शुक्रवार, २ सप्टेंबर, २०११

आरोग्याचा श्रीगणेशा....

मंगलमूर्ती व यशाचा मंत्र

 कोणतेही काम यशस्वी व्हावे, यासाठी सुरवातीला श्री गणेशाची प्रार्थना करण्याची पद्धत असते. श्री गणेश ही मूलाधारचक्राची देवता होय. मूळ आणि आधार या दोन शब्दांपासून मूलाधार शब्द तयार झालेला आहे. कोणत्याही गोष्टीचे मूळ पक्के असले, आधार भक्कम असला, की ती तडीला नेणे शक्‍य असते. अर्थातच मूळ रोवण्यासाठी, मजबूत आधारासाठी पृथ्वी महाभूतासारखे दुसरे तत्त्व नाही. म्हणूनच मूलाधार चक्रात पृथ्वीतत्त्वाचे अस्तित्व असते.

कोणतेही काम यशस्वी व्हावे, यासाठी सुरवातीला श्री गणेशाची प्रार्थना करण्याची पद्धत असते. श्री गणेश ही मूलाधारचक्राची देवता होय. मूळ आणि आधार या दोन शब्दांपासून मूलाधार शब्द तयार झालेला आहे. कोणत्याही गोष्टीचे मूळ पक्के असले, आधार भक्कम असला की ती तडीला नेणे शक्‍य असते. अर्थातच मूळ रोवण्यासाठी, मजबूत आधारासाठी पृथ्वी महाभूतासारखे दुसरे तत्त्व नाही. म्हणूनच मूलाधार चक्रात पृथ्वीतत्त्वाचे अस्तित्व असते.

आपले शरीर पंचमहाभूतांपासून बनलेले आहे हे आपण जाणतोच. पृथ्वीमहाभूताच्या गुणांना साजेसे असे जे काही भाव आहेत. उदा. नखे, हाडे, दात, मांसधातू, त्वचा, मळ, केस, स्नायू, घ्राणेंद्रिय यांना "पार्थिव' शरीरभाव म्हटले जाते. कोणत्याही गोष्टीला आकार देण्याचे कामही पृथ्वी महाभूताचे असते. त्यामुळे शरीरातील अवयवांवर उदा. फुप्फुसे, यकृत, गर्भाशय वगैरेंवरसुद्धा पृथ्वी महाभूताचा प्रभाव असतो. आणि या सर्व शरीरभावांवर मूलाधारचक्राचे नियंत्रण असते. याशिवाय मेरुदंडाच्या टोकाचा खालचा भाग, कंबरेचे हाड, गुप्तेंद्रिये, गर्भाशय, अंडाशय, मलविसर्जनासाठीचे गुद, मलाशय हे भाग मूलाधाराच्या आधिपत्याखाली येतात. मूलाधार चक्रात दोष उत्पन्न झाला तर या अवयवांच्या कार्यात असंतुलन उत्पन्न होऊ शकते. त्याचप्रमाणे या सर्व अवयवांचे आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी प्रयत्न केले नाहीत, तर त्यामुळे मूलाधार चक्र असंतुलित होऊ शकते.

गणेशोत्सवाच्या निमित्ताने मूलाधार चक्राशी संबंधित अवयवांचे आरोग्य नीट राहण्यासाठी काय प्रयत्न केले पाहिजेत, हे आपण पाहू या. ज्याच्या आधारे शरीर ताठपणे उभे राहते, त्यात हाडे मुख्य असतात. हाडांमध्येसुद्धा मेरुदंड व कंबरेचे हाड हे अधिकच महत्त्वाचे असतात. मेरुदंडातील मणक्‍यांची झीज झाली किंवा त्यांच्यातील अंतर कमी-जास्ती झाले, तर त्याचा संपूर्ण शरीरावर परिणाम होतो. कंबरेचे हाड झिजले किंवा कंबरेचे हाड व मांडीचे हाड यांच्या सांध्याच्या ठिकाणी झीज झाली, तर उठणे, बसणे, चालणे वगैरे सर्व क्रियांवर मर्यादा येतात, वेदनाही खूप होतात. आयुर्वेदात हाडांवर पृथ्वी, वायू व अग्नी या महाभूतांचा प्रभाव असतो असे सांगितले आहे. दोषांचा विचार करता, हाडे हे वाताचे स्थान असते. म्हणूनच हाडांचे आरोग्य नीट ठेवायचे असेल तर वातशामक आणि पृथ्वीमहाभूतप्रधान अन्नपदार्थ, औषधी द्रव्यांची योजना करावी लागते. त्या दृष्टीने आहारात गहू, खारीक, बदाम, डिंक, दूध, लोणी, तूप यांचा समावेश असणे चांगले असते. अंगाला नियमित तेल लावणे, हेसुद्धा हाडांच्या, सांध्यांच्या मजबूतीसाठी उत्तम असते. शरीरात उष्णता अति प्रमाणात वाढणेसुद्धा हाडांसाठी चांगले नसते. अंगात ताप मुरला किंवा तापाची कसर शरीरात शिल्लक राहिली तर त्यामुळे सांधे दुखू लागतात. उष्णता नियंत्रणात ठेवण्यासाठी पादाभ्यंग, प्रवाळपंचामृत किंवा पित्तशामक व पृथ्वीप्रधान मोती-शंख भस्मापासून बनविलेले कॅल्सिसॅनसारखी औषधे घेणे फायदेशीर ठरते. याउलट उष्णता वाढविणाऱ्या कॅल्शियमच्या गोळ्या घेण्याने हाडातील अग्नी महाभूत बिघडण्याची शक्‍यता अधिक असते. केस, दात, नखे हे बाकीचे शरीरभाव हाडांशी संबंधित असतात. त्यामुळे हाडांची नीट काळजी घेतली की या सर्व गोष्टी निरोगी राहतात.

मांसधातू हा दुसरा पृथ्वीमहाभूतप्रधान शरीरभाव होय. पृथ्वीतत्त्व जसे स्थिर, दृढ, मजबूत असते, तसेच संपन्न मांसधातू, स्नायू, शरीराला स्थिरता, दृढता देण्याचे काम करत असतो. गहू, बदाम, दूध, लोणी, पंचामृत वगैरे आहारद्रव्ये, कवचबीज, शतावरी, अश्‍वगंधा वगैरे औषधद्रव्ये मांसधातूपोषणासाठी उत्तम असतात. त्वचा हा मांसधातूचा उपधातूच असल्याने, या सर्व गोष्टी त्वचेलाही पोषक असतात.

जडत्वाची, स्थिरत्वाची आवश्‍यकता
स्त्रियांच्या बाबतीत गर्भाशय, बीजाशय (ओव्हरी) हे प्रजननसंस्थेतील महत्त्वाचे अवयव मूलाधारचक्राशी संबंधित असतात. आयुर्वेदात गर्भाशयाला जमिनीची उपमा दिलेली आहे. जमिनीत पेरलेल्या बीजापासून जसा वृक्ष तयार होतो, त्याचप्रमाणे गर्भाशयात गर्भाचा विकास होऊन बालक तयार होते. गर्भाशयाचा आकार जरी लहान असला तरी त्याच्यात प्रसरण पावण्याची क्षमता खूप मोठी असते. बाळाचे वाढणारे वजन पेलवण्याची क्षमताही खूप असते. यावरून गर्भाशयाचा आणि पृथ्वीमहाभूताचा संबंधही स्पष्ट होतो. दोन बीजाशयांतून प्रत्येक महिन्याला एक एक बीजांड तयार होत असते. म्हणूनच बीजाशयाचे कामही पृथ्वीमहाभूताच्या संतुलनाशी संबंधित असते. बीजांड तयारच न होणे, वेळेवर तयार न होता उशिरा तयार होणे, गर्भधारणेसाठी सक्षम नसणे या तक्रारी सध्या वाढताना दिसत आहेत.

यावर पृथ्वीमहाभूताची शुद्धी, मूलाधारचक्राचे संतुलन यांसारख्या उपचारांचा उत्कृष्ट उपयोग होताना दिसतो.
मलमूत्रविसर्जनाची क्रियासुद्धा मूलाधारचक्राशी संबंधित असते. मल ज्या ठिकाणी साठतो ते मलाशय, जेथून बाहेर पडतो तो गुदभाग, तसेच मूत्राशय व मूत्रेंद्रिय या सर्वांवर पृथ्वी महाभूताचा प्रभाव असतो. बद्धकोष्ठ, निरनिराळे मूत्रविकार यांचा संबंध मूलाधार चक्राशी संबंधित असू शकतो. म्हणूनच पोट साफ ठेवणे, मूत्रप्रवृत्ती साफ असण्याकडे लक्ष ठेवणे, हे मूलाधाराच्या संतुलनासाठी आवश्‍यक असते.

पृथ्वी महाभूताचा "जड' हाही एक गुण असतो. अमुक मर्यादेपर्यंत जडत्वाची (ग्राउंडिंग), स्थिरत्वाची आवश्‍यकता असते हे खरे; पण या चक्रात दोष उत्पन्न झाला तर आळस, अनुत्साह, कंटाळा वगैरे मानसिक दोषही उत्पन्न होऊ शकतात. याचीच दुसरी बाजू म्हणजे अति चंचलपणा, अस्थिरता, एकाग्रतेचा अभाव वगैरे दोषही उत्पन्न होऊ शकतात.

शरीराचा आकार, शरीरावयवांचा आकार, हासुद्धा पृथ्वी महाभूताशी संबंधित असतो. हृदयाचा आकार वाढणे, मूत्राशय, पित्ताशयासारखे अवयव सुकणे, आकसणे, गाठी येणे यांसारखे दोषही पृथ्वी महाभूतातील बिघाडाचे निदर्शक असतात.

ज्ञानेश्‍वरांचा समत्वयोग......

मनुष्य हा निसर्गच आहे, हे विधान फारच व्यापक व त्यामुळे मोघम झाले. मनुष्याच्या शरीराचे कोणते घटक नैसर्गिक आहेत, असे विचारणे हे अधिक टोकदार होईल. प्राचीन भारतातील सांख्य दर्शनाने दिलेले उत्तर बहुतेक वैदिक दर्शनांनी विशेषतः वेदांताने ग्राह्य धरले. सांख्याची प्रकृती किंवा स्वभाव हा निसर्गच आहे. ज्या तत्त्वामुळे मनुष्य इतर प्राण्यांपेक्षा वेगळा मानला गेला, ते तत्त्व म्हणजे बुद्धीसुद्धा सांख्यमते जड प्रकृतीचाच अत्यंत तरल व सूक्ष्म असा आविष्कार आहे. ज्याला सांख्य पुरुष म्हणतात ते केवल चैतन्यरूप असलेले तत्त्वच काय ते अजड चेतनरूप आहे. मात्र, सांख्य दर्शनाने जड प्रकृती व चेतन पुरुष यांच्यात द्वैत मानले. ही दोन स्वतंत्र तत्त्वे अनादी असल्याचे सांगितले. अद्वैत वेदांत दर्शनाने सांख्याची सृष्टीच्या रचनेबद्दलची उपपत्ती "पंचीकरण' या नावाने जवळपास जशीच्या तशी स्वीकारली. सांख्यांनी अनंत पुरुषांचे अस्तित्व मान्य करून तेथेही आपल्या बहुतत्त्ववादाच्या पुरस्काराला वेदांत्यांनी एकाच आत्मचेतनेच्या अस्तित्वाला मान्यता दिली. त्यालाच ब्रह्म असेही म्हणण्यात येते. प्रत्यक्ष व्यवहारात दिसून येणारे अनेक जीवात्मे एकमेवाद्वितीय परब्रह्मच आहेत. त्यांची बहुविधता किंवा नानात्व अज्ञानमूलक व भ्रमात्मक आहे. किंबहुना भ्रामक जीवदशा हीच मुळी आत्म्याने स्वतःची देहादी प्राकृतिक जड पदार्थांशी एकरूपता मानल्यामुळे उद्‌भवली आहे. ही दृष्टिगोचर बहुविधता अजड चेतन आत्मतत्त्वाच्या प्राकृतिक देहादी जड पदार्थावर करण्यात आलेल्या अध्यासामुळे भासमान होते. या जड पदार्थांमध्ये गुणात्मक भेद करता येणार नाही. (जड ते जडच चेतन ते चेतनच) पण परिमाणात्मक भेद नक्कीच करता येईल. बोटांची नखे किंवा डोक्‍यावरील केस यांना होत असलेल्या संवेदनांची उदाहरणार्थ जिभेला होणाऱ्या संवेदनेशी तुलना केली तर हा भेद समजून येईल. केशनखादी कमी संवेदनशील शरीरघटक जसे जड; तसेच जीभसुद्धा जड किंवा भौतिकच; पण जीभ हे जडद्रव्याचे पंचभूतांचे अधिक तरल (ठशषळपशव) रूप.

भगवद्‌गीतेमध्ये या क्रमश्रेष्ठत्वाचा विचार करण्यात आलेला दिसतो. "इंद्रियेभ्य परं मनः। मनसस्तु परा बुद्धिर्यो बुद्धेः परतस्तु सः।।' येथे इंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्यातील वेगळेपणच सांगितले नसून इंद्रियांहून मन व मनाहून बुद्धी श्रेष्ठ असल्याचेही सुचवले आहे. आता गीतेला मान्य असलेला वेदांताच्या मुशीत ओतून घेतलेला सांख्य सिद्धांत विचारात घेतला तर हे चढते श्रेष्ठत्व जड द्रव्यातील आहे व ते त्याच्या तरलपणामुळे ठरले, असे म्हणता येते; परंतु बुद्धीच्या पलीकडील व बुद्धीपेक्षा श्रेष्ठ असा जो "सः' किंवा "तो' आहे तो नेमका कोण?

गीतेचे सर्व भाष्यकार हा "तो' म्हणजे चेतन, शुद्ध, बुद्ध, निर्गुण आत्मा मानतात. तो देह, इंद्रिये, मन, बुद्धी या जड पदार्थांपेक्षा वेगळा आहे. या अन्वयार्थाला एकमेव अपवाद आहे तो रामानुजाचार्यांच्या भाष्याचा. प्रस्तुत श्‍लोकाच्या अगोदरचा संदर्भ लक्षात घेऊन रामानुज "सः' (तो) म्हणजे आत्मा असे न मानता काम असा अर्थ लावतात. त्यांच्या मते मानवाची इच्छा किंवा वासना इतकी प्रबळ असते, की ती बुद्धीलाही दाद देत नाही. त्यामुळे कामाशी संघर्ष करणे फार अवघड आहे. कामाचा संबंध मताशी वा भावनांशी, तर विचारांचा संबंध बुद्धीशी लावला जातो. विचार आणि भावना यांच्यातील द्वंद्व मानवाच्या अंतरात सतत चालू असते. मन आणि बुद्धी म्हणजेच भावना आणि विचार यांचा ताळमेळ. म्हणजेच योग, असे ज्ञानेश्‍वर सांगतात.

"अर्जुना समत्व चित्राचे। तेचि सार जाण योगाचे। जेथ मना आणि बुद्धीचे। ऐक्‍य आथी'
....................................................................................................................................................................

श्री गणेशाचे अवतार

श्री गणेशाचे अवतार दोन प्रकारचे आहेत. एक आविर्भाव म्हणजे स्वेच्छेने प्रकट होऊन विघ्ननाशनादी आवश्य कार्य साधून लगेच अंतर्धान पावणारा, अर्थात अगदी थोडा वेळ असणारा, वक्रतुंडासारखा अवतार आणि दुसरा अवतार म्हणजे अधिक काळ राहणारा अर्थात विशिष्ट कार्यासाठीच प्रकट व्हावयाचे, पण त्या अवताराबरोबर अनेक प्रकारच्या भक्तानुग्रही लीलाही करायच्या असा मयूरेश, विनायक इत्यादी अवतार होत. अर्थात दोन्ही प्रकारच्या अवतारांमध्ये भक्तजनांचे तपश्चर्यण व कामना, संकल्प सिध्यर्थ व अभक्तजन व असुरांना शासन वगैरे कारणाकरताच श्री गणेशांनी अवतार घेतले. येथे विशेषत्वाने लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे श्री गणेशाने कोठल्याही असुराचा वध केला नाही, तर त्याच्या मदाचा नाश करून त्याला आपल्या अंकित ठेवले. त्या त्या असुरामुळे समाजात बळावत चाललेल्या मदप्रवृत्तीचा नाश केला, हे खालील अवतारकार्यावरून दिसून येईल. त्या त्या असुराच्या नावावरून आपल्या उन्नतीच्या आड येणाऱ्या आपल्यातील त्या त्या मदप्रवृत्तीचा नाश करावा, अशी अप्रत्यक्ष रीतीने श्री गणेशांनी आपणास शिकवण दिली, हे आपण लक्षात ठेवावयास हवे.
अवतार :
१. वक्रतुंड, २. एकदंत, ३. गजानन,
४. लंबोदर, ५. विकट, ६. विघ्नराज,
७. महोदर, ८. धूम्रवर्ण
कार्य :
मत्सरासुराचा नाश ’ मदासुराचा नाश
लोभासुराचा नाश ’ क्रोधासुराचा नाश
कामासुराचा नाश ’ दंभासुराचा नाश
मोहासुराचा नाश ’ अहं असुराचा नाश.
शिकवण :
आपल्यातील मत्सराचा नाश करणे.
आपल्यातील मदाचा नाश करणे.
आपल्यातील लोभाचा नाश करणे.
आपल्यातील क्रोधाचा नाश करणे.
आपल्यातील कामवृत्तीचा नाश करणे.
आपल्यातील दंभाचा नाश करणे.
आपल्यातील मोहाचा नाश करणे.
आपल्यातील अहंपणाचा नाश करणे.
वरील अवताराखेरीज श्री गणेशांनी अनेक अवतार घेतले. ज्ञानारी आणि शुभ्रसेन राजा यांचे अनुक्रमे सुबोध आणि नरकेसरी हे दोन गणेशभक्त पुत्र होते, पण ज्ञानारी आणि शुभ्रसेन हे दोघे गणेशद्वेष्टे होते. त्यामुळे त्यांनी आपल्या दोन्ही गणेशभक्त मुलांचा अत्यंत छळ केला. श्री गणेशांनी अवतार घेऊन आपल्या बालभक्ताचे तसेच दुसरा एक बालभक्त बल्लाळ या सर्व बालभक्तांचे संरक्षण करून त्यांच्या पित्यांना शासन केल्याचा पुराणात उल्लेख आहे. त्याचप्रमाणे आपल्या भक्तांचे रक्षण करण्याकरिता व असुरांचा नाश करण्यासाठी कारणपरत्वे श्री गणेशांनी इतरही अनेक अवतार धारण केल्याचे पुराण दाखले आहेत.
दुसऱ्या प्रकारच्या अवतारामध्ये श्री गणेशांनी -
१. विनायकनामक अवतार घेऊन नरान्तक व देवान्तक यांचा नाश केला.
२. मयूरेशनामक अवतार घेऊन सिंधुसुराचा नाश केला.
३. श्री गणेशनामक अवतार घेऊन सिंदुरासुराचा नाश केला.
४. कपिलनामक अवतार घेऊन कमलासुराचा नाश केला.
५. वरदमूर्तीनामक अवतार घेऊन तामिस्रासुराचा नाश केला.
६. धूम्रकेतूनामक अवतार घेऊन धुमासुराचा नाश केला.
अशा प्रकारे अनेक अवतार घेऊन असुरांपासून लोकांचे रक्षण केले. सूर आणि असुर हे पौराणिक अलंकारिक शब्द असून सूर याचा अर्थ संवादी म्हणजे आत्मतत्त्वाशी निगडित असलेले व स्वानंदानुभव भोगणारे. असुर म्हणजे, अ म्हणजे नाही, सूर म्हणजे योग्य जे आत्मानुभवाच्या आनंदाच्या आड येणारे ते, म्हणजे कामासुर, मोहासुर इत्यादी. आपले षड्विकार हे आपल्या आनंदाच्या आड का येतात याचा विचार करता ज्या वेळेला या गुणांमध्ये मद उत्पन्न होतो तोच मद आत्मानंद नाश करणारा आहे. म्हणजे मदरहित हे गुण मानवजातीला अनुकूल आहेत. म्हणून त्यांचा नाश न करता त्याच्यापासून उत्पन्न होणाऱ्या मदाचा नाश करणे हाच असुर विनाश होय. त्याच्याकरिता जी स्थिर बुद्धी ती बुद्धिदाता गणेश अथवा गणपती होय.

                                                    ....डीसिताराम

परदेशातील गणेशस्थाने

नेपाळ : नेपाळमधील गणपती हा नृत्यगणपती असून तो लाल रंगाचा आहे. या नृत्यगणपतीभोवती चार विनायक असतात. रक्तविनायक, चंद्रविनायक, सिद्धिविनायक व अशोक विनायक अशा पंच विनायक गणपतींचे एक देऊळ आहे. त्याशिवाय काठमांडूमध्ये काही गणेश मंदिरे आहेत. िझपी, ताडदू, चंगनारायण, सिद्धिविनायकाचे थानकोट अशा नावांची ही गणपती मंदिरे आहेत. नेपाळमध्ये गणेशाच्या मूर्तीत हेरंब गणपती अत्यंत लोकप्रिय आहे. या मूर्तीला नेहमी पाच मस्तके असलेली दिसतात. नृत्यमुद्रेतील काही गणेशमूर्तीच्या मस्तकावर शेषाने फणा उभारलेला दिसतो.
म्यानमार (ब्रह्मदेश) : म्यानमारच्या सखल भागातील सुपीक प्रदेशात मोन लोक राहत होते. ते हीनयानी बौद्ध होते. देवदेवतांचे ते कट्टर शत्रू होते. त्यामुळे येथे प्राचीन बौद्ध मंदिराचे रक्षक म्हणून गणेशासह अनेक देवतांची स्थापना केलेली दिसते. येथील व्यापारी जनसमुदायात गणपती हा विघ्नहर्ता म्हणून विशेष प्रिय होता. हे तिथे सापडलेल्या असंख्य लहान लहान गणेशमूर्तीवरून लक्षात येते. त्याला येथे महापियेन असे म्हणत. येथील गणेशमूर्ती ओबडधोबड आहेत.
कंबोडिया (इंडोचयना) : कंबोडियात गणपतीला प्रह कनेस म्हणतात. तो कोठेही तुंदिलतनू दाखविलेला नाही. याशिवाय कंडल येथील एका खासगी वस्तुसंग्रहालयात चार मस्तकांचा गणपती आहे. ही चार मस्तके चार मुख्य दिशांकडे तोंड करून आहेत. चारही मस्तकांवर मिळून एकच मुकुट आहे.
जपान : येथे दोन गजमुखी देवता एकमेकांच्या खांद्यावर माना टाकून एकमेकांना हातांनी विळखा घालून भेटतात. या दोन्ही मूर्तीच्या अंगावर पायघोळ झगे घातलेले आहेत. अशा पद्धतीची मूर्ती कोठेही पाहायला मिळत नाही. गणेशाच्या या स्वरूपाचे साम्य जपानमधील निओ या देवतेच्या स्वरूपाशी मिळतेजुळते आहे. याशिवाय कांति-तेन हे खाल जपानी गणेशाचे स्वरूप अनेक योगिक तांत्रिक कल्पनांचा समावेश करून बनविले असावे.
थायलंड (सयाम) : गणेश देवता ही वैदिकांइतकीच बौद्धांनाही प्रिय होती. बँकॉक येथील िहदू मंदिरांत पंचधातूंची गणेशाची वैशिष्टय़पूर्ण मूर्ती आहे. हनोईमधील ग्रंथालयात एक जुनी पोथी आहे. तिच्यात गणपतीची सहा चित्रे आहेत. त्यापकी एक मूर्ती अति विलक्षण आहे. त्या गणपतीचे नाव कोंचनानेश्वर असून मुकुटधारी आहे. त्याला तीन मस्तके आणि सहा हात आहेत. अगदी वरच्या हातात लहानसा हत्ती धरला आहे. त्या हत्तीला असंख्य डोकी आहेत. खालच्या उजव्या हातात शंख आहे.
मेक्सिको (दक्षिण अमेरिका) : अमेरिकेतील रेड इंडियन लोक व मेक्सिकोमधील लोक आजही गजमस्तक व मनुष्यदेह असलेल्या मूर्तीची पूजा करतात. एॅझटेक या संस्कृतीतील पूजनीय देवतेचे गणेशाशी पुष्कळ साम्य आहे. ग्रीक पुराणात जॅनस नावाची बुद्धिदेवता आहे. ती गजमुखी किंवा दोन तोंडांची आहे. जॅनस देवदेवतेची कोणत्याही कार्याच्या प्रारंभी पूजा केली जाते.
फ्रान्स : रेयुनियन बेटावर सेंट बेनॉइट या मंदिरात एक गणेशमूर्ती आहे. ही मूर्ती पांढऱ्या वस्त्रात असून तिला फुलांच्या माळा घातलेल्या असतात.
चीन : चीनमध्ये दोन ठिकाणी गणेशाच्या प्राचीन प्रतिमा आढळतात. तुन हॉग येथील लेण्यांच्या िभतीवर कोरलेली एक आणि दुसरी कुग हिस्वेन येथील खडकापासून तयार केलेली आहे. बौद्ध संस्कृतीबरोबर चीनमध्ये गणेशाचे आगमन झाल्याचे मानले जाते. तुन हॉग येथील गणेश मूर्तीच्या डोक्यावर मुकुट नसून लाल रंगाची कुऱ्हाड आहे. या मूर्तीसमवेत चंद्र, सूर्य आणि नवग्रहांच्या प्रतिमा आहेत. कुंग हिस्वेनमधील मूर्तीच्या उजव्या हातात कमळ असून डाव्या हातात चिंतामणी आहे. चीनमध्ये गणेशाची उपासना केली जात होती याचे अनेक पुरावे आजही सापडतात.
न्यूयॉर्क : द िहदू टेंपल ऑफ नॉर्थ अमेरिकेच्या संस्थेचे श्री महावल्लभ गणपती मंदिर आहे. ते न्यूयॉर्कच्या फ्लिशग भागात आहे. िहदू शिल्पशास्त्राप्रमाणे अमेरिकेत बांधलेले सर्वात मोठे अधिकृत मंदिर आहे. येथे रजत सिंहासनावर बसलेली काळ्या पाषाणातून कोरून काढलेली गणपतीची भव्य मूर्ती आहे. या मंदिरात शिवपार्वती, व्यंकटेश्वर, महालक्ष्मी, राम-सीता, हनुमान, कृष्ण देवतांची मंदिरे आहेत. त्यांची सोन्याचांदीची आभूषणे जगात सर्वोत्कृष्ट आहेत.
संदर्भ : श्रीगणेश कोश