रविवार, १० एप्रिल, २०११

स्वगत- एक साक्षात्कार

गुरुंच्या आदेशानुसार मी मार्गक्रमण करण्यास सुरुवात केली. अंगात चैतन्य संचारले होते. जबरदस्त आत्मविश्वास सोबत होता.मुक्कामाचे ठिकाण खुपच लांबवर होते. पण कशाचीही तमा न बाळगता मला त्या ठिकाणी पोचायचेच होते.
त्या रस्त्यावरुन चालणारे बरेच जण होते. कोणी सावकाश गतीने चालत होता. कोणी रखडत रखडत चालत होता. कित्येक जण झाडाच्या सावली  खाली विसावा घेत बसले होते. त्यापैकी अनेक जण निराश झालेले होते. कित्येक जण मागे परतत होते. मोठा विलक्षण देखावा होता तो. त्याकडे दुर्लक्ष करुन मी एकसमान वेगाने चालु लागलो. न थांबता, न थकता.
सूर्य मध्यान्नी आला होता. उन रणरणत होते. आजुबाजुला चौकाचौकांवर शितपेये,  पाणपोईंची, मेवामिठाईंची दुकाने होती. माझ्याबरोबरीचे कित्येक जण त्या जत्रेत रमले होते. कोणी शितपेये तर कोणी पाणी पित होते. तर कोणी मस्तपैकी पक्वांन्नावर ताव मारत होते. त्यापैकी काहीजणांनी मला थांबण्यास सांगितले. जाशील सावकाश म्हणुन सांगितले. मी त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. ध्येय गाठल्याशिवाय मोहनगरीत अडकायचे नाही हे मी मनाशी ठरवले होते.  मला माझ्या मुक्कामाच्या ठिकाणी पोचायचेच होते. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करुन मी पुढे चालु लागलो. चालता चालता कसले तरी गाणे गुणगुणत होतो. आकाशात थोडेफार ढगं जमली होती. सूर्यदेव कधी कधी झाकोळला जात असे. त्यावेळी हवेची थंडगार झुळुक येवुन मनाला आनंद देत असे. किती विलक्षण दृश्य होते ते.
चालता चालता सायंकाळ झाली. सूर्य उतरंडीला लागला. घराबाहेर पडलेले श्रमिकवर्ग घराकडे परतत होते. वासरांच्या आठवणींनी गाई हंबरत परतत होत्या. त्यापाठोपाठ गुराखी देखील लगबगीने परतत होते. सगळीकडे आसमंतात धुराळा उडाला होता. त्यायोगे सूर्यबिंब अगदी लालसर दिसु लागले. बघता बघता सूर्य अस्ताला गेला व सगळी कडे काळकुट्ट होऊ लागले. गाव हळुहळु मागे पडत होते. मी आता अरण्यात प्रवेश केला होता. रस्ता साधारण होता. माझे ठिकाण अद्याप आले नव्हते. मला अंधाराची भीती वाटत नव्हती. मी गुणगुणतच चालत होतो. तोच कसलातरी आवाज कानी येत होता. बहुधा त्या रस्त्यावरुन चालणारे कोणी पांथस्थ असतील. हो, त्यांचाच आवाज येत होता. मी जसजसा पुढे जाऊ लागलो, तसतसा तो कोलाहल वाढु लागला. सभोवताली खूप अंधार होता. नीटसे दिसत नव्हते. पुढे मला भरपुर माणसे घोळक्याने उभी असलेली दिसली. मी त्यांच्या पर्यंत आलो असता मला वेगवेगळे संभाषण ऐकु येऊ लागले.....थांब मुला यापुढे जाऊ नकोस......अहो, हेच आपले मुक्कामाचे ठिकाण आहे. ....हुश्श, पोचलो एकदाचे.....बापरे काय लांबवर होते हे ठिकाण..... गुरुंनी सांगितल्याप्रमाणेच आहे हे.......थोडासा काळोख आहे इतकच काय ते........आता हा कोण पुढे चालला आणखी...... पोरगा वाटतो तो.......थांब मुला अरे हेच तुझे मुक्कामाचे ठिकाण आहे......आम्ही सगळेजण याठिकाणी थांबलो आहोत......पुढे जाऊ नकोस.... निबिड अरण्य आहे......शिवाय हिंस्र श्वापदांची भीती..... पायाला काटे बोचतील..... अरे बघ किती बोचरी हवा सुटली आहे........ थंडीने कुडकुडशील. थांब आमच्याबरोबर आनंद व्यक्त कर........ बघ आम्ही आनंदाने अगदी बेहोष होण्याच्या मार्गावर आहोत...... पोरा थांब अविचार करु नकोस....... आवाज आणखी वाढु लागला....... मीच मोठा साधु ..... मलाच खरा साक्षात्कार झाला आहे...... मी आता सच्चिदानंद स्वरुप बनलो आहे........... मला कशाचीही भीती नाही....... प्रत्यक्ष परमात्मा म्हणतात तो मीच...... मीच जगाचा पालनहार.......
मी त्यांचे बोलणे ऐकता ऐकता तसाच पुढे चालत होतो. मला माहिती होते की ते मुक्कामाचे ठिकाण नाही. ही माणसे चुकीच्याच जागेला मुक्कामाचे ठिकाण म्हणुन स्वतःची फसगत करुन घेत आहेत. वास्तविक पाहता एकतर ते थकलेले आहेत. किंवा, त्यांना आणखी पुढे जाण्याची भीती वाटत असावी.....काही असो मी पुढे चालतच रहाणार. काही झाले तरी.....
हळुहळ त्यांचा घोळका खुप मागे पडला. त्यांचा कोलाहल पण थांबला होता. मी त्यांपासुन खुप दुर व उंचीवर आलो होतो. माझ्या अंगात कसलातरी अनामिक उत्साह संचारला होता. मी चालतच होतो. बोचरी थंडी वाहत होती, पण त्याची जाणिव होत नव्हती. त्या काळोखात मी माझे स्वतःचेच आस्तित्व विसरलो होतो. माझे मन स्तब्ध झाले होते. मनात कोठलेही विचार येत नव्हते. मी तसाच पुढे पुढे जात होतो. तोच काय आश्चर्य क्षितिजावर तांबडं फुटलं होतं. सुर्यदेवाच्या आगमनासाठी सारे वातावरण आनंदित झाले होते. झुंजु मुंजु प्रकाश पडत होता. मी अंमळ मागे वळुन बघितले. बापरे मी किती उंचावर आलो होतो. ते गाव तो घोळका काहीच दिसत नव्हता.
तोच..... आकाशात सुर्यबिंब प्रगटले. सुर्यदेवास पाहुन माझी गात्रे पुलकित झाली. त्याचे दर्शन घेऊन मोठ्या श्रद्धेने डोळे बंद केले व त्यास ह्रदयात साठवु लागलो. ....... नतमस्तक झालो.....माझे भावांतर झाले...
....वत्सा डोळे उघड..... कोठुनसा आवाज कानी पडला..... मी डोळे उघडले तर काय..... साक्षात गुरुदेव समोर उभे.
माझी ब्रह्मानंदी टाळी लागली. .... बाळा हेच तुझे मुक्कामाचे ठिकाण.... या ठिकाणी खुप कमी पोचतात. बाकी तमोगुणास  देव मानुन सुखोपभोगात रममाण होतात. बाळा तुझे कल्याण असो.... तुझे मंगल असो.....
असे म्हणुन गुरुदेव समुद्राच्या लाटेप्रमाणे अंतर्धान पावले.

   ............डी सिताराम

गरीबी- एक काव्य

गरीबीचे भिषण चटके
मी आहेत अनुभवले
खाण्यास पुरते धड नसे
पोट पाठीस भिडलेले

बाप उपाशी, माय उपाशी
बहिण भाऊ सारे उपाशी
माय करी मोलमजुरी
बाप असाच कष्ट उपशी

शिकण्यासाठी पैका नव्हता
चिमटा पोटी पैका साठवी
खुप शिकुनी मोठे व्हारे
म्हणुनी आम्हा शाळा पाठवी

शिकुनी आम्ही मोठे बनलो
कृपा माय पितयांची
गरीबी नव्हे शाप कोणाचा
आहे ताकद दृढ मनाची

रंजुनी गांजुनी करुनी गोंधळ
दोष नशिबी देऊ नये
मार्ग काढुनी स्थिर चित्ताने
प्रयत्ना वाचुनी राहु नये

गतकालाचे भिषण दिवस
पुनः कधी ते येऊ नये
सन्मार्गाची कास धरुनी
सत्याचा मार्ग सोडु नये

   ...........डी सिताराम

शनिवार, ९ एप्रिल, २०११

दत्ता म्हणे

एक
खरा तोचि जाणा साधु।
नाही विकारांशी बाधु।।
करी परउपकार।
नाही सरती माघार।।
निंदा साहे जनी वनी।
स्थिर अंतरी लक्षुनी।।
दत्ता म्हणे असा साधु।
करी सकलांशी बोधु।।

दोन
आयुष्य हा खातो काळ।
कशी जीवा पडे भुल।।
हिच मायेची करणी।
नये कवणाच्या ध्यानी।।
संसारात रमे जीव।
तन मन अर्पी भाव।।
दत्ता म्हणे सावधान।
सोडी सोडी अभिमान।।

   .....डी सिताराम

मानव जन्म- एक काव्य

नाना विकार, वासना घेऊनी
मानव देही आला
गत जन्मींचे कर्म भोग तो
कसा विसरुनी गेला

जीवास सुखी करण्यासाठी
पैशापाठी धावतो
परि सुख कोठे, भास तयाचा
मृगजळापरी फसतो

कर्तृत्वाचे पंख लाऊनी
गगनी झेपावतो
तसाच व्यसने, छंद लाऊनी
अधःपतीत होतो

एक दुर्गुणी रावण होतो
एक सद्गुणी राम
कधी जिंकतो रावण दुर्गुण
कधी जिंकतो राम

खरी लढाई मनात होते
भाव भावनांची
नसे शेवट या युद्धाचा
ठाऊक नसे विरंची

   .....डी सिताराम

सुनामी

जपानच्या सागर किनारी
धरणीकंप झाला
लाटा उसळल्या गगनचुंबी
काल स्तब्ध झाला

नसे कोणाला माहित यातले
सारे सुरळीत होते
उद्याची चिंता मनी ठेऊनी
व्यवहार करीत होते

साऱ्या जगाशी स्पर्धा तयांची
विसरुनी गतकाल
ताठ मानेने उभा राहीला
होता उषःकाल

परि तयांचे नशिबी अजुनी
भोग सरले नव्हते
होऊनी काळ कृतांत लाटा
सारे केले वाहते

होते नव्हते वाहुन गेले
संसार उघडा झाला
पाहुनी करुण दृश्य तयांचे
यमही थरकापला

      ......डी सिताराम

अण्णा हजारे- एक तुफान

सन्मार्गाने मागता येते
लढाई झगडा न करता
सारा देश येतो साथीला
अण्णा हजारे नेता

राजवट ही ढवळुन गेली
हादरले राजकारणी
भ्रष्टाचाराला भय सुटले
जणु थरथरे धरणी

बापुजींच्या मार्गावरती
अण्णा चालत होते
त्यांच्या मागुन सारी जनता
अनुशिलन करते

असा स्वच्छ सद्गुणी नेता
साऱ्या जगाने पाहिला
वंदन करुनी तया मुर्तीस
साथ देऊ तयाला

      .........डी सिताराम

गुरुवार, ७ एप्रिल, २०११

दत्ता म्हणे

गुरु कृपेची पहाट।
राम सर्वत्र चोखट।।
राम शरीरी बाहेरी।
राम राही चराचरी।।
राम चेईले निदेले।
रामे घरकुल केले।।
राम जळी स्थळी काष्ठी।
एक्या मुखी करा गोष्टी।।
दत्ता शरण शरण।
राम राजीव लोचन।।

   .......डी सिताराम

दत्ता म्हणे

एक
संत उदार उदार।
सारा आटवी संसार।।
दृश्यजगाचा नाश केला।
सत्य स्वरुपे पातला।।
मजविण कोणी नाही।
अनुभव हाचि येई।।
दत्ता म्हणे सांगो किती।
ऐशी संतांची महती।।

दोन
गुरु चरणांची शोभा।
भोळा राजा असे उभा।।
यांशी नाही मानपान।
दिले नामाचे साधन।।
नामरुप ऐक्य करी।
भवव्याधी दूर करी।।
दत्ता म्हणे माझा भाव।
गुरु जाहला स्वभाव।।

तीन
संतसमागमु धरावी आवडी।
जाशी पैलथडी भवसिंधु।।
संतांचे वचन अंतरी लक्षुनी।
आपुल्या जीवनी मुक्त होशी।।
संत हाची बाप संत हाची माय।
भक्तालागी सोय सर्वकाळी।।
संत उपदेश हाची गीता सार।
कैवल्याचा भार दत्ता म्हणे।।

चार
करा नामाचे साधन।
तिच गुरुसेवा जाण।।
नाम सुलभ सोपे रे।
नामे काळ थरथरे।।
करा बापांनो उच्चार।
तयाविण ना उद्धार।।
दत्ता म्हणे झालो धीट।
मार्ग पाहिला चोखट।।

पाच
नाम सोपे नाम सोपे।
सरतील विघ्ने पापे।।
नाही आणिक साधन।
देव पहायाशी जाण।।
हरिप्राप्तीचे लक्षण।
पांडुरंग नाम जाण।।
दत्ता म्हणे घेई नाम।
पुढे उभा घनःश्याम।।
   
      ...... डी सिताराम

बुधवार, ६ एप्रिल, २०११

आत्मज्ञान याचे नाव

आत्मा जाणावा विवेके। ज्ञानाज्ञान कौतुके।
अव्दैताचे रुप फिके। आत्मज्ञानयाचे नाव।।

झळाळे सम्यक ज्ञान। समतेची मति जाण।
तटस्थचित्त होऊन। आत्मज्ञान याचे नाव।।

आत्मा धवळ असे जाण। नसे विकार अधिन।
चिदाकाशाची ही खूण। आत्मज्ञान याचे नाव।।

द्रष्टा-दृष्य-दर्शन। जैशी कर्पुर ज्योत जाण।
वेगेसी गेली नासोन। आत्मज्ञान याचे नाव।।

शमदमादि योजना करावी। ब्रह्मैक्याची कास धरावी।
सुमति कदा न संडावी। आत्मज्ञान याचे नाव।।

नाश करा कर्माशय। जन्मोजन्मीचे ते भय।
तोडा भवभ्रम न्याय। आत्मज्ञान याचे नाव।।

नका धरु एकपण। सांडी अवगुण लक्षण।
मनी राहो शुद्धज्ञान। आत्मज्ञान याचे नाव।।

आत्मैक्याची वृत्ती जाण। ओळख आपणा आपण।
करा ईशवरी चिंतन। आत्मज्ञान याचे नाव।।

ब्रह्मत्राटक करावे। मनी स्वरुपी भरावे।
सर्व अहित त्यजावे। आत्मज्ञान याचे नाव।।

करा विकार शमन। उद्धरी आत्म्याशी जाणुन।
पहावे करावे मौन। आत्मज्ञान याचे नाव।।

मनी असावे निर्भय। करा दुर्बलांची सोय।
मति ठेवावी सुन्याय। आत्मज्ञान याचे नाव।।

चराचरात ईश्वर। व्हारे जाणुनी निर्भर।
नको देवावरी भार। आत्मज्ञान याचे नाव।।

दृष्य प्रपंचाचे भुत। करुनिया वरी मात।
जाणुनिया सुषुप्तीत। आत्मज्ञान याचे नाव।।

दत्ता झाला सावचित्त। क्षणभंगुरत्व ज्ञात।
करी आपुलाले हित। आत्मज्ञान याचे नाव।।

 ........... डी सिताराम


दत्ता म्हणे


एक
उदासिन वृत्ती, धरावी अंतरी।
समत्वे बाहेरी, निजरुप।।
मानपान नेणे, नेणे शत्रु-मित्र।
जाणा तो पवित्र, संसारात।।
मोह ममतेचे नाही पाश मनी।
केवळ उन्मनी भोगतसे।।
दत्ता म्हणे ऐसा आचरी जीवन।
वंदिन चरण जिवेभावे।।

दोन
सबाह्य अंतरी विठ्ठल कोंदला।
सोहळा देखला निजरुपी।।
भक्त काजासाठी धरीले सगुणे।
परि व्यापकपणे नटलाशी।।
देवादिका ना कळे तुझे हे स्वरुप।
जाणला मी बाप विटेवरी।।
दत्ता म्हणे ऐसा राजा कनवाळु।
करितो सांभाळु भक्तजना।।

तीन
नलगे नलगे मुक्तिचा सोहळा।
आवडे कृपाळा येरझार।।
जन्मोजन्मी तुझा होईन मी दास।
हेचि माझी आस पुरवावी।।
नामघोष कानी आवडतो देवा।
पडे याचा हेवा ब्रह्मादिका।।
दत्ता म्हणे तुचि प्राणाचा विसावा।
माधव केशवा पद्मनाभा।।
चार
प्रभु तुझी माया न कळे कवणा।
व्यापक विचक्षणा दाखविशी।।
जरी तु व्यापिले सकळ जगत।
असे गुणातित रुप तुझे।।
साऱ्या जगताचा तुची बा विसावा।
घडे बद्ध जीवा आत्मबोध।।
दत्ता म्हणे जाणा भक्त तोची खरा।
मायेचा पसारा पार करी।।

पाच
सकल भ्रमले मायेत रमले।
मन भोगा गुंतले विषयांच्या।।
भाव भक्ति ठाव नाही जयापरी।
अधिनता परि वासनेच्या।।
संत वचनांशी वावडे तयाशी।
नसे तयापाशी नारायण।।
दत्ता म्हणे व्हारे सावध सावध।
करा आत्मबोध गुरुपाशी।।

सहा
सद्गुरु कृपा बंधनाशी तोडी।
मायेशी मरोडी भवताप।।
असे भाग्यवंत दैवाचे दैवाचे।
पंढरीरायाचे दास आम्ही।।
बंधन तोडिले उकलोनी गाठी।
तोचि जगजेठी डोळा दिसे।।
दत्ता म्हणे ऐसी सद्गुरुंची लीला।
भोगतसे सोहळा आपणची।।

सात
पाहे पाहे विठु पाहे।
सर्वाभुति वास राहे।।
ज्ञानदृष्टी दाटे डोळा।
असा पवित्र सोहळा।।
असे सगुण बरवे।
प्रेमे चराचरी राहे।।
दत्ता म्हणे पाहा याशी।
वास आपणया पाशी।।

आठ
पाहता पाहता एकरुप झालो।
दशदिशा ठालो कौतुकाने।।
बोलता बोलता मौनाशी पावलो।
श्रवणाशी आलो अनाहत।।
सबाह्य अंतरी एक निजबोध।
नाशियेली बाध विषयांची।।
दत्ता जाणे ह्रद सकल जीवांचे।
एक कैवल्याचे रुप जगी।।

नऊ
जगत संसार मृगजळ भासे।
तया मुळी दिसे ब्रह्मरुप।।
अविद्या ही जाणा विस्तार जगाचा।
आत्मज्ञाने साचा बिजनाश।।
वासना निमाली ठाईची ह्रदयी।
तेणे रुप पाही ऐक्यरसी।।
दत्ता म्हणे जळे कर्माचे बंधन।
हाचि जन्म जाण शेवटला।।

दहा
विश्वरुप जे पार्थाशी।
तेचि दाविले आम्हासी।।
धन्य धन्य गुरुराया।
तुज ओवाळिन काया।।
अनुग्रहे केली मात।
प्रेमे झालो गुणातित।।
त्रिपुटी ही एक झाली।
ऐक्य कौतुके पाहिली।।
दत्ता पाही निजरुप।
वसे चराचरी बाप।।

अकरा
गोड तुझे नाम देवा।
हरि मुरारी केशवा।।
नसे बंधन काळाचे।
स्मरे पाय विठोबाचे।।
ध्यानी मनी वसे हरि।
स्वप्न जागृती बाहेरी।।
दत्ता म्हणे अनुभवा।
याशी जाणा नित नवा।।

बारा
जन्म होता मुक्त झालो।
हरि भजनांशी आलो।।
आवडिने घ्यावे नाम।
तेणे तुष्टे घनःश्याम।।
जन्मोजन्मी घडो सेवा।
पडे ब्रह्मादिका हेवा।।
दत्ता सांगे सकलांशी।
प्रेमे स्मरा रे हरिशी।।

तेरा
नसे मी मोठा कोणी।
या साऱ्या जनीवनी।।
संत चरणांचा दास।
मी राहतो उदास।।
विकारांचा मी कल्लोळ।
पडे जीवा कशी भुल।।
मी दास संता पायी।
दत्ता म्हणे उगा राही।।

चौदा
करा सद्गुरु सोयरा।
झणी त्याची कास धरा।।
तोचि तारक तारक।
पडे कळीकाळा धाक।।
आत्मज्ञान घडवितो।
देहभोग नासवितो।।
दत्ता म्हणे जागा होई।
सद्गुरु शरण जाई।।

पंधरा
राम तोचि आत्माराम।
सकल जीवांचा आराम।।
राम ध्याई राम गाई।
राम सर्वाभुति राही।।
रामा गोविंदा माधवा।
हाचि योग्यांचा विसावा।।
दत्ता म्हणे राम म्हणा।
नाही पुण्याची गणना।।

सोळा
गुरु कृपेची पहाट।
चारी वाचा एकवट।।
रामनाम घेता वाचे।
नाशे बिज हे कर्माचे।।
रामनाम आदिजप।
हरवितो भवताप।।
दत्ता सांगे सकलांशी।
प्रेमे स्मरा श्रीरामाशी।।

सतरा
जन्मा आलाशी रे नरा।
घेई रामनाम खरा।।
तेणे तुटेल बंधन।
करी बापा हे साधन।।
नसे क्षण भरवसा।
पुढे काळा हाती फासा।।
दत्ता म्हणे वेगु करा।
रामनाम मनी स्मरा।।

अठरा
नाम फुकाचे फुकाचे।
तरी का न घेई वाचे।।
मोहपाशा गुंतियेला।
कामभोगा आकळीला।।
वाणी निंदती सज्जना।
लाज कशी नये मना।।
दत्ता म्हणे मार्ग सोपा।
तरी का न दिसे बापा।।

रविवार, २७ मार्च, २०११

हरवलेले काव्य

काव्य मज सोडुनी गेले
पोरके मज करुनी
सुख वाटेना चैन पडेना
फिरतो मी जनी वनी

दाही दिशा शोधुनी झाल्या
नाही सापडे माग
कसे रुसले कवणा ठाऊक
माझ्या नशिबी भोग

विरह जाळीतो रात्र शोधितो
उधाणलेल्या मनापरी
भयाण, खिन्न, उदास असा मी
दीन बापुडा खरोखरी

कुणा न दिसले कसे नवल हे
पडे मजला कोडं
कसे रुसले नाही कळले
मना लागले वेड

पाशी असता नाही कळले
महत्व मज काव्याचे
तुच्छ लेखिले तयापरी मी
गर्वात बोले वाचे

उदार होऊनी कोणीतरी मज
काव्य शोधुनी देईल का?
थकल्या मनास आधार देऊनी
आनंद कोणी देईल का?

...........डी सिताराम

दत्ता म्हणे

प्रभु तुझी माया न कळे कवणा।
व्यापक विचक्षणा दाखविशी।।
जरी तु व्यापिले सकळ जगत।
असे गुणातित रुप तुझे।।
साऱ्या जगताचा तुची बा विसावा।
घडे बद्ध जीवा आत्मबोध।।
दत्ता म्हणे जाणा भक्त तोची खरा।
मायेचा पसारा पार करी।।


सकल भ्रमले मायेत रमले।
मन भोगा गुंतले विषयांच्या।।
भाव भक्ति ठाव नाही जयापरी।
अधिनता परि वासनेच्या।।
संत वचनांशी वावडे तयाशी।
नसे तयापाशी नारायण।।
दत्ता म्हणे व्हारे सावध सावध।
करा आत्मबोध गुरुपाशी।।


...........डी सिताराम

शनिवार, २६ मार्च, २०११

गुढी पाडवा- एक काव्य

गुढी उभारु, प्रेम वाढवु
आनंदित होऊ

विसरुनी वैर, द्वेष मनीचा
मैत्री ही वाढवु

क्रोध मानसी नको कोणाचा
शोकातित होऊ

जाळुनी काम, भोग-वासना
व्दंव्दातित होऊ

नव स्वराज्य, रामराज्य हे
जगी पुन्हा अवतरे

काळ असो वा असो रावण
तोही पुढे थरथरे

करु संकल्प नव्या युगाचा
नव चैतन्याचा

उठ मानवा रे झडकरी
सिद्ध होई वाचा

...........डी सिताराम

बुधवार, १६ मार्च, २०११

दत्ता म्हणे

उदासिन वृत्ती, धरावी अंतरी।
समत्वे बाहेरी, निजरुप।।
मानपान नेणे, नेणे शत्रु-मित्र।
जाणा तो पवित्र, संसारात।।
मोह ममतेचे नाही पाश मनी।
केवळ उन्मनी भोगतसे।।
दत्ता म्हणे ऐसा आचरी जीवन।
वंदिन चरण जिवेभावे।।


सबाह्य अंतरी विठ्ठल कोंदला।
सोहळा देखला निजरुपी।।
भक्त काजासाठी धरीले सगुणे।
परि व्यापकपणे नटलाशी।।
देवादिका ना कळे तुझे हे स्वरुप।
जाणला मी बाप विटेवरी।।
दत्ता म्हणे ऐसा राजा कनवाळु।
करितो सांभाळु भक्तजना।।


नलगे नलगे मुक्तिचा सोहळा।
आवडे कृपाळा येरझार।।
जन्मोजन्मी तुझा होईन मी दास।
हेचि माझी आस पुरवावी।।
नामघोष कानी आवडतो देवा।
पडे याचा हेवा ब्रह्मादिका।।
दत्ता म्हणे तुचि प्राणाचा विसावा।
माधव केशवा पद्मनाभा।।

..........डी सिताराम

शनिवार, १२ मार्च, २०११

संन्याशी

माझ्या मित्राचा भाऊ लहानपणापासुनच हिमालयात त्याच्या गुरुंच्या आश्रमात ज्ञानार्जनासाठी गेला होता. तेथे त्याने काही साधना केल्या, तप केले, प्राणायाम केले. त्यायोगे त्याचे शरीर तेजस्वी बनले. चेहऱ्यावर एक वेगळीच आभा आली होती. नंतर एक तप उलटल्यावर साधारण बारा वर्षांनी तो आप्तस्वकियांना भेटण्यासाठी तो घरी आला. तपस्वी भाऊ आला  म्हटल्यावर सगळ्यांनाच खुप आनंद झाला. खुप जण भेटावयास येऊ लागले. इतके वर्ष एकांतात राहीलेला आता लोकांत आल्यामुळे तो गोंधळुन गेला. त्यास टि.व्ही. पाहण्याचे वेड लागले. त्यांस बारा वर्षात स्रियांचे दर्शन न झाल्यामुळे तो टि.व्ही. वरील फॅशन शो, चार चौघात बघता न येण्यासारखे शो तो मोठ्या रुचीने पाहु लागला. ते पाहत असतांना तो चेकाळल्यासारखे करी. त्यास आजुबाजुच्या परिस्थितीचे सुद्धा भान नसे.
एके दिवशी त्यास भेटावयास खुपजण भेटण्यास आले होते. ही स्वारी टि.व्हि. पाहण्यास गुंग होती. आणि हा जोरजोरात टाळ्या पिटत होता. त्याच्या भावास हे सर्व असह्य झाले. त्याने तात्काळ टि.व्ही. बंद केला. कनेक्शन काढुन टाकले. या संन्याशी भावाने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. टी.व्ही. पाहण्याचा हट्ट धरला. भावास तो वाटेल ते बोलु लागला. त्याला बोलावयास आलेली मंडळी आवाक झाली. त्यांनी विचार केला की, इतकी वर्ष हिमालयात तपश्चर्या करणारा हा संन्याशी, याने अजुनही वासनेचा त्याग केला नाही? वासनाधिन कसा होऊन राहीला? विकार जर याच्या नियंत्रणात नाहीत, तर याने तपश्चर्या करुन काय कमावले?

सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला व ते निघुन गेले. भावाने शरमेने मान खाली घातली. नंतर क्रोध निघुन गेल्यावर संन्याशी भावास पश्चाताप झाला. त्याला आश्चर्य वाटत होते की, इतकी वर्ष या वासनेने मला पछाडले नाही. पण लोकांत आल्यावर ही वासना मनात उपजली. याचा अर्थ वासनेचा पुर्ण क्षय झाला नाही. एकीकडे समजत होतो की, मी वासनेवर जय मिळवला, पण ते खोटं होतं. मनातली वासना पुर्ण निर्बिज झाली नाही. त्याला स्वताचीच लाज वाटु लागली. त्याने भावाची क्षमा मागितली व तो पुन्हा तपश्चर्या करण्यासाठी हिमालयात निघुन गेला, परत कधी न येण्यासाठी.

.......डी सिताराम

शुक्रवार, ११ मार्च, २०११

बा मना

बा मानवा! इंद्रियांच्या मागे लागु नकोस, भल्याभल्यांना या इंद्रियांनी भुईसपाट केले आहे. वासना, मग ती कोणतीही असो, ती अत्यंत अनिवार असते. विरक्त म्हणवणाऱ्यांनाही या वासनेने सोडले नाही. तेथे तुमच्या आमच्या सारख्यांची काय कथा? वासनेचे बीज जोवर चित्तात आहे, तोवर खरा साक्षात्कार दुर्लभच. वासना क्षीण करण्यासाठी मनाला नामस्मरणात गुंतवुन ठेवणे हाच नाममात्र उपाय आहे. नामस्मरणाने मन निर्विकार होऊ लागते, व जीवास अढळ अशी स्वरुपस्थिती प्राप्त होते. म्हणुन बा मना, कोणत्याही परिस्थितीत नामस्मरण सोडू नको.
.....डी सिताराम

ऐलतीर पैलतीर

ऐलतीरी संसार हा पैलतीरी काळ
कळुनिया सारे तरी करी वळवळ
माझे माझे म्हणुनिया, जोडी धनगोत
बुडूनिया स्वये जाई, करी वाताहत
पाप-पुण्य नाही मानी, अधर्माशी संग
बाह्यात्कारी भुललाशी, होई जीव दंग

ऐलतीरी संसार हा पैलतीरी काळ
कळुनिया सारे तरी करी वळवळ ।।

अहंकार सोबतीला, घेई मानपान
तुच्छ लेखे इतरांशी, पोशी अभिमान
जागा होई बारे गड्या, आवर हा खेळ
तुजलागी भक्षण्याशी, सिद्ध आहे काळ

ऐलतीरी संसार हा पैलतीरी काळ
कळुनिया सारे तरी करी वळवळ।।

.......डी सिताराम

बुधवार, ९ मार्च, २०११

नारी जगाते उद्धारी

नारीओंकों निंदो नये, नारी नरका खान।
जिस खानमें पैदा हुये, भीष्म, राम, हनुमान।।

दत्ता म्हणे

सद्गुरु कृपा बंधनाशी तोडी।
मायेशी मरोडी भवताप।।

असे भाग्यवंत दैवाचे दैवाचे।
पंढरीरायाचे दास आम्ही।।

बंधन तोडिले उकलोनी गाठी।
तोचि जगजेठी डोळा दिसे।।

दत्ता म्हणे ऐसी सद्गुरुंची लीला।
भोगतसे सोहळा आपणची।।

राजाचे सात व्यसन

1. कटु वचन बोलणे
2. कठोर दण्ड देणे
3. धनाचा अपव्यय करणे
4. मद्यपान  करणे
5. स्रियांमध्ये आसक्त रहाणे
6. शिकार खेळण्यासाठी व्यर्थ समय दवडणे
7. जुगार खेळणे

.....डी सिताराम