गुरुवार, १४ एप्रिल, २०११

दत्ता म्हणे

कधी भेटशी रे सख्या पांडुरंगा।
अपराध सांगा काय झाला।।
मोह माया पाश सारियेले दुरी।
नको बा श्रीहरि दुर जाऊ।।
ओढ दर्शनाची लागली मनाशी।
येऊनी वेगेशी भेट देई।।
दत्ता म्हणे जीव झाला कासाविस।
झालो बा उदास जनीवनी।।
    ......डी सिताराम

स्वगत- एक चिंतन

मी पातोंड्याचा, आम्ही दोघं भाऊ व एक लहान बहिण, भाऊ मोठा, मी दुसरा व बहिण माझ्या पाठची.
वडिल घरच्याघरी टेलर काम करीत. आई दुसऱ्यांच्या शेतावर जाऊन मोलमजुरी करत असे.
लहानपणी आमची गरीबीची परिस्थिती होती. अत्यंत हालाखीत बालपण गेले. वडिलांनी आम्हाला वाचनाची गोडी लावली. आम्ही खड्या आवाजात कविता व पाढे म्हणत असु. आई विठ्ठलाची भक्ति करत असे. विठ्ठल मंदिरात जाऊन मी विठ्ठलास नमस्कार करत असे. व विठ्ठलास प्रदक्षिणा मारत असे. त्या बालवयात माझे व विठ्ठलाचे काहीतरी नाते आहे, असे मला सतत वाटत असे. विठ्ठलाची मुर्ति मी डोळे भरुन पाहत असे. त्यावेळी मला काळ वेळाचे भान राहत नसे. हा कालखंड माझ्या विठ्ठलाच्या अनिवार ओढीचा होता. मंदीरात जेव्हा हरिपाठ होत असे त्यावेळी माझे भान हरपुन जात असे. टाळ मृदुंगाचा ध्वनी मला बेहोष करत असे व मी तहानभुक विसरुन जात असे. मोठेपणी मला कळाले की, मी लहानपणीच नाद समाधीचा अनुभव घेतला होता.
मी लहान असतांनाची गोष्ट, माझ्या मित्राचा नवस फेडण्यासाठी आम्ही पातोंड्याहुन बैलगाडीने चाळीसगांव जवळील पाटणादेवीस निघालो होतो. पाच सहा बैलगाड्या होत्या. मी माझ्या आई सोबत होतो. रात्रीची वेळ होती. आकाशात पुर्णचंद्र होता. खुपच छान वातावरण होते. सगळीकडे पिठुर चांदणे पडले होते. आकाशात चांदण्या चमकत होत्या. बैलांच्या गळ्यातील घुंगरांचा आवाज वातावरण प्रसन्न करत होता. मी दिग्मुढ होऊन तो देखावा पाहत होतो. मीच सगळीकडे आहे असे वाटु लागले होते. सारे वातावरण मीच बनलो आहे, असा अनुभव मी घेत होतो. आकाशातील चंद्र तारे व आसमंतात पसरलेला नाद सारे काही मीच बनलो होतो. हळुहळु माझी जाणिव हरपत होती व मन दिव्य आनंदाचा वेध घऊ लागले होते. माझ्या सकल संज्ञा हरपल्या व मी निचेष्ट पडलो. कितीतरी वेळ मी त्या तंद्रित होतो कोणास ठाऊक पण ज्यावेळी मी डोळे उघडले, त्यावेळी आम्ही पाटण्याच्या डोंगराजवळ आलो होतो.  चंद्र पश्चिमेला कलला होता. हा माझा पहिला साक्षात्कार असावा. कारण या घटनेनंतर मी बऱ्याचदा नकळत या आनंदात रमुन जात असे. त्यावेळी मला काळ वेळाचे भान रहात नसे. एखादी गोष्ट हातुन होण्यास विलंब लागत असे.
आम्ही भावंडं जेव्हा कंदिलाच्या उजेडात अभ्यास करत असु त्यावेळी तो धुर ओकणारा कंदिल, माझा भाऊ व
आमच्यावर पहारा करत असलेले माझे पिताश्री व मी हे जणू काही एकाच वस्तुचे बनले आहोत आणि ती वस्तु माझ्या ह्रदयात वसली आहे असे मला सारखे वाटे व मन त्या एकात्ममतेचा अनुभव घेण्यास रमुन जात असे. अशावेळी माझे अभ्यासात लक्ष नाही म्हणुन मी वडिलांच्या हातचा मार देखील भरपुर वेळेस खाल्ला आहे.
लहानपणीच माझ्या हातुन काही साधना झाल्या, पांडुरंगाची भक्ति घडली. खुप दिव्य अनुभव आलेत.
माझे पहिले अध्यात्मिक गुरु पाटणादेवीचे थोर भक्त स्वामी प्रणवानंद हे होत. त्यांच्या प्रसादाने खुप दिव्य अनुभव आले. त्यानंतर कॉलेजचे शिक्षण पुर्ण केल्यावर मी कोकणात गेलो. तेथे वर्षभर शिक्षकाची नोकरी करुन मी नागोठण्याला आय पी सि एल कंपनीत कामाला लागलो. या मधल्या कालखंडात मनातील विकारांशी झगडत मी योगवासिष्ठ या दिव्य ग्रंथाचे वाचन करत होतो. त्या ग्रंथातील अपौरुषीय तत्वज्ञानाने मी धुंद होत असे. हा ग्रंथ समजण्यास खुपच अवघड आहे. त्यामुळे तो फारसा लोकप्रिय नाही. खुप जणांना या विषयी माहितीही नसेल. पण या ग्रंथाचा  माझ्या मनावर खुप खोलवर प्रभाव पडला आहे.
मी 1994 साली सद्गुरुंचा अनुग्रह घेतला. माझे सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद महाराज (घोटीकर) हे होत. त्यांच्या
अनुग्रह बलाने माझी अध्यात्मात चांगली प्रगती झाली. त्रिपुटींचा हळुहळु क्षय व्हायला लागला होता. जगताविषयी फारशी आसक्ती राहीली नव्हती. माझा तो काळ विश्वस्वप्नातुन जागे होण्याचा होता. पण काही कर्म बीजे शिल्लक राहील्याकारणामुळे मी संसारात रमलो होतो. उदासिन वृत्ती एकीकडे तसेच संसाराची ओढ एकाकडे. त्यामुळे मी सद्गुरुंच्या मार्गदर्शनाखाली नामस्मरणाचा मारा चालु ठेवला. प्रगती होत होती. हातातुन काही लिखाण झाले. काही काव्य निर्मिती झाली. याच सुमारास मला गायत्रीदेवीचा साक्षात्कार झाला. तो कालावधी माझ्या अध्यात्मदृष्टीने खुपच चांगला गेला. मी काही जीवन्मुक्त नाही पण जीवन्मुक्तीचा अनुभव घेतला आहे. अध्यात्माबरोबर माझा संसार देखील चांगला चालु होता. दोन मुले झाली. मोठा मुलगा अमोल व छोटी कन्या अमृता. आता दोघेही भावी कलाकार आहेत. पण त्यांना कलाकार म्हणुन घडवण्यासाठी आम्हा उभयतांची खुपच धावपळ झाली. त्या कालखंडात पाच वर्ष आमचा संसार थाऱ्यावर नव्हता. कारण मुलांची आवड जोपासण्यासाठी गुरुंचा शोध घेणे क्रमप्राप्त होते. माझ्या या वेडेपणाला माझे मित्र हसत होते. पण त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करुन माझे काम मी करत होतो. शेवटी कुटुंब हे कधी पेण कधी नागोठणे(रायगड) असे स्थलांतर करीत शेवटी पुण्याला स्थिरावले. मुलांनी कलाक्षेत्रात चांगली प्रगती केली. अमोल हा तबला स्पर्धेत देशपातळीवर तीन वेळा प्रथम क्रमांकाने आला. अमृताने तर व्हॉयलिन सारख्या अवघड वाद्यावर प्रभुत्व मिळवले, ती बासरीपण छान वाजवते. तसेच ती हार्मोनियम हे वाद्य मोठ्या तयारीने वाजवते. तिला
पं. अप्पासाहेब जळगावकरांचा आशीर्वाद व मार्गदर्शन मिळाले आहे. अमोल हा पुण्याला पं. सुरेश सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली शिकतो आहे. सध्या तो ललित कला केंद्र पुणे येथे म्युझिक करतो आहे. त्याला त्याच्या गुरुंनी छोटा पंडित ही पदवी प्रेमाने बहाल केली आहे. कॉलेजमधील सगळेजण त्याच्या तबला वादनावर खुश आहेत.
या परिस्थितीत येण्यासाठी खुपच संकटांना तोंड द्यावे लागले. काही मित्रांनी मला चांगले म्हटले तर काहींनी माझा उपहास केला. पण या साऱ्या संकटांना मी केवळ अध्यात्मामुळेच तोंड दिले. न में भक्त प्रणश्यति।। ( माझा भक्त कधीही नाश पावत नाही ) भगवान श्रीकृष्णांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी माझा व माझ्या परिवाराचा सांभाळ केला. मला प्रत्येक संकटातुन त्यानेच वाचवले. माझा पाय सन्मार्गावरुन कधीच ढळु दिला नाही. पांडुरंगाचा कृपा आशीर्वाद माझ्या व माझ्या कुटुंबाच्या पाठीशी आहे, असे मला सतत वाटत रहाते. आता तर पांडुरंगच माझा श्वास व प्रश्वास बनला आहे. मी मोठा भक्त आहे असेही नाही. तशी माझी योग्यताही नाही. पण माझा भोळा भाव मी पांडुरंगाच्या चरणी अर्पण केला आहे. तो ठेवील तसा मी रहाणार आहे. पण येवढे मात्र नक्की की,...........
जेथे जातो तेथे तु माझा सांगाती।
चालविसी हाती धरुनिया।।
या संतोक्तिनुसार मला अनुभव येत आहे.पांडुरंगाने माझा सर्वतोपरी सांभाळ केला व या पुढेही तो करीत राहील.
जय हरि.