रविवार, ११ सप्टेंबर, २०११

प्रकट चिंतनः-

माझा हा जन्म एकच नाही.. यापुर्वी मी अनेक वेळा जन्म घेऊन मृत्यु पावलो आहे.. असंख्य वेळा मी जन्मबंधनात सापडलो आहे.. माझा देह अहंकार पुष्ट करुन मी जगलो आहे...विषय सुखात मी अज्ञानाने लोळत पडलो आहे...काही वेळा क्षुद्र योनीतही मला जन्म घ्यावा लागला.. कधी किटक.. तर कधी पशु पक्ष्यांच्या जन्मात गेलो.... त्या जन्मात मी अनेक दुःखे भोगली.... प्रत्येक जन्मात मी माझ्या मीपणाला जोपासत वाटचाल केली...सोबत संसाराचे वासनामय बीज घेऊन जन्माला येत गेलो.... चांगल्या-वाईट कर्माचे गाठोडे सोबत आणले...कर्माशय प्रत्येक जन्मात वाढवत नेला... आत्मपौढीने जीवन जगत गेलो... हातुन काहीवेळेस दुष्कर्मही घडले.... निरपराध जीवांचा जाणिव पुर्वक उपहास केला.. त्यामुळे या जन्मात अनेक आपत्तींना तोंड देणे भाग पडले. अनेक संकटे दत्त म्हणुन उभे राहीले. पुर्व जन्मांतील काही पुण्याईचा भाग होता म्हणुन या जन्मात ज्ञानार्जन झाले. सद्गुरुंची भेट झाली. संसारभ्रांती कळुन आली.. ज्ञानाने वैराग्य संपन्न होऊन गतजन्मांतील कर्माशये नष्ट करु लागलो.... पांडुरंगाची उपासना घडु लागली... मनावरील वाईट संस्कार विषयी काठिण्य नष्ट होऊ लागले. आता या जन्मातच सर्व कर्माशये व प्राक्तन संपवुन जन्म- मरणाच्या चक्रातुन मुक्त व्हायचे आहे... पुन्हा पुन्हा गर्भवास नको.. नको त्या यातना व नको संसारातील दाहक चटके.... नको वासनांचा प्रवास.... हे प्रभो... मला सर्व अधःपातापासुन सावरण्याचे बळ दे... माझे सर्व कर्माशये नष्ट करण्यासाठी मनास सामर्थ्य दे.... शोकाकुल झालेल्या माझ्या मनास अखंड शांति दे... हे प्रभो... या जन्मात सर्व संसार बंधने तोडुन जीवन्मुक्त होईल असे आत्मज्ञान जागव.... सद्गुरुकृपेने माझा हा जन्म शेवटचा होईल असे कर....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: