शनिवार, ९ एप्रिल, २०११

दत्ता म्हणे

एक
खरा तोचि जाणा साधु।
नाही विकारांशी बाधु।।
करी परउपकार।
नाही सरती माघार।।
निंदा साहे जनी वनी।
स्थिर अंतरी लक्षुनी।।
दत्ता म्हणे असा साधु।
करी सकलांशी बोधु।।

दोन
आयुष्य हा खातो काळ।
कशी जीवा पडे भुल।।
हिच मायेची करणी।
नये कवणाच्या ध्यानी।।
संसारात रमे जीव।
तन मन अर्पी भाव।।
दत्ता म्हणे सावधान।
सोडी सोडी अभिमान।।

   .....डी सिताराम

मानव जन्म- एक काव्य

नाना विकार, वासना घेऊनी
मानव देही आला
गत जन्मींचे कर्म भोग तो
कसा विसरुनी गेला

जीवास सुखी करण्यासाठी
पैशापाठी धावतो
परि सुख कोठे, भास तयाचा
मृगजळापरी फसतो

कर्तृत्वाचे पंख लाऊनी
गगनी झेपावतो
तसाच व्यसने, छंद लाऊनी
अधःपतीत होतो

एक दुर्गुणी रावण होतो
एक सद्गुणी राम
कधी जिंकतो रावण दुर्गुण
कधी जिंकतो राम

खरी लढाई मनात होते
भाव भावनांची
नसे शेवट या युद्धाचा
ठाऊक नसे विरंची

   .....डी सिताराम

सुनामी

जपानच्या सागर किनारी
धरणीकंप झाला
लाटा उसळल्या गगनचुंबी
काल स्तब्ध झाला

नसे कोणाला माहित यातले
सारे सुरळीत होते
उद्याची चिंता मनी ठेऊनी
व्यवहार करीत होते

साऱ्या जगाशी स्पर्धा तयांची
विसरुनी गतकाल
ताठ मानेने उभा राहीला
होता उषःकाल

परि तयांचे नशिबी अजुनी
भोग सरले नव्हते
होऊनी काळ कृतांत लाटा
सारे केले वाहते

होते नव्हते वाहुन गेले
संसार उघडा झाला
पाहुनी करुण दृश्य तयांचे
यमही थरकापला

      ......डी सिताराम

अण्णा हजारे- एक तुफान

सन्मार्गाने मागता येते
लढाई झगडा न करता
सारा देश येतो साथीला
अण्णा हजारे नेता

राजवट ही ढवळुन गेली
हादरले राजकारणी
भ्रष्टाचाराला भय सुटले
जणु थरथरे धरणी

बापुजींच्या मार्गावरती
अण्णा चालत होते
त्यांच्या मागुन सारी जनता
अनुशिलन करते

असा स्वच्छ सद्गुणी नेता
साऱ्या जगाने पाहिला
वंदन करुनी तया मुर्तीस
साथ देऊ तयाला

      .........डी सिताराम