रविवार, १० एप्रिल, २०११

स्वगत- एक साक्षात्कार

गुरुंच्या आदेशानुसार मी मार्गक्रमण करण्यास सुरुवात केली. अंगात चैतन्य संचारले होते. जबरदस्त आत्मविश्वास सोबत होता.मुक्कामाचे ठिकाण खुपच लांबवर होते. पण कशाचीही तमा न बाळगता मला त्या ठिकाणी पोचायचेच होते.
त्या रस्त्यावरुन चालणारे बरेच जण होते. कोणी सावकाश गतीने चालत होता. कोणी रखडत रखडत चालत होता. कित्येक जण झाडाच्या सावली  खाली विसावा घेत बसले होते. त्यापैकी अनेक जण निराश झालेले होते. कित्येक जण मागे परतत होते. मोठा विलक्षण देखावा होता तो. त्याकडे दुर्लक्ष करुन मी एकसमान वेगाने चालु लागलो. न थांबता, न थकता.
सूर्य मध्यान्नी आला होता. उन रणरणत होते. आजुबाजुला चौकाचौकांवर शितपेये,  पाणपोईंची, मेवामिठाईंची दुकाने होती. माझ्याबरोबरीचे कित्येक जण त्या जत्रेत रमले होते. कोणी शितपेये तर कोणी पाणी पित होते. तर कोणी मस्तपैकी पक्वांन्नावर ताव मारत होते. त्यापैकी काहीजणांनी मला थांबण्यास सांगितले. जाशील सावकाश म्हणुन सांगितले. मी त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. ध्येय गाठल्याशिवाय मोहनगरीत अडकायचे नाही हे मी मनाशी ठरवले होते.  मला माझ्या मुक्कामाच्या ठिकाणी पोचायचेच होते. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करुन मी पुढे चालु लागलो. चालता चालता कसले तरी गाणे गुणगुणत होतो. आकाशात थोडेफार ढगं जमली होती. सूर्यदेव कधी कधी झाकोळला जात असे. त्यावेळी हवेची थंडगार झुळुक येवुन मनाला आनंद देत असे. किती विलक्षण दृश्य होते ते.
चालता चालता सायंकाळ झाली. सूर्य उतरंडीला लागला. घराबाहेर पडलेले श्रमिकवर्ग घराकडे परतत होते. वासरांच्या आठवणींनी गाई हंबरत परतत होत्या. त्यापाठोपाठ गुराखी देखील लगबगीने परतत होते. सगळीकडे आसमंतात धुराळा उडाला होता. त्यायोगे सूर्यबिंब अगदी लालसर दिसु लागले. बघता बघता सूर्य अस्ताला गेला व सगळी कडे काळकुट्ट होऊ लागले. गाव हळुहळु मागे पडत होते. मी आता अरण्यात प्रवेश केला होता. रस्ता साधारण होता. माझे ठिकाण अद्याप आले नव्हते. मला अंधाराची भीती वाटत नव्हती. मी गुणगुणतच चालत होतो. तोच कसलातरी आवाज कानी येत होता. बहुधा त्या रस्त्यावरुन चालणारे कोणी पांथस्थ असतील. हो, त्यांचाच आवाज येत होता. मी जसजसा पुढे जाऊ लागलो, तसतसा तो कोलाहल वाढु लागला. सभोवताली खूप अंधार होता. नीटसे दिसत नव्हते. पुढे मला भरपुर माणसे घोळक्याने उभी असलेली दिसली. मी त्यांच्या पर्यंत आलो असता मला वेगवेगळे संभाषण ऐकु येऊ लागले.....थांब मुला यापुढे जाऊ नकोस......अहो, हेच आपले मुक्कामाचे ठिकाण आहे. ....हुश्श, पोचलो एकदाचे.....बापरे काय लांबवर होते हे ठिकाण..... गुरुंनी सांगितल्याप्रमाणेच आहे हे.......थोडासा काळोख आहे इतकच काय ते........आता हा कोण पुढे चालला आणखी...... पोरगा वाटतो तो.......थांब मुला अरे हेच तुझे मुक्कामाचे ठिकाण आहे......आम्ही सगळेजण याठिकाणी थांबलो आहोत......पुढे जाऊ नकोस.... निबिड अरण्य आहे......शिवाय हिंस्र श्वापदांची भीती..... पायाला काटे बोचतील..... अरे बघ किती बोचरी हवा सुटली आहे........ थंडीने कुडकुडशील. थांब आमच्याबरोबर आनंद व्यक्त कर........ बघ आम्ही आनंदाने अगदी बेहोष होण्याच्या मार्गावर आहोत...... पोरा थांब अविचार करु नकोस....... आवाज आणखी वाढु लागला....... मीच मोठा साधु ..... मलाच खरा साक्षात्कार झाला आहे...... मी आता सच्चिदानंद स्वरुप बनलो आहे........... मला कशाचीही भीती नाही....... प्रत्यक्ष परमात्मा म्हणतात तो मीच...... मीच जगाचा पालनहार.......
मी त्यांचे बोलणे ऐकता ऐकता तसाच पुढे चालत होतो. मला माहिती होते की ते मुक्कामाचे ठिकाण नाही. ही माणसे चुकीच्याच जागेला मुक्कामाचे ठिकाण म्हणुन स्वतःची फसगत करुन घेत आहेत. वास्तविक पाहता एकतर ते थकलेले आहेत. किंवा, त्यांना आणखी पुढे जाण्याची भीती वाटत असावी.....काही असो मी पुढे चालतच रहाणार. काही झाले तरी.....
हळुहळ त्यांचा घोळका खुप मागे पडला. त्यांचा कोलाहल पण थांबला होता. मी त्यांपासुन खुप दुर व उंचीवर आलो होतो. माझ्या अंगात कसलातरी अनामिक उत्साह संचारला होता. मी चालतच होतो. बोचरी थंडी वाहत होती, पण त्याची जाणिव होत नव्हती. त्या काळोखात मी माझे स्वतःचेच आस्तित्व विसरलो होतो. माझे मन स्तब्ध झाले होते. मनात कोठलेही विचार येत नव्हते. मी तसाच पुढे पुढे जात होतो. तोच काय आश्चर्य क्षितिजावर तांबडं फुटलं होतं. सुर्यदेवाच्या आगमनासाठी सारे वातावरण आनंदित झाले होते. झुंजु मुंजु प्रकाश पडत होता. मी अंमळ मागे वळुन बघितले. बापरे मी किती उंचावर आलो होतो. ते गाव तो घोळका काहीच दिसत नव्हता.
तोच..... आकाशात सुर्यबिंब प्रगटले. सुर्यदेवास पाहुन माझी गात्रे पुलकित झाली. त्याचे दर्शन घेऊन मोठ्या श्रद्धेने डोळे बंद केले व त्यास ह्रदयात साठवु लागलो. ....... नतमस्तक झालो.....माझे भावांतर झाले...
....वत्सा डोळे उघड..... कोठुनसा आवाज कानी पडला..... मी डोळे उघडले तर काय..... साक्षात गुरुदेव समोर उभे.
माझी ब्रह्मानंदी टाळी लागली. .... बाळा हेच तुझे मुक्कामाचे ठिकाण.... या ठिकाणी खुप कमी पोचतात. बाकी तमोगुणास  देव मानुन सुखोपभोगात रममाण होतात. बाळा तुझे कल्याण असो.... तुझे मंगल असो.....
असे म्हणुन गुरुदेव समुद्राच्या लाटेप्रमाणे अंतर्धान पावले.

   ............डी सिताराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: