शनिवार, १४ मे, २०११

अनुग्रह- एक विज्ञान


अनुग्रह
अनुग्रह कोण देऊ शकतो?
दर्शनात् स्पर्शनात् शब्दात् कृपया शिष्यदेहके।
जनयेद्यः समावेशं साम्भव स हि देशिकः।।
         योगवासिष्ठ- (निर्वाण प्रकरण)
अर्थः- जे दर्शनाने, स्पर्शाने, शब्दाने व कृपापुर्वक शिष्यांच्या देहामध्ये शिवभावाची मंगलमय अनुभूति करु शकतात त्यांनाच श्रीसद्गुरु असे म्हणतात.
अशी सद्गुरुंबद्दलची स्पष्ट व्याख्या वशिष्ठ मुनींनी केलेली आहे. जे कोणी या पदाला आरुढ झालेले असतात ते शिष्यांना उत्तम प्रकारे अनुग्रह देऊन त्यांना मोक्षाचे अधिकारी बनवतात.
जे आत्मज्ञानी असतात, जे विश्वस्वप्नातुन जागे झालेले असतात, ज्यांचे दोष पुर्णपणे नाहिसे झालेले असतात, जे आत्मस्वरुपावर निरंतर जागे असतात असे सद्गुरुच शिष्यांना अनुग्रह देऊ शकतात.
जे आत्मज्ञानाच्या किंवा, अनुग्रहाच्या मोबदल्यात काहिही न घेता निस्वार्थ भावनेने समाज सदृढ व्हावा या उद्देशाने अनुग्रह देतात तेच खरे सद्गुरु होत. व अशाच आत्मज्ञानी महापुरुषांकडुन अनुग्रह घ्यावा.
जो प्रसिद्धी पासुन दूर रहातो, लोकांच्या निंदेने वा स्तुतीने विचलित होत नाही, जो मान अपमान समान मानतो, ज्यास समत्व योग प्राप्त झालेला आहे, तोच खरा सद्गुरु व अशाच सद्गुरुंकडुन अनुग्रह घ्यावा.
ज्यांच्या मनात शिष्यांविषयी कळकळ असते, जे शिष्यांच्या उद्धाराची काळजी वाहतात, शिष्यांना या भयानक संसार सागरातुन तरुन जाण्यासाठी यथार्थपणे मार्गदर्शन करतात तेच खरे सद्गुरु व खरे संत होत. व अशा संतांच्या समागमाने संसार सागर पार केला जातो व आपण आपल्या कर्माशयाचा नाश करु शकतो. अशाप्रकारे सद्गुरुंच्या वचनावर दृढ विश्वास ठेवल्याने आपण मुक्त होऊ शकतो.
खरे सद्गुरु आपणाला ज्ञानयोग, भक्तियोग आणि कर्मयोग शिकवतात व आपल्याला त्यांच्या इतकेच परिपुर्ण करुन सोडतात. 
संत समागमु धरावी आवडी। जाशी पैलथडी भवसिंधू।।
संतांचे वचन अंतरी लक्षुनी। आपुल्या जीवनी मुक्त होशी।।
संत हेची बाप संत हेची माय। भक्तालागी सोय सर्वकाळी।।
संत उपदेश हाची गीता सार। कैवल्याचा भार दत्ता म्हणे।।
हल्ली मात्र गुरु म्हणविणाऱ्यांचा सुळसुळाटच झाला आहे. ते स्वतः आत्मदृष्टीने निजलेले असुन बाहेर वैराग्याचा देखावा उभा करुन शिष्यांना अनुग्रह देऊ पाहतात. स्वतः विश्वस्वप्नातच गुंग राहुन शिष्यांना विश्वस्वप्नातुन जागे करण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात व शिष्यपण विश्वस्वप्नातुन जागे झाल्याच्या गप्पा मारतात. स्वतःला आत्मज्ञान, आत्मसाक्षात्कार झाल्याचे सांगतात. स्वतःची प्रसिद्धि करतात. हे सारे भयावह आहे. यामुळे समाजाचे भले न होता नुकसान मात्र होते. समाज भलत्याच शक्तिकडे ओढला जातो. हे सारे थांबायलाच पाहिजे. जन्मोजन्मीची अविद्यारुपी महामारी नाश न करता पुन्हा विश्वस्वप्नातच गुंग रहाणाऱ्याला कोणते नाव द्यावे तेच कळत नाही. त्यामुळे सुज्ञांनी गुरु निवडतांना डोळे उघडे ठेवुनच निवडावा. कोणाच्याही सांगण्यावर विश्वास न ठेवता स्वतः जागरुक राहुन सद्गुरुंची परिक्षा घ्यावी. तरच गुरु करावा. बरेच विद्वान माझ्या या विधानाला हसतील. त्यांना हसण्याचे काम करु द्या. आपण आपले काम मात्र चोखपणे करा.
सदुगुरु कसे असतात?
गुरु चरणांची शोभा। भोळा राजा असे उभा।।
याशी नाही मानपान। दिले नामाचे साधन।।
नामरुप ऐक्य करी। भवव्याधी दूर सारी।।
दत्ता म्हणे माझा भाव। गुरु जाहला स्वभाव।।
भगवान रामकृष्ण म्हणत- साधू दिवसा ऐकावा व रात्री पहावा तरच त्यावर विश्वास ठेवावा. या त्यांच्या सांगण्यात खूपच सत्य सामावलेले आहे.
ज्यास  घरादाबद्दल  मोह, ममत्व किंवा  आसक्ति नसते, सर्व लोकांत जो निःसंग वृत्तीने रहातो, जो मायेत कधीही बांधला जात नाही, जो परब्रह्माची नियमित उपासना करतो, जो भगवंताचे नियमित गुणवर्णन करतो असा भक्तिमान सत्पुरुष म्हणजेच खरा ज्ञानी सदुगुरु होय. अशा भक्तिमान सद्गुरुंकडुनच अनुग्रह घ्यावा.
जे बोले तैसा चाले या वृत्तीवर आरुढ असतात, जे शिष्यांना अध्यात्म शिकवतांना विज्ञानाचेही रहस्य समजाऊन सांगतात असे श्रेष्ठ अधिकारी पुरुष म्हणजेच सद्गुरु होय व अशाच ज्ञानमय, विज्ञानमय सद्गुरुंजवळुन अनुग्रह घ्यावा.
जे लोकोपवादाने हर्षित वा दुःखी होत नाहीत, जे संयमी व ब्रह्मचारी असतात, ज्यांची दृष्टी सदा पवित्र व स्वच्छ असते, परद्रव्य व परदारा यांच्याबद्दल ज्यांना आसक्ति नसते, जे कर्म करत असतांना निष्काम कर्मयोग साधतात, ज्यांचे शरीर, मन, वागणे व बोलणे हे नादमय झालेले असते अशा निष्काम कर्मयोगी सद्गुरुंकडुनच अनुग्रह घ्यावा.
जो कोणी देवतांबद्दल शिष्यांच्या मनात भेद करत नाही. नाना संप्रदायांमुळे जो संशयात सापडत नाही, जो शिष्य शिष्यांमध्ये भेदभाव करत नाही. अशा जीवन्मुक्त पुरुषांकडुनच अनुग्रह घ्यावा.
जे निस्वार्थी व परोपकारी असतात, जे शिष्यांच्या पारमार्थिक उन्नती बरोबरच राष्ट्राची उन्नती होण्यासाठी झटत असतात. जे खऱ्या अध्यात्मज्ञानाचा प्रसार होण्यासाठी कार्य करतात, जे खरा स्वधर्म जगाला समजाऊन सांगतात अशा राष्ट्रसंत महापुषालाच सद्गुरु म्हणावा. अशा राष्ट्रसंतांकडुनच अनुग्रह घ्यावा व अशाच सद्गुरुंकडुन अध्यात्म विद्येची धुळाक्षरे शिकावित. त्यांनाच मनोभावे शरण जावे. त्यांच्याजवळुन अनुग्रह घेतल्यास शिष्यपण त्यांच्या सारखाच प्रखर आत्मज्ञानी बनतो हे लक्षात ठेवावे.
                             
                                         ......डीसिताराम

















कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: