आधुनिक पौराणिक हिंदू धर्मात ज्या पाच देवतांची पूजा प्रामुख्याने रुढ आणि लोकप्रिय झाली , त्यात गणपतीचे स्थान फार महत्त्वाचे आहे . त्याची पूजा विघ्नहर्ता या नात्याने इतर कोणत्याही देवतांच्या उपासनेत प्रारंभी केली जाते , यावरून हे सहज लक्षात येते .
जीवनातील यशाचे मूर्त प्रतिक म्हणजे श्रीगणेश . शिवगणांचा अधिपती या अर्थाने या देवाचे गणपती हे नाव अन्वर्थक आहे . गणपतीविषयीच्या प्रमुख संस्कृत ग्रंथात गणेशतापिनी किंवा वरदा पूर्व आणि उत्तर तापिनी उपनिषदे , गणेश उपनिषद अथवा गणपती अथर्वशीर्ष आणि हेरम्ब उपनिषद , तसेच शिवपुराण , स्कन्दपुराण , गणेशपुराण , मुद्गलपुराण , ब्रह्मवैवर्त पुराणातील गणेश खंड , भविष्य पुराणातील ब्राह्म खंड यांचा निर्देश करावा लागेल . गणपतीची पूजा किती प्राचीन आहे याबद्दल नक्की निर्णय देणे कठीण आहे . वैदिक युगामध्ये सुमारे आठ हजार वर्षांपूर्वी गणपतीची कल्पना साधारणपणे मिळते . गणपती हे नाव वैदिक वाङ्मयात निर्दिष्ट आहे . त्यापूर्वी जी द्रविड संस्कृती भारतात होती , त्या संस्कृतीची देवता गणपती होती . ती आर्यांनी पुढे आपली मानली , असे एक मत आहे . काही असले तरी सुमारे २००० वर्षांपासून गणपतीची पूजा भारतात चालत आली असावी . पण आता गणपतीचा जो आकार आपण पाहतो तोच पूर्वी होता , असे म्हणता येणे कठीण आहे . आपल्या देशात सर्व प्रचलित संप्रदायांचा उगम ऋग्वेदात शोधण्याची प्रथा आहे . यादृष्टीने वेद काळात गणपतीचा उल्लेख कोठे आहे , वैदीक ऋषी गणपतीची पूजा करीत होते का त्याचा शोध घ्यायला हवा .
वेदकालीन गणपतीनिर्देश
गणपती या शब्दाचा स्पष्ट उल्लेख ज्यामध्ये आहे , असे ऋग्वेदाचे प्रसिद्ध सूक्त म्हणजे , गणानां त्वा गणपती हवामहे ... असे आरंभ असलेले दुसऱ्या मंडलातील २३ वे , १९ ऋचा असलेले सूक्त . या सूक्ताचे ऋषी गृत्समद , भार्गव , शौनक आणि १ , ५ , ९ , ११ , १७ , १९ या ऋचांची देवता बृहस्पती तर उरलेल्या ऋचांची देवता बृहस्पती असा स्पष्ट निर्देश संहितेत आहे . म्हणजे बृहस्पती या देवतेची स्तुती गात असताना , त्या देवाचा उल्लेख गणपती असा केलेला दिसतो . म्हणजे ऋग्वेद काळात गणपतीची बृहस्पती किंवा ब्रह्मणस्पति रुपाने पूजा होत होती , असे अनुमान करावे लागेल .
ऋग्वेदात बृहस्पती ही ज्ञानाची देवता असून ११ सुक्तात त्याला स्तुतिसुमने वाहिलेली आहेत . त्याच्याबरोबर नेहमी गाणारे गण असतात . म्हणून त्याला गणांचा पती म्हणतात . वैदिक वाङ्मयात गण हा शब्द लोकांच्या , देवतांच्या किंवा मंत्राच्या समूहाला उद्देशून वापरलेला दिसतो .
गणपती या शब्दाचा सामान्य नामासारखा उपयोग केलेला दिसतो . गणांचे आणि समूहाचे अनेक नायक असत , त्यांना गणपती म्हणत . विनायकांची मात्र दुष्ट दैवत म्हणून प्रथम प्रसिद्धी असावी . गणपती आणि विनायक संख्येने पुष्कळ होते . ते सर्वत्र संचार करीत . विनायक रुद्राप्रमाणे स्वभावाने भयंकर असला तरी त्याला संतुष्ट केले असता , तो सुखकर्ता होऊ शकतो . ख्रिस्ताब्दापूर्वीच विनायक हा श्रद्धाविषय झाला असावा , परंतु , गणपती आणि विनायक म्हणजे एकच ही कल्पना मात्र फार कालांतराने रुढ झाली असावी .
गणपती - उपनिषदे
जुन्या उपनिषदांची समाजातील प्रतिष्ठा लक्षात घेऊन गणपती संप्रदायाच्या अनुयायांनीही गणपती बद्दल जुन्या उपनिषदांच्या धर्तीवर उपनिषदे रचली आणि आपल्या संप्रदायाला श्रृतिमान्यता आहे , असे दाखवण्याचा प्रयत्न केला . याच दृष्टीने अत्यंत प्रसिद्ध अशा सूर्य गायत्रीप्रमाणे गणेशगायत्रीची रचना झाली . गणेशाची हजार , १०८ आणि १२ नावे कल्पिण्यात आली आहेत . गणपतीचे अथर्वशीर्ष रचण्यात आले . पूजेचे तंत्र तयार झाले . मानसपूजा , तेत्रे रचण्याच आली . गणपतीच्या पूजेने आणि आराधनाने मिळणाऱ्या फलांची यादी प्रस्तृत करण्यात आली . तंत्रशास्त्राचा आणि योगमार्गाचा अवलंब करून , गणपतीचे तांत्रिक स्वरुप , बीजमंत्र तसेच मालामंत्र , सहाअक्षरी , अष्टाक्षरी वगैरे मंत्र तयार करण्यात आले . विनायक यंत्र आणि गणेशयाग यांचीही कल्पना नक्की करण्यात आली . या सर्व प्रचलित लोकश्रद्धेला प्रतिष्ठा देण्यासाठी आथर्वण ऋषींनी जुन्या नव्यांची सांगड घालणारी नवीन उपनिषदे रचली . त्यात मुळातील एकात्मवाद कायम ठेवला आणि सगुण व निर्गुण स्वरुपांचा सुंदर संगम या उपनिषदात वर्णिला . अनेकी सदा एक देवासी पाहे ... या तत्त्वाप्रमाणे गणपतीच्या सगुण रुपाचे उदात्तीकरण ओमकाररुपात आणि बर्यायात परब्रह्मरुपात करण्याचा प्रयत्न या उपनिषदात केलेला आढळतो . त्यामुळे गणपतीमूर्तीवरही अनेक पारमार्थिक रुपके आरोपित करण्यात आलेली दिसतात . गणपतीच्या स्तुतीपर चार उपनिषदे आहेत . ती म्हणजे गणपत्युपनिषद ( याचेच सर्वश्रृत नाव गणपती अथर्वशीर्ष असे आहे .) हेरम्बोपनिषद आणि वरदा पूर्व आणि उत्तरतापिनी उपनिषदे . वरद - पूर्वोत्तर उपनिषदांचेच दुसरे नाव गणेश पूर्वोत्तरतापिनी असे आहे .
गणपती अथर्वशीर्षाचा रचयिता गणक नावाचा ऋषि आहे . हेरब्म उपनिषद शंकरांनी गौरीला सांगितले . तर वरदा पूर्व आणि उत्तरतापिनी प्रजापति , याज्ञवल्क्य आणि रुद्र यांनी निवेदन केली आहे . ही सर्व उपनिषदे अथर्ववेदाशी निगडीत आहेत .
गणेशपुराण
गणेशपुराणाला गणपती संप्रदायात फार मोठे स्थान आहे . त्यात गणपतीच्या स्तुतीपर अनेक कथा असून गणपतीने कोड बरे केल्याचा उल्लेख आहे . त्यात गणपतीच्या संप्रदायाची आणि पूजाविधीचीही सविस्तर माहिती आहे . गणपतीच्या हजार नावांचाही निर्देश आहे .
सिंदूर नावाच्या असुराने गणपतीला नर्मदा नदीत फेकून दिले . पुढे गणपतीने सिंदुरासुराचा वध केला , म्हणून त्या रक्ताने नर्मदेचे पाणी लाल झाले . नर्मदेतील रक्तवर्ण गोट्यांची - दगडांची नर्मदे गणपती म्हणून अद्याप पूजा केली जाते . घृष्णेश्वराजवळील सिंधुरवाड येथे सिंधुरासुराचे सुवासिक रक्त अंगाला माखून गणपतीने अवतार कार्य संपवले , असा उल्लेख गणेशपुराणात सापडतो . म्हणून गणपतीच्या पूजेत शेंदूर गणेशाला प्रिय , असे मानण्यात येऊ लागले .
गृत्समद , वरेण्य आणि मुग्दल हे गणपतीचे थोर भक्त . गणेशाने आपली हजार नावे शिवाला आणि गणेशगीताला वरेण्याला सांगितली . गणपतीची जयंती वैशाख पौर्णिमा , ज्येष्ठ , भाद्रपद किंवा माघ महिन्याच्या शुक्ल चतुर्थीला साजरी होते . रिद्धी आणि सिद्धी या त्याच्या दोन पत्नी . गणपतीची बारा नावे प्रसिद्ध आहेत . ती अशी - सुमुख , एकदन्त , कपिल , गजकर्णक , लम्बोदर , विकट , विघ्ननाश , गणाधिप , धूम्रकेतू , गणाध्यक्ष , भालचंद्र आणि गजानन . गणपती म्हणजे प्रणवाचे मूर्त स्वरूप त्याची पूजा , म्हणजे परब्रह्माची पूजा .
गणपतीचा प्रत्येक युगात अवतार होता आणि त्या त्या युगात तो भिन्न भिन्न नावांनी ख्यात आहे . कृतयुगात तो कश्यपपुत्र विनायक असून त्याला दहा हात होते . त्यावेळी त्याचे वाहन सिंह होते . अंगकांती तेजस्वी होती . त्यावेळी त्याने देवांतक आणि नरांतक या असुरांचा संहार केला . त्रेता युगात तो शिवपुत्र असून मयूरेश्वर या नावाने प्रसिद्ध झाला . या अवतारात त्याला सहा हात होते . अंगकांती शुभ्र होती . तो त्यावेळी मोरावर बसत असे . या युगात सिंधु नावाचा दैत्याचा त्याने नाश केला . द्वापार युगातही तो शिवपुत्र असून या गणेशाची गजानन म्हणून प्रसिद्धी झाली . त्यावेळी त्याची अंगकांती लाल होती . त्याला चार हात होते आणि त्याचं वाहन उंदीर होते . त्या युगात सिंदुराचा वध करून वरेण्याला त्याने गणेशगीता सांगितली . कलियुगात धुम्रकेतू या नावाने त्याची प्रसिद्धी होईल ; अंगकांती धुम्रवर्ण असून त्याला दोन हात असतील , त्यावेळी त्याचे वाहन अश्व असेल .
परब्रह्मरुप गणेशाच्या स्वरुपाचे सत्यज्ञान ध्यानानेच होऊ शकते . परंतु त्याच्या मूर्तीची मनोभावाने पूजा करूनही त्याचा अनुराग्रह होतो . मुग्दलपुराण हा गणपती संप्रदायातील थोडाफार अर्वाचीन ग्रंथ . त्यात गणपतीच्या बत्तीस प्रकारच्या मूर्तींची वर्णने आहेत . स्कंदपुराणात तो विघ्नहर्ता व सुखकर्ता , असे त्याचे वर्णन आहे . त्याच पुराणात आपल्या अंगाच्या सुगंधी उटण्यापासून पार्वतीने गणेशाची निर्मिती केली , असा निर्देश आहे . ब्रह्मवैवर्त पुराणाच्या गणेशखंडात गणपतीच्या जन्माविषयी व त्याच्या गजमुखाविषयी बऱ्याच भिन्न भिन्न कथा दिलेल्या आहेत . गणेश हा शिवपार्वतीचा मुलगा असला तरी त्याचा मानवासारखा आईच्या पोटातून जन्म झाल्याचे वर्णन नाही . त्यादृष्टीने तो अयोनिज आहे . शनीच्या दृष्टीपातामुळे गणपतीचे डोके गळून पडले , तेव्हा शंकराने त्या जागी हत्तीचे डोके बसवले . भाद्रपद शुद्ध चतुर्थीखेरीज इतर कोणत्याही दिवशी तुळशीची पाने गणपतीच्या पूजेत वापरत नाही . पद्मपुराणात सृष्टीखंडात गणपतीची बारा प्रमुख नावे सांगितली आहेत . ती अशी - गणपति , विघ्नराज , लम्बतुण्ड , गजानन , दवमातूर , हेरंब , एकदन्त , गणाधिप , विनायक , चारुकर्ण , पशुपाल आणि भवात्मज .
डॉ . भांडारकरांच्या मते कोणत्याही गुप्तकालीन शिलालेखात गणपतीच्या नावाचा उल्लेख सापडत नाही . इसवीसन ८६२मधील पटियाला ( जोधपूर ) येथील शिलासासनातील स्तंभावर गणपतीचे स्तोत्र आहे . या स्तंभाच्या वरच्या बाजूला पाठीला पाठ लावून चारीकडे तोंड करून बसलेल्या चार गणपतीमूर्ती आहेत . इसवीसनाच्या आठव्या किंवा नवव्या शतकात नेपाळ व तिबेटमध्येही गणेशाची आराधना प्रचलित होती , असे दिसते . इसवीसन ६००च्या उत्तरार्धात शंकराचार्यांच्या काळी आपल्या देशात गाणपत्य पंत प्रबळ होता . शंकराचार्य पुरस्कृत पंचायतन पूजेत गणपतीला यामुळेच मानाचे स्थान मिळाले . इसवीसन पहिल्या शतकातील हाल सातवाहन आपल्या गाथासप्तशतीत गणाधिपती ( गमाहि वई ) असे गणपतीचे स्तवन करतो . शिल्पशास्त्रज्ञांच्या मते बूमार येथील शक्ती गणपती आणि मथुरा येथील स्थानक गणपती वगैरे प्राचीन शिल्पे इसवीसन ५०० ते ६०० या कालखंडातील आहेत . तेथून पुढे गजमुख , पुरुषाकृती वगैरे आकार स्पष्ट झाला . वेरुळच्या लेण्यात काल , कालि आणि सप्तमातृका किंवा शक्तींच्या मूर्ती आहेत . त्याचप्रमाणे तेथे गणपतीची आज आपण पाहतो , ती गजमुखाकृती रुढ झाली असावी , असे दिसते . महाकवी भवभूती यानेही आपल्या मालती माधव नाटकाच्या नांदीत गजमुखाचा निर्देश केला आहे . इसवीसन ८३२च्या एका शिलालेखात विनायकाची सुरुवातीच्या वाक्यात स्तुती केलेली आढळते .
पुराण हिंदूधर्मात ब्रह्मा , विष्णु आणि शिव या त्रिमूर्तींचे फार मोठे स्थान होते . त्यांच्या स्तुतीपर प्रत्येकी सहा पुराणेही आहेत . परंतु कालांतराने ब्रह्मदेवाची पूजा किंवा संप्रदाय भारतात लोप पावला , असे दिसते . ब्रह्मदेवाचा संप्रदाय नष्ट झाला , तरी विष्णू आणि शिव यांच्याएवढेच महत्त्व मिळवून गणपती संप्रदाय मात्र भारतात दृढमूल झाला , एवढे मात्र सत्य आहे .
( संदर्भ : श्रीगणेश कोश )

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा