रविवार, २५ सप्टेंबर, २०११

अलौकिक शक्तीचा विकास

प्रत्येकाजवळ ईश्वराने एक अलौकिक असा गुण दिला आहे. तो गुण कधी कधी आपल्या नकळत मित्रमंडळीत किंवा, समाजात वावरतांना प्रगट होत असतो. तो गुण आपल्याला वेळीच ओळखता आला व त्यात आपल्याला प्रगती करता आली तर काय बहार होईल.. हे सांगणे नलगे.. बऱ्याच वेळेस आपण त्या गुणांकडे दुर्लक्षच करतो.. या सध्याच्या धावपळीच्या काळात तो गुण झाकला जातो... व तो गुण आपल्याकडे एके काळी होता असे आपण नकळत बोलुनही जातो.. माझा एक मित्र आहे.. तो मिमिक्री छान करतो. हिरो- हिरॉईनचे आवाज काढुन तो मित्रमंडळींचे करमणुक करतो... मित्रमंडळीही त्याला हसुन दाद देतात... त्याच्याजवळ एवढा मोठा अलौकिक गुण असुनही, त्याकडे त्याचे दुर्लक्ष झाले.. त्याने त्या गुणाला जराही महत्व दिले नाही.. त्यामुळे त्याच्या गुणाचे क्षेत्र हे फक्त मित्रमंडळींपुरतेच मर्यादित राहिले.. जर त्याने त्या गुणात आणखी अभ्यास करुन त्यात कल्पनेने भर टाकली असती तर तो आज साऱ्या हिंदुस्थानात चमकला असता... पण त्याने तसे केले नाही. याला कारण म्हणजे त्याच्या त्या ईश्वरदत्त गुणांवर त्याचा स्वतःचाच विश्वास नव्हता.. हल्ली तो फक्त आपल्या मित्रांचेच व्यंगावर बोट ठेऊन त्यांच्या नकला करत दुसऱ्यांना हसवत असतो...
माझा एक दुसरा मित्र आहे.. तो बोलतो छान. इतके छान बोलतो की त्याचे बोलणे ऐकत रहावे असे वाटते.. त्याची एखादी गोष्ट पटवुन देण्याची पद्धत तर माझ्या मनाला भुरळ घालते... तो बोलत असला की मी त्याचा श्रोता बनतो.. अतिशय सुस्वभावी व सालस स्वभावी असा तो माझा मित्र... त्याच्या बोलण्यात एकप्रकारची मोहिनी आहे.. हा त्याचा ईश्वरदत्त गुण.. पण त्याकडे त्याने दुर्लक्षच केले.. जर तो या त्याच्या गुणांविषयी सजग राहिला असता तर तो आज उत्तम वक्ता व उत्तम प्रवचनकार बनला असता... त्याने हा गुण फारच मर्यादित ठेवला... आता तर तो दुसऱ्यांची पाठीमागे निंदा करतो व मित्रांची करमणुक करण्यामध्ये तो आज प्रसिद्ध झाला आहे..
मित्रांनो, प्रत्येकाजवळ काहीना काही ईश्वरदत्त गुण हा असतोच. फक्त तो ओळखुन त्याचा आपण विकास करायला हवा... असा कलागुण वेळीच ओळखुन त्यात स्वप्रयत्नाने भर टाकणारा जीवनात महान होतो यात शंका नाही..
आपल्या गुणांवर आपल्याला प्रेम करता यायला हवे... जो आपल्यातील कलागुणांचा आदर करतो, तोच दुसऱ्याच्या कला गुणांचा आदर करु शकतो..
आपल्या मुलाबाळांमधील कला गुण वेळीच ओळखुन त्यात वाढ होण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहीजे. कला गुण हा फक्त कलेशीच संबंधीत नसुन प्रत्येक क्षेत्रातील माध्यमाशी  संबंधित आहे. कोण सुरेल गातो, कोण चांगला ताल धरतो, कोण निशाणेबाज असतो.. कोण सुंदर बासरी बाजवतो. कोणाचे वक्तव्य सुंदर असते, तर कोण उत्तम चित्रे काढतो. कोणाला जादुच्या ट्रिक्स येतात, तर कोणी उत्तम पियानो वाजवितो, तर कोणाला क्रिकेट मधली गुगली साधते... तर कोणाला बुद्धिबळ उत्तम खेळता येतो.. इ. इ. वरील उदाहरणे मी नमुन्यादाखल दिली आहेत.. याहुनही असंख्य कलागुणांचे वर्णन करता येईल..
सारांश, प्रत्येकाने आपल्या गुणांचा विकास स्वप्रयत्नाने करावा व आपले गुण ज्या वातावरणात वाढतील त्याच वातावरणात रहाण्याचा प्रयत्न करावा...
ही ईश्वरदत्त देणगी ज्याने त्याने सांभाळावी, जतन करावी, त्यात स्वप्रयत्नाने वाढ करावी, मग बघा तुमच्या जीवनात नंदनवन फुलेल की नाही... तुमचे मन हे अतिशय आनंदी राहील व तुमच्यात एकप्रकारचा जबरदस्त आत्मविश्वास निर्माण होईल.. व तुम्ही खऱ्या अर्थाने जीवन जगु लागाल..
जयहरी! जयहरी!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: