श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अरण्यकाण्डे
|| चतुर्थः सर्गः||
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
अरण्यकाण्डे
|| चतुर्थः सर्गः||
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
श्रीराम आणि लक्ष्मण द्वारा विराधाचा वध -
दोन्ही काकुत्स्थ श्रेष्ठ वीर श्रीराम आणि लक्ष्मण यांना राक्षस घेऊन जात आहे - हे पाहून सीता आपले दोन्ही बाहु वर उचलून जोरजोराने रडू, ओरडू लागली - ॥१॥ ’हाय ! या सत्यवादी, शीलवान आणि शुद्ध आचार विचाराच्या दशरथनंदन श्रीराम आणि लक्ष्मणांना हा रौद्ररूपधारी राक्षस घेऊन जात आहे. ॥२॥’राक्षस शिरोमणी ! तुला नमस्कार आहे. या वनात अस्वले, व्याघ्र आणि चित्ते मला खाऊन टाकतील, म्हणून तू मलाच घेऊन चल, परंतु या दोन्ही काकुत्स्थवंशी वीरांना सोडून दे.’ ॥३॥ वैदेही सीतेचे हे बोलणे ऐकून ते दोन्ही वीर श्रीराम आणि लक्ष्मण त्या दुरात्मा राक्षसाचा वध करण्यासाठी घाई करू लागले. ॥४॥ सुमित्राकुमार लक्ष्मणांनी त्या राक्षसाचा डावा आणि श्रीरामांनी त्याचा उजवा बाहु अत्यंत वेगाने तोडून टाकला. ॥५॥ भुजा तुटल्यावर तो मेघाप्रमाणे काळा राक्षस व्याकुळ झाला आणि शीघ्रच मूर्च्छित होऊन वज्राने तुटलेल्या पर्वतशिखराप्रमाणे पृथ्वीवर कोसळला. ॥६॥ तेव्हा श्रीराम आणि लक्ष्मण विराधाला भुजांनी, बुक्यांनी आणि लाथांनी मारु लागले तसेच त्याला उचलून उचलून आपटू लागले आणि पृथ्वीवर रगडू लागले. ॥७॥ बहुसंख्य बाणांनी घायाळ होऊन आणि तलवारांनी क्षत-विक्षत होऊन तसेच वारंवार पृथ्वीवर रगडला जाऊनही तो राक्षस मेला नाही. ॥८॥ अवध्य आणि पर्वतासमान अचल विराधाला वारंवार पाहून भयाच्या प्रसंगी अभय देणारे श्रीमान् राम लक्ष्मणास असे म्हणाले - ॥९॥ ’पुरुषसिंह ! हा राक्षस तपस्येमुळे (वर मिळून) अवध्य झाला आहे. याला शस्त्रांच्या द्वारे युद्धात जिंकता येणे शक्य नाही. म्हणून आपण निशाचर विराधाला पराजित करण्यासाठी आता खड्डा खोदून गाडून टाकू. ॥१०॥ लक्ष्मणा ! हत्ती प्रमाणे भयंकर तसेच रौद्र तेज असणार्या या राक्षसासाठी या वनात फार मोठा खड्डा खण.’ ॥११॥ या प्रकारे लक्ष्मणाला खड्डा खोदण्याची आज्ञा देऊन पराक्रमी श्रीराम आपल्या एका पायाने विराधाचा गळा दाबून उभे राहिले. ॥१२॥ राघवांनी सांगितलेली ही गोष्ट ऐकून राक्षस विराधाने पुरुषप्रवर काकुत्स्थास ही विनययुक्त गोष्ट सांगितली - ॥१३॥ ’पुरुषसिंह ! नरश्रेष्ठ ! आपले बल देवराज इंद्राप्रमाणे आहे. मी आपल्या हातून मारला गेलो. मोहवश मी पहिल्याने आपल्याला ओळखू शकलो नाही. ॥१४॥ ’तात ! आपल्या द्वारा माता कौसल्या उत्तम संतान असलेली ठरली आहे. मी हे जाणले आहे की आपणच श्रीराम आहात, ही महाभागा वैदेही सीता आहे आणि हे आपले लहान भाऊ महायशस्वी लक्ष्मण आहेत. ॥१५॥ ’मला शापामुळे या भयंकर राक्षस शरीरात यावे लागले होते. मी तुम्बरू नामक गंधर्व आहे. कुबेरांनी मला राक्षस होण्याचा शाप दिला होता. ॥१६॥ ’जेव्हां मी त्यांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते महायशस्वी कुबेर मला या प्रकारे म्हणाले- ’गंधर्वा ! जेव्हा दाशरथी राम युद्धात तुझा वध करतील, तेव्हा तुला आपले पहिले स्वरूप प्राप्त होऊन तू स्वर्गलोकास जाशील.’ ॥१७ १/२॥ ’मी रंभा नामक अप्सरेमध्ये आसक्त होतो म्हणून एक दिवस योग्य समयी त्यांच्या सेवेत उपस्थित होऊ शकलो नाही. म्हणून रागावून राजा वैश्रवणा (कुबेरा) ने मला पूर्वोक्त शाप देऊन त्यातून सुटण्याचा मार्ग सांगितला होता’. ॥१८ १/२॥ ’परंतप रघुवीर ! आज आपल्या कृपेने माझी त्या भयंकर शापांतून सुटका झाली. आपले कल्याण होवो ! आता मी आपल्या लोकाला जाईन. ॥१९ १/२॥ ’तात येथून दीड योजन अंतरावर सूर्यासमान तेजस्वी प्रतापी आणि धर्मात्मा महामुनि शरभङ्ग निवास करीत आहेत. त्यांच्या जवळ आपण लवकरच निघून जा. ते आपल्या कल्याणाची गोष्ट सांगतील. ॥२०-२१॥ ’श्रीराम ! आपण माझ्या शरीरास खड्ड्यात पुरून कुशलपूर्वक निघून जावे. मेलेल्या राक्षसांच्या शरीराला खड्ड्यात पुरणे (खड्डे खोदून त्यात पुरून टाकणे) हा त्यांच्यासाठी सनातन (परंपरा प्राप्त) धर्म आहे. ॥२२॥ ’जे राक्षस खड्ड्यात पुरले जातात, त्यांना सनातन लोकांची प्राप्ती होते. काकुत्स्थ रामांना असे सांगून बाणांनी पीडित झालेला महाबली विराध (जेव्हा त्याचे शरीर खड्ड्यात पुरले गेले तेव्हा) त्या शरिरास सोडून स्वर्गलोकास निघून गेला. ॥२३ १/२॥ (तो कशा प्रकारे खड्यात पुरला गेला ? - हेच आता सांगितले जात आहे) त्याचे बोलणे ऐकून राघवांनी लक्ष्मणास आज्ञा दिली - ’लक्ष्मण ! भयंकर कर्म करणार्या तसेच हत्तीप्रमाणे भयानक या राक्षसासाठी या वनात एक खूप मोठा खड्डा खण.’ ॥२४-२५॥ या प्रकारे लक्ष्मणाला खड्डा खोदण्याचा आदेश देऊन पराक्रमी श्रीराम एक पायाने विराधाचा गळा दाबून उभे राहिले. ॥२६॥ तेव्हा लक्ष्मणांनी फावडे घेऊन त्या विशालकाय विराधाच्या जवळच एक फार मोठा खड्डा खोदून तयार केला. ॥२७॥ तेव्हा श्रीरामांनी त्याचा गळा सोडून दिला आणि लक्ष्मणाने खुंटीसारखे कान असणार्या त्या विराधाला उचलून त्या खड्ड्यात टाकले, त्या वेळी तो फार भयानक आवाजात जोजोराने गर्जना करीत होता. ॥२८॥ युद्धात स्थिर राहून शीघ्रता पूर्वक पराक्रम करणार्या त्या दोन्ही भावांनी श्रीराम आणि लक्ष्मणांनी रणभूमीमध्ये क्रूरतापूर्ण कर्म करणार्या त्या भयंकर राक्षस विराधाला बलपूर्वक उचलून खड्ड्यांत फेकून दिले. त्या समयी तो जोरजोराने ओरडत होता. त्याला खड्ड्यांत टाकून ते दोन्ही बंधु खूप प्रसन्न झाले. ॥२९॥ महान असुर विराधाचा तीक्ष्ण शस्त्रांनी वध होणार नाही हे पाहून अत्यंत कुशल दोन्ही भाऊ नरश्रेष्ठ श्रीराम आणि लक्ष्मणांनी त्या समयी खड्डा खणून त्या खड्ड्यात त्याला टाकला आणि त्या खड्ड्यात माती टाकून तो बुझवून त्या राक्षसाचा बध करून टाकला. ॥३०॥ वास्तविक श्रीरामांच्या हातूनच हट्टाने मरणे त्याला अभिष्ट होते. त्या आपल्या मनोवाञ्छित मृत्युची प्राप्ति व्हावी या उद्देश्याने स्वतः वनचारी विराधानेच श्रीरामांना, ’शस्त्र द्वारा माझा वध होऊ शकत नाही’ हे सांगून टाकले होते. ॥३१॥ त्यांनी सांगितलेली ती गोष्ट ऐकून श्रीरामांनी त्याला खड्ड्यात पुरून टाकण्याचा विचार केला होता. ज्यावेळी त्याला खड्ड्यात टाकले जाऊ लागलेत्या वेळी त्या अत्यंत बलवान राक्षसाने आपल्या ओरडण्याने सारा वनप्रांत दणाणून सोडला होता. ॥३२॥ राक्षस विराधाला पृथ्वीच्या आत खड्ड्यात टाकून श्रीराम आणि लक्ष्मणानी मोठ्या प्रसन्नतेने त्याच्यावर वरून बरेचसे दगड टाकले आणि खड्डा बुझवला. नंतर ते निर्भय होऊन त्या महान वनात सानंद विचरण करू लागले. ॥३३॥ याप्रकारे त्या राक्षसाचा वध करून मैथिली सीतेला बरोबर घेऊन सोन्याच्या विचित्र धनुष्यांनी सुशोभित होऊन ते दोघे भाऊ आकाशात स्थित असलेल्या चंद्र, सूर्याप्रमाणे त्या महान वनात आनंदमग्न होऊन विचरण करू लागले. ॥३४॥ या प्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील अरण्यकाण्डाचा चौथा सर्ग पूरा झाला. ॥४॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥