मंगळवार, २१ जून, २०११

अरण्यकांड- प्रथम सर्ग

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अरण्यकाण्डे
|| प्रथमः सर्गः ||
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः
श्रीराम, लक्ष्मण आणि सीतेचा
तापसांच्या आश्रम मण्डलात
सत्कार

दण्डकारण्य नामक महान वनात प्रवेश करून मनाला वश ठेवणार्‍या दुर्जय वीर श्रीरामांनी तपस्वी मुनींचे बरेशसे आश्रम पाहिले. ॥१॥ तेथे कुश आणि वल्कल वस्त्रे पसरलेली होती. ते आश्रम मण्डल ऋषिंच्या ब्रह्मविद्येच्या अभ्यासाने प्रकट झालेल्या विलक्षण तेजाने व्याप्त होते, म्हणून आकाशात प्रकाशित होणार्‍या दुर्दर्श सूर्य-मण्डलाप्रमाणे ते भूतलावर उद्दीप्त होत होते. राक्षस आदिंसाठी त्यांच्याकडे पहाणे ही कठीण होते. ॥२॥ तो आश्रमसमुदाय सर्व प्राण्यांना शरण (आश्रय) देणारा होता. त्याचे अंगण सदा झाडून - सारवून स्वच्छ बनविलेले राहात होते. तेथे बरेशसे वन्य पशु होते आणि पक्ष्यांचे समुदायही त्याला सर्व बाजूनी घेरून राहात होते. ॥३॥ तेथील प्रदेश इतका मनोरम होता की तेथे अप्सरा प्रतिदिन येऊन नृत्य करीत असत. त्या स्थानाबद्दल त्यांच्या मनात मोठा आदराचा भाव होता. मोठ -
मोठ्या
अग्निशाला, स्त्रुवा आदि यज्ञपात्रे, मृगचर्म, कुश, समिधा, जलपूर्ण कलश आणि फल - मूल वगैरे त्याची शोभा वाढवत होते. स्वादिष्ट फळे देणारे परम पवित्र तसेच मोठ मोठ्या वृक्षांनी ते आश्रममण्डल घेरलेले होते. ॥४-५॥ बलि- वैश्वदेव आणि होमाने पूजित तो पवित्र आश्रम समूह वेदमंत्रांच्या पाठाच्या ध्वनीने गुंजत राहात होता. कमल पुष्पांनी सुशोभित पुष्करिणी त्या स्थानाची शोभा वाढवत होत्या तसेच तेथे दुसरीही बरीचसी फुले सर्वत्र विखरून पडलेली होती. ॥६॥ त्या आश्रमात चीर आणि काळे मृगचर्म धारण करणारे तसेच फल-मूलाचा आहार करून राहाणारे, जितेन्द्रिय आणि सूर्य आणि अग्नितुल्य महातेजस्वी, पुरातन मुनि निवास करीत होते. ॥७॥ नियमित आहार करणार्‍या पवित्र महर्षिंनी सुशोभित तो आश्रमसमूह ब्रह्मदेवांच्या धामाप्रमाणे तेजस्वी आणि वेदध्वनीने निनादीत होता. ॥८॥ अनेक महाभाग ब्रह्मवेत्ते ब्राह्मण त्या आश्रमांची शोभा वाढवीत होते. महातेजस्वी श्रीरामांनी त्या आश्रम मण्डलाला पाहून आपल्या महान धनुष्याची प्रत्यञ्चा उतरविली, नंतर ते आश्रमाच्या आंत गेले. ॥९ १/२॥ श्रीराम तसेच यशस्विनी सीतेला पाहून ते दिव्य ज्ञानाने संपन्न महर्षि अत्यंत प्रसन्नतेने त्यांच्या जवळ गेले. ॥१० १/२॥ दृढतापूर्वक उत्तम व्रताचे पालन करणारे ते महर्षि उदयकालच्या चंद्रम्याप्रमाणे मनोहर, धर्मात्मा श्रीरामाला, लक्ष्मणाला आणि यशस्विनी वैदेही सीतेलाही पाहून त्या सर्वांसाठी मङ्‌गलमय आशीर्वाद देऊ लागले. त्यांनी त्या तिघांना आदरणीय अतिथिंच्या रूपात ग्रहण केले. ॥११-१२॥ श्रीरामांचे रूप, शरीराची ठेवण, कांति, सुकुमारता तसेच सुंदर वेष यांना त्या वनवासी मुनींनी आश्चर्यचकित होऊन पाहिले. ॥१३॥ वनात निवास करणारे ते सर्व मुनि श्रीराम, लक्ष्मण आणि सीता तिघांना एकटक नजरेने पाहात राहिले. त्यांचे स्वरूप त्यांना आश्चर्यमय प्रतीत होत होते.
॥१४॥
समस्त प्राण्यांच्या हितात तत्पर राहाणार्‍या त्या महाभाग महर्षिंनी तेथे आपले प्रिय अतिथि या भगवान श्रीरामांना पर्णशाळेत घेऊन जाऊन तेथे थांबवून घेतले. ॥१५॥ अग्नितुल्य तेजस्वी आणि धर्मपरायण अशा त्या महाभाग मुनिंनी श्रीरामांना विधिवत सत्कारासह जल समर्पित केले. ॥१६॥ नंतर अत्यंत प्रसन्नतेने मङ्‌गलसूचक आशिर्वाद देत त्या महात्मा श्रीरामांना त्यांनी फल-मूल आणि फुले आदिसह सारा आश्रम समर्पित केला. ॥१७॥ सर्व काही निवेदन करून ते धर्मज्ञ मुनि हात जोडून म्हणाले- रघुनंदन ! दण्ड धारण करणारा राजा धर्माचा पालक, महायशस्वी, या जनसमुदायाला (आश्रय) शरण देणारा, माननीय, पूजनीय, आणि सर्वांचा गुरू आहे. या भूतलावर (लोकपालां सहित)इंद्राचाच चौथा अंश असल्यामुळे तो प्रजेचे रक्षण करतो. म्हणून राजा सर्वांकडून वंदित होतो आणि उत्तम व रमणीय भोगांचा उपभोग घेतो. (जर साधारण राजाची ही स्थिति आहे, तर आपल्या बद्दल तर काय सांगावे. आपण तर साक्षात भगवान आहात.) ॥१८-१९ १/२॥ आम्ही आपल्या राज्यात निवास करतो आहोत म्हणून आपण आमचे रक्षण केले पाहिजे. आपण नगरात राहा अगर वनात, आम्हां लोकांचे राजेच आहात. आपण समस्त जनसमुदायाचे शासक आणि पालक आहात. ॥२०॥ राजन् ! आम्ही जीवमात्रास दण्ड देणे सोडून दिलेले आहे. क्रोध आणि इंद्रियांना जिंकले आहे, आता तपस्या हेच आमचे धन आहे. ज्याप्रमाणे माता गर्भस्थ बालकाचे रक्षण करते त्याच प्रकारे आपल्यालाही सदा सर्व प्रकारांनी आमचे रक्षण केले पाहिजे.॥२१॥ असे म्हणून त्या तपस्वी मुनिंनी वनात उत्पन्न होणारी फळे, मूळे, फुले तसेच अन्य अनेक प्रकारच्या आहारांनी लक्ष्मण (आणि सीता) सहित भगवान श्रीरामचंद्रांचा सत्कार केला. ॥२२॥ याशिवाय दुसर्‍या अग्नितुल्य तेजस्वी व न्याययुक्त आचरण करणार्‍या सिद्ध तापसांनीही सर्वेश्वर भगवान श्रीरामांना यथोचित रूपाने तृप्त केले. ॥२३॥ याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील अरण्यकाण्डाचा पहिला सर्ग पूरा झाला. ॥१॥

॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: