सोमवार, १५ ऑगस्ट, २०११

अंतर्मनाची जागृती- एक चमत्कार...

या ठिकाणी माझा एक अनुभव सांगणे वावगे होणार नाही असे मला वाटते...याचे कारण असे की, माझ्या सारख्या यत्किंचित माणसाला असे अनुभव येऊ शकतात तर जो कोणी भाग्यवान साधक अध्यात्मात अमळ प्रगत असेल तर त्याला याहुनही जास्त प्रमाणात अनुभव नाही का येऊ शकणार.....
माझा एक अनुभव....
लहानपणी आमची गरीबीची परिस्थिती होती. अत्यंत हालाखीत बालपण गेले. वडिलांनी आम्हाला वाचनाची गोडी लावली. आम्ही खड्या आवाजात कविता व पाढे म्हणत असु. आई विठ्ठलाची भक्ति करत असे. आई बरोबर मी पण विठ्ठल मंदिरात जात असे व विठ्ठलास नमस्कार करत असे. विठ्ठलास प्रदक्षिणा मारत असे. त्या बालवयात माझे व विठ्ठलाचे काहीतरी नाते आहे, असे मला सतत वाटत असे. विठ्ठलाची मुर्ति मी डोळे भरुन पाहत असे. त्यावेळी मला काळ वेळाचे भान राहत नसे. हा कालखंड माझ्या विठ्ठलाच्या अनिवार ओढीचा होता. मंदीरात जेव्हा हरिपाठ होत असे त्यावेळी माझे भान हरपुन जात असे. टाळ मृदुंगाचा ध्वनी मला बेहोष करत असे व मी तहानभुक विसरुन जात असे. मोठेपणी मला कळाले की, मी लहानपणीच नाद समाधीचा अनुभव घेतला होता.
मी लहान असतांनाची गोष्ट, माझ्या मित्राचा नवस फेडण्यासाठी आम्ही पातोंड्याहुन बैलगाडीने चाळीसगांव जवळील पाटणादेवीस निघालो होतो. पाच सहा बैलगाड्या होत्या. मी माझ्या आई सोबत होतो. रात्रीची वेळ होती. आकाशात पुर्णचंद्र होता. खुपच छान वातावरण होते. सगळीकडे पिठुर चांदणे पडले होते. आकाशात चांदण्या चमकत होत्या. बैलांच्या गळ्यातील घुंगरांचा आवाज वातावरण प्रसन्न करत होता. मी दिग्मुढ होऊन तो देखावा पाहत होतो. मीच सगळीकडे आहे असे वाटु लागले होते. सारे वातावरण मीच बनलो आहे, असा अनुभव मी घेत होतो. आकाशातील चंद्र तारे व आसमंतात पसरलेला नाद सारे काही मीच बनलो आहे अशा अनुभवात मी रमुन गेलो, हळुहळु माझी जाणिव हरपत होती व मन दिव्य आनंदाचा वेध घऊ लागले होते. माझ्या सकल संज्ञा हरपल्या व मी निचेष्ट पडलो. कितीतरी वेळ मी त्या तंद्रित होतो कोणास ठाऊक पण ज्यावेळी मी डोळे उघडले, त्यावेळी आम्ही पाटण्याच्या डोंगराजवळ आलो होतो. चंद्र पश्चिमेला कलला होता. मन माझे अतिशय हलके हलके झाले होते.. डोळ्यांसमोर एकतत्वाच्या लहरी दिसत होत्या... सारे काही एकच आहे....अशा अनुभवात मी रमुन गेलो... हा माझा पहिला साक्षात्कार असावा. कारण या घटनेनंतर मी बऱ्याचदा नकळत या आनंदात रमुन जात असे. त्यावेळी मला काळ वेळाचे भान रहात नसे. एखादी गोष्ट हातुन होण्यास विलंब लागत असे. आम्ही भावंडं जेव्हा कंदिलाच्या उजेडात अभ्यास करत असु त्यावेळी तो धुर ओकणारा कंदिल, माझा भाऊ व आमच्यावर पहारा करत असलेले माझे पिताश्री व मी हे जणू काही एकाच वस्तुचे बनले आहोत आणि ती वस्तु माझ्या ह्रदयात वसली आहे असे मला सारखे वाटे व मन त्या एकात्ममतेचा अनुभव घेण्यास रमुन जात असे. अशावेळी माझे अभ्यासात लक्ष नाही म्हणुन मी वडिलांच्या हातचा मार देखील भरपुर वेळेस खाल्ला आहे. असो......( क्रमशः )
                                                     ...............डी सिताराम

आपले अंतर्मन- एक चमत्कार

अंतर्मन हेच परब्रह्म आहे. ज्ञानदेवांचा बापरखुमादेवीवरु, तुकोबा नाम्याचा लाडका विठ्ठल म्हणजे अंतर्मनच होय. ज्ञानदेवादि भावंडे जन्मतःच मुक्त होती. त्यांचे अंतर्मन जन्मतःच जागृत झाले होते. त्यांच्या बाह्यसंज्ञा, बहिर्मनातील घडामोडी ह्या लुप्त झाल्या होत्या. त्यामुळे जगातील जाचक दुःखे बाधु शकले नाहीत. लोकनिंदा त्यांनी हसत हसत सहन केली. ज्ञानदेवांच्या हातुन काही अतर्क्य चमत्कार घडले, पण चे चमत्कार त्या त्या प्रसंगानुरुपच होते. त्यांनी निसर्ग नियमांविरुद्ध ढवळा ढवळ केली नाही.
अशा संतांनी हवेतुन वस्तु, अंगारा आदि भौतिक वस्तु काढुन लोकांना त्यांच्या नादी लावले नाही, किंवा चमत्कार त्यांनी प्रसिद्धिसाठीही केले नाहीत. कारण ते विश्वस्वप्नातुन जागे झालेले महात्मे होते. त्यांनी स्वतःला संत किंवा, अवतारी म्हणवुनही घेतले नाही. उलट ते संतांच्या दासांचाही दास म्हणवुन घेत. हे आताच्या स्वतःला संत, महाराज म्हणवणाऱ्या बाबांनी लक्षात घेतले पाहीजे. मित्रांनो, आपण डोळे उघडे ठेऊन वावरलो तर अशा नकली बाबांचे काही चालणार नाही. असो....संतांचे चमत्कार हे जनजागृतीसाठीच होते... मोठेपणा मिरवण्यासाठी नव्हते.. हे लक्षात ठेवले पाहिजे...त्यांना जगात अशक्य काहीच नव्हते.. साऱ्या जगावर त्यांची अप्रतिहत सत्ता चालत होती...कारण त्यांचे अंतर्मन हे पुर्णपणे जागृत झालेले होते. चारी मुक्ति, मोक्ष, साक्षात्कार आदि शब्द हे अंतर्मनालाच उद्देशुन आहेत. ज्यावेळी आपल्या बाह्यसंज्ञा क्षणभर का होईना बंद पडतात, किंवा, आपल्याला देहभान किंवा, विश्वभान नसते तितका वेळ अंतर्मन आपल्या बाह्य मनाचा व शरीराचा ताबा घेते. प्रत्येक जण व्यवहारात अशी स्थिती अल्पकाळ का होईना अनुभवत असतो... आपले आवडते गाणे ऐकत असतांना नकळत तंद्रावस्था लागते, त्यावेळी सभोवतालचा विसर पडतो. नंतर आपले मन खुपच आनंदित झाल्याचा अनुभव येतो... हा आनंद त्या गाण्यात नसुन तुमचे अंतर्मन क्षणभर बहिर्मनाला स्पर्श करुन जाते त्याचा तो आनंद असतो..
लहानपणी अशी तंद्रावस्था मी खुपच अनुभवली आहे.. एखादे नाटक पाहत असतांना, किंवा हरिजागर वा हरिकीर्तन ऐकत असतांना मला नकळत तंद्रावस्था लागत असे... व मला बाह्य जगाचा अत्यंत विसर पडत असे.. अशा वेळी माझे बाह्य मन पुर्ण लुप्त होई व हळु हळु माझी स्वतःची जाणीव देखील नाहिशी होत असे....माझ्या सारखेच सर्वांनाच होत असेल असे समजुन मी त्या अवस्थेकडे त्यावेळी दुर्लक्ष केले. पण तद्नंतर मात्र माझा या विषयांवरचा अभ्यास वाढला...त्यावेळी लक्षात आले की, ते बालपणीचे क्षण माझे अंतर्मन जागृतीचेच होते. मोठेपणी मात्र सदुगुरुंनी सांगितल्या प्रमाणे साधना घडल्या... त्या काळात आलेले अनुभव मात्र खुपच लोक विलक्षण होते... अर्थात ही स्थिती मला आजही येते.... काही वेळी मी जगाचेच काय पण माझेही भान हरपुन जाते... अशावेळी माझे मन अत्यंत दिव्य आनंदाचा वेध घेते.. ही सारी गुरु माऊलींचीच कृपा होय.... ....( क्रमशः )

                                                                                         ......डी सिताराम

मनी भास होता....

मनी भास होता मीच थोर आहे
मनी गर्व होता मीच सर्व आहे ।। धृ ।।
अहंकाराला ही पोशियेले भारी
काम वासनांनी  केले जग वैरी
भीती मरणाची दाटुनिया आहे
मनी गर्व होता मीच सर्व आहे ।।1।।
आयुष्य वायाची दवडले भारी
नाही पुण्य गाठी जोडले पदरी
श्वान सुकुराचे जीवन हे आहे
मनी गर्व होता मीच सर्व आहे ।।2।।
गर्व चुर्र झाला आज जाग आली
आई वडलांची पुण्याई संपली
काळ विकराळ दटाऊनी पाहे
मनी गर्व होता मीच सर्व आहे ।।3।।

           ....डी सिताराम

आपले अंतर्मन- एक चमत्कार

आज आपण स्वतःला आधुनिक व सुसंस्कृत समजू शकतो, परंतु सुखी मात्र मुळीच समजु शकत नाही. झोपेच्या गोळ्याशिवाय आपण झोपु शकत नाही, जुलाबाच्या गोळ्यांशिवाय आपले पोट सोफ होत नाही, टॉनिकशिवाय आपल्या अंगात शक्ति टिकवु शकत नाही. वेदनाशामक व गुंगीच्या औषधाच्या सेवनाचे प्रमाण वाढत चालले आहे. संपत्तिच्या लालसेने आपण पाषाण ह्रदयी व हावरट बनत चाललो आहोत.शारिरिक व मानसिक आजाराचे आपण कळत नकळत शिकार होत चाललो आहोत. मानसिक दृष्ट्या कमकुवत व अपंग बनत चाललो आहोत. यातुन सावरायलाच हवे. पण सावरणार कोण.. हा मोठा यक्षप्रश्न आहे.. जो तो मानसिक दौर्बल्याची शिकार होत चालला आहे. या साऱ्यातुन सुटका करण्याची शक्ती बाहेर नसुन ती तुमच्या आमच्या शरीरातच आहे... आपल्या मनातच आहे.. पण आपण कस्तुरीमृगाप्रमाणे बाहेरच कस्तुरीचा वास शोधत आहोत..
आपले अंतर्मनच ती शक्ति आहे. या शक्तिचा प्रभाव कायिक व मानसिक पडतो. बाह्यमन एक टक्का धरलो तर अंतर्मन हो आठ टक्का धरायला पाहिजे. पाण्यात हिमशिखराचे टोक दिसते पण खरा हिमपर्वत हा पाण्यात असतो. हिमटोक हे बाह्यमन धरले तर अंतर्मन हे हिमपर्वताप्रमाणे आहे..
कोणी एक थकला भागला जीव उन्हाने हैराण झाला होता. भर दुपारची वेळ. हा एका झाडाखाली विसावला. त्याच्या मनात विचार आला.. अहाहा किती थंडगार छाया आहे ही. या ठिकाणी थंडगार पाणी असते तर किती छान झाले असते.. विचार येण्याचा अवकाश.. त्याच्यासमोर थंडगार पाणी हजर झाले.. तो चपापला.. पण ते पाणी प्याला. त्याच्या मनात विचार आला की आता खाण्याचे ताट समोर असते तर किती बरे झाले असते.. विचार करायचा अवकाश. पक्वन्नाचे ताट त्याच्यासमोर हजर झाले.. मित्रांनो ही गोष्ट सर्वांनाच माहिती असेलच. ते झाड कल्पवृक्षाचे होते. मागाल तो पदार्थ तयार करण्याचे त्याच्यात सामर्थ होते. भगवंताने अस्साच कल्पवृक्ष प्रत्येकाजवळ दिलेला आहे. फक्त त्यास आपण ओळखत नाही. ही दुर्दैवाची गोष्ट आहे.. तो कल्पवृक्ष म्हणजेच आपले अंतर्मन होय.. होय अंतर्मनच तो कल्पवृक्ष आहे... हा विषय प्रत्येक शाळांमधुन लहानपणापासुनच शिकवला गेला पाहिजे. असे माझे स्वतःचे मत आहे.. त्यामुळे प्रत्येक जण या अंतर्मनाचे पुजारी बनतील व साहजिकच हिंसा, चोरी यांसारखे दुकर्म तरी टाळले जाईल.. पण आपल्या शिक्षण मंत्र्यांना कधी जाग येईल... आपले दुर्दैवच दुसरे काय.. पण पालकांनी ह्या विषयावर सखोल अभ्यास करुन आपल्या पाल्यांना हे लवकरात लवकर शिकवावे... ही माझी नम्र विनंती आहे.. त्यामुळे पाल्य हा सुजाण बनुन त्याच्या हातुन यौन अपराध होणार नाहीत व त्याची उर्जा नष्ट होणार नाही. पुढची पिढी तेजस्वी होईल... सुजाण पालकांनी हा विषय जास्तीत जास्त पालकांपर्यंत पोचवण्याची जबाबदारी घेतली पाहीजे.. असो....( क्रमशः )

                                                             ...डी सिताराम