सोमवार, २० जून, २०११

मनाला भावलेले असे हरिपाठाचे अभंग 27

॥  श्री‌सद्गुरुनाथाय नमः ॥
  
        

अभंग # २७.
सर्वसुख गोडी साही शास्त्रें निवडी । रिकामा अर्धघडी राहूं नको ॥
लटिका व्यवहार सर्व हा संसार । वायां येरझार हरिवीण ॥
नाम मंत्र जप कोटी जाईल पाप । रामकृष्णी संकल्प धरूनी राहें ॥
निजवृत्ती हें काढी सर्वमाया तोडी । इंद्रियांसवडी लपो
नको ॥
तीर्थव्रतीं भाव धरी रे करुणा । शांति दया पाहुणा हरि करी ॥
ज्ञानदेवा प्रमाण निवृत्तीदेवीं ज्ञान । समाधी संजीवन हरिपाठ ॥

भिन्नपाठः   साही = सर्व; रामकृष्णी = कृष्णनामी
हा अभंग म्हणजे "एक अभंगी हरिपाठ"च आहे. हरिपाठावर लिहायला सुरुवात केली तेंव्हा पहिल्या अभंगाचा आस्वाद घेताना मी लिहिले होते...
आधुनिक शास्त्रीय भाषेत सांगायचे झाल्यास हरिपाठ हा "ज्ञानियांच्या राजांचा" अद्वैताची बैठक न मोडता लिहिलेला अध्यात्मशास्त्रातील नामस्मरणसाधनेवरील एक शोधनिबंधच आहे. एखाद्या scientific journal मध्ये जेंव्हा शोधनिबंध प्रसिद्ध होतो तेंव्हा प्रामुख्याने Abstract, Methods & methodology, results आणि शेवटी conclusion  अशा ४  भागात ढोबळमानाने लिहिलेले असते. ह्या धर्तीवर म्हणायचे झाल्यास अभंग#१ हा ज्ञानदेवांच्या शोधनिबंधातील abstract म्हणायला हरकत नसावी. त्यांचे हे लेखन ललितलेखन नसून अध्यात्मविषयातील शास्त्रीयलेखनच आहे हे म्हणायला भरपूर वाव आहे.
हरिपाठात नामस्मरण साधनेची सुरुवात,  हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा । पुण्याची गणना कोण करी ॥
असोनि संसारी जिव्हे वेगु करी । वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ॥
अशी होऊन नामसाधनेने साधक अंतर्मुख होऊन  त्याला २६व्या अभंगात "एकतत्त्व नाम दृढ धरी मना । हरिसी करुणा येईल तुझी ॥"अशी अनुभूती येऊ लागते. त्याच अभंगात ज्ञानदेव नामस्मरण साधनेतील परिणाम(result)सांगतात,ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी । धरोनी श्रीहरी जपे सदा ॥
आता २७ व्या अभंगात ज्ञानदेव नामसाधनेवरील शोधनिबंधात  आपले निष्कर्ष (conclusion) देतात.
         सर्वसामान्यपणे 'देव' ह्या संकल्पनेबाबत दोन वर्ग आहेत. एक वर्ग आस्तिकाचा आणि दुसरा नास्तिकाचा. जीवन जगतांना ह्या दोन्ही वर्गात एक समान धागा आहे. एक म्हणतो गोविंद हवा तर दुसरा म्हणतो आनंद हवा. वास्तविक दोघांनाही हवे आहे ते एकच... ते म्हणजे न संपणारे सुख! दोघांची भाषा मात्र वेगळी आहे आणि ते मिळविण्याची दिशा वेगळी आहे. नास्तिक ते सुख बाहेरून विषयांच्या माध्यमातून मिळविण्याचा प्रयत्न करतो तर आस्तिक तेच सुख आतून देवाच्या माध्यमातून मिळविण्याचा प्रयत्न करतो.
           
सर्वसुख म्हणजेच पूर्णसुख शाश्वत असते, स्वतंत्र असते, अंतर्यामी असते. मुख्य म्हणजे ज्याचे त्यालाच ते भोगायचे असते. विषय मुळातच अपूर्ण आहेत, अशाश्वत आहेत आणि त्यांच्यातून सुख उपभोगायचे तर मन त्याजागी स्थिर होत नाही. मग विषयांतून 'सर्वसुख' कसे मिळणार? एक भगवंतच पूर्ण आहे, शाश्वत आहे. त्याचे विस्मरण झाल्यामुळे आपल्याला त्याच्या ठायी असणाऱ्या गोडीची चव चाखायला मिळत नाही म्हणून आवड नाही. त्यासाठी त्याचे स्मरण हवे आणि हे केवळ नामस्मरणानेच शक्य आहे. म्हणूनच पूर्णसुखाचा लाभ होण्यासाठी क्षणभरदेखील नामाशिवाय राहू नये. ह्या आपल्या म्हणण्याला ज्ञानदेव पुन्हा साही शास्त्रांचा आधार देत आहेत.
          
आपण रोजच्या जीवनात अनुभवतोच की Empty mind is Devil's abode. 'रिकामे मन हे सैतानाचे घर' असे आपण कितीही म्हणत असलो तरी हे रिकामपण घालवण्यासाठी आपण काय करतो?  आपण संसाराचा पसारा वाढवत असतो. कार्यालयात आलो की संगणक चालू आणि त्याबरोबर 'मनोगत', 'चॅटींग' ह्यातून वेळ मिळालाच तर मग काम :)). घरी गेलो की "काय वैताग आहे ह्या कामाचा आणि प्रवासाचा" म्हणत शीण घालवायला दूरदर्शन संच सुरू करून सुखासाठी / आनंदासाठी शोध सुरू करतो. मग हा चॅनल बदल, तो चॅनल बदल करत "काय फालतू मालिका आहेत" म्हणत जेवायला तरी काय केले आहे पाहावे तर तेथेही "काय हे? काही नवीन नाही का?" म्हणत नाक मुरडायचे. परत येऊन मासिक, वर्तमानपत्र (?!) चाळत सामाजिक, राजकीय परिस्थितीचा आढावा घ्यायचा आणि ह्यावर मित्रपरिवारात आपल्या मतांना दामटत बसायचे किंवा घरातील माणसांवर आपला राग काढायचा आणि मग थकल्या- भागल्या मनाने आणि आंबलेल्या शरीराने झोपी जाता जाता दिवसा राहून गेलेले एखादे काम आठवले की म्हणायचे, 'एका क्षणाचीही उसंत नाही. दिवसभर किती काम करतो.' आपल्या आयुष्यातही असेच घडते.
"बाळपणी खेळी रमलो, तारूण्य नासले ।
वृद्धपणी देवा आता दिसे पैलतीर"
ही आपली व्यथा आहे. शेवटी "किती वेळा जन्मा यावे किती व्हावे फजित" असे म्हणत जगाचा निरोप घ्यायचा. पुन्हा आहे तेच.
            
ज्ञानदेवांना रिकामा अर्धघडी राहूं नको यातून प्रापंचिक गोष्टींत मन अडकविणे अभिप्रेत नाही. ज्ञानदेवांसारखे संत, सद्गुरू आपल्याला असे मार्गदर्शन नक्कीच करणार नाहीत. संतांना अभिप्रेत असलेले सर्वसुख देण्याचे सामर्थ्य फक्त भगवंतात आहे आणि भगवंत नामापासून वेगळा नाही हेही त्यांना माहीत आहे. नामधारकाने अर्धघडीही रिकामे राहू नये म्हणजे अखंड नामस्मरण करीत राहवे असेच ज्ञानदेवांना सुचवायचे आहे. कारण ज्ञानदेवांना (आणि संतांनाही) माहीत आहे की,
लटिका व्यवहार सर्व हा संसार । वायां येरझार हरिवीण ॥
            आपण सुखासाठी जे व्यवहार करतो, संसाराचा पसारा गोळा करतो ते सर्व 'लटिके' आहे. बरेच जण जग खोटे आहे, नाशिवंत आहे, असार आहे म्हणत वैराग्याच्या खुळचट कल्पना मनात बाळगून जगाकडे पाठ फिरवतात. मी एका संन्यासी प्रवचनकारांना मिथ्या ह्या शब्दाच्या अर्थाबद्दल विचारले असता त्यांनी मला सांगितले neither real nor false. मी मिथ्या ह्या शब्दाचा अर्थ घेतो परिवर्तनशील. तत्त्वता जीव,जग आणि जगदीश एकच आहे. लटिके आहेत ते मानवी व्यवहार आणि खोट्या 'मी'वर आधारित संसार. सृ सरति इति संसार अशी संसाराची व्याख्या केली जाते. सरत सरत जाणारा तो संसार अशी नकारात्मक भूमिका घेण्याऐवजी "जग हे सत्य असून नित्य नूतन आहे" ही सद्गुरू श्री. वामनराव पै ह्यांची वास्तववादी भूमिका स्वीकारून जगणे अधिक हिताचे आहे. सुखाच्या अपेक्षेत जगाकडे पाहिले तर तुकाराम महाराजांचा एक अभंग आपली व्यथा सार्थपणे मांडतो. ते म्हणजे
"किती वेळा जन्मा यावे । किती व्हावे फजित ॥" सुखाचा शोध घेताना जग सुख देत नाही  म्हणण्यापेक्षा विषयांतून सुख घेण्यात आपल्या इंद्रियांच्या मर्यादा आड येतात हे विसरून चालणार नाही. जगात असणाऱ्या गोष्टींचा उपयोग करून मजेत जगा की. आपल्याला भूक लागली असता खायला न देता तत्त्वज्ञान सांगत राहिले तर? मात्र संतांना अभिप्रेत असलेले सुख म्हणजे
'जेथ दुजियाची चाड नाही । इंद्रियांचा पांगू न पडे काही । विषयाविण आनंद हृदयी । निजसुख पाही या नाव ॥' संतांच्या सुखाचे स्थान आहे...
"सुख एक हेचि ठायी । बहु पायी संतांचे ॥"
"सुख या संतसमागमे । नित्य दुणावे तुझिया नामे ॥"
एकदा का सुखाचे स्थान नक्की झाले की मग ज्ञानदेव त्याच्या प्राप्तीचे उपाय पुढील ओव्यांतून स्पष्ट करतात.
नाम मंत्र जप कोटी जाईल पाप । रामकृष्णी संकल्प धरूनी राहें ॥
             संतांना अभिप्रेत असलेले सर्वसुख देण्याचे सामर्थ्य फक्त भगवंतात आहे आणि भगवंत नामापासून वेगळा नाही. पण मानवप्राणी जन्माला आल्यापासून विषयांत सुखाचा शोध घेत फिरतो आणि
अंती "किती वेळा जन्मा यावे । किती व्हावे फजित ॥" म्हणत जगाचा निरोप घेतो. भगवंताशिवाय सर्वसुखाची अपेक्षा करणे हे संतांना अभिप्रेत नाही. नामाशिवाय भगवंत हाती येणे कठीण आहे आणि संतसंगतीशिवाय नाम मुखात आणि मुखातून मनात भरणे शक्यच नाही. भगवंताला आपल्या जीवनात आणायचा असेल तर नामाशिवाय सुलभ मार्ग नाही. त्यासाठी संतसंग मात्र हवा. संतसंगाचा लाभ मिळण्यासाठी गाठी पुण्यसंचय असावा लागतो. पण कळत नकळत जमा झालेले पापाचे डोंगरच ह्या नामसाधनेच्या आड येतात. अशा अवस्थेत नाम घेण्याचा संकल्प म्हणजे निश्चय करून रिकामपणी तरी नाम घेत राहवे. रिकामपणी नामस्मरणाचा अट्टहासाने अभ्यास केला असता साधकाचे मन हळू हळू एकाग्र होऊ लागते. नामाचे दिव्य अनुभव येऊ लागताच सहजच नामाबद्दल प्रेम निर्माण होऊन नामस्मरणाचा छंद लागतो. त्याचा परिणाम म्हणजे हृदयात असणारा आनंद अंतःकरणात प्रत्यक्ष दिसू लागतो. संत हा अनुभव शब्दबद्ध करतात तो असा,
"अंतरीची ज्योति प्रकाशली दीप्ती । मुळींची जे होती आच्छादिली ॥
तेथीचा आनंद ब्रह्मांडी न माये । उपमेसी देवू काय सुखा ॥
भगवंत हेच सर्वसुखाचे एकमेव साधन आहे हे एकदा स्वीकारले आणि त्याच्या प्राप्तीसाठी नामस्मरण करणे हे साधन नक्की केले की त्या मार्गात येणाऱ्या अडचणींबाबत साधकाला सावध करण्याची जबाबदारीही ज्ञानदेव स्वीकारतात आणि सावध करताना सांगतात..
निजवृत्ती हें काढी सर्वमाया तोडी । इंद्रियांसवडी लपो नको ॥
             नामस्मरणाचा अभ्यास चालू असता साधकाने जे पथ्य पाळायचे असते त्याचा ह्या ठिकाणी ज्ञानदेव उल्लेख करतात.
        स्वरूपाच्या विसरामुळे माणसाच्या ठिकाणी अहंवृत्ति उदय पावते. हीच निजवृत्ति होय. अहंकारातूनच 'मी आणि माझे' आकाराला येते. त्यातच माणूस आसक्त होऊन राहतो. दुसरीकडे, सर्वसुखाची गोडी चाखायला मिळत नाही तोवर, विषयसुखात मन रमते. नाहीतरी 'दुधाची तहान ताकावर' हा मनुष्यस्वभावच आहे म्हणा. काहीतरी निमित्त काढून माणूस विषयसुखाकडे धावत राहतो. यावर उपाय म्हणजे संन्यस्त होऊन राहणे. संन्यस्त होणे म्हणजे 'मी आणि माझेपण विसरले ज्याचे अंतःकरण । पार्था तो संन्यासी जाण निरंतर ॥' असा संन्यास ज्ञानदेवांना अभिप्रेत आहे. म्हणजे भगवंतच आहे आणि जे काही आहे ते भगवंताचेच आहे अशी भावना दृढ करणे. ही भावना दृढ करण्यासाठी
तीर्थव्रतीं भाव धरी रे करुणा । शांति दया पाहुणा हरि करी ॥
             हाच एक उपाय आहे. वास्तविक नामात रंगलेल्या साधकाला तीर्थव्रताची गरज नाही. कारण भगवन्नाम हे सर्व तीर्थांचा व व्रतांचा राजा आहे. पण नामाचा चांगला अभ्यास करण्यासाठी मात्र तीर्थव्रतांची आवश्यकता आहे. आपण नाही का पदवी घेऊन व्यवसाय सुरू केला तरी conferences attend करतो. आपल्या व्यवसाय बंधू-भगिनींशी वैचारिक देवाणघेवाण करून आपली व्यावसायिक समज आणि ज्ञान वाढवून पुन्हा नव्या जोमाने व्यवसाय करतो. अगदी तसेच तीर्थाटनांमध्ये निरनिराळ्या संतांची, नामधारकांची भेट होते, आत्मचर्चा होते आणि आपल्या जीवनाला आध्यात्मिक वळण लागते.
            भगवंतप्राप्तीसाठी चित्त शुद्ध असणे फार आवश्यक आहे. चित्त शुद्ध झाल्याची खूण म्हणजे करुणा, दया, क्षमा, शांती ह्या दैवी गुणांची अंतःकरणात वृद्धी होणे.
"दया क्षमा शांति । तेथें देवाची वस्ती ॥" हे तर आपल्याला लहानपणापासूनच ऐकायला मिळते. खालील अभंग ह्या दैवी गुणांचा साक्षात्कारच करवतो.
"निवैरता सर्वांभूतीं । दया शांति आणि करूणा ॥
केली कृपा नारायणे । ऐशी चिन्हें उमटता ॥"
              नामस्मरणाने चित्तशुद्धी सहजच होते आणि अंतःकरण दैवी गुणांनी भरून आणि भारून गेले की अशा अंतःकरणात भगवंत प्रगट होतो. तुकाराम महाराजांनी तरी वेगळे काय सांगितले?
"बैसोनी निवांत शुद्ध कऱी चित्त । तयां सुखा अंत नाही पार ॥
येवोनी अंतरी राहिल गोपाळ । सायासाचे फळ बैसलिया ॥"
            
किंवा
"नलगें सायास जाणें वनांतरा । सुखें येतो घरा नारायण ॥"या दैवी गुणांचे संवर्धन केले तर माणसाचे मनच तीर्थ बनतें आणि भगवंत स्वतःच आनंदाने वास्तव्य करतो.
          शेवटच्या ओवीत ज्ञानदेव नामसाधनेतील आपला अनुभव सांगतात,
ज्ञानदेवा प्रमाण निवृत्तीदेवीं ज्ञान । समाधी संजीवन हरिपाठ ॥
             ज्ञानदेव स्वतः ज्ञानी होते, योगविद्येत पारंगत होते. योगमार्गाने आणि ज्ञानमार्गाने जे साधायचे ते भगवंताच्या नामानेही सहज साधता येते हेंच ज्ञानदेवांना हरिपाठाच्या अभंगातून सांगायचे आहे.
             योगाच्या अभ्यासाने जी समाधी साधली जाते तिला ताटस्थ्य समाधी म्हणतात. नामाच्या द्वारे जी समाधी मिळते ती संजीवन समाधी. पहिल्या समाधीत योगी आपला 'मी' स्वरूपात विरवून टाकतो. त्या अवस्थेत त्याचा देह निश्चेष्ट राहून त्याची सर्व इंद्रिये तटस्थ असतात. काही वेळाने ह्या समाधीचा भंग होतो आणि योगी पुन्हा देहभानावर येतो.
              नामस्मरणाने मिळणारी समाधी ही संजीवन समाधी आहे. या समाधीत साधकाचा 'मी' स्वरूपात विरून जात नाही, इंद्रिये तटस्थ होत नाहीत तर याच्या उलट त्याचे आनंदघन स्वरूप त्याच्या ज्ञानरूपात प्रगट होऊन जाणीवेची सर्व अंगे आनंदाने भरून टाकतात. या स्थितीत साधकाचा 'मी' आनंदस्वरुपात डुंबतो.
           या समाधी स्थितीत साधकाची इंद्रिये तृप्त व शांत झालेली असतात व त्याचा देह पूर्ण कार्यक्षम असतो. या संजीवन समाधीत असणारा नामधारक जगात राहून जगापासून अलिप्त असतो आणि लौकिक दृष्ट्या तो इतर सर्व माणसांसारखा दिसत असला तरी तो त्यांच्यापेक्षा आगळा असतो.
ज्ञानदेवांनीच वर्णन केले आहे,
" ते चालते ज्ञानाचे बिंब । अवयव सुखाचे कोंब ॥"
              ज्ञानदेव सांगतात हरिपाठाने संजीवन समाधी मिळते. हे ज्ञान मला निवृत्तीनाथांच्या कृपेने लाभले व ते मला सर्वस्वी प्रमाण आहे.
              संजीवन समाधीचा लाभ केवळ नामस्मरणाने लाभू शकतो हा ज्ञानदेवांचा अनुभव तुम्हा-आम्हाला यावा म्हणून ज्ञानदेव आवर्जून सांगतात...
             
हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा । पुण्याची गणना कोण करी ॥"
                     ॥ श्री सद्गुरुचरणी समर्पित ॥

मनाला भावलेले असे हरिपाठाचे अभंग 26

॥  श्री‌सद्गुरुनाथाय नमः ॥   
अभंग # २६.
एकतत्त्व नाम दृढ धरी मना । हरिसी करुणा येईल तुझी ॥
तें नाम सोपें रे रामकृष्ण गोविंद । वाचेसी सद्गद जपे आधी ॥
नामापरतें तत्त्व नाही रे अन्यथा । वाया आणिक पंथा जाशी झणीं ॥
ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी । धरोनी श्रीहरी जपे सदा ॥
पाठभेदः  जपे = जपा
हरिपाठाला सुरुवात केली तेंव्हा पहिल्याच अभंगात ज्ञानदेव सांगतात,"हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा । पुण्याची गणना कोण करी ॥" आणि आता हरिपाठाचा उत्तरार्ध जवळ आला असता ते सांगतात,"एकतत्त्व नाम दृढ धरी मना." आपल्याही नकळत हरिनाम मुखातून मनापर्यंत पोहचले. नामधारक अंतर्मुख झाल्याची ही खूण आहे.
           सुरुवातीला नाम हे साधन आहे नामधारकाचे. पण नाम घेता घेता अनुभव हा येऊ लागला की नाम हेच तत्त्व आहे. 'नाम-नामी अभेद' हा संतांचाही अनुभव आहे. नाम हे परब्रह्माचे शुद्ध स्फुरण आहे. भगवन्नाम आकाराला येण्यासाठी स्वस्वरूपात शुद्ध स्फुरण व्हावे लागते व यासाठी आत्मतत्त्वाला आपल्याच अंगी असणाऱ्या शक्तीचा आलंब घ्यावा लागतो. लाट ही पाण्याचे स्फुरण असल्यामुळे ती अंतर्बाह्य पाणीरूप आहे. त्याचप्रमाणे नाम हे परब्रह्मस्वरूप आत्मतत्त्वाचे स्फुरण असून ते ब्रह्मरूप आहे. भगवंताचे ते अतिसूक्ष्म रूप आहे. म्हणूनच सर्व संतांनी नामाचा अनुभव घेऊन ते तत्त्वरूप-चैतन्यरूप-ब्रह्मरूप आहे असे जगाला हाकारून सांगितले.
नामा म्हणे नाम आठवा अवतार । पूर्णब्रह्म साचार कृष्णरूप ॥
नाम ते ब्रह्म नाम ते ब्रह्म । नामापाशी नाही कर्म विकर्म ॥
हे मना ! तू जर दृढतापूर्वक नाम धरलेस तर हरिला करुणा येणारच. ज्ञानदेवांनी येथे 'दया' हा शब्द का वापरला नाही ह्याचा मी विचार करत होतो. दया आणि करुणा हे शब्द बऱ्याच वेळा आपण समानार्थी वापरतो. मी, ह्या दोन शब्दांमध्ये, थोडा फरक करतो. आपण 'दयेची भीक' मागतो. पण कधी करुणेची भीक मागतो का? बाह्यता जरी समान दिसले तरी त्यामागील भाव वेगळा असावा असे वाटते. 'दया' ह्या भावात उपकाराची छटा असते तर 'करूणा' मध्ये आपलेपणाची.  'दया' दाखवताना आपण ती इतर कुणालातरी दाखवत असतो. 'करुणा' मात्र आपल्या जवळच्या कुणाबद्दल तरी वाटते आपल्याला. आईच्या ठायी आपल्या लेकराबद्दल असते ती करुणा आणि इतरांबद्दल असते ती दया. मन हे त्या परब्रह्माचाच अंश आहे असे तर नाही ना ज्ञानदेवांना सुचवायचे?
तें नाम सोपें रे रामकृष्ण गोविंद । वाचेसी सद्गद जपे आधी ॥
नाम हे सुलभ आहे, सहज आहे, सोपेही आहे. तरी सामान्यता माणूस ते घेत नाही. हे साऱ्या संतांचेच दुःख आहे. नाम कसेही घेतले तरी ते फळते हे जरी खरे असले तरी सद्गदित अंतःकरणाने नामाचा जप केल्यास ते त्वरित फळते. असा नापजप होण्यासाठी नामाचे स्वरूप आणि त्याचा महिमा समजला पाहिजे. हे काम फक्त सद्गुरूच करू शकतात. म्हणूनच संत एकमुखाने सद्गुरूमहिमा गातात.
'सद्गुरूवाचोनि नाम न ये हाता । साधनें साधिता कोटी जाणा ॥'
'संतांसी शरण गेलियावांचोनि । एका जनार्दनी न कळे नाम ॥'
नामाच्या रूपाने प्रभू आपल्याजवळ आहे. नामस्मरणाने भगवत्कृपा होऊन तो आपला सर्वप्रकारे योगक्षेम वाहतो हे नामाचे वर्म लक्षात ठेवून नामजप करणे म्हणजेच सद्गदित अंतःकरणाने जप करणे होय.
नामापरतें तत्त्व नाही रे अन्यथा । वाया आणिक पंथा जाशी झणीं ॥
नाम हे साधन न राहता एक तत्त्वच आहे हे ज्ञानदेव पुन्हा पुन्हा सांगत आहेत. ज्ञानेश्वरीतही ज्ञानदेव १०व्या अध्यायात लिहितात,
अशेषांही वाचा । आंतु नटनाच सत्याचा ।
तें अक्षर एक मी वैकुंठींचा । वेल्हाळु म्हणे ॥ २३१ ॥
समस्तांही यज्ञांचा पैकीं । जपयज्ञु तो मी ये लोकीं ।
जो कर्मत्यागें प्रणवादिकीं । निफजविजे ॥ २३२ ॥
नामजपयज्ञु तो परम । बाधूं न शके स्‍नानादि कर्म ।
नामें पावन धर्माधर्म । नाम परब्रह्म वेदार्थें ॥ २३३ ॥

आपला (जीवनातील) अनुभव हा आहे की साधनाच्या अंगाने जाता साध्य पदरात पडते आणि मग साधन संपते. नामाच्याबाबतीत मात्र असे होत नाही. नाम घेणारा 'मी' आणि ज्याचे नाम घेतो तो 'भगवंत' ह्यांचे अद्वैत असते. म्हणून नाम घेता घेता 'मी' भगवंतामध्ये विलीन होतो आणि अखेर नामच शिल्लक उरते. अशी प्रचिती येण्यासाठी मात्र धीर हवा. धीर नसेल तर उतावळेपणाने साधक दृश्यातील प्रचितीच्या मागे जातो. इतर मार्गांत थोडी साधना झाली की छोट्या-मोठ्या प्रचिती येतात आणि साधक त्यांच्याच नाही लागतो. असे घडू नये म्हणून ज्ञानदेव नामधारकांना धोक्याचा इशाराच देत आहेत. नामाचे अंतिम ध्येय काय असावे आणि अनुभूती काय असावी हे पुढच्याच ओवीतून ते स्पष्ट करतात.
ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी । धरोनी श्रीहरी जपे सदा ॥
संत कबीरांचा नामस्मरणाबाबतचा अनुभव त्यांनीच शब्दबद्ध केला आहे तो असा..
"राम हमारा जप करे । हम बैठे आराम ॥"आणि आता ज्ञानदेवही त्यांचा अनुभव शब्दबद्ध करतात तो "ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी । धरोनी श्रीहरी जपे सदा ॥" असा. ह्या दोन्ही संतांचा / नामधारकांचा अंतरीचा अनुभव हा एकच होता हे आपल्या ध्यानात येईल. प्रामाणिकपणे, अखंड आणि निष्ठापूर्वक मुखाने हरी हरी म्हणता साधकाला शेवटी वरील अनुभव येतोच.
सर्वसामान्यता साधक वैखरी, मध्यमा आणि पश्यंती ह्या वाणीतच जप करतो. त्याच्याही पलीकडे असते ती परावाणी. परावाणीत चालणारा जप हा स्फुरद्रुप असतो. हा जप करावा लागत नाही. तर केवळ ईश्वरी कृपा किंवा सद्गुरूकृपा झाली तरच असा जप नामधारकाच्या अंतरी चालतो. संत तुकाराम महाराजांसारखा अखंड जप आपण करू शकत नाही. मग ईश्वरी कृपेची अपेक्षा आपण कशी करावी? मात्र असाच अनुभव सद्गुरू आपणाला देऊ शकतात. किंबहुना असा अनुभव साधकाला देऊन त्याच्या साधनेची दिशा नक्की करतात तेच खरे सद्गुरू!  ईश्वरी कृपेने परावाणी उघडली की नामधारकाला असा अनुभव येतो की नामजप प्रत्यक्ष न करताही अंतरात नामजप आपोआप चालू आहे. परावाणी उघडल्यावर 'देव' जप करतो आणि 'मी' तो आरामात बसून ऐकतो असा अनुभव नामधारकाला येतो. असा अनुभव नामस्मरणाच्या थोड्या अभ्यासाने मिळत नाही. त्यासाठी अट्टहासाने अखंड नामस्मरण करीत राहावे लागते. म्हणूनच ज्ञानदेव पुन्हा पुन्हा सांगतात...
हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा । पुण्याची गणना कोण करी ॥"
                     ॥ श्री सद्गुरुचरणी समर्पित ॥

मनाला भावलेले असे हरिपाठाचे अभंग 25

श्री‌सद्गुरुनाथाय नमः ॥
अभंग # २५.
जाणीव नेणीव भगवंती नाही । हरिउच्चारणी पाही मोक्ष सदा ॥
नारायण हरि उच्चार नामाचा । तेथे कलिकाळाचा रीघ नाही ॥
तेथील प्रमाण नेणवे वेदांसी । ते जीवजंतूंसी केविं कळे ॥
ज्ञानदेवा फळ नारायण पाठ । सर्वत्र वैकुंठ केलें असें ॥

पाठभेदः हरिउच्चारणी = उच्चारणीं
नामाचा महिमा अगाध आहे ह्यात शंकाच नाही. हरीला आपले नाममाहात्म्य किती प्रिय आहे हे ज्ञानदेव आपल्याला ह्या अभंगातून सांगत आहे. नवजात अर्भक जरा जरी रडले तरी त्याची आई पटकन आपल्या हातातील सारी कामे बाजूला सारून धावत आपल्या बाळाकडे लक्ष देते. गाढ निद्रेत असली तरी ती उठून आपल्या बाळाकडे लक्ष देते. त्याच्या रडण्याचे कारण नेमके काय आहे हे जाणून ते दूर करण्याचा प्रयत्न करते. अगदी त्याचप्रमाणे भक्ताच्या / नामधारकाच्या मुखात भगवंताचे नाम आले की भगवंत नामधारकाची काळजी घेतोच. असा नामधारक तत्काळ निर्भय आणि निश्चिंत होतो. भगवंताच्या स्मरणाचा अनुभव असा रोकडा आहे. म्हणूनच तर संतजन विठूमाऊली असा विठ्ठलाचा धावा करतात. दुसऱ्या अंगाने विचार केला तर विदर्भातील साधू श्री. गुलाबराव महाराज यांच्या खालील ओवीही याचेच प्रमाण देतात.
'अमृत अवचट मुखीं पडले । तरि काय म्हणावे मरण न चुकले ॥
तैसे अवचट हरिनाम वदनीं आले । तरि होय दहन महादोषा ॥'
'वस्तु शक्तीच्या ठायीं । श्रद्धेची अपेक्षा नाही ॥
नाम 'वस्तुतंत्र' लवलाही । वचन सिद्ध ॥'

नाम कसेही घेतले तरी ते मोक्षाचे फळ देणारच. दुसरे म्हणजे, नाम घेणारा जरी अज्ञ असला तरी ज्याचे नाम घेतो तो तर सुज्ञ आहे. घेणारा अल्पज्ञ असला तरी ऐकणारा सर्वज्ञ आहे आणि घेणारा जरी एकदेशी असला तरी नामी सर्वव्यापी आहे की. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे भगवंत नामात सूक्ष्म रूपाने वास करून असतो.
'तुका म्हणे नाम । चैतन्य निजधाम ॥'म्हणूनच नामाचा उच्चार केल्याबरोबर सुज्ञ, सर्वज्ञ, सर्वव्यापी आणि सर्वशक्तिमान अशा भगवंताचे लक्ष वेधले जाते. नामाच्या अखंड स्मरणाने त्याची कृपादृष्टी साधकाकडे वळते आणि नामधारकाला प्रभूकृपेने मोक्ष तर मिळतोच पण त्याच्या जीवनात प्रभू प्रगट होऊन नामधारकाचा आधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक योगक्षेम स्वतः वाहतो.
'तुका म्हणे यासी नामाचा अभिमान । जाईल शरण त्यासी तारी ॥'

नारायण हरि उच्चार नामाचा । तेथे कलिकाळाचा रीघ नाही ॥

नामधारकाचे एक वैशिष्ट्य असते. तो नेहमी भगवंताच्या स्मरणात जीवन जगत असतो. त्याची खूण म्हणजे त्याच्या मुखात अखंड नाम चालू असणे. त्याच्या स्मरणात भगवंताशिवाय काही नसतेच. द्वैतभावच नसेल तर मग वाईट विचार तरी कुणाबद्दल असणार आणि देहभावच सरला तर मग काळाची तरी भीती का असावी? भगवंताच्या कृपेने श्रद्धायुक्त अभ्यासाने नामधारकाच्या अंतःकरणात नाम स्थिरावते आणि त्यामुळे त्याच्या जीवनात वाईट काळ येतच नाही.

यमदमा अवकळा आणिली । तीर्थें ठायावरुनि उठविली । यमलोकीं खुंटिली । राहाटी आघवी ॥ १९८ ॥
यमु म्हणे काय यमावें । दमु म्हणे कवणातें दमावें ।
तीर्थें म्हणती काय खावें । दोष ओखदासि नाहीं ॥ १९९ ॥
ऐसे माझेनि नामघोषें । नाहीं करिती विश्वाचीं दुःखें ।
अवघें जगचि महासुखें । दुमदुमित भरलें ॥ २०० ॥
ज्ञानेश्वऱीतील ह्या ओव्या आणखी वेगळे काय सांगतात?

तेथील प्रमाण नेणवे वेदांसी । ते जीवजंतूंसी केविं कळे ॥
ही ओवी वाचताना ज्ञानदेवांनी 'ज्ञानेश्वरी'त लिहिलेल्या नवव्या अध्यायातील ओव्या आठवाव्याश्या वाटतात.
परि प्राणियांचें दैव कैसे । जे न देखती मातें ॥ ३०० ॥
ज्ञानेश्वरीही ज्ञानदेवांनीच लिहिली आहे. पण ती 'भगवंताच्या' भूमिकेतून. हरिपाठात मात्र ज्ञानदेव साधकाच्या / अभ्यासकाच्या भूमिकेतून हे लिहितात असे वाचकांच्या निदर्शनास आणून द्यावेसे वाटते.
ज्ञानेश्वरीतील नवव्या अध्यायातील खालील ओव्या ह्या ओवी संदर्भात चिंतनीय आहेत.
आणि आघवेयां जाणणेयांचिया वाटा । जया गांवा येती गा सुभटा ।
जे वेदांचियां चोहटां । वेद्य जें म्हणिजे ॥ २७३ ॥
जेथ नाना मतां बुझावणी जाहाली । एकमेकां शास्त्रांची अनोळखी फिटली ।
चुकलीं ज्ञानें जेथ मिळों आलीं । जे पवित्र म्हणिजे ॥ २७४ ॥
पै ब्रह्मबीजा जाहला अंकुरु । घोषध्वनीनादाकारु ।
तयांचें गा भुवन जो ॐकारु । तोही मी गा ॥ २७५ ॥
जया ॐकाराचिये कुशी । अक्षरें होती अउमकारेंसीं ।
जियें उपजत वेदेंसीं । उठलीं तिन्हीं ॥ २७६ ॥
म्हणोनि ऋग्यजुःसामु । हे तिन्ही म्हणे मी आत्मारामु ।
एंव मीचि कुलक्रमु । शब्दब्रह्माचा ॥ २७७ ॥
नामाचा यथार्थ महिमा प्रत्यक्ष वेदांनाही आकळत नाही. चैतन्याचा विराट सागर विश्वाच्या अतीत आहे. जेव्हा तोच विश्वभाव ग्रहण करतो तेंव्हा तो शक्तिरूपाने प्रत्ययास येतो. तेच शक्तिरूपी स्फुरण संतांच्या ठायी 'नाम'रूपाने वास करीत असते. संत तुकाराम महाराज तर देवालाच कौतुकाने म्हणतात,
'तुझ्या नामाचा महिमा । तुज न कळे मेघश्यामा ॥'तुलसी रामायणात तुलसीदासांनीही असेच उद्गार प्रभू रामचंद्रांना उद्देशून काढले आहेत.
तात्पर्य हेच की नामाचा महिमा जेथे वेदांनाही आकळत नाही तेथे इतर जडबुद्धिच्या स्थूल दृष्टीच्या लोकांना कसा कळणार? ज्या शरीराच्या आधाराने आपण आपली ओळख करून देतो. ज्याच्यामुळे आपण जिवंत आहोत असे आपल्याला वाटते त्या शरीराबद्दल तरी आपल्याला कुठे काही माहीत आहे? तरीही आपण जगतोच ना? मग परमेश्वराबद्दल आपले अज्ञान किती प्रचंड आहे ह्याची कल्पनाही न केलेली बरी. पण ज्यांना ह्याची जाणीव झाली अशा सामान्य माणसांनी संतांच्या सांगण्यावर श्रद्धा ठेवून नाम घेत राहावे म्हणजे एक दिवस त्या भगवंताचे दर्शन होईलच.
ज्ञानदेवा फळ नारायण पाठ । सर्वत्र वैकुंठ केलें असें ॥
नामाचा महिमा गाऊन झाल्यानंतर ज्ञानदेव आता नामाची फलश्रुती नेमकी कशात आहे हे वाचकांना सांगत आहेत. भगवन्नामाच्या पाठाचे फळ म्हणजे 'सर्वत्र वैकुंठ' असे दृष्टीस पडणे. भवरोगाने त्रस्त झालेल्या साधकाला जगाचे खरे दर्शन घडतच नाही. मनोरुग्णाला कळते का की तो रोगी आहे? तसेच सामान्य माणसाला कितीही सांगितले की तो भवरोगाने त्रस्त आहे तरी त्याला हे पटणार नाही. नामाच्या उच्चाराने साधक भवरोगातून मुक्त होतो. त्याला जी दिव्य दृष्टी प्राप्त होते त्या दिव्यदृष्टिला सर्व जग म्हणजे प्रभूचा विस्तार, विश्व म्हणजे परमात्म्याचा चिद्विलास, भूतमात्र म्हणजे चैतन्याची शोभा असा अनुभव प्राप्त होतो.
ज्या नामाने ज्ञानदेवांना हा अनुभव प्राप्त झाला तोच अनुभव तुम्हा-आम्हाला यावा म्हणून ज्ञानदेव आवर्जून सांगतात...
हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा । पुण्याची गणना कोण करी ॥"
॥ श्री सद्गुरुचरणी समर्पित ॥

मनाला भावलेले असे हरिपाठाचे अभंग 24

॥  श्री‌सद्गुरुनाथाय नमः ॥   
अभंग # २४.
जप तप कर्म क्रिया नेम धर्म । सर्वांघटीं राम भावशुद्ध ॥
न सोडी हा भावो टाकी रे संदेहो । रामकृष्णीं टाहो नित्य फोडी ॥
जात वित्त गोत कुळ शील मात । भजकां त्वरित भावनायुक्त
ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी । वैकुंठ भुवनी घर केलें ॥
पाठभेदः भजकां = भजे का; भावनायुक्त = भावयुक्त                    
आपल्या भारतीय जीवनप्रणालीत "धर्म" ह्या संकल्पनेला फार महत्त्व आहे. मानवी व्यवहारातही चार पुरुषार्थ सांगितले आहेत. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. मानवी व्यवहार हे देहभावाच्या अधिष्ठानावरच चालतात. शरीरधर्मात साधी भूक लागली तर त्यातून मोक्ष मिळवण्यासाठी काही तरी खाणे भाग असते. ते खाणे(अर्थ)मिळविण्यासाठीही धर्म ( कर्तव्य ?! )  हवाच! खाण्यामागे क्षुधाशांती आणि  देहसंवर्धन हा मुख्य हेतू आहे. आपली प्रकृती काय आहे, शरीराला काय योग्य ह्या गोष्टींचा विचार करूनच काही नियम  केले जातात ( उपासना ?!). ह्या नियमांचे पालन करून तसे वागले तर उत्तम आरोग्य आणि शांती आपल्या घरी सुखाने नांदतात. वरील पुरुषार्थांत धर्माचे स्थान प्रथम आहे. तर ज्ञानदेवांच्या हरिपाठातील ह्या अभंगाच्या पहिल्याच चरणात जप, तप, कर्म, क्रिया, नेम आणि मग धर्म येतो. अध्यात्म किंवा परमार्थ सुरू होतो तो देवाच्या ओळखीतून आणि सांगता होते ती स्वये देव होण्यात. आपल्या ठायी असणाऱ्या देवाची ओळख झाली की 'सर्वांघटी राम' ह्या भावाची धारणा करावी लागत नाही. मुळात नाना प्रकारच्या उपासना करणाऱ्या लोकांना उपासनेचे मुख्य वर्म नेमके कशात आहे हेच कळत नाही. त्यामुळे साधकाच्या पदरात कष्ट मात्र पडतात; पण फळ दूर राहते. 'सर्वांघटी राम' ह्या शुद्ध भावाचा अंतःकरणात उदय होण्यासाठीच ह्या साऱ्या उपासना आहेत. भगवत गीतेतही भगवान श्रीकृष्ण १८व्या अध्यायात सांगतात,
"ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशे ऽ र्जुन तिष्ठति ।
भ्रामयन्सर्वभूतानि यन्त्रारूढानि मायया ॥ ६१॥

ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीत हे गुह्य अधिकच स्पष्ट केले आहे.
तोचि एक ईश । तुझिया अंतरीं । पार्था वास करी । निरंतर ॥ २२६८ ॥
न घेतां पार्थत्व । अहं ऐसें स्फुरे । अंतरी ते खरें । त्याचें रूप ॥ २२६९ ॥ (अध्याय १८)
ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायात ज्ञानदेव स्वतःच लिहितात,
या उपाधिमाजि गुप्त । चैतन्य असे सर्वगत ।
तें तत्त्वज्ञ संत । स्वीकारिती ॥ १२६ ॥

"सर्वांघटी राम", "ईश्वरः सर्वभूतानां" आणि " या उपाधिमाजि गुप्त । चैतन्य असे सर्वगत ।" हे सर्व सत्य आहे. पण आपल्यासारख्या सामान्य माणसांना याची प्रचिती येते का? तसा आपला अनुभव तर नाही. कारण स्थूल ज्ञानेंद्रियांच्या द्वारे जे प्रचितीला येते तेच खरे असे म्हणणाऱ्या स्थूल दृष्टीच्या माणसांना सूक्ष्म चैतन्यरूप जगाचे दर्शन होणार तरी कसे? पण ज्ञानदेव हरिपाठात पुन्हा पुन्हा आपल्याला सांगतात की भाव धर आणि सत्य जाणून घे.
न सोडी हा भावो टाकी रे संदेहो । रामकृष्णीं टाहो नित्य फोडी ॥
हरिपाठात ज्ञानदेव देवाच्या प्राप्तीसाठी नामस्मरणाचा मार्ग सांगत असले तरी ते "भावा"लाही तितकेच प्राधान्य देतात हे विसरून चालणार नाही. नामस्मरण, भावस्मरण आणि देवस्मरण असा हा सुलभ मार्ग आहे हे आपण ध्यानात घेतले पाहिजे.
        सर्वसामान्यपणे, माणूस कुणीतरी सांगितले म्हणून देवासाठी  काहीतरी उपासना करतो. देवाच्या असण्याबद्दल श्रद्धा नसते असे नाही. पण ती सदोष असते. ह्यात त्याचा दोष काहीच नाही. कारण देवाबरोबरच माणसाला जगदेखील तितकेच खरे वाटते. त्याच्या परिणामस्वरूप जीवनांत मनाविरुद्ध काही घडले की देवाच्या अस्तित्वाबद्दलच शंका येते.अशावेळी मनात कोणताही संदेह न ठेवता टाहो फोडून त्याचा धावा करावा असा उपाय ज्ञानदेव आपल्याला सांगतात. देवाचे नाम घेणाऱ्याच्या हातात प्रार्थना हे मोठे शस्त्र आहे. भगवंतावरील श्रद्धा निकोप राहणे हे आध्यात्मिक आरोग्य आहे. ह्यासाठी प्रार्थनेसारखा नामी उपाय नाही.
"सर्वांघटी राम" ही दृष्टी आज आपल्याजवळ नसली तरी ते त्रिकालाबाधित सत्य आहे. मनात कोणताही संदेह न ठेवता त्या सत्याच्या शुद्ध भावात उपासना चालू ठेवली असता अभ्यासाने आणि प्रार्थनेने त्याच सत्याचा साक्षात्कार नामधारकाला होणारच.
जात वित्त गोत कुळ शील मात । भजकां त्वरित भावनायुक्त ॥
माणसाला जात, वित्त, गोत, कुळ जन्मताच चिकटतात आणि त्याचसाठी तो जन्मभर कष्ट करतो. जातीचा अभिमान, श्रीमंतीचा गर्व, आप्तांचा भरवसा, कुळाचा उच्चपणा ह्या गोष्टी माणसाचा अहंकार पुष्ट करतात. तर ह्याच्या उलटही होऊ शकते. माणूस नकळत स्वतःला हीन, दीन, लाचार समजतो. पहिला अहंकार त्याला तर त्रास देतोच पण समाजालाही अहितकारक असतो. दुसऱ्या प्रकारच्या 'अहं'कडे आपले बऱ्याचदा दुर्लक्ष होते. त्याचा आपल्यावर किंवा समाजावर प्रत्यक्ष परिणाम काही दिसत नाही असा आपला गैरसमज / भ्रम असतो. ह्या अहंकाराचे दृश्य स्वरूप म्हणजे माणसाच्या ठायी असणारा न्यूनगंड. त्यामुळे माणसाची कुवत असूनही माणूस कार्यविन्मुख होतो आणि जीवनात सुख-आनंद ह्यांना पारखा होतो.
परमार्थातही अहंकारच भगवंत दर्शनाच्या आड येतो. माणसाचा अभिमान, गर्व त्याला बहिर्मुख करतात. त्यामुळे माणसाचे मन सूक्ष्म भगवंताकडे वळत नाही. तर न्यूनगंडामुळे देवाला दोष देत तो देवाकडे पाठ करतो. ज्ञानदेव,तुकाराम,नरहरी सोनार,चोखा मेळा इ.मराठी संतांबद्दल माझ्या मनात आदर,प्रेम आहे ते याबद्दलच. त्यांनी स्वतः जगून, नामाला पूर्ण समर्पित होऊन पोथ्या,देवळात बंद केलेल्या देवाला आपलेसे केले आणि सर्वांना हा सुलभ मार्ग मोकळा करून दिला. जात,वित्त,गोत ह्या गोष्टी प्रारब्धाने / पूर्वपुण्याईने मिळाल्याच तर त्यांची किंमत ओळखून भगवंताच्या नामात मन गुंतवावे. शुद्ध भावाने युक्त होऊन त्वरित भजन-नामस्मरणाचा मार्ग स्वीकारावा. नामधारकाला बंधमुक्त करून अंतर्बाह्य सुखी करणे हेच नामस्मरणाचे फळ. म्हणूनच जात-पात,कुळ-शील,वित्त-गोत याचा जराही विचार न करता नामस्मरणातून देवाचे भजन त्वरित करावे. तुकाराम महाराजही हाच उपदेश करतात,
'आता तरी पुढे हाचि उपदेश । नका करू नाश आयुष्याचा ॥'एकदा का नामाला गती आली की,
ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी । वैकुंठ भुवनी घर केलें ॥
हा ज्ञानदेवांचा अनुभव नामधारकालाही सहज येतो. शुद्ध भावाने युक्त अशा भजनाचा-नामस्मरणाचा सतत अभ्यास केल्याने "ध्यानी मनी रामकृष्ण" अशी साधकाची अवस्था प्राप्त होऊन जो अद्भुत लाभ नामधारकाला होतो त्याचे वर्णन ह्या चरणात ज्ञानदेवांनी केले आहे.
      तीनही देहांच्या पलीकडे जे स्वस्वरूप ते वैकुंठ होय. अखंड आनंद म्हणजे गोविंद स्वरूपी नित्य वास करतो. पण या ठिकाणी तो जीवाला अव्यक्त असतो आणि आनंद हृदयात असूनही जीवाला त्याचा भोग मिळत नाही. दिव्य नामाच्या उच्चाराने हृदयातील हा भगवंत परेच्या पलीकडील प्रांतातून नामधारकाच्या अंतःकरणात उतरतो, इंद्रियांत पसरतो आणि देहाला व्यापून राहतो. याचाच अर्थ असा की, श्रीहरी परमात्मा नामाच्या प्रेमाने वैकुंठ लोकातून भूलोकी येऊन राहिला.

ज्या नामाच्या प्रभावाने हा अनुभव ज्ञानदेवांना आला तोच अनुभव इतरांनाही यावा म्हणून ज्ञानदेव सांगतात,
हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा । पुण्याची गणना कोण करी ॥"
                     ॥ श्री सद्गुरुचरणी समर्पित ॥

मनाला भावलेले असे हरिपाठाचे अभंग 23

॥  श्री‌सद्गुरुनाथाय नमः ॥   
अभंग # २३.
सात पांच तीन दशकांचा मेळा । एकतत्त्वीं कळा दावी हरि ॥
तैसे नव्हे नाम सर्व मार्गां वरिष्ठ । तेथें काही कष्ट न लागती ॥
अजपा जपणे उलट प्राणाचा । तेथेंही मनाचा निर्धारू असें ॥
ज्ञानदेवा जिणे नामेंविण व्यर्थ । रामकृष्णी पंथ क्रमियेला ॥
पाठभेदः सर्व मार्गा = सर्वत्र ; तेथे = येथे ;मनाचा = नामाचा
हरिपाठ लिहिण्यामागे ज्ञानदेवांची मूळ प्रेरणा आणि हेतू आहे तो नामस्मरण साधनेने हरिप्राप्ती सहज आणि सुलभ आहे हे साधार सांगणे. संसारी लोकांनी परमार्थाकडे वळून सहज असणारा देव सहज आणि विनासायास कसा प्राप्त करून घ्यायचा हे सांगण्यासाठीच हरिपाठाचे प्रयोजन आहे. ज्ञानेश्वरी वाचताना आपल्या लक्षात येते की ज्ञानदेव हे खरेच 'ज्ञानियांचा राजा' होते. ज्ञानेश्वरीतील सहावा अध्याय वाचताना त्यांना 'योगिराज' म्हणणे योग्यच आहे हे प्रकर्षाने जाणवते.    
         त्यांची नामनिष्ठा आणि सर्वसामान्यांप्रती असलेली कणव ह्यामुळेच त्यांनी हरिपाठ लिहिला असावा. ह्या अभंगातूनही नाममार्ग आणि इतर मार्ग यांची तुलना करून नाम हाच श्रेष्ठ मार्ग आहे असा स्पष्ट अभिप्राय ज्ञानदेवांनी दिला आहे.
शास्त्रग्रंथांचे वाचन / श्रवण करताना आपल्याला कळते की आपल्या दिव्यस्वरूपाचा विसर पडण्याचे कारण आहे माया. माया दोन प्रकारे कार्य करते. एक म्हणजे आवरण; ज्यामुळे आपल्याला आपल्या दिव्यस्वरूपाचा विसर पडला आणि दुसरे म्हणजे विक्षेप; जेणे करून जे नाही तेच आपल्याला सत्य भासू लागणे आणि वृत्तीतादात्म्यामुळे आपल्याला त्यातून सुख-दुःखाची अनुभूती येणे. आपण चित्रपट पाहायला चित्रपटगृहात जातो. चित्रपटाचा अनुभव घेण्यासाठी बाह्यजगताशी आपला संबंध तुटणे आवश्यक असते. आत काळोख करून अगदी आपल्या शेजारी असलेल्याशीही आपला संबंध दुरावतो. नंतर पडद्यावर चित्रफीत दाखवली जाते. आपण त्याच्याशी इतके एकरूप होतो की नकळत आपण त्यातील पात्रांच्या सुखदुःखाने आनंदी अथवा दुःखी होतो. अगदी तसाच अनुभव आपल्याला झोपेत येतो. झोपल्यामुळे आपला जगाशी संबंध तुटतो (आवरण!) आणि विक्षेपामुळे स्वप्नात स्वप्नमय जगाचा अनुभव आपण घेतो. स्वप्नातील प्रसंगाशी आपण इतके एकरूप होतो की त्यातील घटनांप्रमाणे आपण सुखदुःखांचे अनुभव घेतो. ह्यातून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे ते आवरण दूर करून 'जागे होणे'. परमार्थातही मायेचे आवरण दूर करून आपल्याला आपल्या स्वरूपी जागे करणे (देवाची प्राप्ती करून देणे) हाच सगळ्या साधनांचा हेतू आहे.
सात पांच तीन दशकांचा मेळा । एकतत्त्वीं कळा दावी हरि ॥
त्यासाठी योगमार्ग, तपोमार्ग, ज्ञानमार्ग, इंद्रियदमन यासारखे मार्ग शास्त्रकारांनी सांगितले आहेत. यामुळे मायेचे आवरण दूर सारून आपल्याला आपल्या दिव्यस्वरूपाची अनुभूती घेता येईल. भक्तीच्या भाषेत सांगायचे तर साधकाला देवाची प्राप्ती सहज होईल.
अष्टांगयोगातील सात पायऱ्या ( यम, नियम,आसन, प्राणायाम. प्रत्याहार,धारणा आणि ध्यान ) ओलांडल्या की समाधीतून देवाची प्राप्ती होते. पाच म्हणजे पंचाग्निसाधकाचा (पंचाग्निविषयी) किंवा त्यासारखा तपाचा मार्ग. तीन म्हणजे तीन देहांचा ( स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह ) निरास करून त्यांच्या पलीकडे असलेल्या आत्मतत्त्वाशी एकरूप होण्याचा व्यतिरेकाचा ज्ञानमार्ग. दहा इंद्रियांच्या दमनाचा मार्गही वाटतो इतका सोपा नाही.ह्या मार्गाने जाऊन विषयासक्त असलेल्या इंद्रियांचे बळेच दमन करण्यात काय मरणप्राय दुःख आहे याची कल्पनाही सर्वसाधारण मनुष्याला येणे कठीण आहे.
दुसरे म्हणजे वरील मार्ग साधकाच्या दृष्टीने अतिशय खडतर आहेत. योग्याला आपल्या शरीराला वेठीस धरावे लागते आणि बऱ्याचशा भौतिकसुखांपासून त्याला वंचित राहवे लागते. तपाचा मार्गही असाच कठीण आहे. ज्ञानमार्गाने जायचे तर तसा स्वानुभवी आत्मज्ञानी मिळायला हवा ज्याच्या मुखातून असे श्रवण कानी पडेल. साधकाने 'मी देह नसून त्यांचा साक्षी केवळ आत्मा आहे-ब्रह्म आहे-असा दृढ निश्चय करणे' असा कितीही विचार केला तरी प्रत्यक्ष आचाराचा प्रश्न येतो तेंव्हा विचार विचाराच्याच ठिकाणी राहतो व मी ब्रह्म आहे म्हणणाऱ्या साधकाच्या पदरात ब्रह्मघोटाळा मात्र पडतो.
दुसरे धोके म्हणजे साधकाला जर ह्या मार्गाने जाऊन काही सिद्धी प्राप्त झाल्या तर तो त्यामध्येच अडकण्याचा धोका असतो. गर्व, द्वेष इ. मुळे साधनाभ्रष्ट होण्याचीच शक्यता जास्त असते.परंतु
तैसे नव्हे नाम सर्व मार्गां वरिष्ठ । तेथें काही कष्ट न लागती ॥
नामस्मरण साधनेत असे धोके नाहीतच. भक्ती म्हणजे देवाप्रती प्रीती! नामस्मरणाने भक्ती प्रगट करणे यासारखे दुसरे सुलभ साधन नाही. पण आपला स्वभाव असा आहे की सोपे साधन आम्हाला पटत नाही. संतांनीही हेच सांगितले,
'सोपे वर्म आम्हां सांगितले संती । टाळ दिंडी हाती घेऊनि नाचा ॥'
गजाननमहाराजांनी शिष्यांना उपदेश केला आहे.
या तिन्ही मार्गाचे अंतिम फळ ध्यान साचे ।
परी ते ज्ञान प्रेमाचेविण असता कामा नये ।
जे जे कृत्य प्रेमाविण ते ते अवघे शीण ।
म्हणून प्रेमाचे रक्षण करणे तिन्ही मार्गांत ।
ज्ञानदेवांनीही आधीच्या अभंगातून हेच सांगितले आहे.
'उगा राहि निवांत । शिणसी वाया ॥'नामस्मरणासारखे सुलभ साधन हाती असता कष्टप्रद मार्गाने जाण्याची खरंच गरज आहे का ?
अजपा जपणे उलट प्राणाचा । तेथेंही मनाचा निर्धारू असें ॥
माणसाच्या ठायी मन आणि प्राण दोन्ही आहेत. ह्या दोहोंपैकी एकास स्वाधीन केले की दुसरे ताब्यात येते. ह्या दोहोंच्या एकत्वातच हरीचे सुख प्राप्त करून देण्याचे सामर्थ्य आहे. नरसी मेहता यांचे भजन मार्गदर्शनीय आहे.
'मन अने प्राणनो साध्यो सुमेळ में । गगनमा घंटडी वागी रे ।'अजपाजपाचा माणसाच्या श्वासोच्छ्वासी निकट संबंध आहे. ही क्रिया जन्मापासून मरेपर्यंत अखंडपणे चालते. नाकाने श्वास आत घेणे व तो बाहेर सोडणे या दोन्ही क्रिया मिळून एक सहज जपक्रिया होते. हा जप करावा लागत नाही. तो आपोआप होतो. श्वास आत घेताना सो आणि श्वास बाहेर सोडताना हं असा सोहं मंत्राचा जप जन्मभर चालतो. अजपाजपाला माळ नको,संख्या मोजणे नको. श्वासावर सारखे अनुसंधान मात्र हवे. अनुसंधान टिकू लागले की श्वासांची गती हळूहळू मंदावते. एका मर्यादेपर्यंत ते सहन होते. पण नंतर श्वास निरोध होऊ लागतो. ते रोखणे सहन करणे अत्यंत कठीण असते. ह्यासाठी मजबूत मनच हवे. जीव गुदमरतो, कासावीस होतो. त्यातून सहीसलामत पार पडण्यासाठी प्राणाला उलटवता आले पाहिजे.उलट फिरलेला प्राण कुंडलिनी जागी करतो.ती शक्ती जागी झाली की प्रथम केवलकुंभक साधतो. केवलकुंभकाने प्राण एकत्र गोळा झाला की हृदयांतील अनाहत चक्र जागे होते.कुंडलिनी तेथपर्यंत पोचली की २४ तास सोहंचा झंकार ऐकू येतो. हाच नादब्रह्माचा साक्षात्कार होय. ह्याचे सविस्तर वर्णन ज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्यायात आहे. पण तेथून पुढे शब्दब्रह्मापर्यंत जायचे असते. त्यासाठी गुरूकृपाच लागते. ह्या खडतर मार्गापेक्षा नामस्मरणाच्या मार्गाने जावे.
ज्ञानदेवा जिणे नामेंविण व्यर्थ । रामकृष्णी पंथ क्रमियेला ॥
या ओवीत ज्ञानदेवांनी नामाविषयीचा आपला जिव्हाळा व्यक्त केला आहे. शरीराला गौणपणा देऊन मनाला साधनांत संपूर्णपणे गुंतवणारा मार्ग केंव्हाही बरा यात शंका नाही. मन हेही शक्तिरूपच आहे. या शक्तीला बळजबरीने वळवण्यापेक्षा युक्तीने भगवंताकडे वळवणे अंतिम सुखाचे आहे. ज्ञानदेव स्वतः ह्या मार्गाने गेले. भगवन्नामाचे सर्वांगीण महत्त्व आणि माहात्म्य ओळखल्यानंतर नामाशिवाय जगणे व्यर्थ आहे असा त्यांचा निश्चय झाला. म्हणूनच भगवन्नामाचा पंथराज किंवा राजमार्ग त्यांनी स्वीकारला. नामाशिवाय जगण्यात अर्थ नाही असे त्यांना वाटू लागले. यातच त्यांची नामावरील निष्ठा आणि श्रद्धा दिसून येते. म्हणूनच ज्ञानदेव सर्वांना उपदेश करतात.

"हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा । पुण्याची गणना कोण करी ॥"
                     ॥ श्री सद्गुरुचरणी समर्पित ॥

मनाला भावलेले असे हरिपाठाचे अभंग 22

॥  श्री‌सद्गुरुनाथाय नमः ॥   
अभंग # २२.
नित्य नेम नामीं ते प्राणी दुर्लभ । लक्ष्मीवल्लभ तयां जवळी ॥
नारायण हरि नारायण हरि । भुक्ति मुक्ति चारी घरी त्यांच्या ॥
हरिविण जन्म नरकचि पै जाणा । यमाचा पाहुणा प्राणी होय ॥
ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड । गगनाहूनि वाड नाम आहे ॥

पाठभेदः ते प्राणी = तो नर; भुक्ति = भक्ति

आपण आपल्या आजूबाजूला पाहिले तर एक गोष्ट आपल्या सहज लक्षात येते. सर्वसामान्य माणूस इतर सर्व गोष्टींत रस घेईल पण भगवंताबद्दल काही ऐकणे, वाचणे किंवा जाणून घेणे ह्याबाबतीत तो सदैव उदासीन असतो. अगदी थोडीच माणसे अशी असतात जी भगवंतप्राप्तीचे ध्येय निश्चित करून एखादे साधन / मार्ग अंगिकारतात. त्यापैकी अगदी थोडी नामस्मरण हा मार्ग स्वीकारतात. त्या नाम घेणाऱ्या साधकांपैकी अगदी थोडेच असे असतात जे खऱ्या अर्थाने नामाला वाहून घेतात. नामाला चिकटणे वाटते इतके सोपे नाही. त्याला निष्ठा आणि चिकाटी हवीच. त्यात माणूस हा कर्मप्रिय आहे. फक्त नाम घेऊन काय होते का? असाच प्रश्न तो नामधारकांना किंवा सद्गुरूंनाच विचारतो. सर्वसामान्य माणूस सर्वांवर प्रेम करील पण भगवन्नामावर प्रेम स्थिर होणे कठीणच आहे. अगदी सुरुवातीला कुणाच्या तरी सांगण्याने नाम घेतो. पण हळूहळू नामाचा कंटाळा येऊ लागतो. नाम घेण्यात मन रमतच नाही. नामाचा कंटाळा येऊ लागतो. एखादाच दुर्मिळ मनुष्य की ज्याचे नामावरच लक्ष स्थिर होते. एखादाच दुर्लभ मनुष्य ज्याचे नामावर प्रेम जडते. मन नामाला चिकटण्यास थोडीतरी आध्यात्मिक क्षमता आवश्यक असते. काहींच्या ठायी ती उपजतच असते. तर काहींना संतसंगतीने लाभते.काहींना केवळ श्रद्धेने नाम घेतल्यानेही अशी क्षमता प्राप्त होते. परम भाग्याने जर संतसंगती मिळाली तर साधकाचे ठायी नामाची गोडी निर्माण होते व अखंड नामस्मरण-नित्य नेम नामी हेच त्याच्या जीवनाचे सार होते. हळूहळू त्याची आध्यात्मिक क्षमता बहरू लागते आणि भगवंताचे अस्तित्व अगदी आपल्यापाशीच आहे अशी जाणीव त्याला होऊ लागते. ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीतही हेच सांगितले आहे.
"तो मी वैकुंठी नसे । वेळु एक भानुबिंबहि न दिसे । वरि योगियांचीही मानसे । उमरडोनी जाय ।" " तरि तयापाशी पांडवा । मी हरपला गिवसावा । जेथं नामघोषु बरवा । करिती माझा ।"संतांचाही असाच अनुभव आहे.
'नित्य काळ जेथे हरिनामाचा घोष । तेथे जगन्निवास लक्ष्मीसहित ॥'
'मागे पुढे उभा राहे सांभाळित । आलिया आघात निवाराया ।'

नारायण हरि नारायण हरि । भुक्ति मुक्ति चारी घरी त्यांच्या ॥
भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव फार आल्हाददायक असते. त्या जाणीवेच्या प्रभावानेच नामधारकाचे मन हळूहळू अंतर्मुख होऊन नामामध्ये रमायला लागते. नामात रंगलेला नामधारक देहाची कोंडी फोडून सर्व विश्वालाच आपले समजू लागतो.त्याच्या अपेक्षेचे आणि महत्त्वाकांक्षाचे स्वरूपच बदलते. इतरांसाठी सहज आपलेपणा निर्माण झाल्यामुळे त्याचीही चिंता इतर जण वाहतात. परंतु अशा ऐश्वर्यात संत कधीच रमत नाहीत. संत तुकाराम महाराजांनी शिवाजी राजांकडून चालत आलेले ऐश्वर्य नाही का परतवून लावले? परिसा भागवताचा परिस नामदेवांनी नदीत बुडवून टाकलाच ना? अशा ऐश्वर्याचा आणि सिध्दींचा संतांना काय उपयोग? अशा विषयांनदापेक्षा सहस्र पटीने श्रेष्ठ असा भगवंताचा प्रेमानंद त्यांना प्राप्त झालेला असतो. त्यांच्या घरी भुक्ति आणि चारी मुक्ती अक्षरशः पाणी भरत असतात.
हरिविण जन्म नरकचि पै जाणा । यमाचा पाहुणा प्राणी होय ॥
नरक ही संकल्पना आताच्या काळी सर्वसाधारण माणसाला पटणार नाही. जेथे परमेश्वरालाच 'रिटायर्ड' करण्याचे वेध लागलेत तेथे नरक ही गोष्ट कशी पटेल? नरकामध्ये जीवाला शारीरिक आणि मानसिक यातना भोगाव्या लागतात आणि त्या असह्य असतात असे म्हणतात. अगदी विचार केला तर आपल्या लक्षात येईल की आपल्याला दुःख आणि त्रास देणाऱ्या बाह्य गोष्टी नसतात; तर त्यासंबंधी आपल्या मनात येणारे विचार आणि प्रतिक्रियाच आपल्याला जास्त दुःख अथवा क्लेश देतात. भय आणि चिंता ह्यामुळेच माणूस हैराण होतो. जर शांत मनाने जगता येत नसेल तर मग असा अशांत आणि अतृप्त मनाचा माणूस मेल्यानंतर तेच मन घेऊन अदृश्यांत जाणार हे उघड आहे. तेथे त्याला भयचिंता काही सोडत नाहीत. शिवाय येथे जी दुष्कर्मे केलेली असतात त्यांची फळे तेथे भोगावीच लागतात. निसर्गामध्ये ( विश्वामध्ये ) नैसर्गिक नियंत्रण व्यवस्था असल्यामुळे आपल्या कर्मांची फळे भोगायला लावणारी शक्ती तेथे वास करते.तिला यम अशी संज्ञा आहे. 'यमाचा पाहुणा' या शब्दात एक अव्यक्त गोष्ट आहे. ती म्हणजे माणूस काही कायमच तेथे वास करणार नसतो. कर्माची फळे भोगल्यानंतर तो पुन्हा पृथ्वीवर परत येतो. म्हणून तो 'यमाचा पाहुणा'! परत आल्यावर येथे पूर्ववत् जीवन चालू होते.पुन्हा त्याच चिंता, त्याच इच्छा आणि तेच विषयभोग. पण देवाचे नाम काही घेतले जात नाही. म्हणूनच तुकाराम महाराज लिहितात,
'किती वेळा जन्मा यावा । किती व्हावे फजित' तर शंकराचार्य लिहितात,
'पुनरपि जननं पुनरपि मरणं । जननी जठरंद्रियें शयनं ॥'
ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड । गगनाहूनि वाड नाम आहे ॥
ह्या ओवीवर चिंतन करण्यापूर्वी मला ज्ञानदेवांच्या हरिपाठातील मागील अभंगातील खालील ओव्या आपल्या नजरेस आणून द्याव्याशा वाटतात.
ज्ञानदेव म्हणे निवृत्ति निर्गुण । दिधले संपूर्ण माझे हाती ॥
(अभंग १२)
ज्ञान गूढ गम्य ज्ञानदेवा लाधले । निवृत्तिने दिधले माझ्या हाती ॥ (अभंग १७)

ज्ञानदेव स्वतः 'ज्ञानियांचा राजा', 'योगियांचे योगिराज' होते. पण देवाच्या निर्गुण स्वरूपाविषयी किंवा अध्यात्मातील गूढ ज्ञानाचे आकलन होण्यासाठी ते आपल्या सद्गुरूंना पूर्ण शरण गेले आहेत. येथे साधकाच्या प्रयत्नांना कमी लेखायचे नाही. पण साधकाचे प्रयत्न एका मर्यादेपर्यंतच साथ देऊ शकतात. अंतिम अनुभूती मात्र केवळ ईश्वरी कृपा किंवा सद्गुरूकृपा ह्यामुळेच येऊ शकते असे तर त्यांना सुचवायचे नाही ना?
ह्याआधी नामावर आणि त्याच्या अनुभवावर भरभरून लिहीत असता ज्ञानदेव आपल्या सद्गुरूंचा उल्लेख करत नाहीत. पण येथे मात्र तो आवर्जून करतात. एका मर्यादेपर्यंतच साधक नामाची महती जाणू शकतो.
परमेश्वराप्रमाणेच त्याचे नामही अनंत आहे. ते गगनाहूनि वाड आहे. आकाश आपल्याला निळे भासते. पण जसं जसे आपण त्याला जाणण्याचा प्रयत्न करू लागतो तसं तसे आपल्याला कळते की आकाश म्हणजे केवळ एक पोकळी आहे. पाणीही आपल्याला निळेच भासते. पण त्याला ना आकार ना स्वतःचा रंग. देवाचे नामही असेच आहे. नाम घेता घेता आपल्या नामाचा ध्वनी अव्यक्त अनाहतनादांत लीन होतो. तो शरीराच्या कानाला ऐकू येत नाही. श्रवणशक्तीला तो ऐकू येतो. तो ध्वनीदेखील वाड म्हणजे अमर्याद आहे. कारण तो मूळचा ओंकार आहे. नाम हे चैतन्याचे शुद्ध स्फुरण आहे. तर आकाश हे पंचमहाभुतांपैकी एक आहे व जड आहे.एका जनार्दनी नाम । शुद्ध चैतन्य निष्काम ॥'चैतन्य हे जडापेक्षा श्रेष्ठ असल्याने चैतन्यघन असे नाम जड आकाशापेक्षा  श्रेष्ठच असणार. जड असल्याकारणे आकाशाला सीमा आहेत. शिवाय भूतमात्रांना तारण्याचे सामर्थ्य आकाशात नाही. याच्या अगदी उलट नामाचा महिमा आहे.'नामाचा महिमा कोण करी सीमा । जपा श्रीरामा एक्या भावे ॥'
'नामेचि तरले कोट्यानु हे कोटी । नामे हे वैकुंठी बैसविले ॥'
सर्वात महत्वाचे म्हणजे आकाशासकट अनंत ब्रह्मांडे ज्या हरीच्या उदरात आहेत त्या हरिलाच अंकित करून घेण्याचे सामर्थ्य नामात आहे. म्हणूनच नाम हे गगनाहूनि वाड, श्रेष्ठ आहे.

नामाचे हे माहात्म्य ओळखूनच ज्ञानदेव सर्वांना उपदेश करतात.
"हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा । पुण्याची गणना कोण करी ॥"
                     ॥ श्री सद्गुरुचरणी समर्पित ॥

मनाला भावलेले असे हरिपाठाचे अभंग 21

॥  श्री‌सद्गुरुनाथाय नमः ॥   
अभंग # २१.
काळवेळ नाम उच्चारितां नाहीं । दोन्ही पक्ष पाहीं उद्धरती ॥
रामकृष्ण नाम सर्व दोषां हरण । जडजीवां तारण हरि एक ॥
हरिनाम सार जिव्हा या नामाची । उपमा त्या दैवाची कोण वानी ॥
ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ । पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा ॥

पाठभेदः हरिनाम=नाम हरि, ज्ञानदेवा=ज्ञानदेवीं

भगवंतप्राप्तीची इतर जी साधने आहेत त्यांत स्थळ,काळ, शूची-अशुचि इ. नियम पाळावे लागतात. परंतु नामस्मरणाला काळ-वेळेचे बंधन किंवा शूची-अशुचिचे नियम नाहीत.
"काळवेळ नसे नामसंकीर्तनी । उंचनीच योनी हेंही नसे ॥
धरा नाम कंठी सदासर्वकाळ । मग तो गोपाळ सांभाळील ॥"
"नामासी नाही स्नान बंधन । नाहीं नामापाशी विधि विधान ॥"
असा इतर संतांचाही अनुभवाधिष्ठित उपदेश आहे.मी गमतीने म्हणतो..मरणाला कुठे काळ-वेळ असते?नामस्मरण करणे म्हणजे 'मी' त्याच्यात मरून जाणे आणि नामी होऊन राहणे. भगवंत स्थळ आणि काळ यांच्या पलीकडे आहे. त्याची सहज आणि अखंड अनुभूती घेण्यासाठी नामासारखे साधन नाही. सुरुवातीला मात्र काही काळ नामस्मरणाची वेळ आणि जागा निश्चित असेल तर ते साधकाला हितकारकच ठरते. शरीर आणि मन नकळत साथ देऊ लागते. एकदा का नाम अंतर्मनात रुजले की नामधारकाचे काम झाले. तुकाराम महाराजांच्या जीवनातील एक प्रसंग सांगितला जातो. ते प्रातर्विधिकरिता गेले होते. तेथेच नामात दंग झाले. त्यांना भेटावयास आलेल्या एका शास्त्रीबुवांनी ते पाहिले आणि त्यांचा राग अनावर झाला व म्हणाले,'ही काय जागा आहे पवित्र नाम घेण्याची? तुम्ही लोकांनीच धर्म बुडवला आहे. कुठेही नाम घेता.' महाराज म्हणाले,'काय करू? माझी मज झाली अनावर वाचा'तुम्ही माझी जीभ धरा म्हणजे मी नाम घेणार नाही.' हे ऐकल्यावर शास्त्रीबुवांनी महाराजांची जीभ धरली. त्याबरोबर शास्त्रीबुवाच विठ्ठल नामात दंग झाले आणि नाचू लागले. असा जर संतांचा अनुभव असेल तर आपण सामान्य जनांनी का काळजी करावी?
हरिपाठात ज्ञानदेवांचा आग्रह आहे,
'असोनी संसारी जिव्हे वेगु करी' तर तुकाराम महाराजांच्याच एका अभंगात महाराज लिहितात,
'रात्रंदिन आम्हां युद्धाचा प्रसंग । अंतर्बाह्य जग आणि मन ॥' गीतेच्या आठव्या अध्यायात भगवान म्हणतात,
"तस्मात्सर्वेषु कालेषु मामनुस्मर युद्धच"आता सामान्य माणसाला आपल्या अशा धकाधकीच्या जीवनात भगवंताचे स्मरण ठेवायचे असेल तर असे साधन हवे ज्याला काही स्थळकाळाची बंधने असणार नाहीत. हे का संतांना ठाऊक नसणार? नामाशिवाय दुसरे असे कोणतेही साधन नाही जे असे सुलभ आहे. नामस्मरणयोगात हे सत्य स्वीकारले आहे की भगवंत स्थळ-काळाच्या पलीकडे आहे.म्हणून केंव्हाही, कोठेही नाम घेतले तरी ते त्याच्यापर्यंत पोचणारच."जेथे उठे 'मी'चे स्फुरण तेथे म्हणा विठ्ठल विठ्ठल " असा तुकाराम महाराजांचाही उपदेश आहे.

मानवी जीवनाचा केंद्र आहे "मी"! हा 'मी' एका बाजूने जगाशी जोडला आहे तर दुसऱ्या बाजूने भगवंताशी. नामस्मरण करता करता भगवंताच्या कृपाप्रसादाने हा 'मी' भगवत्स्वरूप होऊन जातो आणि 'मी'चा उद्धार होतो. तर जसा जसा 'मी'चा उद्धार होत जातो तसतसा त्याच्या संपर्कात येणाऱ्या जगाचाही उद्धार होतो. मानवी व्यवहारात दुःखाचे कारण आहे स्वार्थ! इतरांचाही स्वार्थ असतो आणि तोही साधला गेला पाहिजे हे नकळत आपण विसरतो.  नामस्मरणाने माणसाचे मन नकळत शुद्ध होत जाते. तो निःस्वार्थी बनत जातो. जगाशी त्याचे संबंध नकळत आपलेपणाचे होऊ लागतात. अशा लोकांच्या सहवासाने, उपदेशाने जग सन्मार्गी लागले तर नवल ते काय? अजूनही साईबाबा, गजानन महाराज ह्या जगात देहाच्या अंगाने नसले तरी त्यांचे कार्य अखंड चालूच आहे ना? स्वतःचा उद्धार तर त्यांनी साधलाच;पण त्यांच्या संपर्कातील जगाचाही उद्धार केला.
रामकृष्ण नाम सर्व दोषां हरण । जडजीवां तारण हरि एक ॥
माणूस म्हटला की त्याच्यात गुणदोष हे असणारच. सामान्य मानवी व्यवहारात जे दोष आपल्याला दिसतात त्याचे मूळ आहे अहंकार. माणसाचा 'मीपणा' अथवा अहंकारच सर्वात मोठा दोष आहे असे संतांचे सांगणे आहे. तोच तर देवाच्या दर्शनाच्या आड येतो. म्हणूनच तुकाराम महाराज सांगतात,
'अहंकार गेला । तुका म्हणे देव झाला ॥' अध्यात्म साधनेत आणि देवाच्या दर्शनात  हा 'अहंकार'च मोठा अडसर आहे. नामस्मरण करता करता माणसाचा हा अहं शून्यवत होतो. नामधारक हळूहळू अंतर्मुख होतो आणि त्याच्या एक लक्षात येते की बाह्य जगतावर विजय मिळवणे शक्य आहे. पण आपल्या अंगी असलेल्या अवगुणांना, विकारांना जिंकून देवाच्या प्रांतात जाणे कठीण आहे. नकळत तो सद्गुरू किंवा भगवंताला शरण जातो. त्यानंतरचे त्याचे नामस्मरण हे आत्यंतिक तळमळीने आणि हृदयापासून असते. अशा नामस्मरणाने भगवंताची कृपा होऊन नामधारक भवसागर तरून जातो.
हरिनाम सार जिव्हा या नामाची । उपमा त्या दैवाची कोण वानी ॥
मानवी जीवनात ज्ञानाला सर्वोत्तम स्थान आहे. म्हणूनच तर आपण म्हणतो,'विद्वान सर्वत्र पूज्यते'! ज्ञान हे स्मृतिरूप असते.ह्या ज्ञानाचे दृश्य स्वरूप म्हणजे त्याच्या मुखातून काय प्रगट होते ते. त्याच्या जिभेवर सरस्वती वास करते असे आपण सहज म्हणतो. अगदी तसेच भगवंताच्या ज्ञानाच्या बाबतीत म्हणायला हरकत नाही. मानवी जीवनाचे सर्वोत्तम मूल्य हे भगवंतप्राप्ती अथवा आत्मानुभूती आहे हे भारतीय ऋषीमुनींनी स्वीकारले आणि त्याची अनुभूती नामस्मरणाने घेता येते हेही जाणले. हे ज्ञान अंतर्मनात भिनते आणि जिभेवर नामाच्या रूपात नांदू लागते.विस्मरण हे जर अज्ञान असेल तर स्मरण हे ज्ञान असले पाहिजे.भगवंताचे नाम हे त्याच्या स्मरणाची खूण आहे.जिव्हा जर नामाचीच झाली तर अशा नामधारकाच्या भाग्याचे वर्णन कोण करू शकेल?
ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ । पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा ॥
भगवंताचे नाम सांग आहे. नामाकडे कुठल्याही अंगाने पाहिले तरी ते पूर्ण आहे. नाम सर्वांगाने आणि सर्व गुणांनी युक्त आहे ते असे..
१. नाम अमोल पण बिनमोल आहे.
२. नामाच्या ठिकाणी वर्णभेद, आश्रमभेद किंवा जातिभेद नाही.
३. नामाच्या ठायी स्त्री-पुरूष भेद नाही.
४. नामाला काळ-वेळेचे बंधन नाही.
५. नामाला शूची- अशुचिचे नियम नाहीत.
६. नामाला सोवळे ओवळे नाही.
७. नामाला साक्षरतेची किंवा विद्वत्तेची जरूरी नाही.
८. नाम घ्यावयास कष्ट नाही.
९. नाम स्वयंपूर्ण आहे.
१०. नाम हे प्रत्यक्ष स्फुरद्रूप परब्रह्म आहे.

असे हे सांग नाम पूर्वजांनी मोठे परिश्रम करून उपलब्ध केले म्हणूनच तर आम्हाला वैकुंठीचा मार्ग सोपा झाला. संत निळोबाराय सांगतात,
संत एकांती बैसले । सर्वही सिद्धांत शोधिले ॥
ज्ञानदृष्टीं अवलोकिले । सार काढिले निवडोनि ॥
ते हे श्रीहरिचे नाम । सर्व पातकां करी भस्म ॥
अधिकारी उत्तम अथवा अधम । चारी वर्ण नर नारी ॥

आपल्या पूर्वजांचे ऋण फेडण्याचा मार्ग म्हणजे त्यांनी दिलेले हे नाम कंठात अखंड धारण करणे हाच होय. म्हणूनच ज्ञानदेव सर्वांना उपदेश करतात.

"हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा । पुण्याची गणना कोण करी ॥"
                     ॥ श्री सद्गुरुचरणी समर्पित ॥

मनाला भावलेले असे हरिपाठाचे अभंग 20

॥  श्री‌सद्गुरुनाथाय नमः ॥   
अभंग # २०.
नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी । पापें अनंत कोटी गेली त्यांची॥
अनंत जन्माचे तप एक नाम । सर्व मार्ग सुगम हरिपाठ ॥
योग याग क्रिया धर्माधर्म माया । गेले ते विलया हरिपाठीं
ज्ञानदेवी यज्ञयाग क्रिया धर्म । हरिविण नेम नाही दुजा ॥

पाठभेदः हरिपाठीं= हरिपाठें, यज्ञयाग=योग
संतांची 'वैष्णव' ह्या शब्दाची व्याप्ती मोठी आहे. भागवतात एकनाथ महाराज लिहितात,
'जाणीव शहाणीव ज्ञातेपण । सांडुनी जातीचा अभिमान ।
जो मज होय अनन्यशरण । तो जाण वैष्णव माझा ॥'
  
नामदेव महाराज लिहितात,
' नामा म्हणे नाम केशवाचे घेसी । तरीच वैष्णव होसी अरे जना '
तर ज्ञानदेव दुसऱ्या एका ठिकाणी वैष्णवांचे गुण गाताना लिहितात,
'नाम नीजधीर गर्जती वैष्णव वीर । कळीकाळ यमाचे भार पळाले तेथे ॥'म्हणजे संतांना अपेक्षित असे वैष्णव तेच जे नामाच्या आनंदात दंग झालेले असतात. अशा वैष्णवांच्या संगतीत राहून मुखात नामाशिवाय आणखी काय येणार ?
ह्या अभंगावर चिंतन करताना सहजच एक विचार माझ्या मनात आला. अभंगाच्या पहिल्या ओवीत आधी नामसंकीर्तन असायला हवे की आधी वैष्णवांची जोडी? वैष्णवांच्या सहवासाची गोडी नामसंकीर्तनानेच अधिक आवडू लागते हे मात्र खरे आहे. कुणीतरी सांगितले म्हणून आपण नामस्मरण करू लागतो. पण नामाची गोडी, प्रेम हे केवळ वैष्णवांच्या संगतीनेच वाढू लागते.'जसा संग तसा रंग' किंवा 'जशी संगती तशी मती आणि तशी गती' हेही आपणास ठाऊक आहे.नामसंकीर्तन आणि वैष्णवांची जोडी ह्या दुग्धशर्करा योगाने अनंत कोटी पातके नाश पावतात. पाप ही संकल्पना अनेक वेळा याआधीही हरिपाठात ज्ञानदेवांनी मांडली आहे. पापांचे मूळ विकारांत आहे. विकारांचे मूळ आहे वासना तर वासनेचे मूळ देहभावात आहे. देहभावाचे कारण आहे स्वरूपाचा विसर. स्वरूपाच्या विसरात आपण कल्पनेतच जीवन व्यतीत करत असतो.नामाच्या अखंड संकीर्तनाने भगवत्कृपा होऊन नामधारकाची प्रज्ञा जागृत होते व त्याला आपल्या स्वरूपाची ओळख पटते‌. स्वरूपाचे भान झाल्याबरोबर साधकाचा देहभाव नष्ट होतो. त्याच्या पापवृक्षाच्या मुळावरच असा घाव घातल्यावर सर्व पापांचा नाश होणारच. आपण झोपेत असता आपल्याला एखादे वाईट स्वप्न पडले  तर आपण भीतीने किंचाळतो. जेव्हा आपण 'जागे' होतो तेंव्हा आपले शरीर घामाने चिंब झालेले असते. पण विचारांती आपल्याला त्यातील फोलपणा जाणवतो आणि आपण सहज सगळे विसरून जातो. आपण आपल्या स्वरूपाच्या ठायी जागे झालो की अनंत जन्मे आणि अनंत पापे ह्या सगळ्याचा आपल्याला सहजच विसर पडतो. कारण मुळातच हा सगळा स्वरूपाच्या विसरात घडलेला आपला कल्पनाविलासच असतो.
अनंत जन्माचे तप एक नाम । सर्व मार्ग सुगम हरिपाठ ॥
परमार्थ किंवा अध्यात्माचे ध्येय आहे आपल्या स्वरूपाची ओळख करून घेणे अथवा देवाचा साक्षात्कार. काहीतरी घडले आणि आपण आपल्या मूळ स्वरूपाला विसरलो. शास्त्रकार त्याचे कारण 'माया' असे देतात. माया म्हणजे reason unknown. वैद्यकीय क्षेत्रातही एखाद्या रोगाचे कारण माहीत नसेल तर idiopathic etiology असे लिहिण्याचा प्रघात आहे.परिणाम आहे तेथे कारण हे असलेच पाहिजे. कारण ज्ञात नसले तरी त्याचे परिणाम दिसत आहेतच. कारण काहीही असले तरी आता पुन्हा स्वरूपाची स्मृती होण्यासाठी भगवंताचे स्मरण हाच एक उपाय आहे. ह्यासाठी जे साधन हवे तेही सोपे आणि स्वतः सिद्ध हवे. नामाइतके सुलभ साधन नाही असा संतांचा अनुभव आहे. नामाचे महातप एवढे मोठे आहे की अनंत जन्म तप करून जी पुण्याई मिळते ती याच जन्मात नामाच्या संकीर्तनाने मिळते.नामाने जे पुण्य मिळते त्याला निवृत्तीनाथ शुद्ध पुण्य असे म्हणतात.
'नित्य नाम वाचे तोचि एक धन्य । त्याचे शुद्ध पुण्य इये जनी ॥"या शुद्ध पुण्याने नामधारकाला भगवंताचे प्रेमसुख अखंड भोगण्याचे भाग्य मिळते. नामाचे एवढे अलौकिक सामर्थ्य असूनही ते सर्व साधनांत सर्वच दृष्टीने अत्यंत सुलभ आहे. केंव्हाही, कोठेही नाम सहज चालू लागले की आपली आध्यात्मिक प्रगती उत्तम आहे असे समजायला हरकत नसावी.
योग याग क्रिया धर्माधर्म माया । गेले ते विलया हरिपाठीं ॥
जोपर्यंत कर्तेपणाचा अहंकार आहे, अभिमान आहे तोवर आपल्याकडून जे जे काही साधनामार्ग अवलंबिले जातात ते कोठेतरी कमी पडतात. भगवंत हा अनंत आहे,अमित आहे; तर साधनामार्ग हे सीमित  आणि मर्यादित आहेत असे जाणवते. ज्ञानयोग समजायला तेवढी सूक्ष्म बुद्धी हवी तर कर्मयोग आचरण्यासाठी उत्तम शरीरप्रकृती हवी. पण शेवटी ह्यांनाही काही मर्यादा पडतात. मर्यादित साधन अमर्यादित,अनंत अशा भगवंताला कसे साध्य करणार? पण नामस्मरणाने 'मी कर्ता आहे' ही जाणीव शून्यवत होते आणि माया लटकी पडते. सूर्योदय झाला की त्याच्या प्रकाशात चंद्र, तारे, चांदण्यांचा प्रकाश लयाला जातो. त्याचप्रमाणे हरिनामाच्या तेजाचा प्रकाश इतका मोठा आहे की त्या प्रकाशात इतर सर्व साधनांचा प्रकाश लयाला जातो. हरिनामापुढे इतर सर्व साधने निष्प्रभ ठरतात. खरं म्हणजे 'काहीच न करणे हेच करणे' परमार्थात करायचे असते.किंबहुना काही कर्म करून भगवंत प्राप्ती होते हा एक भ्रम आहे. म्हणूनच ज्ञानदेव शेवटच्या चरणात सांगतात,
ज्ञानदेवी यज्ञयाग क्रिया धर्म । हरिविण नेम नाही दुजा ॥
गुरुकृपेने नामाचे हे अद्भुत सामर्थ्य कळल्यामुळेच ज्ञानदेव सांगतात की नामावाचून इतर कोणत्याही साधनांचा अवलंब न करण्याचा निश्चय केला आहे. कारण एकदा का नामात मन रमले की मन आवरण्याचे कष्ट करावे लागत नाहीत आणि नकळत ते पश्यंतीत प्रवेश करते आणि मग सतत भगवंताच्या भोवतीच घोटाळत राहते. यालाच अनुसंधान म्हणतात. नामस्मरणाचा महायोग जाणूनच ज्ञानदेव सर्वांना सांगतात,
"हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा । पुण्याची गणना कोण करी ॥"
                     ॥ श्री सद्गुरुचरणी समर्पित ॥

मनाला भावलेले असे हरिपाठाचे अभंग 19

॥  श्री‌सद्गुरुनाथाय नमः ॥   
अभंग # १९.
वेदशास्त्रपुराण श्रुतींचे वचन । एक नारायण सार जप ॥
जप तप कर्म हरिविण धर्म । वाउगाची श्रम व्यर्थ जाय ॥
हरिपाठीं गेले ते निवांतचि ठेले । भ्रमर गुंतले सुमनकळिके ॥
ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र । यमें कुळगोत्र वर्जियेले ॥
पाठभेदः हरिविण= क्रिया नेम, शस्त्र= शास्त्र
ज्ञानदेव नामाचा महिमा हरिपाठातून सांगत असले तरी त्याला अध्यात्मशास्त्रातील प्रमाणभूत ग्रंथ वेद, शास्त्रं, पुराणं आणि उपनिषदांचा आधार आहे हे निदर्शनास आणून देण्यास विसरत नाहीत. ह्याआधीही ते दुसऱ्या अभंगात 'चहूवेदी जाण षट्शास्त्रीकारण । अठराही पुराणे हरिसी गाती ॥' असे सांगून आपल्या म्हणण्याला वेद, शास्त्रं आणि पुराणांचा असा आधार असल्याचे पटवून देतात. भारतीय अध्यात्मशास्त्राप्रमाणे भगवंताचे दर्शन हेच मानवीजीवनाचे अंतिम ध्येय असावे असे वर्णन आढळते. ते ध्येय साध्य करण्यासाठी नाम हेच साधन सांगितले आहे. आपल्या आधी जे संत होऊन गेले त्यांचाही हाच उपदेश आहे.
"चारी वेद जयासाठी । त्याचे नाम धरा कंठी ॥
न करी आणिक साधन । कष्टसी कां वायांविण ॥
अठरा पुराणाचे पोटी । नामाविण नाही गोठी ॥
तुका म्हणे सार धरीं । वाचे हरिनाम उच्चारी ॥"
                    किंवा
वेदांचा संवाद श्रुतींचा अनुवाद । नामाचा मकरंद पुराण वदे ॥
कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी आपल्या आधीच्या ज्ञानी अभ्यासकांच्या तर्कशुद्ध विचार आणि अनुभूतींच्या आधाराने वाटचाल केली तर वृथा श्रम तर वाचतातच पण कालापव्ययही होत नाही. संतांचे वचन आणि अनुभव हे आपल्यासारख्या सामान्यांना मार्ग दाखवीत असतात.
नामजप हेच सर्व साधनांचे सार आहे. कारण नाम हे उपाधिरहित आणि बंधनातीत आहे असा नामधारकांचा अनुभव आहे.
जप तप कर्म हरिविण धर्म । वाउगाची श्रम व्यर्थ जाय ॥
भारतीय ज्ञानी आणि विचारवंतांनी मानवी जीवनात धर्माचे स्थान अढळ आहे ह्याची जाण ठेवली आहे. धर्माचे उद्दिष्ट आहे मानवी समाज एकत्र राखून मानवाला सुख-सुविधा देणे आणि त्याची प्रगती साधणे. देहाच्या अंगाने भौतिक उत्कर्ष आणि अंतरंगातून आत्मिक उन्नती हेच खऱ्या प्रगतीचे लक्षण आहे. देहाच्या अंगाने कर्म करणे भागच आहे आणि अंतरंगातील प्रगती म्हणजे आत्मानुभूती किंवा भगवंताचे दर्शन ह्यासाठी जप, तप हेही आवश्यक आहे. पण त्याठायी भगवंताचे अधिष्ठान हवे. रामदासस्वामींनी लिहिलेच आहे,
'सामर्थ्य आहे चळवळीचे । परंतु तेथे देवाचे अधिष्ठान हवे ॥'
धर्माचे वर्मच न समजता केलेले धर्माचरण अहंकार, द्वेष-मत्सर ह्यांनाच खतपाणी घालणार. त्यामुळेच तर सध्या धर्मा-धर्मांत एवढी तेढ दिसून येते. विरोधामुळे भांडण-युद्ध ह्यांना खतपाणी घातले जाते. अंतिमता मानवालाच घातक ठरते.
भगवंताचे दर्शन हा एक दिव्य अनुभव आहे. त्या दिव्यत्वाची थोडी झलक सद्गुरू साधकाला देऊन त्याच्या साधनेची दिशा काय असावी ह्याचे मार्गदर्शन करतात‌. सद्गुरूंचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन लाभले तर नरेंद्रांचा स्वामी विवेकानंद व्हायला वेळ लागत नाही. हा सगळा प्रांत अंतरंगाशी निगडित आहे. प्रामाणिकपणे अखंड नामस्मरण केले असता नामधारकाचा हा प्रवास सुखाचा होऊन तो तृप्त होतो.जप, तप, कर्म, अनुष्ठान आणि धर्माचे नियमपालन यांचा संबंध मुख्यता जीवनाच्या बहिरंगाशी आहे. त्यामुळे शुद्ध अध्यात्मात ह्या गोष्टींना गौण स्थान आहे. केवळ भगवंताच्या दर्शनाची पार्श्वभूमी नसेल तर मग असे जप, तप, कर्म, धर्म ह्या साधनांना काही अर्थ उरत नाही. मात्र असे केल्याने विनाकारण श्रम मात्र होतात आणि ते वाया जातात. तहानेने व्याकुळ झालेला मृगजळामागे धावत गेला तर काय होईल? पाणी तर मिळणार नाहीच. पण श्रम मात्र पदरी पडतात. तद्वत केवळ अज्ञानाच्या अधिष्ठानावर केलेले जप, तप, कर्म हे केवळ श्रमच पदरी पाडतात.
हरिपाठीं गेले ते निवांतचि ठेले । भ्रमर गुंतले सुमनकळिके ॥
माणूस सुखासाठी आणि आयुष्यात निवांतपणा लाभावा म्हणून बरेच प्रयत्न करत असतो. सुखाच्या आशेने जे काही गोळा करतो तेच मुळी अपूर्ण,परावलंबी असल्यामुळे त्याच्या आयुष्यात तो कधीही निवांत होत नाही. 'उगा राहे निवांत शिणसी वाया' असे ज्ञानदेव मागील एका अभंगातून सांगतात. आता मात्र 'निवांत' होण्याची गुरुकिल्ली ते साधकाच्या हाती देत आहेत. जो भगवंताचा आधार धरतो तो निवांत आणि निर्भर होतो. त्यामुळे प्रापंचिक प्रसंग मनावर आघात करीत नाहीत. नामस्मरणाने सत्वगुणसंपन्न झालेले मन भगवंताच्या ठिकाणी रमू लागते. हळूहळू नामधारक भगवंताचे प्रेमसुख भोगण्यात इतका रंगून आणि रमून जातो की त्याचे जीवपण संपून देवपणात कधी रुपांतर झाले हे त्याचे त्यालाही कळत नाही. एखादा भुंगा सुगंधी कळीवर बसतो आणि तिच्यातील मकरंद सेवन करण्यात स्वतःला विसरून जातो. त्याचप्रमाणे भगवंताच्या नामात रंगलेल्या साधकाची अवस्था होते. एकदा का नामधारक नामात रंगला की त्याला स्वतःचे व जगाचे भान उरत नाही. तो भगवंताचाच होऊन राहतो. ह्या अवस्थेलाच नामसमाधि म्हणतात.
ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र । यमें कुळगोत्र वर्जियेले ॥
मंत्र आणि शस्त्र ह्यांचा एक समान गुण आहे. ते आपले इप्सित साध्य करतात.पण स्वतःमध्ये मात्र बदल होऊ देत नाहीत अथवा नाशही पावत नाही. मंत्राच्या माध्यमातून साधक विश्वातील शक्ती सिद्ध करून आपला कार्यभाग साधतो. अशा शक्तींचा दृश्याशी संबंध असतो. भगवंताची शक्ती अतिसूक्ष्म असते. भगवंताचे नाम हा त्या शक्तीचा मंत्र होय. नाम मुळातच सिद्ध आहे. पण तेच जर सद्गुरूंकडून आले की त्यामध्ये सद्गुरूंची साधना आणि संकल्पाचे सारे तेज येते. या नामाचा प्रामाणिकपणे मनापासून जप केला तर साधकाची देहबुद्धी आणि त्यामुळे निर्माण होणारी वासना ह्या दोन्हीही मारल्या जातात. वासनाशून्य झाल्यानंतर जे नाम आतून स्फुरते ते साक्षात भगवंताचेच स्फुरण होय.
'एका जनार्दनी नामापरता मंत्र । दुजे नाही शस्त्र कलियुगी ॥'हा एकनाथ महाराजांचाही अनुभव आहे.
नामाने जे प्रतिभाज्ञान साधकाला मिळते, प्राप्त होते, त्या ज्ञानाच्या प्रकाशात त्याला आपल्या स्वरूपाचा साक्षात्कार होतो. आपल्या अमरत्वाचाही बोध होतो.
'महाराज म्हणती त्याकारण । हेच तुझे अज्ञान । अरे वेड्या जन्ममरण । हीच  मुळी भ्रांति असे ॥ ३५ ॥ जन्मे न कोणी मरे न कोणी । हे जाणावया लागुनी । परमार्थाचा उपाय जाणी । शास्त्रकारें केला ॥ ३६ ॥ (गजाननविजय अध्याय ११)  गजाननविजय मध्येही गजानन महाराज आपल्या शिष्यांना उपदेश करतात.
नामस्मरण करता करता साधकाला जगाचे भान उरत नाही तेथे काळाचे भान कोठलें उरणार?
नामाचे हे माहात्म्य ओळखूनच ज्ञानदेव उपदेश करतात,
"हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा । पुण्याची गणना कोण करी ॥"
                     ॥ श्री सद्गुरुचरणी समर्पित ॥

मनाला भावलेले असे हरिपाठाचे अभंग 18

॥  श्री‌सद्गुरुनाथाय नमः ॥   
अभंग # १८.
हरिवंशपुराण हरिनाम संकीर्तन । हरिविण सौजन्य नेणें कांहीं॥तयां नरा लाधलें वैकुंठ जोडलें । सकळही घडलें तीर्थाटन ॥
मनोमार्गे गेला तो येथें मुकला । हरिपाठीं स्थिरावला तोचि धन्य ॥
ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी । रामकृष्णीं आवडी सर्वकाळ ॥
पाठभेदः येथें=तेथें

ह्या अभंगात ज्ञानदेव भक्तिमार्गाची सुरुवात आणि परिणिती थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. नवविधाभक्तितही श्रवणभक्तीला प्राधान्य आहे. एखाद्या विषयाची गोडी लागण्यासाठी त्या मार्गाने जाणाऱ्यांबद्दल आणि तेथवर जाऊन जे मिळविले (भगवंत) त्याबद्दल ऐकणे / वाचणे ह्यातूनच त्याबद्दल प्रीती निर्माण होवून माणूस ते मिळविण्यासाठी प्रयत्न करू शकतो. भगवंताबद्दल प्रेम निर्माण होण्यासाठी किंवा तो प्राप्त करून घेण्याची इच्छा मनात निर्माण होवून त्या मार्गाने साधना करावीशी वाटण्यासाठी हरिवंशपुराण वाचले पाहिजे किंवा ऐकले तरी पाहिजे. वाचन आणि श्रवण ह्यात फरक आहे. एखादी कविता आपण वाचतो तेंव्हा ती मनात घर करेलच असे नाही. पण तीच कविता चाल लावून गाण्यातून सादर केली किंवा त्यातील गर्भितार्थ कुणी आपल्याला समजावून दिला तर ती आपल्या मनात पटकन घर करू लागते. वाचताना आपण त्या विषयाशी समरस होऊच असे नाही. पण श्रवण करताना वक्ता जर विषयाच्या (भगवंताच्या) प्रेमरसात न्हाऊन निघाला असेल तर त्याच्या मुखातून आलेले वक्तव्य आपले हृदय हेलावून सोडते आणि आपणही नकळत भगवंताच्या प्रेमात रंगू लागतो. दृकश्राव्य माध्यम आणि आंतरिक ओढ ह्या दोहोंच्या परिणामातून असाध्य तेही साध्य होऊ शकते असा सर्वसामान्य अनुभव आहे.
अध्यात्मात अगदी सुरुवातीला भगवंताचे कुल, बालपण आणि लीला यांचे वर्णन असलेल्या ग्रंथांचे वाचन / श्रवण केले असता साधकाच्या मनालाही भगवंताच्या दिव्यपणाची ओढ लागते. (आमच्या लहानपणी मनोरंजनाची आजची माध्यमे नव्हती. सकाळी उठलो की शेजारी जाऊन बुवांबरोबर ग्रंथ वाचायचे किंवा हरिपाठ म्हणायचा हा नित्यक्रम होता.त्यामुळे लहानपणापासून भक्त प्रल्हाद,चिलयाबाळ,राम-लक्ष्मण,ज्ञानदेव-मुक्ताई मनात घर करून राहिले होते.घरून,शेजाऱ्यांकडून मुल्यशिक्षण असे मिळत होते.)नकळत साधक देवाच्या ओढीने त्याच्याकडे ओढला जातो. त्याच्या मनात भगवंताबद्दलच्या आठवणी घर करू लागतात. सुरुवातीच्या टप्प्यात पुराण म्हणजे भगवंताबद्दलचे चरित्रपर प्राचीन काव्यग्रंथ श्रवण करता करता देवाच्या ओढीने साधक सद्गुरुकृपेने नामसंकीर्तन करू लागतो. भगवंताच्या नामामध्ये असे सामर्थ्य आहे की जगांत आणि जीवनांत भगवंतच सर्वोत्तम आहे अशी निष्ठा नकळत निर्माण होते. हरिप्रेमावाचून दुसरे काहीच प्रिय नाही अशी साधकाची अवस्था होते.
साधक असे नामस्मरण करू शकतो. पण आपण सर्वसामान्य माणसे मनात किंतु ठेवूनच असतो. कशाला हवा देव? परमार्थ करून कुणाचे भले झाले आहे? आधी शिका / नोकरी-धंधा करा / पैसा कमवा / संसार करा आणि मग म्हातारपणी आहेच वेळ तेंव्हा करा भगवंताचा विचार अशी सर्वसामान्य माणसाची विचारधारा असते. तीच तो आपल्या मुलांवर ठसवत असतो.
वैद्यकीय शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना प्रथम वर्षी Anatomy,Physiology & Biochemistry हे विषय अभ्यासावे लागतात.नंतर मग Pathology शिकविले जाते. एकदा का normal & abnormal काय हे कळले की मग Surgery की medicines ह्यापैकी कशाचा उपयोग करून रोगी बरा करायचा हे अंतिम वर्षात शिकविले जाते. पण गंमत अशी आहे की 'मी कोण' आहे,'देव कोण' आहे आणि 'जग' म्हणजे नेमके काय? ह्यांचा आपला संबंध काय?नशीब / नियती म्हणजे काय ?  ह्याची ओळख न होताच आपण जीवन जगायला सुरुवात करतो. जीवनाच्या शाळेचा अभ्यासक्रम विचारवंत का नाही नक्की करत? अध्यात्म(परमार्थ) आणि व्यवहार ही मानवी जीवनाची दोन भिन्न अंगे केली गेली. एवढी मोठी फसगत आपल्या जीवनात झाली आहे ह्याची आपल्याला जाणीवच नाही. मग त्याबद्दल खंत तरी का वाटावी आपल्याला? असो.
तयां नरा लाधलें वैकुंठ जोडलें । सकळही घडलें तीर्थाटन ॥
हरीच्या वंशांचे पुराण, कथा, गोष्टी ज्याला प्रिय आहेत; हरिनामसंकीर्तन प्रिय आहे. किंबहुना हरिप्रेमावाचून दुसरे काहीच प्रिय नाही आणि हरी हाच ज्याच्या सर्व सुखाचा विषय आहे अशा नामधारकाला इहलोकीच वैकुंठाचा अनुभव येतो. श्री.ज्ञानदेवांची वैकुंठाची संकल्पना समजावून घेणे गरजेचे आहे. त्यांच्या मते हे विश्व म्हणजे भगवंताचा विलास (चित्शक्तिविलास) आहे. माणूस अज्ञानामुळे भगवंताला विसरतो आणि भगवत्स्वरूप असणारे विश्व त्याला स्थूल व जड दिसते. भगवंताच्या नामसंकीर्तनाने भगवत्स्वरूप झालेल्या साधकाला हे जग भगवंताने भरलेले दिसते. भगवंतांनी गीतेत सांगितले आहेच,तो मी वैकुंठी नसे । वेळ एक भानु बिंबीही न दिसे ।।
वरी योगियांचीहि मानसे । उमरडोनि जाय ॥
परी तयापाशी पांडवा । मी हारपला गिवसावा ॥
जेथ नामघोष बरवा । करिती माझा ॥

त्याचप्रमाणे नामधारकाला तीर्थाटन करण्याचीही जरूरी नाही. कारण हरिनामात, हरिप्रेमात रंगून गेलेल्या नामधारकाचा देह हा सर्व तीर्थांचे माहेरघर असतो.
हेच तुकाराम महाराज सांगतात,
राम म्हणे वाट चाली । यज्ञ पाऊला पाऊली ॥
धन्य ते शरीर । तीर्थव्रतांचे माहेर ॥

भगवन्नाम हेच महातीर्थ आहे. या महातीर्थात अखंड स्नान करणाऱ्या नामधारकाला दुसऱ्या तीर्थाकडे जाण्याची आवश्यकताच नाही. उलट तीर्थांना पावन करण्याचे सामर्थ्य नामधारकात असते.
मनोमार्गे गेला तो येथें मुकला । हरिपाठीं स्थिरावला तोचि धन्य ॥
ही ओवी वाचताना माझ्या मनात आठव्या अभंगातील
'संतांचे संगती मनोमार्ग गति । आकळावा श्रीपति येणें पंथे ॥' ही ओवी आठवली. हा विरोधाभास आहे असे विचार आपल्या मनात येतात. एका मनाचाच आलंब घेऊन देव आकळावा असा विचार करावा तर ज्ञानदेवच सांगताहेत की 'मनोमार्गें गेला तो येथे मुकला'! ह्यातील गुह्य समजायलाच तर सद्गुरू हवेत. 'वाहणे' हा पाण्याचा गुणधर्म आहे. विशिष्ट माध्यमाच्या साहाय्याने जर ह्या पाण्याला गती दिली तर वीजनिर्मिती होवू शकते. दुधात लोणी अव्यक्त रूपात असतेच.दूध जर असेच ठेवले तर ते नासते.पण त्याच दुधाला 'दह्याची संगती' लाभली तर त्याचेही दही होते आणि ते दही घुसळले की त्यातून लोणी आणि मग तूप सहज प्राप्त होते. तद्वत सामान्य माणसाच्या मनाला संतसंगातून नामाचे विरजण लाभले तर त्या मनात देवभाव जागा होऊन हळूहळू नामसंकीर्तनाने त्या भावातूनच 'देवत्व' प्रगट होऊ शकते. हा संतांचा अनुभव आहे,ज्ञानदेवांचा उपदेश आहे.

पण सामान्य माणूस सुखासाठी बहिर्मुख होऊन इंद्रियांद्वारे मनाच्या विषयलोलूप मार्गाचा आलंब घेतो आणि भगवंताच्या दिव्य सुखाला मात्र मुकतो. पण ह्या दिव्यसुखासाठी साधक हरिपाठी स्थिरावला पाहिजे. कारण मनाची चंचलता हेच दुःख व मनाची स्थिरता हेच सुख होय. विषयाने मन चंचल होते तर हरिनामाने मन स्थिर होते. विषयांपाठी धावेल तो अभागी तर हरिपाठी स्थिरावेल तोच धन्य होय. शेवटच्या चरणात ज्ञानदेव सांगतात,
ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी । रामकृष्णीं आवडी सर्वकाळ ॥
ह्या ओवीतील गोडी,जोडी आणि आवडी ह्यातील यमक न पाहता ज्ञानदेवांचा अनुभव आणि परमार्थातील साधकाच्या प्रगतीचा आढावा तीन टप्प्यात कसा घेतला गेला आहे ते पाहायला हवे. हरिवंशपुराणाच्या श्रवणातून हरीची गोडी निर्माण झाली आणि नामसंकीर्तनसाधनेची जोडी असेल तर भगवंताच्या स्वरूपाची ओळख होऊन भगवंताच्या ठायी अखंड आवडी निर्माण होते. स्थान व परिस्थिती यांची मर्यादा न राहणे ही खरी 'आवडी'. आवडीमध्ये लाजलज्जा, कंटाळा व लौकिकाचा विचार कधीही नसतो. पुष्कळ लोक परमार्थ करतात. पण त्यांचा तो परमार्थ फावल्या वेळेचा असतो. परमार्थात गोडी किंवा आवडी मुळीच नसते. विषयांच्या ठिकाणी जितकी गोडी सर्वसामान्यांना असते त्याहूनही अधिक आवडी भगवंताच्या ठायी असणे ज्ञानदेवांना अभिप्रेत आहे.
संतांच्या संगतीने आणि त्यांच्या उपदेश-श्रवणाने हरिनामाची गोडी चित्तात रुजते,उमलते,फुलते आणि त्याची चंचलता संपूर्ण नष्ट होऊन ते रामकृष्णी म्हणजेच भगवंताच्या चरणी स्थिर होते. साधकाचा अनुभव मग
'चित्त चाकाटले स्वरूपामाझारी । ते न निघे बाहेरी ऐसे झाले ॥' असा शब्दरूप घेतो.
नामाचा अट्टहासाने अभ्यास केल्याशिवाय नामाची गोडी निर्माण होत नाही. म्हणूनच ज्ञानदेव सांगतात,
"हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा । पुण्याची गणना कोण करी ॥"
                     ॥ श्री सद्गुरुचरणी समर्पित ॥

मनाला भावलेले असे हरिपाठाचे अभंग 17

॥  श्री‌सद्गुरुनाथाय नमः ॥   
अभंग # १७.
हरिपाठकीर्ति मुखे जरी गाय । पवित्रचि होय देह त्याचा ॥
तपाचे सामर्थ्य तपिन्नला अमूप । चिरंजीव कल्प वैकुठी नांदे ॥
मातृपितृ भ्राता सगोत्र अपार । चतुर्भुज नर होऊनी ठेले ॥
ज्ञानगूढ गम्य ज्ञानदेवा लाधलें । निवृत्तीने दिधले माझ्या हाती ॥

पाठभेदः तपिन्नला=तें भिनले, वैकुंठी=कोटी,दिधले=दिले
हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा ।  हा ज्ञानदेवांचा उपदेश ग्राह्य मानून मुखाने हरिनाम घेता घेता पुण्याची गणना कोण करी असे नामाचे दिव्य अनुभव नामधारकाला येऊ लागतात. नामाचे अनुभव घेऊन नामाची महती इतरांना सांगणारा असा नामधारक परमश्रेष्ठ समजला जातो. असा नाममहिमा गाणाऱ्या नामधारकाचा देह पवित्र होय. याचा अर्थ तो देह धारण करणारा जीव धन्य होय. जो जीव या नरदेहाचा उपयोग नामसंकीर्तनासाठी करतो व नामाची महती,कीर्ती सांगून इतरांना नामस्मरण करण्यास प्रवृत्त करतो तो स्वतःचे व इतरांचे सुख निर्माण करतो. म्हणून तो जीव पवित्र,धन्य होय. भगवंत आणि त्याचे नाम हे एकमेकांहून वेगळे असूच शकत नाहीत. नामस्मरणात भगवंताचे सर्वांगीण चिंतन करणे अपेक्षित आहे. ईश्वरप्राप्तीचा हाच राजमार्ग आहे. असे चिंतन करता करता अंतःकरण निर्मल आणि पवित्र होतेच. त्याचबरोबर साधकाच्या वृत्तीही सात्त्विक आणि विकाररहित होतात. त्याचा परिणाम म्हणून देहदेखील सूक्ष्म बनतो. "खवळलिया काम क्रोधी । अंगी भरती आधी व्याधी ॥" हे जर खरे असेल तर "हरिपाठकीर्ति मुखे जरी गाय । पवित्रचि होय देह त्याचा ॥" ह्याची अनुभूती नामधारकाला का न यावी? जे सूक्ष्म आहे ते पवित्र असते. नामस्मरणाने नामधारकाचा देहही सूक्ष्म होत जातो. संतांच्या शरीरातील पेशीसुद्धा नाममय झालेल्या असतात. एका संतांच्या अपघाती निधनानंतर त्याच्या अस्थीतून 'विठ्ठल' नामाचा ध्वनी येत होता. त्यावरून त्यांची ओळख पटली होती. असे सांगतात की अर्जुनाच्याही रोमरोमातून 'कृष्ण' नामाचा जप चालू असे. अर्थात ह्यासाठी अनेक वर्षे चिकाटीने अभ्यास करावा लागतो.
तपाचे सामर्थ्य तपिन्नला अमूप । चिरंजीव कल्प वैकुठी नांदे ॥
भारतीय शास्त्रांमध्ये अनेक प्रकारची तपे सांगितली आहेत. तपाचा प्रकार कोणताही असला तरी त्यात इंद्रियनिग्रह अपेक्षित असतो आणि शरीराला ताप असतो. शास्त्रांनुसार सारे घडले तर पुण्यसंचयाने तपस्व्याच्या सूक्ष्मदेहांत बदल घडून येतो. त्याचे महत्त्वाचे फल म्हणजे मृत्यूनंतर त्याला उत्तम गती प्राप्त होते असे शास्त्र सांगते. मृत्यूनंतर स्वर्ग तरी प्राप्त होतो अथवा त्यांपलीकडे  असणाऱ्या वैकुंठाची प्राप्ती होते. परंतु स्वर्ग आणि वैकुठ हे दोन्ही लोक भगवंताच्या दर्शनाच्या म्हणजे आत्मसाक्षात्काराच्या खालीच आहेत. पुण्यक्षय झाला की त्याला पुन्हा पृथ्वीवर यावेच लागते. याचे कारण तपश्चर्येने कारणदेहामध्ये घट्टपणे बसलेले अज्ञान दूर होत नाही. अशावेळी भगवंताचे स्मरण करून देणारे नाम आणि गुरूपदेशच उपयोगी पडते.
भक्तीच्या भाषेत बोलायचे तर स्वतः नामाचा अभ्यास करून त्याची कीर्ती-महती इतरांना सांगून त्यांना नामाची गोडी लावणे हेच महातप आहे. या तपाच्या सामर्थ्याने नामधारकाला स्वतःच्या अमरत्वाचा बोध होतो, तो चिरंजीव होतो. वैकुंठ म्हणजे विविध कुंठा-जिथे वृत्ती कुंठीत होते त्या आनंदात नांदतो.
मातृपितृ भ्राता सगोत्र अपार । चतुर्भुज नर होऊनी ठेले ॥
ह्या ओवीचा वाच्यार्थ असा घेतला जातो की नामधारकाचे माता, पिता इत्यादी चतुर्भुज म्हणजे हरिरूप होऊन राहतात किंवा स्वर्गात (थोडे पुण्यवान असलेले वैकुंठात) जातात. पण हे खरे आध्यात्मिक आहे का? असा प्रश्न माझ्या मनात आहे.
भक्तीच्या भाषेत म्हटले तर नामधारकाचे नातलग म्हणजे जे नामधारकावर आणि नामावर प्रेम करतात; त्याचा आदर करतात आणि त्याच्यासंबंधी आपलेपणा बाळगतात ते. संत सेना महाराजांचा ज्ञानदेवांबद्दलचा खालील भाव हे अधिक स्पष्ट करतो.ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता । तोडील भवव्यथा ज्ञानदेव ॥
ज्ञानदेव माझे सोयरे धायरे । जीवलग निर्धारे ज्ञानदेव ॥
ही सर्व मंडळी नामधारकाच्या संगतीने चतुर्भुज म्हणजे हरिरूप होतात. याचे कारण असे की, नामधारकाच्या संगतीने व त्याच्या उपदेशाने या सर्व लोकांना नामाची गोडी लागते. एकदा का नामाची गोडी लागली की तेच गोड नाम त्या सर्वांचे जीवन गोड करते. त्या सर्वांना चतुर्भुज म्हणजे हरिरूप करते.

चतुर्भुज होणे म्हणजे बेड्या ठोकणे (बंदिवान होणे) असाही अर्थ आहे. ज्ञानदेव नामस्मरणाचे महत्त्व सांगत असता तपश्चर्या वगैरे साधनामार्गांच्या अंतिम फलाचा आढावा (सिद्धाचे मुक्तिसुख) तपाचे सामर्थ्य तपिन्नला अमूप । चिरंजीव कल्प वैकुठी नांदे ॥ह्या ओवीतून घेत आहेत.
तर
मातृपितृ भ्राता सगोत्र अपार । चतुर्भुज नर होऊनी ठेले ॥ह्या ओवीतून सर्वसामान्य माणूस कसा बद्ध होतो हे त्यांना सांगावयाचे असावे असे मला वाटते.संसाराच्या ह्या पसाऱ्यातून मुक्त होणे बद्धाला जमत नाही. पण नामस्मरणाने एकदा का सद्गुरूकृपा झाली की,
ज्ञानगूढ गम्य ज्ञानदेवा लाधलें । निवृत्तीने दिधले माझ्या हाती ॥
हा ज्ञानदेवांचा अनुभव नामधारकाला येतोच येतो. स्वर्ग आणि वैकुंठ हे दोन्ही कालाच्या स्वामित्वाखाली असतात. पुण्याईच्या बळावर जरी ते प्राप्त झाले तरी त्याला क्षय आहे. म्हणून देहातीत, कालातीत होणे हे अध्यात्माचे ध्येय असते; नव्हे असावेच. अध्यात्मज्ञान हे जरी गूढ असले तरी अगम्य नाही हे ज्ञानदेव नामधारकांना आवर्जून सांगत आहेत. एकदा का सद्गुरूकृपा झाली की ज्ञाता-ज्ञेय-ज्ञान ह्या त्रिपुटीचा नाश होऊन जातो. तेंव्हाच खरे तर आत्मज्ञान उदयास येते. हेच त्यातील गूढपण आहे. नामस्मरणानेच दिव्य ज्ञान, दिव्य दृष्टी प्राप्त होते आणि त्याचा प्रत्यक्ष अनुभव केवळ सद्गुरुकृपेनेच शक्य आहे हे ज्ञानदेव पुन्हा पुन्हा आवर्जून सांगतात. ही सद्गुरूकृपा प्राप्त करून घेण्याचे सर्वात सुलभ साधन म्हणजे...
"हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा । पुण्याची गणना कोण करी ॥"
                     ॥ श्री सद्गुरुचरणी समर्पित ॥

मनाला भावलेले असे हरिपाठाचे अभंग 16

॥  श्री‌सद्गुरुनाथाय नमः ॥   
अभंग # १६.
हरिनाम जपे तो नर दुर्लभ । वाचेसी सुलभ रामकृष्ण ॥
रामकृष्ण नामी उन्मनी साधिली । तयासी लाधली सकळ सिद्धी ॥
सिद्धि बुद्धि धर्म हरिपाठीं आले । प्रपंची निवालें साधुसंगे ॥
ज्ञानदेवीं नाम रामकृष्ण ठसा । येणें दशदिशा आत्माराम ॥
पाठभेदः हरिनाम=हरि बुद्धी, निवालें=निमालें, ज्ञानदेवीं=ज्ञानदेवा, रामकृष्ण=रामकृष्णी, येणें=तेणें

हरिप्राप्ती हे जर ध्येय असेल तर त्यासाठी अनेक साधने उपलब्ध आहेत. पातंजलींची योगसूत्रे, नारदाची भक्तीसूत्रे, व्यासांची ब्रह्मसूत्रे. काही आचरण्यास सोपी तर काही आचरण्यास अत्यंत कठीण. भगवंताच्या नामस्मरणाचे साधन सोपे आणि सुलभ आहे. नामाला लिंग,वर्ण,जात आणि धर्माची अट नाही. नामाला मोल द्यावे लागत नाही. काळ-वेळ, शुचि-अशुचिचा प्रश्न नामाच्या ठिकाणी उद्भवत नाही. नामाचा अभ्यास करण्यास कष्टही नाहीत. नामस्मरण हे सर्व बाजूंनी सुलभ असूनही नामाचा जप करणारी माणसे दुर्मिळ आहेत. स्वस्त आणि फुकट काही असले की त्याच्यावर विश्वास ठेवणे सामान्यजनांना कठीण जाते. नाम घेऊन काय होणार असा प्रश्न विचारण्यात आयुष्य घालवतील. याउलट संत तुकाराम महाराजांसारखे श्रेष्ठ नामधारक सांगतात,
" काय नोहे केले । एका चिंतितां विठ्ठले ॥
तुका म्हणे जपा । मंत्र त्रिअक्षरी सोपा ॥

नामस्मरण साधनेत जीवनाची संपूर्ण स्वीकृती अपेक्षित असते. आपल्या कर्तेपणाचा अहंकार घालवून देवच कर्ता आहे हा भाव धरून जीवनांत जे घडते ते प्रसन्न मनाने स्वीकारणे आणि देवाचे स्मरण करत जीवन जगणे हे नामस्मरणात अपेक्षित आहे. पण हे स्वीकारणे सोपे नाही. त्यात आता माणसाच्या सुखाच्या कल्पनाही बदलत चालल्या आहेत. विषयांवर आधारित सुखाची लालसा असेल तर त्या विषयांची साधने गोळा करणे हेच मानवी जीवनाचे ध्येय होणे स्वाभाविक आहे. पण विषयातून सुख भोगताना नेमके कशामुळे सुख मिळते ह्याबद्दल सामान्य माणूस अनभिज्ञ असतो. परमार्थ किंवा अध्यात्मात संतांच्या वचनावर विश्वास ठेवून जे कोणी नामाचा अभ्यास करतात, अखंड नामस्मरण करतात, ते नाम घेता घेता नामात रंगून जातात आणि त्यांच्या मनाचे उन्मन होते.
रामकृष्ण नामी उन्मनी साधिली । तयासी लाधली सकळ सिद्धी ॥
उत्+मन=उन्मन. उत् प्रत्येयाचा अर्थ ऊर्ध्वगति, पूर्णता, श्रेष्ठत्व असा आहे. मन हे जाणीवेचेच व्यक्त अथवा दृश्य रूप आहे. सर्वसामान्य माणसाला जागृती,स्वप्न आणि सुषुप्तीचा अनुभव असतो. काही साधक तुरीय अवस्थेपर्यंत जाऊ शकतात. पण उन्मनी ही जाणीवेची सर्वोत्तम अवस्था आहे. देवाच्या ओढीने जेव्हा साधक नामस्मरण करू लागतो तेंव्हा त्याच्याही नकळत वासना क्षीण होवून मनाची विषयाकडील धाव कमी होत ते सूक्ष्मात रमू लागते आणि अखेर भगवत्स्वरूप होवून राहते. ह्या दिव्य अवस्थेला उन्मनी अवस्था म्हणतात. ती साधल्यावर साधक कृतकृत्य होतो. उन्मनीत स्थिर झालेल्या साधकापुढे,
"निळा म्हणे सर्वही सिद्धी । रुळती पदी हरिनामी ॥
नामी तिष्ठती ऋद्धीसिद्धी । तुटती उपाधी हरिनामे ॥
नामामृताने आणि देवाच्या अखंड प्रेमसुखाने तृप्त झालेला नामधारक त्या सिध्दींकडे ढुंकूनही पाहत नाही, मग त्यांचा प्रत्यक्ष उपभोग घेण्याचे तर दूरच राहिले!
सर्व सुखे नामे येती लोटांगणी । कोण त्यासी आणि दृष्टीपुढे
असे तुकाराम महाराज सांगतात, तर
सिद्धी लावी पिसें कोण तया पुसे । नेणें राजहंसे पाणी काय॥
हरी नामामृत सेवी सावकाश । मोक्ष त्याचे भूस दृष्टीपुढें ॥
असा अनुभव एकनाथ महाराज व्यक्त करतात.
सिध्दी बुद्धी धर्म हरिपाठीं आले । प्रपंची निवालें साधुसंगे ॥
परमेश्वर हा आनंदस्वरूप असून जाणीव हे त्याचे रूप आणि शक्ती हा त्याचा गाभा आहे. तो आपल्या हृदयात आहे. किंबहुना तोच देहाच्या मार्फत प्रगट झाला आहे. पण विषयसुखाच्या अपेक्षेने ह्या शक्तीचा ऱ्हास होत गेला. अखंड नामस्मरणाने सिद्धी म्हणजे स्वरूपसिद्धी प्राप्त होते. म्हणजेच अतींद्रिय सामर्थ्य प्रगट होते. योगामध्ये वृत्तींचा निरोध करून जो शक्तिसंचय होतो तो नामस्मरणाने सहज व नकळत होतो. नामात रंगून गेल्यामुळे नामधारकाला त्याची जाणीवही नसते. त्यामुळे त्याची बाधा होत नाही.
त्याचप्रमाणे नामधारकाच्या बुद्धीचा परमात्म्याशी योग घडून समबुद्धी प्राप्त होते; जी प्राप्त झाली असतां साधकाला हरी सर्वत्र समत्वाने भरून राहिलेला आहे ह्याची प्रचिती येते. प्रत्येक माणसाच्या अंतरी ज्ञान असतेच. अभ्यासाने त्यावरील अज्ञानाचे आवरण दूर करायचे असते. अभ्यासाचे / साधनांचे महत्त्व ह्याच साठी आहे. नामासारख्या साधनाचा आलंब घेऊन नामस्मरणाचा अभ्यास केला तर अशी समबुद्धी प्राप्त होतेच होते.
माणसाला जीवन जगत असता त्याचा निसर्ग, समाज आणि कुटुंबातील घटक ह्या सर्वांशी संबंध येत असतो. सर्वात महत्वाचे म्हणजे आपण सुखी व्हावे ही मनीषा प्रत्येकाच्या ठायी आहेच. ह्या सर्वांत राहून आपण सुखी होण्यासाठी ह्या सर्वांशी जुळवून घेता आले पाहिजे. म्हणूनच माणसाच्या जीवनात 'धर्म' आला. समाजात / कुटुंबात राहून नीतीचे आचरण करावे, आपले कर्तव्य पालन करावे हे ओघाने आलेच. 'धर्मामाजी श्रेष्ठ स्वधर्म' असे रामदासस्वामींनी सांगितले आहेच. सद्गुरू श्री.वामनराव पै लिहितात,ज्या भगवंताने आपल्याला जन्मास घातले. सुंदर असा मानवदेह दिला, अमोल अशी ज्ञानेंद्रियें / कर्मेंद्रियें दिली, अद्भुत अशी बुद्धी व स्मरण शक्ती दिली आणि आपल्याला विश्वाच्या मंडपात रंगपंचमीचा उत्सव नित्य साजरा करण्यासाठी पंचमहाभुतांच्या पाच रंगांनी भरलेली देहाची पिचकारी दिली त्या भगवंताचे नित्य स्मरण करणे, त्याच्या नामाचे आवडीने संकीर्तन करणे हाच खरा धर्म-स्वधर्म आहे. सिद्धी-बुद्धी-धर्म या तिन्ही गोष्टी नाम घेणाऱ्याच्या दैनंदिन जीवनांत सहज साकार होतात. अशा रितीने नामांत राहणाऱ्याची संगत ज्या संसारी माणसांना लाभते त्यांच्या मनाला खरी शांती मिळते. कारण संतांच्या संगतीतच नामाचे वर्म समजते, नामाची गोडी लागते आणि लागलेली नामाची गोडी संतसंगतीतच टिकते व वाढतही राहते. प्रपंचात तापलेला जीव अशा रितीने नामामृताने निवतो, शांत होतो आणि त्याचे तोंडून सहज उद्गार निघतात,
"दिवाळी दसरा तोचि आम्हां सण । सखे संतजन भेटतील ॥
अमूप जोडिल्या सुखाचिया राशी । पार या भाग्यासी न दिसे आता ॥
धन्य दिवस आजी झाला सोनियाचा । पिकली हे वाचा रामनामें ॥
तुका म्हणे कैसे होऊ उतराई । ठेविता हा पायी जीव थोडा ॥"

ज्ञानदेवीं नाम रामकृष्ण ठसा । येणें दशदिशा आत्माराम ॥
माणसाच्या ठिकाणी उठणाऱ्या वृत्तीचे प्रगट रूप म्हणजे मन. जसे संस्कार होतील हे मन तसे रूप धारण करते आणि तसेच जग प्रचितीला येते. लहानपणी एखाद्या मुलावर संस्कार झाले की 'तू डॉक्टर व्हायचेस'. तर ते मूल तसेच चिंतन करू लागते, अभ्यास करू लागते. एकदा का विद्यापीठाने त्याला डॉक्टर पदवी दिली की त्याच्या मनात 'डॉक्टर' हा  ठसा बसला की तो जाईल तिकडे त्याची ओळख डॉक्टर म्हणूनच होते. तसेच दिव्य नामाने साधकाच्या चित्तावर भगवत् प्रेमाचे ठसे उमटले की मन हळूहळू अंतर्मुख होते. भगवंताच्या चरणाचा स्पर्श होवून चित्ताचे चैतन्यात रूपांतर होते. चित्ताचे चैतन्य झालेल्या साधकाला सर्वत्र हरीच भरून राहिलेला असा अनुभव प्राप्त होतो. आपले कर्तेपण संपून जिकडेतिकडे भगवंताची सत्ता दिसू लागते. असाच ज्ञानदेवांचाही अनुभव आहे. म्हणूनच ते सांगतात,
"हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा । पुण्याची गणना कोण करी ॥"
                     ॥ श्री सद्गुरुचरणी समर्पित ॥

मनाला भावलेले असे हरिपाठाचे अभंग 15

॥ श्री‌सद्गुरुनाथाय नमः ॥   
अभंग १५.
एक नाम हरि द्वैत नाम दुरी । अद्वैत कुसरी विरळा जाणे ॥
समबुद्धी घेतां समान श्रीहरी । शमदमा वैरी हरी झाला ॥
सर्वांघटी राम देहादेहीं एक । सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी ॥
ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेमा । मागिलिया जन्मा मुक्त झालों ॥

पाठभेदः शमदमा वैरी = शमदमावरी
परमेश्वरप्राप्तीची इच्छा तर सर्वांच्याठायी असते. त्यासाठी साधनांचीही कमी नाही. ज्ञानदेव हरिपाठातून नामस्मरणासारखे सुलभ साधन आपल्या हाती देत आहेत. सर्वसामान्य माणूस भगवंताचे नाम घेत असतो.  नाम घेणे हे त्याच्याठायी पुण्यसंचय करून देऊ शकते. पण संतांच्या ठायी असलेली आध्यात्मिक बैठक त्याच्या ठिकाणी नसते. आध्यात्मिक भूमिकेतून नामस्मरण चालणे हे आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांच्या दृष्टीने अत्यंत कठीण आहे. केवळ भगवंतच आहे असा दृढ भाव धरून नामापरतें सत्य नाही ह्याची जाणीव ठेवून एकत्वाने नाम घेणे हिच खरी आध्यात्मिक भूमिका. 'नाम नामी अभेद' हा सिद्धांत आपणांस माहीत आहेच. पण तो अभेद नामीकडून आहे हेही लक्षात घेतले पाहिजे. 'मी नाहीच, आहे तो केवळ भगवंतच' असा भाव धरून जगणे ही आहे अद्वैताची कुशलता. पण साधकावस्थेत मात्र मी भक्त, तो देव असा भाव घेऊनच साधकाचे नाम चालते. हरिनाम हे एकच असे साधन आहे की, त्याच्या सामर्थ्याने जीवाच्या ठिकाणी असणारा द्वैतभाव दूर होतो. सर्वसामान्य माणूसही भगवंताचे नाम घेतो. पण त्याला कारण असते ते त्याच्या प्रापंचिक अडचणी आणि स्वतःचा दुबळेपणा / दुर्बलता जेणेकरून आपल्या अडचणी दूर करण्यासाठी तो मदत शोधत राहतो. ह्या नामाने त्याच्याठायी पुण्यसंचय तर होतो. पण संत / सद्गुरूंना अपेक्षित अशी अद्वैताची आध्यात्मिक बैठक नसल्यामुळे द्वैताच्या अधिष्ठानावर केलेली साधना दुरी मात्र निर्माण करते. संतांना हे अभिप्रेत नाही. एकत्वभावाने घेतलेले भगवन्नाम ही एक 'अद्वैत कुसरी' आहे, अद्वैतस्थिती प्राप्त करून देणारी कला आहे. पण हे अनुभवाने जाणणारा ह्या जगात विरळाच !  नामासारख्या सुलभ साधनाची महती सर्वसामान्यांना कळत नाही. ज्ञानदेवांनी ही खंत ह्याआधीही आठव्या अभंगात व्यक्त केली आहे.
" ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ । सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे॥"नामसाधनेतून अद्वैतस्थिती प्राप्त करून घेता येते ह्यावर ज्ञानदेवांचा ठाम विश्वास आहे. पण ही कला (अद्वैत कुसरी विरळा जाणे ॥)जाणणारा आणि त्याचा अनुभव घेणाराही विरळाच हेही त्यांना नकळत लिहावेच लागते.

समबुद्धी घेतां समान श्रीहरी । शमदमा वैरी हरी झाला ॥
चिकाटीने आणि श्रद्धेने अखंड नामस्मरण केले असता आपली बुद्धी देवाशी सम होऊन तिचा देवाशी योग घडवून आणता येतो. नामस्मरणाने ही अनुभूती घेणाऱ्या नामधारकाला इतर मार्गाने जाणाऱ्या साधकांप्रमाणे शम म्हणजे मनाचे नियमन व दम म्हणजे इंद्रियांचे दमन करावे लागत नाही. याचे कारण असे की ज्या मनाचे नियमन करायचे ते मनच हरिनामात रंगून गेल्यावर त्या मनाचे नियमन करण्याचा प्रश्नच उरत नाही. त्याचप्रमाणे सर्व इंद्रिये हरिप्रेमात सुस्नात झाल्यावर त्यांचेही निराळे दमन करावे लागत नाही. 'मुखी नाम । हृदयी राम' अशी अवस्था झाली की शमदमादी साधनचतुष्ठ्य आपोआप अंगी बाणतात. त्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत. भगवंताच्या नामस्मरणात एवढी शक्ती नक्कीच आहे की ते साधकाला अद्वैताची प्रचिती देते आणि त्याचे साधनचातुष्ठ्य सहज होते.
'नाम घेता कंठ शीतळ शरीर । इंद्रियां व्यापार नाठवीती ॥
गोड गोमटे हें अमृतासी वाड । केला कइवाड माझ्या चित्तें॥'

याच्या उलट शम-दमांचा अभ्यास करणाऱ्या साधकांची अवस्था मोठी केविलवाणी असते. मनाचे नियमन आणि इंद्रियांचे दमन करण्यात या साधकांना मानसिक व शारीरिक क्लेश होतात. त्यांच्या मनाचा तोल ढळल्यामुळे ते शीघ्रकोपी बनतात. जगाकडे पाहण्याची त्यांची दृष्टी अधिकच विकृत होते. जगरूपाने हरीच नटलेला आहे असे दिसण्याऐवजी जग( जगरूपाने असणारा हरि)म्हणजे वैरी असेच त्यांना भासू लागते. सरतेशेवटी पूर्ण अधोगती होऊन त्यांची हरीकडे पाठ होते.
सर्वांघटी राम देहादेहीं एक । सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी ॥
ह्या अभंगात ज्ञानदेव अद्वैतानुभव वर्णन करतात. आपल्या हृदयात असणारा भगवंत नामाच्या आलंबाने प्रगट झाला की साधकाची जगाकडे पाहण्याची दृष्टी बदलते. ज्या साधकाला स्वतःच्या देहामध्ये भगवंत पाहता येतो, त्याला एकच आत्मस्वरूप भगवंत चराचर सृष्टीत कसा भरून राहिला आहे ते कळते. आत्मा सूर्यासारखा आहे. एका आत्मसूर्याचा प्रकाश सर्व विश्वाला प्रकाशित करतो. इथे एक सत्य सांगावेसे वाटते. सूर्य विश्वाला प्रकाशित करतो.आपण प्रकाशात विश्व पाहतो.पण आपल्याला प्रकाश दिसतो का ? त्या प्रकाशकिरणांचा स्रोत जो सूर्य तो आपणांस दिसतो. तसेच आत्मसूर्याचा आपल्या ठायी साक्षात्कार झाला की त्याच्या प्रकाशात सर्व चराचरांत तोच विलसत आहे ह्याची प्रचिती येते.
असो रूपक हे तो ईश्वरू । सकल भूतांचा अहंकारू ॥
पांघरोनी निरंतरू । उल्हसत असे ॥
हे ज्ञानदेवच ज्ञानेश्वरीत सांगतातच की.
परंतु हा अनुभव अखंड नामस्मरणाने मिळणाऱ्या दिव्यज्ञानानेच प्राप्त होतो. हे ज्ञान केवळ ईश्वरकृपेने किंवा सद्गुरुकृपेनेच प्राप्त होते. प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णानेच गीतेत सांगितले आहे,
''ददामि बुद्धियोगं तं येन मां उपयान्ति ते ॥"सद्गुरुकृपेने अथवा ईश्वर कृपेने दिव्यज्ञान प्राप्त झाले की त्या दिव्य ज्ञानप्रकाशात जीवाला सर्व काही दिव्यच दिसू लागते. अनुभूतीआधी 'मी' देहाएवढा आहे असे वाटते तर दिव्यानुभूतीने 'तुका आकाशाएवढा' असे अनुभवाला येते. आधीचेच दुःखरूप जग 'अवघेचि त्रैलोक्य आनंदाचे आता' ह्याची प्रचिती येते.
ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेमा । मागिलिया जन्मा मुक्त झालों ॥
हरि मुखे म्हणा । हरि मुखे म्हणा ॥ असे अखंड नामसंकीर्तन केल्याने अगणित पुण्याईने ज्ञानदेवांच्या चित्तात अखंड नामस्मरणाचा नेम आहे. हे म्हणजे मागच्या जन्मीच मुक्त झाल्याची खूण आहे. मुक्ती मिळणे आणि मुक्ती मिळाल्यानंतर मुक्तीचा भोग घेणे ह्या दोन गोष्टी भिन्न आहेत.
'जन्म घेणे लागे वासनेच्या संगे । तीच अंगे झाली हरिरूप ॥" हा संतांचा अनुभव आहे.
देहबुद्धीतून निर्माण झालेल्या वासना जन्माला तर घालतातच. पण नामाची पुण्याई गाठी नसेल तर बंधनात अडकवूनही ठेवतात. मात्र आत्मबुद्धीच्या वासनाही जन्मास घालतात.पण भगवंताच्या नामात एवढी मोठी शक्ती आहे की नामाला चिकटलेला साधक वासनामूक्तच होईल. सद्गुरू श्री.वामनराव पै लिहितात,  'मुक्ती मिळणे आणि मुक्ती मिळाल्यानंतर मुक्तीचा भोग घेणे ह्या दोन गोष्टी भिन्न आहेत. मुक्ती मिळाल्यावर जे स्वतःला धन्य झालो असे समजतात ते अभागी होत. याच्या उलट मुक्ती मिळाल्यानंतर तिचा भोग घेतात ते भक्त भाग्यवान होत. मुक्ती भोगणे ही भक्ती होय. ही भोगण्याची प्रक्रिया म्हणजे नामसंकीर्तन. हा प्रेमानंद पुन्हा पुन्हा भोगायला मिळावा म्हणून संत गर्भवास इच्छितात.'नलगे मुक्ति आणि संपदा । संतसंग देई सदा ॥
तुका म्हणे गर्भवासी । सुखे घालावे आम्हासी ॥'
हे तर तुकाराम महाराजांचे मागणे आहे.

याच्या उलट नामाच्या द्वारे ज्यांना मुक्तीचा सोहळा भोगता येत नाही ते जन्ममरणाच्या चक्रांतून स्वतःची सोडवणूक करून घेतात. पण नामाचा हा महिमा ज्ञानदेवांनी ओळखला आणि आपल्यासारख्या सामान्यांनानाही ती प्रचिती यावी म्हणून ते सांगतात,
"हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा । पुण्याची गणना कोण करी॥"
                      "॥ सद्गुरुचरणी समर्पित ॥"