मंगळवार, २३ ऑगस्ट, २०११

अंतर्मनाची जागृती- एक चमत्कार...

अंतर्मनाची जागृती एक चमत्कार....

साधना...

साधकाने सुखासनात बसावे. दीर्घ श्वास घेऊन तो सोडुन द्यावा. कुंभक वगैरे करु नये. नंतर हळुहळु डोळे बंद करावे. लक्ष्य भ्रुमध्यावर किंवा, टाळुचे ( सहस्रधाराच्या ठिकाणी ) केंद्रित करा.. नंतर तुमच्या आवडत्या देवतेचे मोठ्याने नामस्मरण करा... उच्चार करत असतांना त्या आवाजातील कंप जाणा... नंतर सुमारे तीन चार मिनिटे मोठ्याने नामस्मरण करा... नंतर मात्र दोन नामस्मरणात गॅप ठेवा..पहिले नाम घेतल्यावर थोडे थांबा.....त्या नामाने जी लाट उसळली आहे ती शांत होऊ द्या.. नंतर त्या गॅपवरच लक्ष ठेवा. परत थोड्या वेळाने दुसरे नाम घ्या....अशा प्रकारे दोन नाम मधील गॅप वाढवत चला... व त्या गॅपकडेच अवधान असु द्या. असे करतांना तुम्हाला नकळत गॅप वाढवला गेल्याचा अनुभव येईल.. हिच अवस्था पकडुन ठेवा..कारण ह्या गॅप मधे आपले बाह्यमन हे स्थिर झालेले असते..मन हे एका विषयावरुन उठुन दुसऱ्या विषयांवर जात असतांना जो मधला कालखंड असतो, तेच अंतर्मनाचे स्वरुप होय.. तेच परमात्म्याचे स्वरुप होय.. असो..
दोन नामामधला गॅप वाढवा.. आणखी वाढवा.. उतावळे बनु नका.. विचारांना साक्षी ही राहु नका...आपोआप मन हे निर्विकार होईल... डोळ्यांवर अंमल झोपेचे झापडे येऊ लागेल.....पण झोपु नका... निग्रहाने जागे राहा... पुन्हा नाम घ्या ... गॅप वाढवा... व त्या गॅपकडे पाहा...
हळुहळु मनातील विचार शांत होतील... त्या गॅपमधील स्थिती अनुभवा....यावेळी मन हे सुक्ष्म होऊ लागेल.... भ्रुमध्यभागी किंवा, डोक्यात थोडासा जडपणाचा अनुभव येऊ लागेल...पण तो अल्पकाळच टिकेल... नंतर गोड संवेदना सर्व शरीर भर पसरल्याचा अनुभव येईल...यात अडकु नका...पुन्हा नाम गॅपकडे लक्ष्य ठेवा...गॅप वाढवा...
असे चालु असतांना उठावेसे वाटेल, आळस प्रगट होऊ लागेल...जांभया येऊ लागतील...पायाला रग येईल...भुकेची जाणिव होईल.... असले प्रकार होणे स्वाभाविकच आहे...कारण या साधनेत अल्पकाळ का होईना...बाह्यमनाचा नाश होऊ लागतो...स्वतःचा नाश होणे कोणाला आवडेल.... स्वताःचा नाश होत आहे हे पाहुन बाह्यमनच अशा प्रकारचा अडथळा निर्माण करते...
तुम्ही थांबु नका... पुन्हा नाम घ्या.... व गॅप वाढवा....
मित्रांनो... ही अतिशय दिव्य प्रकारची व प्रभावी साधना आहे. ..तुम्ही जेव्हा या साधनेतुन जागे व्हाल, तेव्हा तुम्हाला अतिशय दिव्य आनंदाचा अनुभव येऊ लागेल.... तुम्हाला या जगताविषयीचे गांभिर्य वाटणार नाही.... तुम्हाला खुपच प्रसन्न वाटु लागेल... आळस वा कंटाळा कोठल्या कोठे पळु गेल्याचा अनुभव येईल.....तुम्हाला खरे तर या साधनेतुन उठावेसेच वाटणार नाही... असे होणे म्हणजेच ही साधना योग्य मार्गाने होत असल्याचे गमक आहे....
या साधनेत जप....तप....प्राणायाम करण्याची गरज नाही...ज्ञानयोगादि योग करण्याची गरज नाही....ही साधना सर्व साधनांत श्रेष्ठ आहे.... गेल्या वीस वर्षापासुन ही साधना मी अजुनही करीत आहे.... व अंतर्मनाच्या अथांग सागरात डुबकी मारुन मी धन्य होत आहे... मी या साधनेसाठी श्रीराम-जयराम हा मंत्र म्हणतो...श्रीराम शब्द म्हटल्यावर गॅप ठेऊन पुढचा शब्द जयराम म्हणतो... मित्रांनो..... एकदा श्रीराम बोलल्यावर पुढचा जयराम हा कधी येतो ते आठवत नाही.... बऱ्याचदा येतच नाही....त्या मधल्या अवस्थेत दिव्य आनंदात मी मग्न असतो...तो आनंद शब्दातित व अवर्णनिय असा आहे...आताही हे लिहित असतांना माझ्या बाह्यसंज्ञा पुर्णपणे लोपल्या असुन अंतर्मनाच्या प्रवाहात मी डुंबुन गेलो आहे...डोळ्यांवाटे आनंदाश्रु वाहत आहेत व अंगभर सुखद रोमांच प्रगटले आहेत...सारा निसर्गच जणु या अवस्थेचे स्वागत करत आहे.....
मित्रांनो... ही साधना करत असतांना आपण आपला ताबा अंतर्मनाकडे देतो.... त्यावेळी आपली काळजी अंतर्मनच वाहते. आपल्या पोटा-पाण्याची, आपल्या परिवाराची काळजी अंतर्मनच करते... आपल्याला विशेष काही करावे लागत नाही....
कंपनीत एखादी  सिस्टिम कॅसकेड मध्ये टाकली की, ती आपोआपच कंट्रोल होत असते... त्यासाठी ऑपरेटरला विशेष काही करावे लागत नाही...
तुकोबाराय महाराज म्हणतात....
जेथे जातो तेथे, तु माझा सांगाती।
चालविशी हाती धरुनिया।।
हाच तो पांडुरंग, हाच तो परब्रह्म, अंतर्मनाच्या रुपाने तुमच्या आमच्या ह्रदयात वास करतो आहे... तोच साऱ्या विश्वात प्राणतत्वाने वास करीत आहे....
आपण जो जो विचार करतो तो आपल्या अंतर्मनात रेकॉर्ड होत असतो..त्यामुळे त्याच विचाराचे आऊटपुट आपल्याला मिळत असते...हे माझ्याने होणार नाही असे म्हणण्याचा अवकाश.... अंतर्मन तुम्हाला तसेच आऊटपुट देऊन ते तुमच्या हातुन कधीच होऊ देणार नाही अशी व्यवस्था करते....किंवा, मला नशापाणी केल्याशिवाय चैन पडत नाही,, त्याशिवाय झोप येत नाही असले विचार केल्यावर अंतर्मन तसेच फळ आपल्याला बहाल करत असते.... अमकी एखादी गोष्ट मी सहजच करुन दाखविन असे विश्वासाने म्हणण्याचा अवकाश..... मग ती गोष्ट कितीही अवघड असो....अंतर्मन ती गोष्ट सहजच करुन दाखवते.... हा अंतर्मनाचा चमत्कार होय.... अण्णा हजारेंनी जे विश्वासाने उपोषण चालवले आहे... त्या साऱ्या गोष्टीत त्यांचे अंतर्मनच त्यांच्या पाठीशी आहे... हा अंतर्मनाचा मोठ्ठा चमत्कार आपण व सारे जग पाहतच आहे...
आपण सतत नकारात्मकच विचार करत आलो आहोत व आपल्या मुलाबाळांनाही आपण असेच नकारात्मक पणेच वागवत आलो आहोत... हे तुझ्या हातुन होणारच नाही... तु अजुन बच्चा आहे.... असले धंदे करुन का तुझे पोट भरणार आहे का.... तु अगदी बावळटच आहे..... गधा आहेस.... तुला अक्कल नाही... उगाच मोठ्य मोठ्या गप्पा मारु नकोस...तुला कवडीचे ज्ञान नाही....उगाच बकवास करु नकोस......मुर्ख कुठला...तुला लायकी नाही.... मोठे झाल्यावर कळेल तुला....मुकाट्याने तुझा अभ्यास कर.... नको तो उपद्व्याप करु नको... त्यात तुला यश येणार नाही.... उगाच मोठेपणाचा आव आणु नकोस.....वगैरे बोलुन आपण आपल्या पाल्यास अगदी नकारात्मक विचारांचा असा नेभळट करुन टाकतो..... त्यांचे अंतर्मन आपण अंकुरीत होण्याच्या अगोदरच कोमजुन टाकतो.... मग त्याला तसेच आऊटपुट मिळाल्यास नवल नाही....
मित्रांनो... असे काही करु नका... मुलांना तेजस्वी व कणखर मनाचे घडवण्यात आपलाच सहभाग असला पाहिजे... कारण आपला पाल्य खुप काळ आपल्या संपर्कात असतो.... त्याला मनाचे समृद्ध व बलवान बनवा... त्याला देशाचे कणखर नागरीक बनवा... त्याचे अंतर्मन बलवान कसे होईल त्याकडे लक्ष्य द्या... आपल्या चिमुकल्याला अंतर्मन जागृतीच्या साधना करायला सांगा....जप तप तीर्थाटण आदिंपेक्षा अंतर्मन कसे जागृत होईल यांकडे लक्ष द्या... त्याच्या हातुन वाईट होणार नाही हे ही आवर्जुन पाहा.... या पेक्षा मी आणखी काय सांगणार... असो... मी ही जी साधना सांगितली आहे, ती अनुभव सिद्ध आहे... प्रत्येकाने करुन पाहा व दुसऱ्यालाही आवर्जुन सांगा.... तुम्हाला काही शंका असतील तर माझ्या मेल वर पाठवा.... अजुनही खुपच प्रभावी साधना आहेत पण तुर्तास ही साधना सांगुन मी तुमचा निरोप घेतो.... व यावरील लिखाण मी थांबवतो.... तुम्हाला या साधने द्वारे खुपच दिव्य अनुभव येवो... व तुमचे कल्याण होवो... मंगल होवो.. अशी मी अंतर्मनाजवळ माझ्या पांडुरंगाजवळ प्रार्थना करतो.. श्रीहरी... श्रीहरी....
माझा मेल आय डी..dsitaram27@yahoo.co.in  ( समाप्त )

        .......डी सिताराम

गुरुवार, १८ ऑगस्ट, २०११

अंतर्मनाची जागृती- एक चमत्कार...

अंतर्मन हे सर्वव्यापी आहे. हे यापुर्वी सांगितलेच आहे. काहीजण याला Cosmic  Electricity ( विश्वव्यापी विद्दुतशक्ती ) असेही म्हणतात.. अंतर्मन पुर्ण जागृत झाले तर ते सर्व फळ देण्यास समर्थ होते. असा योगी जगतावर अप्रतिहत सत्ता गाजवु शकतो... त्याची कुंडलिनि शक्ति जागृत झालेली असते... तो दुसऱ्याच्या मनातील विचार ओळखु शकतो.. किंवा आपले विचार दुसऱ्या व्यक्तित संक्रमण करु शकतो.. त्याच्या दिव्य चक्षुस दुरवरचे दिसु शकते... भुत-भविष्याचे त्याला ज्ञान होते... हस्तस्पर्शाने तो दुसऱ्या व्यक्तिस आनंदित करु शकतो.. अथवा त्यास दिव्यज्ञान देऊ शकतो...व त्याच्या मनात ईश्वरीय तत्व भरु शकतो...
अशा श्रेष्ठ क्रियेस योगशास्रात शक्तिपात असे म्हटले आहे... माझे सद्गुरु ब्रह्मलिन श्रीपाद बाबा हे असेच शक्तिपाताचे स्रोत होते... अध्यात्मिक अनुभुति ते तात्काळ ते शिष्याच्या ह्रदयात संक्रमित करीत असत.. नंतर हा शिष्य संशय रहित होऊन जात असे...त्यांचे अंतर्मन पुर्णपणे जागृत झालेले होते... ते विश्वस्वप्नातुन पुर्णपणे जागृत झालेले होते..त्यांनी दुसऱ्यांच्या संपत्तीवर कधीच डोळा ठेवला नाही..किंवा, शिष्यांकडुन पैसा गोळा करुन ट्रस्टही उभारला नाही.. ते साक्षात फिरती ज्ञानगंगा होते... त्यांच्या पश्चात त्यांच्या गादीवर महाड येथील कातिवडे ( बिरवाडी ) येथील सद्गुरु नारायण महाराज गायकवाड ह्यांनी अध्यात्मिक धुरा सांभाळली....ह्यांची ज्ञान पातळी अतिशय उच्चपातळीची होती...अशा जीवन्मुक्तांच्या सहवासात मला दीर्घकाळ रहावयास मिळाले हे माझे परम भाग्यच होय...त्यांच्या चरणांशी बसुन मला ज्ञानामृत प्राशन करायला मिळाले... त्यांच्या कृपेने मला क्षणभर का होईना जीवन्मुक्तिचा अनुभव आला.. व अंतर्मन जागृतीचा अनुभव घेतला.. असा अनुभव सर्वांनाच मिळावा अशी माझ्या मनाची तळमळ आहे... त्यासाठी ही उठाठेव आहे... दररोजचे कामकाज सांभाळत असतांना वेळ मिळेल तेव्हा रोज थोडेतरी लिहावे, असा संकल्प मनाशी धरुन आहे...त्यासाठी फेसबुकचे माध्यमाचा आधार घेतला आहे... हे अनुभव सिद्ध ज्ञान सर्वांनाच मिळावे अशी माझी मनिषा आहे....असो...
निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान व मुक्ताबाई तसेच.. नामदेव, तुकाराम, एकनाथ, गोरा कुंभार, सावता माळी, जनाबाई यांसारखी संत मंडळी म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे भुषणच होत... त्यांच्या भक्तियोगाने अध्यात्मिक शक्ति इतकी उंचावली होता की, ते या विश्वस्वप्नातुन जागे झाले होते....जीवन्मुक्त बनले होते.. त्यांच्या अंतर्मनावर त्यांचा पुर्ण ताबा होता.. त्यांची या विश्वावर अप्रतिहत सत्ता चालत होती...त्यांच्या हातुन त्यांना नकळत काही चमत्कारही झाले..पण त्यांचा अहंपणा किंवा, प्रसिद्धिचा हेतू नव्हता... प्रत्येक प्राणिमात्रांबद्दल त्यांच्या मनात कळकळ होती..त्यांचे मन विश्वाशी एकरुप झाले होते.... अशा जीवन्मुक्त संतांना माझे कोटी कोटी प्रणाम...असो...
आता पर्यंत आपण अंतर्मनाच्या प्रांगणात उभे राहुन त्याचा थोडासा अभ्यास केला....त्यास जाणुन घेण्याचा प्रयत्न केला...आता प्रत्यक्ष अंतर्मनाचेच द्वार उघडुन त्यात प्रवेश करायचा आहे...
माझे मित्र हे सात्विक विचाराचे असल्यामुळे त्यांना काही अनुभव सिद्ध साधना सांगाव्यात की ज्यायोगे त्यांचेही अंतर्मन हे क्षणभर का होईना जागृत व्हायला पाहिजे...असे माझ्या मनास वाटत आहे...अंतर्मन जागृतीचे अनेक उपाय विविध ग्रंथांमधुन सांगण्यात आले आहे...पण मी ज्या काही सांगणार आहे त्या साध्या, सोप्या, सहज करतो येण्याजोग्य व अनुभव सिद्ध अशाच आहेत... काही साधना गुरुकृपेने प्राप्त झाल्या आहेत... त्या पैकी माझ्या मित्रांनी एखादी साधना नियमित करुन स्वतःचे कल्याण करुन घ्यावे व दिव्य आनंदाचा लाभ घ्यावा...साधनेने अंतर्मनाचा स्पर्श झाल्याशिवाय रहाणार नाही. असे झाले तर त्यांचे सर्व जीवन मंगल तेजस्वी व आनंदमय झाल्याशिवाय रहाणार नाही.. अंतर्मनाची शक्ति अशा साधकाचे ऐहिक व पारमार्थिक कल्याणच करते....हे मी माझ्या स्वानुभवाने सांगतो............ श्रीहरी.. श्रीहरी,,,( क्रमशः )

मंगळवार, १६ ऑगस्ट, २०११

अंतर्मनाची जागृती- एक चमत्कार...

अंतर्मनाच्या जागृतीची अवस्था आपल्याला निरंजनपदाकडे घेऊन जाते. कारण यात जगताचे प्रतिबिंब नसते.. जगद्भ्रम नसतो... जगातील विकार नसतात....जगताचे प्रतिबिंब हे बाह्यमनात भासते.. त्यानुसार आपण जगात व्यवहार करत असतो.. भय, द्वेष, काम, क्रोध, लोभ आदि विकार हे बाह्यमनातच भसत असतात.. मित्रांनो.. हा विषय समजण्यास जरा कठिण आहे.. पण तो सोपा करुन सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. अंतर्मनाचे ज्ञान मिळवायचे.. ज्ञानाने अज्ञान निवृत्त करायचे व नंतर ज्ञानाचाही त्याग करायचा.. नाम घेता घेता आपण नामातित व्हायला पाहिजे... स्वतःला नामात विलिन करता यायला पाहिजे.. तिच अंतर्मनाची जागृती व तोच आत्मसाक्षात्कार..
नाथांच्या घरची उलटी खुण ही तिच आहे.. सद्गुरुंनी दिलेले नाम जपता जपता आपणच सद्गुरुंना गिळुन सद्गुरुपदी आरुढ व्हायला पाहिजे.. नंतर त्या पदाचाही त्याग केला पाहिजे.. हाच तो अंतर्मन जागृतीचा प्रवास.....मी जास्त भक्तियोगाबद्दल लिहिणार नाही.. कारण तो स्वतंत्र विषय आहे... त्याबद्दल मी कधीतरी लिहिनच... असो.. याठिकाणी त्याचा उल्लेख करण्याचे कारण की, अंतर्मन हे भक्तियोगाने कशा प्रकारे जागृत होते.. हे माझ्या मित्रांना सांगायचे होते... कारण स्वतःला ईश्वराचा महान भक्त म्हणवणारे देखील मायेत अडकततात व विषयसुखाच्या मागे लागुन कपाळमोक्ष करुन घेतात... आपल्याला असा वरकरणी देखावा नको.. त्यासाठी दर आषाढी कार्तिकीला पंढरपुरी जाणे नको.. व्रत वैकल्य, जप तप करणे नको... कष्टसाध्य हटयोग नको... वा प्राणायामादि अवघड क्रिया देखील नको.. कारण यांसाठी सद्गुरुंच्या संगतीची गरज असते.. हल्लीच्या फसवेगीरीच्या कालखंडात खरे सद्गुरु शोधुन काढणे अवघड असते... हा विषय एकदा का समजला म्हणजे आपल्या मनाची तयारी होईल.... व आपल्याला नक्की काय व कशासाठी करायचे याचा बोध पक्का होईल...
माझा एक मित्र आहे.. धार्मिक मनाचा, नियमित जप तप करणारा.. वारी करणारा.. असा.. पण तो नेहमी दुःखी कष्टी व उदास असायचा... त्याचे कारण त्याला विचारले असता... तो म्हणाला की, भगवंताचे मी इतके करतो पण त्याने मला कधीच चांगले दिवस दाखवले नाही.. पैसा हातात दिला नाही...त्याच्या दृष्टीने ईश्वराची उपासना ही केवळ ऐहिक उपभोगासाठी करायची... म्हणजे याचा अर्थ त्याला ईश्वर समजला नव्हता... व त्याच्या मनात असलेल्या अंतर्मनाच्या प्रचंड सामर्थ्याची त्याला जाणिव नव्हती.. नंतर त्याला मी ईश्वर प्रणिधानाची व अंतर्मन जागृतीची दीक्षा दिली.. यात माझा मोठेपणा बिलकुल नाही... मी कोणी साधुपुरुष देखील नाही.. हे माझ्या मित्रांना मी आताच सांगुन ठेवतो...असो.. यानंतर माझा तो मित्र शांत झाला.. त्याचे मन भरकटण्याचे थांबले... व तो ऐहिक दृष्टीने व पारमार्थिक दृष्टीने सुखी आहे.. तो म्हणतो की आज खरा ईश्वराचा अर्थ कळला आहे... इतके दिवस नुसता शब्दज्ञानी बनलो होतो... शब्दांचा खेळ...
मित्रांनो.. अंतर्मन जागृतीसाठी आपल्याला एका गोष्टीची सतत जाणिव ठेवायला पाहिजे, ती ही की, आपल्या मनातील पाच विकारांचा लय व्हायला पाहिजे. ते विकार म्हणजे.... संकल्प- विकल्प, मन, बुद्धि, चित्त, अहंकार, हा विषय चांगला समजण्यासाठी मी आपल्याला सर्वांच्या परिचयाचे उदाहरण सांगतो... मी ऑफिस मधुन दमुन थकुन घरी येतो. त्यावेळी मला गरमा गरम चहा घ्यावसा वाटतो.. माझ्या साऱ्या चित्तवृत्ती या चहाकडे लागलेल्या असतात. माझे मन चहाच्या संकल्पात रममाण होते.. कान स्वयंपाक घरातील आवाजाचा वेध घेऊ लागतात... माझी वृत्ती ही कानाच्या रुपाने स्वयंपाक घरात धाव घेते.. स्वयंपाक घरातुन चहा ठेवण्याचा आवाज येतो.. साखरेच्या डब्याचा व चहाच्या डब्याचा आवाज ऐकल्यावर माझी पक्की खात्री होते की चहा ठेवला गेला आहे... त्यामुळे माझे संकल्प विकल्प शांत होतात..... मनाची स्वयंपाक घरातील आवाजाकडे लक्ष देण्याची वृत्ती शांत झाली.. नंतर तो चहा थोड्या वेळाने प्रत्यक्ष हातात येतो त्यावेळी माझी बुद्धी शांत होते... व चहा घेतल्यावर मात्र माझा अहंकार देखील शांत होतो... व मला चहा प्यायल्यावर सुख वाटते मित्रांनो... आता विचार करा की माझे सुख चहाच्या कपबशीत आहे का.... नाही... कारण तसे असते तर मी दररोज चहा पितो.. तर मी सुखी व्हायला पाहिजे.. पण तसे होत नाही... कारण माझ्या चंचल चित्तवृत्ती जेव्हा शांत होतात त्याच वेळेस मला खरे सुख मिळते... हीच गोष्ट विषयसुखाबाबत समजावी.... चहाचे एक सौम्य उदाहरण दिले आहे....या चंचल वृत्ती जेव्हा शांत होतात त्यावेळी माझ्या बहिर्मनास अंतर्मनाचा स्पर्श झालेला असतो... आता असे अंतर्मन आपल्याला हवे त्या वेळेला जागृत करता आले तर...अर्थात् कोणाचीही मदत न घेता.. काय मजा येईल नाही का... खुपच मजेचा विषय आहे हा....
आणखी एक उदाहरण... जेव्हा आपल्याला गाढ- प्रगाढ अशी झोप लागते त्यावेळी आपले मनातील सर्व विषय चित्तात लय पावतात. त्यावेळी चित्त व अहंकार देखील लयास जातो...कारण या वेळी मी कोणी मोठा माणुस नसतो.. साहेब नसतो.. अशा गाढ झोपेत पुरुष पुरुष नसतो, स्री ही स्री नसते, सन्याशी संन्याशी नसतो, ब्रह्मचारी ब्रह्मचारी नसतो... कारण की गाढ झोपेत एकही विषय नसतो... गाढ झोपेत संकल्प विकल्प थांबले आहेत, चित्ताचा वेध घेण्याचे थांबले आहे, बुद्धिचा विचार करण्याचे थांबले आहे.... त्यावेळी अहंकारही आपोआपच लयाला जातो...झोपेतुन उठल्यावर किती ताजेतवाने वाटते.....याचा अर्थ असा होतो की, समोर एकही विषय नसतांना खरे सुख मिळते... .याचाच अर्थ असा की, विषयांत सुख नसते... ते असते सुखाचे प्रतिबिंब... एक मृगजळ....ज्याचे अंतर्मन साधनेने जागृत झाले आहे, तो साधक अशा सुखासाठी त्याला सुखाच्या प्रतिबिंबाकडे धावण्याची गरजच नसते... ( क्रमशः )

                                     .....डी सिताराम

सोमवार, १५ ऑगस्ट, २०११

अंतर्मनाची जागृती- एक चमत्कार...

या ठिकाणी माझा एक अनुभव सांगणे वावगे होणार नाही असे मला वाटते...याचे कारण असे की, माझ्या सारख्या यत्किंचित माणसाला असे अनुभव येऊ शकतात तर जो कोणी भाग्यवान साधक अध्यात्मात अमळ प्रगत असेल तर त्याला याहुनही जास्त प्रमाणात अनुभव नाही का येऊ शकणार.....
माझा एक अनुभव....
लहानपणी आमची गरीबीची परिस्थिती होती. अत्यंत हालाखीत बालपण गेले. वडिलांनी आम्हाला वाचनाची गोडी लावली. आम्ही खड्या आवाजात कविता व पाढे म्हणत असु. आई विठ्ठलाची भक्ति करत असे. आई बरोबर मी पण विठ्ठल मंदिरात जात असे व विठ्ठलास नमस्कार करत असे. विठ्ठलास प्रदक्षिणा मारत असे. त्या बालवयात माझे व विठ्ठलाचे काहीतरी नाते आहे, असे मला सतत वाटत असे. विठ्ठलाची मुर्ति मी डोळे भरुन पाहत असे. त्यावेळी मला काळ वेळाचे भान राहत नसे. हा कालखंड माझ्या विठ्ठलाच्या अनिवार ओढीचा होता. मंदीरात जेव्हा हरिपाठ होत असे त्यावेळी माझे भान हरपुन जात असे. टाळ मृदुंगाचा ध्वनी मला बेहोष करत असे व मी तहानभुक विसरुन जात असे. मोठेपणी मला कळाले की, मी लहानपणीच नाद समाधीचा अनुभव घेतला होता.
मी लहान असतांनाची गोष्ट, माझ्या मित्राचा नवस फेडण्यासाठी आम्ही पातोंड्याहुन बैलगाडीने चाळीसगांव जवळील पाटणादेवीस निघालो होतो. पाच सहा बैलगाड्या होत्या. मी माझ्या आई सोबत होतो. रात्रीची वेळ होती. आकाशात पुर्णचंद्र होता. खुपच छान वातावरण होते. सगळीकडे पिठुर चांदणे पडले होते. आकाशात चांदण्या चमकत होत्या. बैलांच्या गळ्यातील घुंगरांचा आवाज वातावरण प्रसन्न करत होता. मी दिग्मुढ होऊन तो देखावा पाहत होतो. मीच सगळीकडे आहे असे वाटु लागले होते. सारे वातावरण मीच बनलो आहे, असा अनुभव मी घेत होतो. आकाशातील चंद्र तारे व आसमंतात पसरलेला नाद सारे काही मीच बनलो आहे अशा अनुभवात मी रमुन गेलो, हळुहळु माझी जाणिव हरपत होती व मन दिव्य आनंदाचा वेध घऊ लागले होते. माझ्या सकल संज्ञा हरपल्या व मी निचेष्ट पडलो. कितीतरी वेळ मी त्या तंद्रित होतो कोणास ठाऊक पण ज्यावेळी मी डोळे उघडले, त्यावेळी आम्ही पाटण्याच्या डोंगराजवळ आलो होतो. चंद्र पश्चिमेला कलला होता. मन माझे अतिशय हलके हलके झाले होते.. डोळ्यांसमोर एकतत्वाच्या लहरी दिसत होत्या... सारे काही एकच आहे....अशा अनुभवात मी रमुन गेलो... हा माझा पहिला साक्षात्कार असावा. कारण या घटनेनंतर मी बऱ्याचदा नकळत या आनंदात रमुन जात असे. त्यावेळी मला काळ वेळाचे भान रहात नसे. एखादी गोष्ट हातुन होण्यास विलंब लागत असे. आम्ही भावंडं जेव्हा कंदिलाच्या उजेडात अभ्यास करत असु त्यावेळी तो धुर ओकणारा कंदिल, माझा भाऊ व आमच्यावर पहारा करत असलेले माझे पिताश्री व मी हे जणू काही एकाच वस्तुचे बनले आहोत आणि ती वस्तु माझ्या ह्रदयात वसली आहे असे मला सारखे वाटे व मन त्या एकात्ममतेचा अनुभव घेण्यास रमुन जात असे. अशावेळी माझे अभ्यासात लक्ष नाही म्हणुन मी वडिलांच्या हातचा मार देखील भरपुर वेळेस खाल्ला आहे. असो......( क्रमशः )
                                                     ...............डी सिताराम

आपले अंतर्मन- एक चमत्कार

अंतर्मन हेच परब्रह्म आहे. ज्ञानदेवांचा बापरखुमादेवीवरु, तुकोबा नाम्याचा लाडका विठ्ठल म्हणजे अंतर्मनच होय. ज्ञानदेवादि भावंडे जन्मतःच मुक्त होती. त्यांचे अंतर्मन जन्मतःच जागृत झाले होते. त्यांच्या बाह्यसंज्ञा, बहिर्मनातील घडामोडी ह्या लुप्त झाल्या होत्या. त्यामुळे जगातील जाचक दुःखे बाधु शकले नाहीत. लोकनिंदा त्यांनी हसत हसत सहन केली. ज्ञानदेवांच्या हातुन काही अतर्क्य चमत्कार घडले, पण चे चमत्कार त्या त्या प्रसंगानुरुपच होते. त्यांनी निसर्ग नियमांविरुद्ध ढवळा ढवळ केली नाही.
अशा संतांनी हवेतुन वस्तु, अंगारा आदि भौतिक वस्तु काढुन लोकांना त्यांच्या नादी लावले नाही, किंवा चमत्कार त्यांनी प्रसिद्धिसाठीही केले नाहीत. कारण ते विश्वस्वप्नातुन जागे झालेले महात्मे होते. त्यांनी स्वतःला संत किंवा, अवतारी म्हणवुनही घेतले नाही. उलट ते संतांच्या दासांचाही दास म्हणवुन घेत. हे आताच्या स्वतःला संत, महाराज म्हणवणाऱ्या बाबांनी लक्षात घेतले पाहीजे. मित्रांनो, आपण डोळे उघडे ठेऊन वावरलो तर अशा नकली बाबांचे काही चालणार नाही. असो....संतांचे चमत्कार हे जनजागृतीसाठीच होते... मोठेपणा मिरवण्यासाठी नव्हते.. हे लक्षात ठेवले पाहिजे...त्यांना जगात अशक्य काहीच नव्हते.. साऱ्या जगावर त्यांची अप्रतिहत सत्ता चालत होती...कारण त्यांचे अंतर्मन हे पुर्णपणे जागृत झालेले होते. चारी मुक्ति, मोक्ष, साक्षात्कार आदि शब्द हे अंतर्मनालाच उद्देशुन आहेत. ज्यावेळी आपल्या बाह्यसंज्ञा क्षणभर का होईना बंद पडतात, किंवा, आपल्याला देहभान किंवा, विश्वभान नसते तितका वेळ अंतर्मन आपल्या बाह्य मनाचा व शरीराचा ताबा घेते. प्रत्येक जण व्यवहारात अशी स्थिती अल्पकाळ का होईना अनुभवत असतो... आपले आवडते गाणे ऐकत असतांना नकळत तंद्रावस्था लागते, त्यावेळी सभोवतालचा विसर पडतो. नंतर आपले मन खुपच आनंदित झाल्याचा अनुभव येतो... हा आनंद त्या गाण्यात नसुन तुमचे अंतर्मन क्षणभर बहिर्मनाला स्पर्श करुन जाते त्याचा तो आनंद असतो..
लहानपणी अशी तंद्रावस्था मी खुपच अनुभवली आहे.. एखादे नाटक पाहत असतांना, किंवा हरिजागर वा हरिकीर्तन ऐकत असतांना मला नकळत तंद्रावस्था लागत असे... व मला बाह्य जगाचा अत्यंत विसर पडत असे.. अशा वेळी माझे बाह्य मन पुर्ण लुप्त होई व हळु हळु माझी स्वतःची जाणीव देखील नाहिशी होत असे....माझ्या सारखेच सर्वांनाच होत असेल असे समजुन मी त्या अवस्थेकडे त्यावेळी दुर्लक्ष केले. पण तद्नंतर मात्र माझा या विषयांवरचा अभ्यास वाढला...त्यावेळी लक्षात आले की, ते बालपणीचे क्षण माझे अंतर्मन जागृतीचेच होते. मोठेपणी मात्र सदुगुरुंनी सांगितल्या प्रमाणे साधना घडल्या... त्या काळात आलेले अनुभव मात्र खुपच लोक विलक्षण होते... अर्थात ही स्थिती मला आजही येते.... काही वेळी मी जगाचेच काय पण माझेही भान हरपुन जाते... अशावेळी माझे मन अत्यंत दिव्य आनंदाचा वेध घेते.. ही सारी गुरु माऊलींचीच कृपा होय.... ....( क्रमशः )

                                                                                         ......डी सिताराम

मनी भास होता....

मनी भास होता मीच थोर आहे
मनी गर्व होता मीच सर्व आहे ।। धृ ।।
अहंकाराला ही पोशियेले भारी
काम वासनांनी  केले जग वैरी
भीती मरणाची दाटुनिया आहे
मनी गर्व होता मीच सर्व आहे ।।1।।
आयुष्य वायाची दवडले भारी
नाही पुण्य गाठी जोडले पदरी
श्वान सुकुराचे जीवन हे आहे
मनी गर्व होता मीच सर्व आहे ।।2।।
गर्व चुर्र झाला आज जाग आली
आई वडलांची पुण्याई संपली
काळ विकराळ दटाऊनी पाहे
मनी गर्व होता मीच सर्व आहे ।।3।।

           ....डी सिताराम

आपले अंतर्मन- एक चमत्कार

आज आपण स्वतःला आधुनिक व सुसंस्कृत समजू शकतो, परंतु सुखी मात्र मुळीच समजु शकत नाही. झोपेच्या गोळ्याशिवाय आपण झोपु शकत नाही, जुलाबाच्या गोळ्यांशिवाय आपले पोट सोफ होत नाही, टॉनिकशिवाय आपल्या अंगात शक्ति टिकवु शकत नाही. वेदनाशामक व गुंगीच्या औषधाच्या सेवनाचे प्रमाण वाढत चालले आहे. संपत्तिच्या लालसेने आपण पाषाण ह्रदयी व हावरट बनत चाललो आहोत.शारिरिक व मानसिक आजाराचे आपण कळत नकळत शिकार होत चाललो आहोत. मानसिक दृष्ट्या कमकुवत व अपंग बनत चाललो आहोत. यातुन सावरायलाच हवे. पण सावरणार कोण.. हा मोठा यक्षप्रश्न आहे.. जो तो मानसिक दौर्बल्याची शिकार होत चालला आहे. या साऱ्यातुन सुटका करण्याची शक्ती बाहेर नसुन ती तुमच्या आमच्या शरीरातच आहे... आपल्या मनातच आहे.. पण आपण कस्तुरीमृगाप्रमाणे बाहेरच कस्तुरीचा वास शोधत आहोत..
आपले अंतर्मनच ती शक्ति आहे. या शक्तिचा प्रभाव कायिक व मानसिक पडतो. बाह्यमन एक टक्का धरलो तर अंतर्मन हो आठ टक्का धरायला पाहिजे. पाण्यात हिमशिखराचे टोक दिसते पण खरा हिमपर्वत हा पाण्यात असतो. हिमटोक हे बाह्यमन धरले तर अंतर्मन हे हिमपर्वताप्रमाणे आहे..
कोणी एक थकला भागला जीव उन्हाने हैराण झाला होता. भर दुपारची वेळ. हा एका झाडाखाली विसावला. त्याच्या मनात विचार आला.. अहाहा किती थंडगार छाया आहे ही. या ठिकाणी थंडगार पाणी असते तर किती छान झाले असते.. विचार येण्याचा अवकाश.. त्याच्यासमोर थंडगार पाणी हजर झाले.. तो चपापला.. पण ते पाणी प्याला. त्याच्या मनात विचार आला की आता खाण्याचे ताट समोर असते तर किती बरे झाले असते.. विचार करायचा अवकाश. पक्वन्नाचे ताट त्याच्यासमोर हजर झाले.. मित्रांनो ही गोष्ट सर्वांनाच माहिती असेलच. ते झाड कल्पवृक्षाचे होते. मागाल तो पदार्थ तयार करण्याचे त्याच्यात सामर्थ होते. भगवंताने अस्साच कल्पवृक्ष प्रत्येकाजवळ दिलेला आहे. फक्त त्यास आपण ओळखत नाही. ही दुर्दैवाची गोष्ट आहे.. तो कल्पवृक्ष म्हणजेच आपले अंतर्मन होय.. होय अंतर्मनच तो कल्पवृक्ष आहे... हा विषय प्रत्येक शाळांमधुन लहानपणापासुनच शिकवला गेला पाहिजे. असे माझे स्वतःचे मत आहे.. त्यामुळे प्रत्येक जण या अंतर्मनाचे पुजारी बनतील व साहजिकच हिंसा, चोरी यांसारखे दुकर्म तरी टाळले जाईल.. पण आपल्या शिक्षण मंत्र्यांना कधी जाग येईल... आपले दुर्दैवच दुसरे काय.. पण पालकांनी ह्या विषयावर सखोल अभ्यास करुन आपल्या पाल्यांना हे लवकरात लवकर शिकवावे... ही माझी नम्र विनंती आहे.. त्यामुळे पाल्य हा सुजाण बनुन त्याच्या हातुन यौन अपराध होणार नाहीत व त्याची उर्जा नष्ट होणार नाही. पुढची पिढी तेजस्वी होईल... सुजाण पालकांनी हा विषय जास्तीत जास्त पालकांपर्यंत पोचवण्याची जबाबदारी घेतली पाहीजे.. असो....( क्रमशः )

                                                             ...डी सिताराम

शुक्रवार, ५ ऑगस्ट, २०११

द्वार खडा मै तेरे....

द्वार खडा मै जोगी बनके, प्रभु दर्शन देई रे।
आयो शरण तेरे पगमें, राख लाज हमारी रे।।
कन्हैय्या बनके माखन खाया, करके लीला दिखायों रे।
पगमे घुंगरू बांधके मीरा, सारा संसार नाची रे।।
सारे संतन को रूप दिखाया, प्रभु मनमें समाया रे।
काम क्रोध की बाधा नही, अहंकार नाश किया रे।।
कहे दत्ताजी कृपा करो, मैं लागत हु चरणो रे।
मेरा भगवान सामने खडा, सगुण रूप दिखायो रे।।
                                         
                                         ......डी सिताराम

सच्चा रास्ता..


सच्चा रास्ता...

 मुरत की पुजा सब करे, उसमें नहीं रे जान।
दीन दुःखी की सेवा करे, वहीं धर्म पहचान।।
मेंरा धरम सबसे बडा, छोटा तुम्हारा धरम।
धरम पर क्यों लढाई खेले, कर इंसान शरम।।
जगमें कोई छोटा नही, नही कोई रे महान।
एक ईश के बच्चे सारे, उस आगे सब समान।।
फिर क्यों झगडा लफडा करते, क्यों बहाते खुन।
अरे मानव दुश्मनी छोडो, तुम्हे प्रभुकी आन।।
सारे मानव भाई भाई, नही करे अवमान।
इस धरती पर जनम लिया, न करे व्यर्थ अभिमान।।
ज्ञान विज्ञान सिख ले बंदे, कर कोई मेहनत।
सच्चे रास्ते को छोडो ना प्यारे, है उसमें हित।।
कहे दत्ताजी सुनो मेरे भाई, याद रखो सारी बात।
ईश्वर तुम्हारा भला करे, खुल जाए किस्मत।।

......डी सिताराम


एक बापुडा....


एक बापुडा

एक बापुडा उन्हात भटकत, असाच चालत राहीला
पायात साधे नसे वहाणही, होरपळतचि चालला
असंख्य दुःखे गिळुनी मनाशी, ओठांती पुटपुटतसे
केविलवाण्या नजरेने, भिरिभिरी साऱ्या जगा पहातसे
बहु दिवसांचा उपाशी जीव हा, पोट पाठी भिडलेले
माशा उडती डोक्यावरती, केस असेच वाढलेले
कोणीही नसे तयास वाली, सगे सोयरे कोणी नसे
पुत्र-सुनांनी बाहेर काढुनी, जनात त्याचे केले हसे
कुठे निवारा नसे तयाशी, फुटपाथही भरलेला
कोठे नीजे झाडाखालती, तर कोठे प्रिय दगड शिला
सर्वच जण बघती त्याशी, तिरस्कारीत नजरेने
कोणी दुष्ट शिव्याही देती, दुर सारती नेटाने
माय बापहो खायास द्याहो, असे ओरडी करुणेने
तरणी, ताठी, जवान, पोरे, पाही त्यास गमतीने
पण कोणाही मनास पाझर फुटेना, थोर थट्टा केली
पाहुनी तया नाजुक ठाया, माणुसकीही गहिवरली