शनिवार, २१ मे, २०११

मनाचा निग्रह

ज्यांस आपल्या मनावर विजय प्राप्त करावययाचा असेल, त्याने आसक्ति व परिग्रहाचा त्याग करुन संन्यासी वृत्ती ठेवावी व एकांतात राहुन त्याने जेवण व निद्रा अल्पशी ( परिमित ) घ्यावी. पवित्र आणि सपाट जमिनीवर आसन टाकुन स्वच्छ मनाने त्यावर बसुन ओमकारचा प्रथम मोठ्याने व नंतर मनातल्या मनात जप करावा. दृष्टी नासिग्रावर ठेऊन पुरक, कुंभक व रेचक द्वारा प्राण आणि अपानाची गति नियंत्रण करावी, मनातल्या चित्तवृत्ती जेथे जेथे जातील तेथ तेथुन विद्वान पुरुषाने त्यावृत्ती खेचुन ह्रदययात थोपवाव्यात. प्रथम असे करणे कठिण जाईल, पण सवयीने ते सहज साध्य होईल. कारण असाध्य ते साध्य, करिता सायास। कारण अभ्यास तुका म्हणे।। असा सतत अभ्यास करीत गेल्याने मनातील वृत्ती या मनातच थांबल्याचा अनुभव येईल. ज्याप्रमाणे इंधन संपल्यावर अग्नि आपोआपच विझुन जातो, त्याचप्रमाणे थोड्याच वेळात चित्त हे शान्त होऊन जाते. अशाप्रकारे मनातल्या वृत्ती या जेव्हा अत्यंत शान्त होतात, त्यावेळेला चित्त ब्रह्मानंदात विलिन होते अणि मग चित्तवृत्ती या परत उसळत नाहीत. असा साधक संसारातील सुख-दुःखाने विचलीत होत नाही. तो सदा आनंदी रहातो. कारण सर्व अनर्थाचे मुळ हे आपले मनच होय. या मनाच्या चंचलतेमुळे आपण संकटात सापडतो व आजचा आनंद हरवुन बसतो. करीता मनावर विजय प्राप्त करणे अपरिहार्य ठरते. त्यासाठी वरील साधना प्रत्येकाला सहजच करण्याजोगी आहे. पाहिजे फक्त मनाचा निश्चय.

                                    ......... डी सिताराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: