शनिवार, १२ मार्च, २०११

संन्याशी

माझ्या मित्राचा भाऊ लहानपणापासुनच हिमालयात त्याच्या गुरुंच्या आश्रमात ज्ञानार्जनासाठी गेला होता. तेथे त्याने काही साधना केल्या, तप केले, प्राणायाम केले. त्यायोगे त्याचे शरीर तेजस्वी बनले. चेहऱ्यावर एक वेगळीच आभा आली होती. नंतर एक तप उलटल्यावर साधारण बारा वर्षांनी तो आप्तस्वकियांना भेटण्यासाठी तो घरी आला. तपस्वी भाऊ आला  म्हटल्यावर सगळ्यांनाच खुप आनंद झाला. खुप जण भेटावयास येऊ लागले. इतके वर्ष एकांतात राहीलेला आता लोकांत आल्यामुळे तो गोंधळुन गेला. त्यास टि.व्ही. पाहण्याचे वेड लागले. त्यांस बारा वर्षात स्रियांचे दर्शन न झाल्यामुळे तो टि.व्ही. वरील फॅशन शो, चार चौघात बघता न येण्यासारखे शो तो मोठ्या रुचीने पाहु लागला. ते पाहत असतांना तो चेकाळल्यासारखे करी. त्यास आजुबाजुच्या परिस्थितीचे सुद्धा भान नसे.
एके दिवशी त्यास भेटावयास खुपजण भेटण्यास आले होते. ही स्वारी टि.व्हि. पाहण्यास गुंग होती. आणि हा जोरजोरात टाळ्या पिटत होता. त्याच्या भावास हे सर्व असह्य झाले. त्याने तात्काळ टि.व्ही. बंद केला. कनेक्शन काढुन टाकले. या संन्याशी भावाने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. टी.व्ही. पाहण्याचा हट्ट धरला. भावास तो वाटेल ते बोलु लागला. त्याला बोलावयास आलेली मंडळी आवाक झाली. त्यांनी विचार केला की, इतकी वर्ष हिमालयात तपश्चर्या करणारा हा संन्याशी, याने अजुनही वासनेचा त्याग केला नाही? वासनाधिन कसा होऊन राहीला? विकार जर याच्या नियंत्रणात नाहीत, तर याने तपश्चर्या करुन काय कमावले?

सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला व ते निघुन गेले. भावाने शरमेने मान खाली घातली. नंतर क्रोध निघुन गेल्यावर संन्याशी भावास पश्चाताप झाला. त्याला आश्चर्य वाटत होते की, इतकी वर्ष या वासनेने मला पछाडले नाही. पण लोकांत आल्यावर ही वासना मनात उपजली. याचा अर्थ वासनेचा पुर्ण क्षय झाला नाही. एकीकडे समजत होतो की, मी वासनेवर जय मिळवला, पण ते खोटं होतं. मनातली वासना पुर्ण निर्बिज झाली नाही. त्याला स्वताचीच लाज वाटु लागली. त्याने भावाची क्षमा मागितली व तो पुन्हा तपश्चर्या करण्यासाठी हिमालयात निघुन गेला, परत कधी न येण्यासाठी.

.......डी सिताराम