रविवार, २४ एप्रिल, २०११

सद्गुरुंची पूजा कशी करावी?

पुर्वी लहानपणीच मुलांना गुरुंच्या आश्रमात शिक्षणासाठी टाकले जायचे. तेथे त्याला सर्व प्रकारची शिक्षा मिळे. प्रत्यक्ष गुरुंच्या सान्निध्यात राहुन, शिष्य गुरु इतकाच, किंवा गुरुपेक्षाही वरचढ निघायचा. अशा भाग्यवान शिष्यांना प्रत्यक्ष गुरुंची सेवा करायला मिळायची. पण हल्लीच्या धावपळीच्या काळात प्रत्यक्ष गुरुंचा सहवास फारच कमी लाभतो. आपल्याला गुरुंच्या घरी रहाणे शक्य होत नाही. त्यामुळे गुरुंची सेवा कशी करावी? असा प्रश्न पुढे उभा रहातो. त्यामुळे गुरुंची खरी सेवा किंवा पूजा म्हणजे काय ते समजुन घेऊ.सद्गुरुंनी स्वधर्माचे व आत्मविकासाचे जे ज्ञान आपणास दिले आहे, त्या ज्ञानाची कास धरुन स्वधर्मावर चालणे व त्यांनी दिलेले नाम अखंड घेत जाणे म्हणजेच गुरुसेवा होय. प्राणीमात्रांवर प्रेम करणे, दयाबुद्धिने व समानतेने वागणे म्हणजेच गुरुसेवा होय. कठोर शब्दांनी दुसऱ्यांचे मन दुखावणे, अपमान करणे, शत्रुत्व करणे, व्देषबुद्धी वा आकस ठेवणे, परस्री विषयक आसक्ति ठेवणे, परधनाचा अपहार करणे इ. अधर्मकारक व अनीतिकारक गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात. वरील प्रकारची अनीतिकारक गोष्टी न करणे हीच खऱ्या अर्थाने गुरुसेवा होईल. काहीजण प्रत्यक्ष गुरुंशी उलटे बोलतात. त्यांच्यासमोर धडधडीत खोटे बोलतात व उगाच आत्मप्रौढी मिरवतात. हे कितपत योग्य आहे? व ही गुरुसेवा खऱ्या अर्थाने होऊ शकेल काय याचा सर्वांनी विचार करावा.
सद्गुरुंचा देह जरी स्थुल रुपाने दिसत असला तरी तो अतिवाहक किंवा ज्ञानमय असा असतो. त्यांच्यातील गुरुत्व हे साऱ्या विश्वात कोंदाटले आहे. त्यामुळे साऱ्या प्राणीमात्रांशी प्रेमळपणाने वागलो तर, सद्गुरुंशीच प्रेमळपणाने वागण्याचे समाधान पदरी पडेल. व तीच गुरु सेवा होईल. जे कोणी  रंजलेले वा  गांजलेले असतील  जे कोणी दुःखाने पीडित असतील त्यांची जमेल तितकी सेवा केल्यास प्रत्यक्ष सद्गुरुंचीच सेवा घडेल. कोणाचही द्वेष वा मत्सर न करता नम्रपणे वागावे, मित्रत्वाने वागावे व गुरुंनी सांगितलेल्या परमार्थ मार्गावर वाटचाल चालु ठेवावी. आपले मन हे शात ठेवावे. हिच खरी गुरुसेवा होय. अशा सेवेने सद्गुरु संतुष्ट होतात.
करा नामाचे साधन। तीच गुरुसेवा जाण।।
नाम सुलभ सोपेरे। नामे काळ थरथरे।।
करा बापांनो उच्चार। तयाविण ना उद्धार।।
दत्ता म्हणे झालो धीट। मार्ग पाहिला चोखट

     ......... डी सिताराम









सद्गुरु कसा पहावा?

सद्गुरुंना देहात पाहु नये. माझे गुरु चराचरात वास करत असुन मला ज्ञान देत आहेत, असा भाव ठेवावा. सतत ज्ञान मिळवत रहावे. हिच गुरुंची गुरुदक्षिणा होय. जसे आकाश सर्व प्राणीमात्रांना एकच एक असते, तसे सद्गुरु सर्व प्राणीमात्रांना एकच एक असतात. हे सदैव लक्षात ठेवावे. सदुरुंना देहात पाहणे म्हणजे आपली ज्ञानदृष्टी संकुचित करुन घेणे होय. म्हणुनच सद्गुरुंना विश्वरुपात पहावे. त्यांनी दिलेल्या नामसाधनेची सुलभपणे वाटचाल करावी व नाम मोठ्या विश्वासाने जपावे.

                        नाम सोपे नाम सोपे। सरतील विघ्ने पापे।।
                        नाही आणिक साधन। देव पाहायाशी जाण।।
                        हरिप्राप्तीचे लक्षण। पांडुरंग नाम जाण।।
                        दत्ता म्हणे घेई नाम। पुढे उभा घनःश्याम।।