शुक्रवार, २४ जून, २०११

अरण्यकांड- तृतीयःसर्ग

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अरण्यकाण्डे
|| तृतीयः सर्गः ||
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
 विराध आणि श्रीरामांचे संभाषण, श्रीराम आणि लक्ष्मणद्वारा विराधावर प्रहार तसेच विराधाचे या दोन्ही भावांना बरोबर घेऊन दुसर्‍या वनात जाणे -
त्यानंतर विराधाने त्या वनाला आवाजाने थरारून टाकीत म्हटले - अरे ! मी विचारतो आहे मला सांगा. तुम्ही दोघे कोण आहात आणि कोठे जाणार आहात ? ॥१॥ तेव्हा श्रीरामांनी आपला परिचय विचारणार्‍या प्रज्वलित मुख असणार्‍या त्या राक्षसाला या प्रकारे म्हटले - तुला माहीत असावयास पाहिजे की महाराज इक्ष्वाकुंचे कुलच माझे कुल आहे. आम्ही दोघे भाऊ सदाचाराचे पालन करणारे क्षत्रिय आहोत आणि कारणवश यावेळी वनात निवास करीत आहो. आता आम्ही तुझा परिचय जाणू इच्छितो. तू कोण आहेस, जो स्वेच्छेने दण्डकारण्यात विचरत आहेस ? ॥२-३॥ हे ऐकून विराधाने सत्यपराक्रमी श्रीरामांना म्हटले - रघुवंशी नरेशा ! मी प्रसन्नतापूर्वक आपला परिचय देत आहे. तुम्ही माझ्या विषयी ऐका. ॥४॥ मी "जव" नामक राक्षसाचा पुत्र आहे. माझ्या मातेचे नाम शतदृदाआहे. भूमण्डलांतील समस्त राक्षस मला विराध नामाने हाक मारतात. ॥५॥ मी तपस्येच्या द्वारे ब्रह्मदेवांना प्रसन्न करून हे वरदान प्राप्त केले की कुठल्याही शस्त्राने माझा वध होऊ नये. मी संसारात अच्छेद्य आणि अभेद्य होऊन राहावे. - कुणीही माझ्या शरीरास छिन्न-भिन्न करू शकता कामा नये. ॥६॥ आता तुम्ही दोघे या युवती स्त्रीला येथेच सोडून, तिच्या प्राप्तिची इच्छा न ठेवता जसे आलात त्याच प्रकारे ताबडतोब येथून पळून जा. मी तुमचे दोघांचे प्राण घेणार नाही.॥७॥ हे ऐकून श्रीरामांचे डोळे रागाने लालभडक झाले. ते पापपूर्ण विचार आणि विकट आकाराच्या त्या पापी राक्षस विराधास याप्रमाणे म्हटले- ॥८॥ नीचा ! तुझा धिक्कार असो. तुझा अभिप्राय फारच खोटा (वाईट) आहे. निश्चितच तू आपल्या मृत्युचा शोध घेत आहेस आणि तो तुला युद्धात प्राप्त होईल. थांब, आता तू माझ्या हातातून जिंवत सुटू शकणार नाहीस.॥९॥ असे म्हणून भगवान् श्रीरामांनी आपल्या धनुष्यावर प्रत्यञ्च्या चढवली आणि ताबडातोब तीक्ष्ण बांणाचे अनुसंधान करून त्या राक्षसास विंधून टाकण्यास आरंभ केला. ॥१०॥ त्यांनी प्रत्यञ्चायुक्त धनुष्याच्या द्वारा विराधावर पाठोपाठ सात बाण सोडले, जे गरूड आणि वायुप्रमाणे महान वेगवान होते आणि सोन्याच्या पंख्यानी सुशोभित होत होते. ॥११॥ प्रज्वलित अग्निसमान तेजस्वी आणि मोरपिसे लावलेले ते बाण विराधाच्या शरीरास छेदून रक्तरञ्जित होऊन खाली पृथ्वीवर पडले. ॥१२॥ घायाळ झाल्यावर त्या राक्षसाने वैदेही सीतेला अलग ठेवून दिली आणि स्वतः हातात शूळ घेऊन अत्यंत कुपित होऊन श्रीराम आणि लक्ष्मणावर तात्काळ तुटून पडला. ॥१३॥ तो अत्यंत जोराने गर्जना करीत इंद्रध्वजाप्रमाणे शूळ घेऊन त्या समयी तोंड वासलेल्या काळाप्रमाणे शोभत होता. ॥१४॥ तेव्हा काळ, अंतक आणि यमराजा प्रमाणे त्या भयंकर राक्षस विराधावर त्या दोन्ही भावांनी प्रज्वलित बाणांची वृष्टि केली. ॥१५॥ हे पाहून तो महाभयंकर राक्षस अट्टाहास करून उभा राहिला आणि जांभया देत अंगाला आळोखे पिळोखे देऊ लागला. त्याने असे करतांच शीघ्रगामी बाण त्याच्या शरीरातून निघून खाली पृथ्वीवर पडले. ॥१६॥ वरदानामुळे त्या राक्षस विराधाने प्राणांना रोखून धरले आणि शूळ उचलून त्या दोन्ही रघुवंशी वीरांवर आक्रमण केले. ॥१७॥ त्याचा तो शूळ आकाशात वज्र आणि अग्नि प्रमाणे प्रज्वलित दिसू लागला परंतु शस्त्रधार्‍यामध्ये श्रेष्ठ श्रीरामचंद्रांनी दोन बाण मारून त्याला छाटून टाकले. ॥१८॥ श्रीरामचंद्रांच्या बाणांनी तुटलेला विराधाचा तो शूळ वज्राने छिन्न-भिन्न झालेल्या मेरूच्या शिलाखण्डाप्रमाणे खाली पृथ्वीवर पडला. ॥१९॥ नंतर तर ते दोघे भाऊ ताबडतोब काळ्या सर्पाप्रमाणे दोन तलवारी घेऊन त्वरित त्याच्यावर तुटून पडले आणि तात्काळ बलपूर्वक प्रहार करू लागले. ॥२०॥ त्यांच्या आघातांनी अत्यंत घायळ झालेल्या त्या भयंकर राक्षसाने आपल्या दोन्ही भुजांनी त्या अकंप्य पुरुषसिंह वीरांना पकडून अन्यत्र जाण्याची इच्छा केली. ॥२१॥ त्याचा अभिप्राय जाणून श्रीरामांनी लक्ष्मणास म्हटले- सौमित्र ! हा राक्षस आपल्या इच्छेनुसार आपल्याला या मार्गाने वाहून नेऊ दे. ह्याची जशी इच्छा असेल त्या तर्‍हेने तो आपले वाहन बनून आपल्याला घेऊन जाऊं दे. (यात बाधा आणण्याची आवश्यकता नाही आहे.) ज्या मार्गाने हा निशाचर जात आहे तोच आपल्यासाठी पुढे
जाण्याचा
मार्ग आहे.॥२२-२३॥ अत्यंत बलाने उद्दण्ड बनलेल्या निशाचर विराधाने आपल्या बल-पराक्रमाने त्या दोन्ही भावांना बालकांप्रमाणे उचलून आपल्या दोन्ही खांद्यावर बसविले. ॥२४॥ त्या दोन्ही रघुवंशी वीरांना खांद्यावर चढविल्यावर राक्षस विराध भयंकर गर्जना करीत वनाकडे चालू लागला. ॥२५॥ त्यानंतर त्याने महान मेघांच्या समुदायाप्रमाणे घनदाट आणि निळ्या (रंगाच्या) दिसणार्‍या वनात प्रवेश केला. नाना प्रकारचे मोठ मोठे वृक्ष तेथे भरपूर होते. निरनिराळ्या प्रकारच्या पक्ष्यांचे समुदाय त्याला विचित्र शोभेने संपन्न बनवित होते आणि बरीचशी गिधाडे आणि हिंस्त्र पशु त्यात सर्वत्र पसरलेले होते. ॥२६॥ याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदि काव्यातील अरण्यकाण्डाचा तिसरा सर्ग पूरा झाला. ॥३॥


॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: