रविवार, २७ मार्च, २०११

हरवलेले काव्य

काव्य मज सोडुनी गेले
पोरके मज करुनी
सुख वाटेना चैन पडेना
फिरतो मी जनी वनी

दाही दिशा शोधुनी झाल्या
नाही सापडे माग
कसे रुसले कवणा ठाऊक
माझ्या नशिबी भोग

विरह जाळीतो रात्र शोधितो
उधाणलेल्या मनापरी
भयाण, खिन्न, उदास असा मी
दीन बापुडा खरोखरी

कुणा न दिसले कसे नवल हे
पडे मजला कोडं
कसे रुसले नाही कळले
मना लागले वेड

पाशी असता नाही कळले
महत्व मज काव्याचे
तुच्छ लेखिले तयापरी मी
गर्वात बोले वाचे

उदार होऊनी कोणीतरी मज
काव्य शोधुनी देईल का?
थकल्या मनास आधार देऊनी
आनंद कोणी देईल का?

...........डी सिताराम

दत्ता म्हणे

प्रभु तुझी माया न कळे कवणा।
व्यापक विचक्षणा दाखविशी।।
जरी तु व्यापिले सकळ जगत।
असे गुणातित रुप तुझे।।
साऱ्या जगताचा तुची बा विसावा।
घडे बद्ध जीवा आत्मबोध।।
दत्ता म्हणे जाणा भक्त तोची खरा।
मायेचा पसारा पार करी।।


सकल भ्रमले मायेत रमले।
मन भोगा गुंतले विषयांच्या।।
भाव भक्ति ठाव नाही जयापरी।
अधिनता परि वासनेच्या।।
संत वचनांशी वावडे तयाशी।
नसे तयापाशी नारायण।।
दत्ता म्हणे व्हारे सावध सावध।
करा आत्मबोध गुरुपाशी।।


...........डी सिताराम