मनुष्य हा निसर्गच आहे, हे विधान फारच व्यापक व त्यामुळे मोघम झाले. मनुष्याच्या शरीराचे कोणते घटक नैसर्गिक आहेत, असे विचारणे हे अधिक टोकदार होईल. प्राचीन भारतातील सांख्य दर्शनाने दिलेले उत्तर बहुतेक वैदिक दर्शनांनी विशेषतः वेदांताने ग्राह्य धरले. सांख्याची प्रकृती किंवा स्वभाव हा निसर्गच आहे. ज्या तत्त्वामुळे मनुष्य इतर प्राण्यांपेक्षा वेगळा मानला गेला, ते तत्त्व म्हणजे बुद्धीसुद्धा सांख्यमते जड प्रकृतीचाच अत्यंत तरल व सूक्ष्म असा आविष्कार आहे. ज्याला सांख्य पुरुष म्हणतात ते केवल चैतन्यरूप असलेले तत्त्वच काय ते अजड चेतनरूप आहे. मात्र, सांख्य दर्शनाने जड प्रकृती व चेतन पुरुष यांच्यात द्वैत मानले. ही दोन स्वतंत्र तत्त्वे अनादी असल्याचे सांगितले. अद्वैत वेदांत दर्शनाने सांख्याची सृष्टीच्या रचनेबद्दलची उपपत्ती "पंचीकरण' या नावाने जवळपास जशीच्या तशी स्वीकारली. सांख्यांनी अनंत पुरुषांचे अस्तित्व मान्य करून तेथेही आपल्या बहुतत्त्ववादाच्या पुरस्काराला वेदांत्यांनी एकाच आत्मचेतनेच्या अस्तित्वाला मान्यता दिली. त्यालाच ब्रह्म असेही म्हणण्यात येते. प्रत्यक्ष व्यवहारात दिसून येणारे अनेक जीवात्मे एकमेवाद्वितीय परब्रह्मच आहेत. त्यांची बहुविधता किंवा नानात्व अज्ञानमूलक व भ्रमात्मक आहे. किंबहुना भ्रामक जीवदशा हीच मुळी आत्म्याने स्वतःची देहादी प्राकृतिक जड पदार्थांशी एकरूपता मानल्यामुळे उद्भवली आहे. ही दृष्टिगोचर बहुविधता अजड चेतन आत्मतत्त्वाच्या प्राकृतिक देहादी जड पदार्थावर करण्यात आलेल्या अध्यासामुळे भासमान होते. या जड पदार्थांमध्ये गुणात्मक भेद करता येणार नाही. (जड ते जडच चेतन ते चेतनच) पण परिमाणात्मक भेद नक्कीच करता येईल. बोटांची नखे किंवा डोक्यावरील केस यांना होत असलेल्या संवेदनांची उदाहरणार्थ जिभेला होणाऱ्या संवेदनेशी तुलना केली तर हा भेद समजून येईल. केशनखादी कमी संवेदनशील शरीरघटक जसे जड; तसेच जीभसुद्धा जड किंवा भौतिकच; पण जीभ हे जडद्रव्याचे पंचभूतांचे अधिक तरल (ठशषळपशव) रूप.

भगवद्गीतेमध्ये या क्रमश्रेष्ठत्वाचा विचार करण्यात आलेला दिसतो. "इंद्रियेभ्य परं मनः। मनसस्तु परा बुद्धिर्यो बुद्धेः परतस्तु सः।।' येथे इंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्यातील वेगळेपणच सांगितले नसून इंद्रियांहून मन व मनाहून बुद्धी श्रेष्ठ असल्याचेही सुचवले आहे. आता गीतेला मान्य असलेला वेदांताच्या मुशीत ओतून घेतलेला सांख्य सिद्धांत विचारात घेतला तर हे चढते श्रेष्ठत्व जड द्रव्यातील आहे व ते त्याच्या तरलपणामुळे ठरले, असे म्हणता येते; परंतु बुद्धीच्या पलीकडील व बुद्धीपेक्षा श्रेष्ठ असा जो "सः' किंवा "तो' आहे तो नेमका कोण?
गीतेचे सर्व भाष्यकार हा "तो' म्हणजे चेतन, शुद्ध, बुद्ध, निर्गुण आत्मा मानतात. तो देह, इंद्रिये, मन, बुद्धी या जड पदार्थांपेक्षा वेगळा आहे. या अन्वयार्थाला एकमेव अपवाद आहे तो रामानुजाचार्यांच्या भाष्याचा. प्रस्तुत श्लोकाच्या अगोदरचा संदर्भ लक्षात घेऊन रामानुज "सः' (तो) म्हणजे आत्मा असे न मानता काम असा अर्थ लावतात. त्यांच्या मते मानवाची इच्छा किंवा वासना इतकी प्रबळ असते, की ती बुद्धीलाही दाद देत नाही. त्यामुळे कामाशी संघर्ष करणे फार अवघड आहे. कामाचा संबंध मताशी वा भावनांशी, तर विचारांचा संबंध बुद्धीशी लावला जातो. विचार आणि भावना यांच्यातील द्वंद्व मानवाच्या अंतरात सतत चालू असते. मन आणि बुद्धी म्हणजेच भावना आणि विचार यांचा ताळमेळ. म्हणजेच योग, असे ज्ञानेश्वर सांगतात.
"अर्जुना समत्व चित्राचे। तेचि सार जाण योगाचे। जेथ मना आणि बुद्धीचे। ऐक्य आथी'
....................................................................................................................................................................
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा