एक बापुडा
एक बापुडा उन्हात भटकत, असाच चालत राहीला
पायात साधे नसे वहाणही, होरपळतचि चाललाअसंख्य दुःखे गिळुनी मनाशी, ओठांती पुटपुटतसे
केविलवाण्या नजरेने, भिरिभिरी साऱ्या जगा पहातसे
बहु दिवसांचा उपाशी जीव हा, पोट पाठी भिडलेले
माशा उडती डोक्यावरती, केस असेच वाढलेले
कोणीही नसे तयास वाली, सगे सोयरे कोणी नसे
पुत्र-सुनांनी बाहेर काढुनी, जनात त्याचे केले हसे
कुठे निवारा नसे तयाशी, फुटपाथही भरलेला
कोठे नीजे झाडाखालती, तर कोठे प्रिय दगड शिला
सर्वच जण बघती त्याशी, तिरस्कारीत नजरेने
कोणी दुष्ट शिव्याही देती, दुर सारती नेटाने
माय बापहो खायास द्याहो, असे ओरडी करुणेने
तरणी, ताठी, जवान, पोरे, पाही त्यास गमतीने
पण कोणाही मनास पाझर फुटेना, थोर थट्टा केली
पाहुनी तया नाजुक ठाया, माणुसकीही गहिवरली
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा