!! एक !!
जन्मलाशी बंधनात ! व्यर्थ भ्रमी संसारात !गुरुकृपा अवचित ! प्रगटली सामोरी !!१!!
उजळले आत्मज्ञान ! संसार हा झाला क्षीण !
जन्म होवोनि पावन ! स्वरुप हे कळो आले !!२!!
नसे यमाची यातना ! नासे जन्मीची वासना !
बोध प्रगटला नाना ! गुरुराजा हा उदार !!३!!
दत्ता लागतसे पायी ! होऊ कसे उतराई !
भवतीरासी हा नेई ! नमस्कारी वेळोवेळा !!४!!
!! दोन !!
नाम आवडीने घ्यावे ! तोषवावे पांडुरंगा !!१!!नामा नाही काळवेळ ! तळमळ दूर जाय !!२!!
नाही बाधे यमपाश ! जगदिश रक्षितसे !!३!!
दत्ता म्हणे नाम घेऊ ! उगे राहु ब्रह्मपदी !!४!!
प्रेमे रंगलो नामात ! विसरलो जनरीत !
!! तीन !!
लज्जा सोडोनि नाचत ! हसती हे सारे जन !!१!!सरे देहाची कल्पना ! नुरे मनीची वासना !
नष्ट संसार भ्रमणा ! जागे होवोनी सत्वर !!२!!
दत्ता म्हणे नाम घेई ! बैसोनिया एक्या ठाई !
करी बारे लवलाही ! परमार्थ साधावया !!३!!