म पावते. यासाठी दररोज क्रियायुक्त नाम घेण्याची साधकाची तयारी पाहीजे. काहीजण थोडे दिवस नाम घेतात, नंतर मात्र महिनों महिने नामच घेत नाहीत. नंतर असे साधक नाम घेऊन काहीच फायदा झाला नाही असे रडगाणे गात बसतात. काहीजण अनुग्रह घेतल्यावर तात्काळ ईश्वरदर्शन वा आत्मसाक्षात्कार होतो अशी गोड (गैर) समजुत करुन घेतात. तसा अनुभव न आल्यामुळे नाम जपणे सोडुन देतात. क्रियायुक्त नाम न घेतल्याने ते (अभागी) साधक दिव्य अनुभवाला पारखे होतात. त्यामुळे गुरुंनी सांगितल्याप्रमाणे नाम घेतल्याने साधकास दिव्य अनुभव येऊ लागतात. नाम हे आपोआपच चालु होणे हे नाम समजल्याचे लक्षण आहे. असो.
अनुग्रहाच्या वेळी सद्गुरु शिष्याच्या मस्तकावर कृपाहस्त ठेवतात व त्यास नाम सांगतात. शिष्य नाम घेत असतांना गुरु त्यास एकप्रकारची गती देतात. नाम घेण्याची क्रिया समजाऊन सांगतात. शिष्याचा दृढनिश्चय, वैराग्य व ज्ञानपिपासा पाहुन सद्गुरु शक्तिपाताच्या क्रियेने दिक्षा देतात. त्यायोगे शिष्याच्या शरिरांतर्गत बदल होऊ लागतात. त्याच्या शरीरातील मानसिक घडामोडी तीव्र वेगाने किंबहुना प्रकाशाच्या वेगेपेक्षाही दुप्पट वेगाने घडु लागतात. सारे शरीर कंपायमान होते. दृष्टी कधी अर्धोन्मिलित तर कधी बंद असते. सद्गुरु नामजपास आणखी गती देतात. शिष्याचा श्वासोश्वास हा जलद गतीने पडु लागतो (भस्रिका प्राणायमाच्या वेळी जसा श्वासोश्वास होतो तसा). शरीर कधी उजवीकडे, डावीकडे तर कधी मागेपुढे जलद गतीने हलु लागते. जप हा मध्यमेतुन सुरु झाल्याने शिष्यास आणखी काही करावे लागत नाही. विशिष्ठ प्रकारची तंद्रावस्था अनुभवास येते. जड समाधिचा नकळत लाभ होतो. अंतर्मन जाग्रुतीचा बाह्य मनास स्पर्श झाल्यामुळे एक दिव्य आनंदाची नशा जडते व या नशेत साधक आनंदाने रडू लागतो. त्यास ही अवस्था बिलकुल आवरता येत नाही. त्याला कशाचीही शुद्ध रहात नाही. त्याचे डोळे अश्रुंनी डबडबलेले असतात. अष्टसात्विक भाव जागृत झाल्यामुळे तो निश्चेष्ठ पडतो. किंवा, जोरजोराने हुंदके देऊन रडू लागतो. शिष्य ज्या गुणाचा तशी अवस्था अनुग्रहाच्या वेळी प्रगट होते. रडतांना शिष्य घुटके गिळु लागतो. शरीराच्या अंतर्बाह्य एक प्रकारची सुखद संवेदना जाणवु लागते.
।। आपणा सारखे करीती तात्काळ। नाही काळवेळ तयालागी।।
असा सद्गुरुंचा महिमाच आहे. आणि हे खरेच आहे. अशा प्रकारचा अनुग्रह झाल्यामुळे कित्येक साधक आजही दिव्य आनंदाचा लाभ घेत आहेत व आजही ब्रह्मभावात आहेत.
क्रियायुक्त नाम कसे घ्यावे हे समजल्यामुळे साधक दररोज त्यापद्धतीने नाम जपतो. त्यायोगे मन प्रसन्न होऊ लागते. मानसिक ताणतणाव कमी होत जाऊन साधक मोठ्या प्रसन्नतेने व्यवहार करु लागतो. त्याच्या देहातील जडतत्वे कमी होत जाऊन साधक उच्चतर प्रांतात प्रवेश करतो. त्यास दैवी अनुभव येऊ लागतो. शरीर हलके हलके होते. शरीरांतर्गत जागृत असलेली शक्ती ही सुषुम्ना नाडीच्या तोंडाला धक्के मारु लागते. किंबहुना सुषुन्मा नाडीत त्या शक्तीचा संचारही होऊ लागतो. त्यामुळे
शिष्याच्या चेहऱ्यावर सात्विकतेचा प्रकाश चमकु लागतो. यानंतर साधकाने काही पथ्ये जरुर पाळावीत.
साधकाने पाळायची काही पथ्ये
8ब्रम्हचर्याचे पालन करावे.
8प्रत्येक स्रीच्या ठायी मातृभाव असावा.
8खोटे बोलु नये.
8चौर्यकर्म किंवा व्यभिचार करु नये.
8सर्वांशी नम्रपणे वागावे.
8गुरुंच्या भेटीसाठी नियमित जावे व त्यांच्याकडु नामजपाची गती वाढवुन घ्यावी. चुकलेल्या क्रिया पुन्हा समजाऊन घेतल्यास तो शिष्य पाहता पाहता आत्मस्वरुपाचा अधिकारी बनु शकतो.
8सत्संग व शत्शास्र यांचा सहवास करावा.
8ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, भागवत, गीता तसेच चांगदेव पासष्टी व उपनिषदे समजुन घ्यावीत.
8मन हे जास्तीत जास्त अंतर्मुख करावे.
8दुसऱ्यांचे दोष न पाहता आपल्यातील दोष कमी करीत जावे.
8एकादशीला नियमित उपवास करावा.
8नियमबद्ध काम करावे. आजचे काम उद्यावर टाकु नये.
8स्वधर्मावर वाटचाल करावी.
8अश्लिल व बिभित्स वाचणे कटाक्षाने टाळावे.
मित्रांनो, अनुग्रह घेतांना जी अवस्था होती ती दिवसेंदिवस वाढु लागते. शिष्यांचे लक्ष संसारातील घडामोडींवर रहात नाही. (याचा अर्थ असा की, तो संसार करतो पण विरक्त मनाने. सुख-दुःख मनास स्पर्शु देत नाही.) त्याचे डोळे नुसत्या भगवत् स्मरणानेच ओले होतात. गुरुंच्या भेटीसाठी तो व्याकुळ होतो. गुरुंच्या आठवणीने त्यास रडु येते. साधकांच्या संपर्कात जास्त काळ घालवतो. अशी अवस्था जास्त काळ राहु लागली तर गुरु त्याची पारख करतात. त्याच्यात वास करीत असलेले दैवी गुण जागृत होत आहेत की नाही,त्याची चाचपणी करतात. तसेच त्याचे दोष क्षीण झाले आहेत की नाही त्याचीही ते परिक्षा घेतात. नंतर मात्र शिष्य या परिक्षेला उतरला तर वेळ येते ती प्रबोधनाची. प्रबोध घेणे म्हणजे महावाक्याचा स्विकार करण्याची आलेली योग्य वेळ होय. ही सर्वश्रेष्ठ परिपुर्ण प्रक्रिया आहे. जे सद्गुरु शिष्यांना अनुग्रह देतात तेच त्यास प्रबोध देतात. शिष्याची अवस्था अंतर्मुख करतात. हा महावाक्याचा बोध प्राप्त झाल्यावर अध्यात्मिक शक्ति जागृत करुन ती उफराटी करतात. योग्य वेळ आल्यावर असे भाग्यवान शिष्य आपली शक्ति बहिर्मुख करुन ती लोककल्याणाकडे वळवतात. बहुजन हिताय, बहुजन सुखाय अशी त्यांची वृत्ती होते. नाथा घरची उलटी खूण ज्यास समजली तोच खऱ्या अर्थाने साधू बनतो. आणि ही खूण प्रबोध झाल्यावर जास्त समजते. म्हणुनच अनुग्रह घेतल्यावर प्रबोध अवश्य घ्यावा. काही सांप्रदायिक गुरु प्रथम अनुग्रहरुपी नाम देण्याएवजी प्रबोध देऊन महावाक्याचा उपदेश करतात. पण तसे करणे योग्य नाही. कारण बीज पेरण्यापुर्वी उत्तम मशागत केली पाहीजे, तरच बीज पेरुन फायदा होतो. अन्यथा बीजांकुर होण्यापुर्वीच बीज करपुन जाते. तसलाच हा प्रकार समजावा. याठिकाणी अनुग्रह घेणे म्हणजे मनावर संस्कार करणे व मन हे भक्तिने, नामस्मरणाने नांगरुन तयार ठेवणे होय. एकदा का मन तयार झाले तर मग प्रबोधरुपी बीज पेरावयास हरकत नाही. असो.
दहावीची परिक्षा चांगल्या मार्कांनी पास झालो तर उच्च शिक्षणासाठी प्रवेश निश्चित होतो. जर आपण आयुष्यभर दहावीचाच अभ्यास केला तर प्रगती ही काहीही होणार नाही. त्याचप्रमाणे अनुग्रह घेतल्यानंतरची श्रेष्ठ वेळ येते ती प्रबोधनाची. हे लक्षात ठेवावे. जसा अनुग्रह बळजबरीने घेता येत नाही, त्याचप्रमाणे काहीही अनुभव न येता प्रबोध घेण्यासाठी उतावीळ होऊ नये. सद्गुरुंच्या संपर्कात राहीलो तर हा अनुभव लवकर येतो. निरंजन कवींनी सद्गुरुस्तवनामध्ये म्हटलेलेच आहे की,
प्रबोध करीता श्रम फार झाला। विसरु कसा मी गुरुपादुकाला।।
प्रबोध मिळाल्यावर शिष्य खऱ्या अर्थाने जीवनमुक्तिच्या क्षेत्रात प्रवेश करतो व तो हळुहळु विश्वस्वप्नातुन जागा होऊ लागतो. साधकाचे डोळे ज्ञानाने चमकु लागतात. मनातील विषयवासना कमी होत गेल्यामुळे साधकास खुपच दिव्य अनुभव येऊ लागतात. कोणाला दिव्य दर्शन, दिव्य स्वप्न स्वप्ने पडु लागतात. कोणाला देवादिकांचे दर्शन होते. कोणाला क्षुद्र सिद्धिंचा लाभ होतो. पण खऱ्या साधकाने स्वतःस वरील चमत्कारांत अडकवुन घेऊ नये.
अनुग्रह देण्यापुर्वी सद्गुरु शिष्यास काही सर्वमान्य अटी सांगतात, त्या अशा...
8दर एकादशीला उपवास करावाः- महिन्यातुन येणाऱ्या दोन्ही एकादशीस उपवास करावा. यामागे शास्रिय दृष्टीकोन आहे. उपवास याचा अर्थ निरंतर मनाने ईश्वराजवळ रहाणे व ईश्वर चिंतन करणे. उपवासामुळे मन सुक्ष्म होते. या दिवशी काहीही न खाता केवळ पाणी पिऊन लंघन करावे. कोणाला असे लंघन करणे शक्य नसल्यास फळांचा रस घ्यावा, लिंबु पाणी घ्यावे. या दिवशी पोटास पुर्णपणे विश्रान्ति द्यावी. त्यामुळे पोटातील स्नायु कार्यक्षम होतात व चेहरा तेजस्वी होतो.
8धार्मिक ग्रंथाचे वाचनः- ज्ञानेश्वरी, भागवत, योगवासिष्ठ यांसारख्या धार्मिक ग्रंथांचे वाचन करावे, मनन करावे, चिंतन करावे. असे आत्मोन्नतीपर ग्रंथ वाचल्याने अध्यात्मिक विचारांची बैठक पक्की होऊ लागते. सद्गुरुंचा बोध मनात पक्का होऊ लागतो. विचारात प्रौढत्व येते. सात्विक मन झाल्यामुळे आपले आचरण शुद्ध होते. हातुन वाईट कृत्ये होत नाहीत. मन व बुद्धि प्रगल्भ होते. ईश्वराची भक्ति दृढ होऊ लागते. त्यामुळे न कंटाळता दररोज ग्रंथांचे वाचन करावे.
8तुळसीला पाणी घालावेः- तुळशी ही पवित्र वनस्पती आहे. तिच्यामुळे घरदार पवित्र होते. जंतूंचा नायनाट होतो व प्राणशक्तीचा उदय होतो. त्यामुळे आपल्यालाही मुबलक प्रमाणात प्राणवायू मिळतो. तुळशी ही विष्णुला प्रिय आहे. त्यामुळे तुळशीत ईश्वराचे रुप पाहिल्याने सर्वाभुति ईश्वर आहे हा बोध दृढ होतो. म्हणुनच तुळशीला पाणी घालावे व तुळशीची पूजा करुन प्रदक्षिणा घालावी.
8दररोज नाम घ्यावेः- नामस्मरण तर नियमित करावेच, पण क्रियायुक्त नाम घ्यावेच. आपल्या मेंदुत जन्मोजन्मीच्या ज्या दुषित लहरी असतात त्या लहरी बाहेर पडुन वातावरण दुषित करण्याचे काम करतात. दररोज नाम घेत गेल्याने अशा दुषित लहरी नाहिशा होतात व अत्यंत पवित्र आणि सात्विक लहरी निर्माण होऊन भोवतालचे वातावरण पवित्र करतात. दररोज नाम घेत गेल्याने आपल्या बुद्धिवरील अनंत जन्माचे संस्कार नाहिसे होत जातात व आपण दिवसेंदिवस आत्मज्ञानाच्या समिप जाऊ शकतो. दृष्टी व वाणी पवित्र ठेवावीः- दुःखद वा कामोत्तेजक दृश्य पाहिल्याने मन चंचल व अस्थिर होते. दुसऱ्यांचे दोष पाहिल्याने वा विनाकारण भांडल्याने मन बेचैन होते. यामुळे साधना करतांना अडथळे येतात. मनाचे अधःपतन होते. यासाठी दृष्टी व वाणी पवित्र ठेवणे हितावह आहे.
8दररोज हरिपाठ म्हणावाः- भगवान ज्ञानेश्वरांच्या हरिपाठात हरिनामाचा महिमा गाईला आहे. नामावर चित्त हळुहळु जडु लागले की, मन हे नाममय होऊ लागते. एकदा का दैवी नामात मन तल्लिन झाले की, शरीर नादमय होऊ लागते. कुंडलिनि शक्ति जागृत होऊ लागते. सद्गुरुंनी दिलेले नाम व ईश्वराचे सगुण रुपातील नाम यात कसलाही भेद न उरल्याने, साधकाने कोठलेही नाम जपले तरी त्यास एकच दैवी अनुभव येऊ लागतो. यासाठी हरिपाठ हा समजुन म्हणावा.
..........डी सिताराम