शनिवार, १४ मे, २०११

हे लक्षात ठेवा

8शिष्यास अनुग्रह दिल्यावर सद्गुरु शिष्यांची वेळोवेळी चौकशी करतात. त्यांच्यात नामाबद्दल गोडी उत्पन्न करतात. नाम दिल्यानंतर जो अनुभव येतो त्या अनुभवाच्या वरच्या अवस्थेत नेण्यास शिष्यांस उत्तेजन देतात. शिष्यांची खरोखर उन्नती होते आहे की नाही, यावर त्यांचा भारी कटाक्ष असतो.
8खरे सद्गुरु हे शिष्यांस भक्तियोग, ज्ञानयोग व कर्मयोगाची सांगड कशी घालावी हे शिकवतात. तसेच त्यांना स्वधर्म समजाऊन सांगतात.
8खरे सद्गुरु हे शिष्यांना अंधश्रद्धेपासुन दूर ठेवतात.
8खरे सद्गुरु शिष्यांस ज्ञान देऊन प्रबोध देतात व त्यांना विश्वस्वप्नातुन जागे करतात. आत्मदर्शन घडवुन आणतात.
8खरा शिष्य गुरुंनी दिलेले नाम मोठ्या श्रद्धेने घेतो.
8खरा शिष्य हा गुरुंचा आदर करतो व मनात आलेले सर्व संशय गुरुंजवळ मनमोकळेपणाने सांगुन शंका निरसन करुन घेतो.
8खरा शिष्य हा गुरुंनी सांगितलेल्या ज्ञानाचे चिंतन करुन प्रयत्नाने ज्ञानात भर घालतो. ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव पासष्टी, योगवाशिष्ठ, दासबोध, उपनिषदे व महाभारत यांसारख्या पवित्र ग्रंथाचे नियमित वाचन व मनन करतो.
8प्राप्त झालेला अनुभव गुरु किंवा अधिकारी व्यक्तिंखेरीज कोणाला सांगु नये.
8बद्धतेकडुन मोक्षाकडे, सगुणत्वाकडुन निर्गुणत्वाकडे वाटचाल करायची असल्यामुळे शिष्याने नामसाधना अत्यंत सुक्ष्मत्वाने करावी. तसेच गुरुंच्या देहाकडे न पाहता गुरुंचे विश्वव्यापक रुपाकडे लक्ष ठेऊन ज्ञानसाधना चालु ठेवावी. 
 
8एकवेळ गुरुंचा विसर पडला तरी चालेल पण त्यांनी जी साधना व जे नाम दिलेले आहे कोठल्याही परिस्थितीत सोडु नये.
8गुरुंची महती एकदा समजल्यावर त्यांच्यावर दृढ विश्वास ठेवा व त्यांच्या कार्यास हातभार लावावा. त्यांचे विचार तळागाळातील सर्वस्तरीय बांधवांपर्यंत पोचविण्याचे पवित्र कार्य करा.

8नवा व बलवान भारत घडवा.
8संतांच्या चमत्कारांकडे लाक्षणिक अर्थाने पाहा. त्या चमत्कारात गुंग होऊ नका,

8स्वतः स्वधर्म आचरुन दाखवा तसेच दुसऱ्यांनाही आचरण्यास सांगा.
8कोणावरही अन्याय करु नका व कोणाचाही अन्याय सहन करु नका तसेच अहिंसेचा अतिरेक करु नका.

8प्राचिन काळातील ऋषी-मुनींच्या तत्वज्ञानाचा अर्थ वैज्ञानिक दृष्टीकोनातुन समजुन घ्या व तसे वागण्याचा प्रयत्न करा. 
8अंधश्रद्धा मनी कवटाळुन ठेऊ नका. डोळस व्हा.

8स्रियांना मान देण्यास शिका. ज्या घरात वा ज्या देशात स्रियांना योग्य मान दिला जातो, तेथे स्वधर्म, नीति, संपत्ती व खरा परमार्थ वास करीत असतो हे लक्षात ठेवा.
8जेथे स्रियांना उपभोग्य वस्तु म्हणुन बघितले जाते तेथे अज्ञान, अविद्या, अधर्म व अवदसा वास करतात. असा विकारी जनांचा अधःपात हा ठरलेलाच असतो. असा व्यक्ति कधीच सुखी नसतात हे लक्षात ठेवावे.

8सवड काढुन पंढरपुर, आळंदी, शिर्डी, गाणगापुर यासारखी पवित्र तीर्थयात्रा करा. आपल्या श्रीमंतीचे प्रदर्शन करु नका. साधा व भोळा भावच ईश्वराला आवडतो. 
8थोर पुरुषांची भेटीगाठी घ्या. त्यांचा आशीर्वाद घ्या. संतांची अभंगे पाठ करा.

8एकादशी नियमित करा. जमेंल तर आरत्या, हरिपाठ नियमित म्हणण्याचा परिपाठ चालु करा. नियमांचे पालन करा. नियम अंगी बाणा. लहान मुलांना शुभ संस्कार देऊन घडवा. 
8घर अंगण परिसर स्वच्छ ठेवा.
8दारु, तंबाखु, मद्यपान, मांसाहार, परद्रव्य व परदारा यांपासुन दूर राहा. कोठलेही व्यसन करु नका.
8दुसऱ्या बांधवांनाही अध्यात्माचा मार्ग दाखवा. त्यांनाही अनुग्रह घ्यायला सांगुन परमार्थावर वाटचाल करायला सांगा.

8चमत्कार व बुवाबाजीवर विश्वास ठेऊ नका.

8ज्ञानी व्यक्तिंचा सहवास करा.

8भगवंताचे वेळोवेळी स्मरण करीत चला. जेंव्हा जेंव्हा तुमचे मन संसारातील गोष्टींकडे भरकटत जाईल तेंव्हा तेंव्हा त्यास प्रयत्नपुर्वक खेचुन भगवंताकडे लावा. हळुहळु सवय झाल्यावर ते आणखी कशातही गुंतणार नाही.

8परस्री व परधन यापासुन जाणिवपुर्वक दूर राहा.

8वेळोवेळी गुरुंचा सहारा घ्या. त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे वाटचाल करा. भक्तिमार्ग सोपा व सरळ आहे. कोणालाही कोणत्याही वयात तो सहज करण्याजोगा आहे. पण तो मार्ग गुरुंकडून नीट समजुन घ्या. कारण शुद्ध मार्ग फक्त सदुगुरुच सांगु शकतील.

8सतत गुरुंवर अवलंबुन राहु नका. त्यामुळे परावलंबी होण्याची शक्यता जास्तच. स्वतः विवेकाने व ज्ञानपुर्वक वागल्यास वैराग्य व भक्ति ही दृढ होत जाते व तीच खरी गुरुसेवा होय.

8स्वतःचे निर्णय स्वतः घ्या.

8तुमचे मन जसजसे अध्यात्मात प्रगत होऊ लागेल तसतसे विकार उसळुन तुमचा मनक्षोभ होईल. अशा वेळी धीर व संयम ठेवा. इंद्रियांच्या आहारी न जाता तटस्थ भावाने व साक्षित्वाने स्वतःचे परिक्षण करा.

8जग हे परिवर्तनशिल आहे, पण म्हणुन संसार हा अर्धवट सोडु नका. आपल्या वाट्याला जे भोग प्राप्त झालेले आहेत ते निमुटपणे स्विकारा.

8वेळोवेळी ध्यान करा. त्याचबरोबर स्वतःचेहि परिक्षण करा. आपल्या चुका ओळखुन त्यावर मात करा.

8खरा साधु निसर्ग नियमात ढवळाढवळ करत नाही. तो निसर्गाने आखुन दिलेल्या चौकटीत आनंदाने रहातो.

8रंजल्या गांजल्यात ईश्वर पहा. समाजातील तळागाळातील बंधुंची  जमेल तितकी निस्वार्थी भावनेने सेवा करावी.

8खरा साधू ओळखुन त्याची भक्तिभावाने पूजा करावी. तसेच शत्रु ओळखुन त्याला वेळीच ठेचण्याचे वा प्रतिकार करण्याचे धारिष्ठ दाखवावे. दास्यत्व ईश्वराचे स्विकारावे. स्वतःच्या स्वार्थासाठी उठसुठ कोणाचे पाय धरु नये.

8उठा...... वेळ थोडा आहे. कार्य जास्त आहे. यश तुमचेच आहे. सद्गुरु सदैव तुमचे रक्षण करोत. तुमची अध्यात्मिक प्रगती होवो व स्वधर्मावरील वाटचाल ही सुखकर होवो. तुमचे मंगल होवो

                                             ......डी सिताराम


 




 










 


 


 

 










अनुग्रह- एक विज्ञान


अनुग्रह
अनुग्रह कोण देऊ शकतो?
दर्शनात् स्पर्शनात् शब्दात् कृपया शिष्यदेहके।
जनयेद्यः समावेशं साम्भव स हि देशिकः।।
         योगवासिष्ठ- (निर्वाण प्रकरण)
अर्थः- जे दर्शनाने, स्पर्शाने, शब्दाने व कृपापुर्वक शिष्यांच्या देहामध्ये शिवभावाची मंगलमय अनुभूति करु शकतात त्यांनाच श्रीसद्गुरु असे म्हणतात.
अशी सद्गुरुंबद्दलची स्पष्ट व्याख्या वशिष्ठ मुनींनी केलेली आहे. जे कोणी या पदाला आरुढ झालेले असतात ते शिष्यांना उत्तम प्रकारे अनुग्रह देऊन त्यांना मोक्षाचे अधिकारी बनवतात.
जे आत्मज्ञानी असतात, जे विश्वस्वप्नातुन जागे झालेले असतात, ज्यांचे दोष पुर्णपणे नाहिसे झालेले असतात, जे आत्मस्वरुपावर निरंतर जागे असतात असे सद्गुरुच शिष्यांना अनुग्रह देऊ शकतात.
जे आत्मज्ञानाच्या किंवा, अनुग्रहाच्या मोबदल्यात काहिही न घेता निस्वार्थ भावनेने समाज सदृढ व्हावा या उद्देशाने अनुग्रह देतात तेच खरे सद्गुरु होत. व अशाच आत्मज्ञानी महापुरुषांकडुन अनुग्रह घ्यावा.
जो प्रसिद्धी पासुन दूर रहातो, लोकांच्या निंदेने वा स्तुतीने विचलित होत नाही, जो मान अपमान समान मानतो, ज्यास समत्व योग प्राप्त झालेला आहे, तोच खरा सद्गुरु व अशाच सद्गुरुंकडुन अनुग्रह घ्यावा.
ज्यांच्या मनात शिष्यांविषयी कळकळ असते, जे शिष्यांच्या उद्धाराची काळजी वाहतात, शिष्यांना या भयानक संसार सागरातुन तरुन जाण्यासाठी यथार्थपणे मार्गदर्शन करतात तेच खरे सद्गुरु व खरे संत होत. व अशा संतांच्या समागमाने संसार सागर पार केला जातो व आपण आपल्या कर्माशयाचा नाश करु शकतो. अशाप्रकारे सद्गुरुंच्या वचनावर दृढ विश्वास ठेवल्याने आपण मुक्त होऊ शकतो.
खरे सद्गुरु आपणाला ज्ञानयोग, भक्तियोग आणि कर्मयोग शिकवतात व आपल्याला त्यांच्या इतकेच परिपुर्ण करुन सोडतात. 
संत समागमु धरावी आवडी। जाशी पैलथडी भवसिंधू।।
संतांचे वचन अंतरी लक्षुनी। आपुल्या जीवनी मुक्त होशी।।
संत हेची बाप संत हेची माय। भक्तालागी सोय सर्वकाळी।।
संत उपदेश हाची गीता सार। कैवल्याचा भार दत्ता म्हणे।।
हल्ली मात्र गुरु म्हणविणाऱ्यांचा सुळसुळाटच झाला आहे. ते स्वतः आत्मदृष्टीने निजलेले असुन बाहेर वैराग्याचा देखावा उभा करुन शिष्यांना अनुग्रह देऊ पाहतात. स्वतः विश्वस्वप्नातच गुंग राहुन शिष्यांना विश्वस्वप्नातुन जागे करण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात व शिष्यपण विश्वस्वप्नातुन जागे झाल्याच्या गप्पा मारतात. स्वतःला आत्मज्ञान, आत्मसाक्षात्कार झाल्याचे सांगतात. स्वतःची प्रसिद्धि करतात. हे सारे भयावह आहे. यामुळे समाजाचे भले न होता नुकसान मात्र होते. समाज भलत्याच शक्तिकडे ओढला जातो. हे सारे थांबायलाच पाहिजे. जन्मोजन्मीची अविद्यारुपी महामारी नाश न करता पुन्हा विश्वस्वप्नातच गुंग रहाणाऱ्याला कोणते नाव द्यावे तेच कळत नाही. त्यामुळे सुज्ञांनी गुरु निवडतांना डोळे उघडे ठेवुनच निवडावा. कोणाच्याही सांगण्यावर विश्वास न ठेवता स्वतः जागरुक राहुन सद्गुरुंची परिक्षा घ्यावी. तरच गुरु करावा. बरेच विद्वान माझ्या या विधानाला हसतील. त्यांना हसण्याचे काम करु द्या. आपण आपले काम मात्र चोखपणे करा.
सदुगुरु कसे असतात?
गुरु चरणांची शोभा। भोळा राजा असे उभा।।
याशी नाही मानपान। दिले नामाचे साधन।।
नामरुप ऐक्य करी। भवव्याधी दूर सारी।।
दत्ता म्हणे माझा भाव। गुरु जाहला स्वभाव।।
भगवान रामकृष्ण म्हणत- साधू दिवसा ऐकावा व रात्री पहावा तरच त्यावर विश्वास ठेवावा. या त्यांच्या सांगण्यात खूपच सत्य सामावलेले आहे.
ज्यास  घरादाबद्दल  मोह, ममत्व किंवा  आसक्ति नसते, सर्व लोकांत जो निःसंग वृत्तीने रहातो, जो मायेत कधीही बांधला जात नाही, जो परब्रह्माची नियमित उपासना करतो, जो भगवंताचे नियमित गुणवर्णन करतो असा भक्तिमान सत्पुरुष म्हणजेच खरा ज्ञानी सदुगुरु होय. अशा भक्तिमान सद्गुरुंकडुनच अनुग्रह घ्यावा.
जे बोले तैसा चाले या वृत्तीवर आरुढ असतात, जे शिष्यांना अध्यात्म शिकवतांना विज्ञानाचेही रहस्य समजाऊन सांगतात असे श्रेष्ठ अधिकारी पुरुष म्हणजेच सद्गुरु होय व अशाच ज्ञानमय, विज्ञानमय सद्गुरुंजवळुन अनुग्रह घ्यावा.
जे लोकोपवादाने हर्षित वा दुःखी होत नाहीत, जे संयमी व ब्रह्मचारी असतात, ज्यांची दृष्टी सदा पवित्र व स्वच्छ असते, परद्रव्य व परदारा यांच्याबद्दल ज्यांना आसक्ति नसते, जे कर्म करत असतांना निष्काम कर्मयोग साधतात, ज्यांचे शरीर, मन, वागणे व बोलणे हे नादमय झालेले असते अशा निष्काम कर्मयोगी सद्गुरुंकडुनच अनुग्रह घ्यावा.
जो कोणी देवतांबद्दल शिष्यांच्या मनात भेद करत नाही. नाना संप्रदायांमुळे जो संशयात सापडत नाही, जो शिष्य शिष्यांमध्ये भेदभाव करत नाही. अशा जीवन्मुक्त पुरुषांकडुनच अनुग्रह घ्यावा.
जे निस्वार्थी व परोपकारी असतात, जे शिष्यांच्या पारमार्थिक उन्नती बरोबरच राष्ट्राची उन्नती होण्यासाठी झटत असतात. जे खऱ्या अध्यात्मज्ञानाचा प्रसार होण्यासाठी कार्य करतात, जे खरा स्वधर्म जगाला समजाऊन सांगतात अशा राष्ट्रसंत महापुषालाच सद्गुरु म्हणावा. अशा राष्ट्रसंतांकडुनच अनुग्रह घ्यावा व अशाच सद्गुरुंकडुन अध्यात्म विद्येची धुळाक्षरे शिकावित. त्यांनाच मनोभावे शरण जावे. त्यांच्याजवळुन अनुग्रह घेतल्यास शिष्यपण त्यांच्या सारखाच प्रखर आत्मज्ञानी बनतो हे लक्षात ठेवावे.
                             
                                         ......डीसिताराम

















साधक भगिनींसाठी सुचना

साधक भगिनींसाठी सुचना
स्री ही देवीस्वरुप आहे तिला आदराने आदिशक्ती असे म्हटले आहे. कारण ती या साऱ्या त्रैलोक्याची जननी आहे. सारे भूतमात्र तिच्याच पोटी निर्माण झाले आहे. तिचा गौरव करायला आपण शिकले पाहिजे.
एकविसावे शकत उजाडले तरीही पुरुष आणि स्री यांच्यात समानता आलेली नाही. तिला नाना प्रकारे छळले जाते. तिच्याकडे केवळ उपभोग्य वस्तु म्हणुन पाहीले जाते. याकरीता भगिनींनी प्रथम स्वतःला बदलले पाहिजे. तिने स्वतःचा सम्मान केला पाहिजे. जी भगिनी सद्गुरुंकडे जाऊन अनुग्रह घेते, तिने तर स्वतःला अबला कधीच समजु नये. कारण तिची परमात्म्याशी एकतानता साधली जाते. नाम जपता जपता ती प्रत्यक्ष भगवंताला प्राप्त करुन घेते. प्रत्यक्ष पांडुरंग मागेपुढे उभा राहुन तिचा सांभाळ करतो. संत जनाबाई, संत मुक्ताबाई, महाराणी ताराबाई, जिजामाता, महाभारत कालिन मैत्रैयी, द्रौपदी, उलपी इ. भाग्यवान स्रिया कणखर होत्या. कोणाचाही अन्याय त्यांनी सहन केला नाही. समाज कणखर व बलवान होण्यासाठी त्या आयुष्यभर झटल्या. प्रत्येक भगिनीने अशा तेजस्वी स्रियांचा आदर्श ठेवावा. असो.
प्रपंच करीत असतांना पांडुरंगाची सतत आठवण ठेवावी. मुलाबाळांवर अध्यात्मिक संस्कार करावेत. त्यासाठी सकाळ संध्याकाळ आरती, हरिपाठ, स्तोत्रे इ. नियमित म्हणण्याचा परिपाठ ठेवावा. मुलांचे फाजील लाड न करता, त्याच्या ममतेत न अडकता, प्रसंगी कठोर होऊन तो चुकल्यास त्यास त्याच्या चुकीचा जाणिव करुन द्यावी. योग्य वेळी मौन राखावे, मुलांना मांसाहाराचे वळण न लावता त्यास शुद्ध शाकाहाराचे महत्व सांगावे. उद्याची चिंता करु नये. सासु-सासरे, नणंद, दीर व पती यांच्याशी प्रेमाने वागावे. अन्याय सहन करु नये. अन्यायाचा शक्तीनिशी प्रतिकार करावा. शेजारणींशी सलोख्याचे संबध ठेवावेत. मनातील गुपीत मनातच ठेवावे. संसारातील न्यून, कमीपणा, मनातील शल्य चारचौघात सांगुन त्याचे प्रदर्शन करु नये.
स्रियांमध्ये शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, लोकमान्य टिळक, राम, कृष्ण यांसारखे तेजस्वी महापुरुष घडवण्याची शक्ती आहे. त्यामुळे भगिनीने स्वतःचा मान ठेवावा. स्री सुखी असेल तर घर-परिवार सुखी व समृध्द होईल. म्हणुन घरातील प्रत्येक पुरुषाने घरातील स्री वर्गाचा आदर व सम्मान करावा. कारण त्यात सर्वांचेच हित सामावलेले आहे.
पुरुषातील वाईट प्रवृत्ती स्रियांना ओळखता येते. त्यामुळे तिने त्या वाईट प्रवृत्तींना खतपाणी न घालता, उत्तेजन न देता त्यांचा निषेध करावा. वाईट प्रवृत्तींचा नायनाट करण्याचे सामर्थ तिच्याजवळ नक्कीच आहे.
नारींचा सन्मान ज्या घरात, ज्या गावात व ज्या देशात केला जातो, त्या घरात, त्या गावात व त्या देशात लक्ष्मी, स्वधर्म व परमार्थ वास करत असतात, तेथे अध्यात्म स्थिर असते.
भगिनी जर अशिक्षित व अडाणी असेल तर सज्ञान होण्याचा प्रयत्न करावा. मुलाबाळांना चांगले ज्ञान द्यावे. मुलांची अंघोळ करतांना प्रत्यक्ष पांडुरंगाचेच स्नान करीत आहोत असाच भाव ठेवावा. सारा परिवार व घर हे पांडुरंगाचेच निवास आहे असे चिंतन करावे. मुलांतील सद्गुणांना वाव द्यावा. समर्थ घर, समर्थ गाव व समर्थ देश घडवण्यास हातभार लावावा. म्हणतात ना.....
।।जिच्या हाती पाळण्याची दोरी। ती राष्ट्राते उद्धारी।।
साधक भगिनीने दैवावर हवाला न ठेवता, मुलांना दैववादी बनवु नये. त्यांना कर्तव्य व ज्ञानार्जन करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. रामायण महाभारत यांतील विररसाच्या गोष्टी सांगुन त्यांचे मन बलवान करावे. भुताखेताच्या गोष्टी सांगुन त्यांना भित्रा व पळपुटा करु नये. व्यायामाचे महत्व सांगुन त्यांची शरीर संपदा वाढवावी. असे प्रत्येक भगिनीने मनापासुन आचरण केल्यास संसार हा सुसह्य होईल व ईश्वराची सेवा आपोआपच होईल यात संशय नाही.

                                                            ..........डी सिताराम