सोमवार, १५ ऑगस्ट, २०११

अंतर्मनाची जागृती- एक चमत्कार...

या ठिकाणी माझा एक अनुभव सांगणे वावगे होणार नाही असे मला वाटते...याचे कारण असे की, माझ्या सारख्या यत्किंचित माणसाला असे अनुभव येऊ शकतात तर जो कोणी भाग्यवान साधक अध्यात्मात अमळ प्रगत असेल तर त्याला याहुनही जास्त प्रमाणात अनुभव नाही का येऊ शकणार.....
माझा एक अनुभव....
लहानपणी आमची गरीबीची परिस्थिती होती. अत्यंत हालाखीत बालपण गेले. वडिलांनी आम्हाला वाचनाची गोडी लावली. आम्ही खड्या आवाजात कविता व पाढे म्हणत असु. आई विठ्ठलाची भक्ति करत असे. आई बरोबर मी पण विठ्ठल मंदिरात जात असे व विठ्ठलास नमस्कार करत असे. विठ्ठलास प्रदक्षिणा मारत असे. त्या बालवयात माझे व विठ्ठलाचे काहीतरी नाते आहे, असे मला सतत वाटत असे. विठ्ठलाची मुर्ति मी डोळे भरुन पाहत असे. त्यावेळी मला काळ वेळाचे भान राहत नसे. हा कालखंड माझ्या विठ्ठलाच्या अनिवार ओढीचा होता. मंदीरात जेव्हा हरिपाठ होत असे त्यावेळी माझे भान हरपुन जात असे. टाळ मृदुंगाचा ध्वनी मला बेहोष करत असे व मी तहानभुक विसरुन जात असे. मोठेपणी मला कळाले की, मी लहानपणीच नाद समाधीचा अनुभव घेतला होता.
मी लहान असतांनाची गोष्ट, माझ्या मित्राचा नवस फेडण्यासाठी आम्ही पातोंड्याहुन बैलगाडीने चाळीसगांव जवळील पाटणादेवीस निघालो होतो. पाच सहा बैलगाड्या होत्या. मी माझ्या आई सोबत होतो. रात्रीची वेळ होती. आकाशात पुर्णचंद्र होता. खुपच छान वातावरण होते. सगळीकडे पिठुर चांदणे पडले होते. आकाशात चांदण्या चमकत होत्या. बैलांच्या गळ्यातील घुंगरांचा आवाज वातावरण प्रसन्न करत होता. मी दिग्मुढ होऊन तो देखावा पाहत होतो. मीच सगळीकडे आहे असे वाटु लागले होते. सारे वातावरण मीच बनलो आहे, असा अनुभव मी घेत होतो. आकाशातील चंद्र तारे व आसमंतात पसरलेला नाद सारे काही मीच बनलो आहे अशा अनुभवात मी रमुन गेलो, हळुहळु माझी जाणिव हरपत होती व मन दिव्य आनंदाचा वेध घऊ लागले होते. माझ्या सकल संज्ञा हरपल्या व मी निचेष्ट पडलो. कितीतरी वेळ मी त्या तंद्रित होतो कोणास ठाऊक पण ज्यावेळी मी डोळे उघडले, त्यावेळी आम्ही पाटण्याच्या डोंगराजवळ आलो होतो. चंद्र पश्चिमेला कलला होता. मन माझे अतिशय हलके हलके झाले होते.. डोळ्यांसमोर एकतत्वाच्या लहरी दिसत होत्या... सारे काही एकच आहे....अशा अनुभवात मी रमुन गेलो... हा माझा पहिला साक्षात्कार असावा. कारण या घटनेनंतर मी बऱ्याचदा नकळत या आनंदात रमुन जात असे. त्यावेळी मला काळ वेळाचे भान रहात नसे. एखादी गोष्ट हातुन होण्यास विलंब लागत असे. आम्ही भावंडं जेव्हा कंदिलाच्या उजेडात अभ्यास करत असु त्यावेळी तो धुर ओकणारा कंदिल, माझा भाऊ व आमच्यावर पहारा करत असलेले माझे पिताश्री व मी हे जणू काही एकाच वस्तुचे बनले आहोत आणि ती वस्तु माझ्या ह्रदयात वसली आहे असे मला सारखे वाटे व मन त्या एकात्ममतेचा अनुभव घेण्यास रमुन जात असे. अशावेळी माझे अभ्यासात लक्ष नाही म्हणुन मी वडिलांच्या हातचा मार देखील भरपुर वेळेस खाल्ला आहे. असो......( क्रमशः )
                                                     ...............डी सिताराम

आपले अंतर्मन- एक चमत्कार

अंतर्मन हेच परब्रह्म आहे. ज्ञानदेवांचा बापरखुमादेवीवरु, तुकोबा नाम्याचा लाडका विठ्ठल म्हणजे अंतर्मनच होय. ज्ञानदेवादि भावंडे जन्मतःच मुक्त होती. त्यांचे अंतर्मन जन्मतःच जागृत झाले होते. त्यांच्या बाह्यसंज्ञा, बहिर्मनातील घडामोडी ह्या लुप्त झाल्या होत्या. त्यामुळे जगातील जाचक दुःखे बाधु शकले नाहीत. लोकनिंदा त्यांनी हसत हसत सहन केली. ज्ञानदेवांच्या हातुन काही अतर्क्य चमत्कार घडले, पण चे चमत्कार त्या त्या प्रसंगानुरुपच होते. त्यांनी निसर्ग नियमांविरुद्ध ढवळा ढवळ केली नाही.
अशा संतांनी हवेतुन वस्तु, अंगारा आदि भौतिक वस्तु काढुन लोकांना त्यांच्या नादी लावले नाही, किंवा चमत्कार त्यांनी प्रसिद्धिसाठीही केले नाहीत. कारण ते विश्वस्वप्नातुन जागे झालेले महात्मे होते. त्यांनी स्वतःला संत किंवा, अवतारी म्हणवुनही घेतले नाही. उलट ते संतांच्या दासांचाही दास म्हणवुन घेत. हे आताच्या स्वतःला संत, महाराज म्हणवणाऱ्या बाबांनी लक्षात घेतले पाहीजे. मित्रांनो, आपण डोळे उघडे ठेऊन वावरलो तर अशा नकली बाबांचे काही चालणार नाही. असो....संतांचे चमत्कार हे जनजागृतीसाठीच होते... मोठेपणा मिरवण्यासाठी नव्हते.. हे लक्षात ठेवले पाहिजे...त्यांना जगात अशक्य काहीच नव्हते.. साऱ्या जगावर त्यांची अप्रतिहत सत्ता चालत होती...कारण त्यांचे अंतर्मन हे पुर्णपणे जागृत झालेले होते. चारी मुक्ति, मोक्ष, साक्षात्कार आदि शब्द हे अंतर्मनालाच उद्देशुन आहेत. ज्यावेळी आपल्या बाह्यसंज्ञा क्षणभर का होईना बंद पडतात, किंवा, आपल्याला देहभान किंवा, विश्वभान नसते तितका वेळ अंतर्मन आपल्या बाह्य मनाचा व शरीराचा ताबा घेते. प्रत्येक जण व्यवहारात अशी स्थिती अल्पकाळ का होईना अनुभवत असतो... आपले आवडते गाणे ऐकत असतांना नकळत तंद्रावस्था लागते, त्यावेळी सभोवतालचा विसर पडतो. नंतर आपले मन खुपच आनंदित झाल्याचा अनुभव येतो... हा आनंद त्या गाण्यात नसुन तुमचे अंतर्मन क्षणभर बहिर्मनाला स्पर्श करुन जाते त्याचा तो आनंद असतो..
लहानपणी अशी तंद्रावस्था मी खुपच अनुभवली आहे.. एखादे नाटक पाहत असतांना, किंवा हरिजागर वा हरिकीर्तन ऐकत असतांना मला नकळत तंद्रावस्था लागत असे... व मला बाह्य जगाचा अत्यंत विसर पडत असे.. अशा वेळी माझे बाह्य मन पुर्ण लुप्त होई व हळु हळु माझी स्वतःची जाणीव देखील नाहिशी होत असे....माझ्या सारखेच सर्वांनाच होत असेल असे समजुन मी त्या अवस्थेकडे त्यावेळी दुर्लक्ष केले. पण तद्नंतर मात्र माझा या विषयांवरचा अभ्यास वाढला...त्यावेळी लक्षात आले की, ते बालपणीचे क्षण माझे अंतर्मन जागृतीचेच होते. मोठेपणी मात्र सदुगुरुंनी सांगितल्या प्रमाणे साधना घडल्या... त्या काळात आलेले अनुभव मात्र खुपच लोक विलक्षण होते... अर्थात ही स्थिती मला आजही येते.... काही वेळी मी जगाचेच काय पण माझेही भान हरपुन जाते... अशावेळी माझे मन अत्यंत दिव्य आनंदाचा वेध घेते.. ही सारी गुरु माऊलींचीच कृपा होय.... ....( क्रमशः )

                                                                                         ......डी सिताराम

मनी भास होता....

मनी भास होता मीच थोर आहे
मनी गर्व होता मीच सर्व आहे ।। धृ ।।
अहंकाराला ही पोशियेले भारी
काम वासनांनी  केले जग वैरी
भीती मरणाची दाटुनिया आहे
मनी गर्व होता मीच सर्व आहे ।।1।।
आयुष्य वायाची दवडले भारी
नाही पुण्य गाठी जोडले पदरी
श्वान सुकुराचे जीवन हे आहे
मनी गर्व होता मीच सर्व आहे ।।2।।
गर्व चुर्र झाला आज जाग आली
आई वडलांची पुण्याई संपली
काळ विकराळ दटाऊनी पाहे
मनी गर्व होता मीच सर्व आहे ।।3।।

           ....डी सिताराम

आपले अंतर्मन- एक चमत्कार

आज आपण स्वतःला आधुनिक व सुसंस्कृत समजू शकतो, परंतु सुखी मात्र मुळीच समजु शकत नाही. झोपेच्या गोळ्याशिवाय आपण झोपु शकत नाही, जुलाबाच्या गोळ्यांशिवाय आपले पोट सोफ होत नाही, टॉनिकशिवाय आपल्या अंगात शक्ति टिकवु शकत नाही. वेदनाशामक व गुंगीच्या औषधाच्या सेवनाचे प्रमाण वाढत चालले आहे. संपत्तिच्या लालसेने आपण पाषाण ह्रदयी व हावरट बनत चाललो आहोत.शारिरिक व मानसिक आजाराचे आपण कळत नकळत शिकार होत चाललो आहोत. मानसिक दृष्ट्या कमकुवत व अपंग बनत चाललो आहोत. यातुन सावरायलाच हवे. पण सावरणार कोण.. हा मोठा यक्षप्रश्न आहे.. जो तो मानसिक दौर्बल्याची शिकार होत चालला आहे. या साऱ्यातुन सुटका करण्याची शक्ती बाहेर नसुन ती तुमच्या आमच्या शरीरातच आहे... आपल्या मनातच आहे.. पण आपण कस्तुरीमृगाप्रमाणे बाहेरच कस्तुरीचा वास शोधत आहोत..
आपले अंतर्मनच ती शक्ति आहे. या शक्तिचा प्रभाव कायिक व मानसिक पडतो. बाह्यमन एक टक्का धरलो तर अंतर्मन हो आठ टक्का धरायला पाहिजे. पाण्यात हिमशिखराचे टोक दिसते पण खरा हिमपर्वत हा पाण्यात असतो. हिमटोक हे बाह्यमन धरले तर अंतर्मन हे हिमपर्वताप्रमाणे आहे..
कोणी एक थकला भागला जीव उन्हाने हैराण झाला होता. भर दुपारची वेळ. हा एका झाडाखाली विसावला. त्याच्या मनात विचार आला.. अहाहा किती थंडगार छाया आहे ही. या ठिकाणी थंडगार पाणी असते तर किती छान झाले असते.. विचार येण्याचा अवकाश.. त्याच्यासमोर थंडगार पाणी हजर झाले.. तो चपापला.. पण ते पाणी प्याला. त्याच्या मनात विचार आला की आता खाण्याचे ताट समोर असते तर किती बरे झाले असते.. विचार करायचा अवकाश. पक्वन्नाचे ताट त्याच्यासमोर हजर झाले.. मित्रांनो ही गोष्ट सर्वांनाच माहिती असेलच. ते झाड कल्पवृक्षाचे होते. मागाल तो पदार्थ तयार करण्याचे त्याच्यात सामर्थ होते. भगवंताने अस्साच कल्पवृक्ष प्रत्येकाजवळ दिलेला आहे. फक्त त्यास आपण ओळखत नाही. ही दुर्दैवाची गोष्ट आहे.. तो कल्पवृक्ष म्हणजेच आपले अंतर्मन होय.. होय अंतर्मनच तो कल्पवृक्ष आहे... हा विषय प्रत्येक शाळांमधुन लहानपणापासुनच शिकवला गेला पाहिजे. असे माझे स्वतःचे मत आहे.. त्यामुळे प्रत्येक जण या अंतर्मनाचे पुजारी बनतील व साहजिकच हिंसा, चोरी यांसारखे दुकर्म तरी टाळले जाईल.. पण आपल्या शिक्षण मंत्र्यांना कधी जाग येईल... आपले दुर्दैवच दुसरे काय.. पण पालकांनी ह्या विषयावर सखोल अभ्यास करुन आपल्या पाल्यांना हे लवकरात लवकर शिकवावे... ही माझी नम्र विनंती आहे.. त्यामुळे पाल्य हा सुजाण बनुन त्याच्या हातुन यौन अपराध होणार नाहीत व त्याची उर्जा नष्ट होणार नाही. पुढची पिढी तेजस्वी होईल... सुजाण पालकांनी हा विषय जास्तीत जास्त पालकांपर्यंत पोचवण्याची जबाबदारी घेतली पाहीजे.. असो....( क्रमशः )

                                                             ...डी सिताराम

शुक्रवार, ५ ऑगस्ट, २०११

द्वार खडा मै तेरे....

द्वार खडा मै जोगी बनके, प्रभु दर्शन देई रे।
आयो शरण तेरे पगमें, राख लाज हमारी रे।।
कन्हैय्या बनके माखन खाया, करके लीला दिखायों रे।
पगमे घुंगरू बांधके मीरा, सारा संसार नाची रे।।
सारे संतन को रूप दिखाया, प्रभु मनमें समाया रे।
काम क्रोध की बाधा नही, अहंकार नाश किया रे।।
कहे दत्ताजी कृपा करो, मैं लागत हु चरणो रे।
मेरा भगवान सामने खडा, सगुण रूप दिखायो रे।।
                                         
                                         ......डी सिताराम

सच्चा रास्ता..


सच्चा रास्ता...

 मुरत की पुजा सब करे, उसमें नहीं रे जान।
दीन दुःखी की सेवा करे, वहीं धर्म पहचान।।
मेंरा धरम सबसे बडा, छोटा तुम्हारा धरम।
धरम पर क्यों लढाई खेले, कर इंसान शरम।।
जगमें कोई छोटा नही, नही कोई रे महान।
एक ईश के बच्चे सारे, उस आगे सब समान।।
फिर क्यों झगडा लफडा करते, क्यों बहाते खुन।
अरे मानव दुश्मनी छोडो, तुम्हे प्रभुकी आन।।
सारे मानव भाई भाई, नही करे अवमान।
इस धरती पर जनम लिया, न करे व्यर्थ अभिमान।।
ज्ञान विज्ञान सिख ले बंदे, कर कोई मेहनत।
सच्चे रास्ते को छोडो ना प्यारे, है उसमें हित।।
कहे दत्ताजी सुनो मेरे भाई, याद रखो सारी बात।
ईश्वर तुम्हारा भला करे, खुल जाए किस्मत।।

......डी सिताराम


एक बापुडा....


एक बापुडा

एक बापुडा उन्हात भटकत, असाच चालत राहीला
पायात साधे नसे वहाणही, होरपळतचि चालला
असंख्य दुःखे गिळुनी मनाशी, ओठांती पुटपुटतसे
केविलवाण्या नजरेने, भिरिभिरी साऱ्या जगा पहातसे
बहु दिवसांचा उपाशी जीव हा, पोट पाठी भिडलेले
माशा उडती डोक्यावरती, केस असेच वाढलेले
कोणीही नसे तयास वाली, सगे सोयरे कोणी नसे
पुत्र-सुनांनी बाहेर काढुनी, जनात त्याचे केले हसे
कुठे निवारा नसे तयाशी, फुटपाथही भरलेला
कोठे नीजे झाडाखालती, तर कोठे प्रिय दगड शिला
सर्वच जण बघती त्याशी, तिरस्कारीत नजरेने
कोणी दुष्ट शिव्याही देती, दुर सारती नेटाने
माय बापहो खायास द्याहो, असे ओरडी करुणेने
तरणी, ताठी, जवान, पोरे, पाही त्यास गमतीने
पण कोणाही मनास पाझर फुटेना, थोर थट्टा केली
पाहुनी तया नाजुक ठाया, माणुसकीही गहिवरली


रविवार, १७ जुलै, २०११

माझी माय

माझी माय

वाहे प्रेमाचा निर्झर
जिच्या नयनी अखंड
अशी माय माझी थोर
तिच्या कृपेशी ना खंड

दयावंत कृपावंत
तिज संतांचे लक्षण
थोर तिचे उपकार
तिच्या सेवेशी ना उणं

सदा कामात तत्पर
नसे तिला कसे भान
गरीबीचा शाप होता
केला हसत सहन

चव तिच्या भोजनाची
जाई अमृत लाजुन
स्वर्गीचे ते सुख माझे
गेले आज हरपुन

जरी सुखाचे वलय
असे माझ्या सभोवार
पण माये विना झालो
सदा बेकार बेजार

शोधतो मी माय माझी
या साऱ्या जनी वनी
पण उदास मी होतो
नाही भेटे त्रिभुवनी

      ... डीसिताराम

शुक्रवार, २४ जून, २०११

अरण्यकांड- चतुर्थः सर्ग

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अरण्यकाण्डे
|| चतुर्थः सर्गः||
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
श्रीराम आणि लक्ष्मण द्वारा विराधाचा वध -
दोन्ही काकुत्स्थ श्रेष्ठ वीर श्रीराम आणि लक्ष्मण यांना राक्षस घेऊन जात आहे - हे पाहून सीता आपले दोन्ही बाहु वर उचलून जोरजोराने रडू, ओरडू लागली - ॥१॥ हाय ! या सत्यवादी, शीलवान आणि शुद्ध आचार विचाराच्या दशरथनंदन श्रीराम आणि लक्ष्मणांना हा रौद्ररूपधारी राक्षस घेऊन जात आहे. ॥२॥राक्षस शिरोमणी ! तुला नमस्कार आहे. या वनात अस्वले, व्याघ्र आणि चित्ते मला खाऊन टाकतील, म्हणून तू मलाच घेऊन चल, परंतु या दोन्ही काकुत्स्थवंशी वीरांना सोडून दे.॥३॥  वैदेही सीतेचे हे बोलणे ऐकून ते दोन्ही वीर श्रीराम आणि लक्ष्मण त्या दुरात्मा राक्षसाचा वध करण्यासाठी घाई करू लागले. ॥४॥ सुमित्राकुमार लक्ष्मणांनी त्या राक्षसाचा डावा आणि श्रीरामांनी त्याचा उजवा बाहु अत्यंत वेगाने तोडून टाकला. ॥५॥ भुजा तुटल्यावर तो मेघाप्रमाणे काळा राक्षस व्याकुळ झाला आणि शीघ्रच मूर्च्छित होऊन वज्राने तुटलेल्या पर्वतशिखराप्रमाणे पृथ्वीवर कोसळला. ॥६॥ तेव्हा श्रीराम आणि लक्ष्मण विराधाला भुजांनी, बुक्यांनी आणि लाथांनी मारु लागले तसेच त्याला उचलून उचलून आपटू लागले आणि पृथ्वीवर रगडू लागले. ॥७॥ बहुसंख्य बाणांनी घायाळ होऊन आणि तलवारांनी क्षत-विक्षत होऊन तसेच वारंवार पृथ्वीवर रगडला जाऊनही तो राक्षस मेला नाही. ॥८॥ अवध्य आणि पर्वतासमान अचल विराधाला वारंवार पाहून भयाच्या प्रसंगी अभय देणारे श्रीमान् राम लक्ष्मणास असे म्हणाले - ॥९॥ पुरुषसिंह ! हा राक्षस तपस्येमुळे (वर मिळून) अवध्य झाला आहे. याला शस्त्रांच्या द्वारे युद्धात जिंकता येणे शक्य नाही. म्हणून आपण निशाचर विराधाला पराजित करण्यासाठी आता खड्डा खोदून गाडून टाकू. ॥१०॥ लक्ष्मणा ! हत्ती प्रमाणे भयंकर तसेच रौद्र तेज असणार्‍या या राक्षसासाठी या वनात फार मोठा खड्डा खण.॥११॥ या प्रकारे लक्ष्मणाला खड्डा खोदण्याची आज्ञा देऊन पराक्रमी श्रीराम आपल्या एका पायाने विराधाचा गळा दाबून उभे राहिले. ॥१२॥ राघवांनी सांगितलेली ही गोष्ट ऐकून राक्षस विराधाने पुरुषप्रवर काकुत्स्थास ही विनययुक्त गोष्ट सांगितली - ॥१३॥ पुरुषसिंह ! नरश्रेष्ठ ! आपले बल देवराज इंद्राप्रमाणे आहे. मी आपल्या हातून मारला गेलो. मोहवश मी पहिल्याने आपल्याला ओळखू शकलो नाही. ॥१४॥ तात ! आपल्या द्वारा माता कौसल्या उत्तम संतान असलेली ठरली आहे. मी हे जाणले आहे की आपणच श्रीराम आहात, ही महाभागा वैदेही सीता आहे आणि हे आपले लहान भाऊ महायशस्वी लक्ष्मण आहेत. ॥१५॥ मला शापामुळे या भयंकर राक्षस शरीरात यावे लागले होते. मी तुम्बरू नामक गंधर्व आहे. कुबेरांनी मला राक्षस होण्याचा शाप दिला होता. ॥१६॥ जेव्हां मी त्यांना प्रसन्न करण्याचा प्रयत्‍न केला तेव्हा ते महायशस्वी कुबेर मला या प्रकारे म्हणाले- गंधर्वा ! जेव्हा दाशरथी राम युद्धात तुझा वध करतील, तेव्हा तुला आपले पहिले स्वरूप प्राप्त होऊन तू स्वर्गलोकास जाशील.॥१७ १/२॥ मी रंभा नामक अप्सरेमध्ये आसक्त होतो म्हणून एक दिवस योग्य समयी त्यांच्या सेवेत उपस्थित होऊ शकलो नाही. म्हणून रागावून राजा वैश्रवणा (कुबेरा) ने मला पूर्वोक्त शाप देऊन त्यातून सुटण्याचा मार्ग सांगितला होता’. ॥१८ १/२॥ परंतप रघुवीर ! आज आपल्या कृपेने माझी त्या भयंकर शापांतून सुटका झाली. आपले कल्याण होवो ! आता मी आपल्या लोकाला जाईन. ॥१९ १/२॥ तात येथून दीड योजन अंतरावर सूर्यासमान तेजस्वी प्रतापी आणि धर्मात्मा महामुनि शरभङ्‌ग निवास करीत आहेत. त्यांच्या जवळ आपण लवकरच निघून जा. ते आपल्या कल्याणाची गोष्ट सांगतील. ॥२०-२१॥ श्रीराम ! आपण माझ्या शरीरास खड्ड्यात पुरून कुशलपूर्वक निघून जावे. मेलेल्या राक्षसांच्या शरीराला खड्ड्यात पुरणे (खड्डे खोदून त्यात पुरून टाकणे) हा त्यांच्यासाठी सनातन (परंपरा प्राप्त) धर्म आहे. ॥२२॥ जे राक्षस खड्ड्यात पुरले जातात, त्यांना सनातन लोकांची प्राप्ती होते. काकुत्स्थ रामांना असे सांगून बाणांनी पीडित झालेला महाबली विराध (जेव्हा त्याचे शरीर खड्ड्यात पुरले गेले तेव्हा) त्या शरिरास सोडून स्वर्गलोकास निघून गेला. ॥२३ १/२॥ (तो कशा प्रकारे खड्यात पुरला गेला ? - हेच आता सांगितले जात आहे) त्याचे बोलणे ऐकून राघवांनी लक्ष्मणास आज्ञा दिली - लक्ष्मण ! भयंकर कर्म करणार्‍या तसेच हत्तीप्रमाणे भयानक या राक्षसासाठी या वनात एक खूप मोठा खड्डा खण.॥२४-२५॥ या प्रकारे लक्ष्मणाला खड्डा खोदण्याचा आदेश देऊन पराक्रमी श्रीराम एक पायाने विराधाचा गळा दाबून उभे राहिले. ॥२६॥ तेव्हा लक्ष्मणांनी फावडे घेऊन त्या विशालकाय विराधाच्या जवळच एक फार मोठा खड्डा खोदून तयार केला. ॥२७॥ तेव्हा श्रीरामांनी त्याचा गळा सोडून दिला आणि लक्ष्मणाने खुंटीसारखे कान असणार्‍या त्या विराधाला उचलून त्या खड्ड्यात टाकले, त्या वेळी तो फार भयानक आवाजात जोजोराने गर्जना करीत होता. ॥२८॥ युद्धात स्थिर राहून शीघ्रता पूर्वक पराक्रम करणार्‍या त्या दोन्ही भावांनी श्रीराम आणि लक्ष्मणांनी रणभूमीमध्ये क्रूरतापूर्ण कर्म करणार्‍या त्या भयंकर राक्षस विराधाला बलपूर्वक उचलून खड्ड्यांत फेकून दिले. त्या समयी तो जोरजोराने ओरडत होता. त्याला खड्ड्यांत टाकून ते दोन्ही बंधु खूप प्रसन्न झाले. ॥२९॥ महान असुर विराधाचा तीक्ष्ण शस्त्रांनी वध होणार नाही हे पाहून अत्यंत कुशल दोन्ही भाऊ नरश्रेष्ठ श्रीराम आणि लक्ष्मणांनी त्या समयी खड्डा खणून त्या खड्ड्यात त्याला टाकला आणि त्या खड्ड्यात माती टाकून तो बुझवून त्या राक्षसाचा बध करून टाकला. ॥३०॥ वास्तविक श्रीरामांच्या हातूनच हट्टाने मरणे त्याला अभिष्ट होते. त्या आपल्या मनोवाञ्छित मृत्युची प्राप्ति व्हावी या उद्देश्याने स्वतः वनचारी विराधानेच श्रीरामांना, ’शस्त्र द्वारा माझा वध होऊ शकत नाहीहे सांगून टाकले होते. ॥३१॥ त्यांनी सांगितलेली ती गोष्ट ऐकून श्रीरामांनी त्याला खड्ड्यात पुरून टाकण्याचा विचार केला होता. ज्यावेळी त्याला खड्ड्यात टाकले जाऊ लागलेत्या वेळी त्या अत्यंत बलवान राक्षसाने आपल्या ओरडण्याने सारा वनप्रांत दणाणून सोडला होता. ॥३२॥ राक्षस विराधाला पृथ्वीच्या आत खड्ड्यात टाकून श्रीराम आणि लक्ष्मणानी मोठ्या प्रसन्नतेने त्याच्यावर वरून बरेचसे दगड टाकले आणि खड्डा बुझवला. नंतर ते निर्भय होऊन त्या महान वनात सानंद विचरण करू लागले. ॥३३॥ याप्रकारे त्या राक्षसाचा वध करून मैथिली सीतेला बरोबर घेऊन सोन्याच्या विचित्र धनुष्यांनी सुशोभित होऊन ते दोघे भाऊ आकाशात स्थित असलेल्या चंद्र, सूर्याप्रमाणे त्या महान वनात आनंदमग्न होऊन विचरण करू लागले. ॥३४॥ या प्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील अरण्यकाण्डाचा चौथा सर्ग पूरा झाला. ॥४॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥