साधकाचे आचरण
ज्या भाग्यवान शिष्याने सद्गुरुंकडुन अनुग्रह घेतला आहे, त्याने प्राप्त झालेले नाम कोठल्याही परिस्थितीत सोडु नये. गुरुवचनावर विश्वास ठेवावा. गुरुंच्या भेटीसाठी अवश्य जावे. गुरु आपल्या घरी आल्यावर सत्संगाच्या मिषाने प्रवचनादी ठेवावे. श्रवणाचा लाभ घ्यावा. इतर बांधवांना गुरुंचे दर्शन उपलब्ध करुन द्यावे. त्यात देखावा, वरवरपणा किंवा दांभिकपणा नसावा. स्वभाव नम्र ठेवावा. गुरुंचे प्रदर्शन करु नये. किंवा, गुरुंना चमत्काराच्या वलयात अडकवु नये. माझा गुरु खुप मोठा व श्रेष्ठ आहे, असे म्हणुन त्यांना लहान करु नये. कारण गुरु हे अद्वैत भुमिकेवर असतात. त्यांच्या दृष्टीपुढे लहान-मोठा, आप-पर, मान-अपमान आदि भाव नसतात. गुरुंची प्रसिद्धि करु नये. काही शिष्यांना आपल्या गुरुंबद्दल अवास्तव सांगण्याची सवयच असते. त्यामुळे गुरु या पदाविषयी सामान्य जनतेच्या मनाविषयी संशय निर्माण होतात, या कारणासाठी असे करणे टाळावे. शिष्याने गुरुंजवळ घरादाराबद्दल रडगाणे न गाता त्यांच्या मार्गदर्शनाखाली नामजपात प्रगती करुन घ्यावी. काही शंका आल्या असतील तर त्यांच्याशी निःसंकोचपणे पत्रव्यवहार करावा. किंवा, प्रत्यक्ष भेटुन शंका निरसन करुन घ्याव्यात. प्रत्यक्ष गुरुंना शंका विचारल्यास शिष्य चटकन संशयरहित होतो. आपले अनुभव, किंवा, आपल्याला झालेल्या दिव्यदर्शनादि गोष्टी फक्त जाणकार साधकांजवळ किंवा आपल्या गुरुंजवळ सांगव्यात. ज्याला साधनादि, ध्यानयोगाचा अनुभव नाही अशा व्यक्तिंजवळ आपले अनुभव कधीही प्रगट करु नये. त्यायोगे अध्यात्ममार्गावरील आपली घसरण होते, व आपला मधुर भक्तिभाव नष्ट होतो. म्हणुनच दुर्जन, नास्तिक, संशयीत व्यक्तिंच्या संपर्कापासुन सदैव दूर रहावे. इतकेच नव्हे तर दांभिक भक्तांपासुनही चार पावले दूर रहावे.
दुसऱ्या गुरुंना भेटण्याचा योग आला तर अवश्य जावे. त्यांना मनोभावे वंदन करावे. त्यांचे देखील मार्गदर्शन घ्यावे. कारण आपल्या गुरुंचे गुरुत्व त्यांच्यात देखील असते, हे सदैव लक्षात ठेवावे. त्यांच्याजवळ आपल्या गुरुंचे दोष वा अवास्तव महत्व सांगु नये. किंवा, आपल्या गुरुंजवळ देखील दुसऱ्या सांप्रदायातील वा दुसऱ्या गुरुंचे दोष सांगु नये. कारण अशा प्रकारे शिष्य संशयात सापडतो. त्याचे मन क्षणोक्षणी चंचल बनते. असा शिष्य भित्रा वा पळपुटा बनतो. त्याचा गुरुंवरील विश्वास उडू लागतो.
आपला जो सांप्रदाय आहे तो आईप्रमाणे प्रेमळ, पित्याप्रमाणे ज्ञानी व सद्गुरुंप्रमाणे ब्रह्मज्ञानी असा आहे. म्हणुन ज्याप्रमाणे आपण आपल्या आई-वडिलांवर मनाप्रमाणे प्रेम करतो तसेच प्रेम आपण आपल्या सांप्रदायाबद्दल व आपल्या सद्गुरुंबद्दल ठेवावे. ज्याप्रमाणे आपण दुसऱ्यांच्या आई-वडिलांचा आदर करतो, त्यांच्याविषयी पूज्यभाव ठेवतो तसेच आपण दुसऱ्या सांप्रदायाबद्दल पूज्यभाव ठेवावा. यामुळे आपले मन गोंधळात पडत नाही व आपण संशयरहित होतो.
बरेच साधक दुसऱ्यांच्या सांप्रदायाला नावे ठेवतात, दुसऱ्या गुरुंबद्दल वाट्टेल ते बोलतात. हे सर्वथैव अयोग्यच आहे, हे सदैव लक्षात ठेवावे. दुसऱ्यांच्या सांप्रदायाबद्दल आपल्याला अस्वस्थ वा क्रोधित होण्याचे कारणच काय? त्यांना त्यांचे काम करु द्या. आपण आपले काम मात्र स्वच्छ, शुभ्र, सूर्यासारखे प्रकाशमान करा. आपण ज्ञानाने इतके परिपुर्ण बना की, सर्व सांप्रदाय हे आपल्याकडे ओढले जातील.
दुसऱ्यांचे अज्ञान पाहाण्यापेक्षा आपण ज्ञानी होण्याचा प्रयत्न करावा. आपण आपले दोष क्षीण करत जावे, दुसऱ्यांच्या सद्गुणांकडेच लक्ष ठेवावे. गुरुंच्या वचनांवर विश्वास ठेऊन वाटचाल चालु करावी. कोणाच्या निंदेने भडकुन जाऊ नये. ज्याठिकाणी आपल्या गुरुंचा अपमान होत असेल तर, आपण प्रतिकार जरुर करावा पण तो हिंसक नसावा. किंवा, ती जागा बदलावी. असो, आपण गुरुंच्या मार्गावरच वाटचाल चालु ठेवावी.
गुरुंचा मारग भला। त्यांच्या पाठी जाऊ चला।।
गुरुंचा आशीर्वाद घेऊ। त्यांचे नाम मुखी घेऊ।।
सारे परब्रह्म होऊ। कर्मी अकर्मता राहू।।
दत्ता म्हणे सोडा गाठी। गुरुपायी घाला मिठी।।
साधकाने प्रत्येक काम मनापासुन करावे. दुबळे बनु नये. मनाने कणखर बनावे. कोणाचा अन्याय सहन करु नये. स्वधर्मावर वाटचाल करावी. प्रत्येक कर्म हे विश्वासाने केल्यास ती गुरुसेवा होते व अशाच सेवेने गुरु संतुष्ट होतात. जर आपण कामात भ्रष्टाचार, खोटेपणा किंवा, स्वैराचार केला तर त्यायोगे सद्गुरु हे दुःखी, कष्टी होतील यात शंकाच नाही. म्हणुनच आपले आचार व विचार शुद्ध ठेवावेत
............डी सिताराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा