सोमवार, २० जून, २०११

मनाला भावलेले असे हरिपाठाचे अभंग 8

॥ श्री‌सद्गुरुनाथाय नमः ॥
अभंग # ८.
संतांचे संगती मनोमार्ग गती । आकळावा श्रीपती येणे॥
रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा । आत्मा जो शिवाचा रामजप ॥
एकतत्त्व नाम साधिती साधन । द्वैताचे बंधन न बाधिजे ॥
नामामृत गोडी वैष्णवां लाधली । योगियां साधली जीवनकळा ॥
सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला । उद्धवा लाधला कृष्ण दाता ॥
ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ । सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे ॥
भिन्नपाठः मनोमार्ग= मनोमार्गे ,एकतत्त्व= एकतत्त्वीं
ज्ञानदेव संसारी सामान्यजनांसाठी भगवंतप्राप्तीचा "नामस्मरण" मार्ग हरिपाठातून सांगत आहेत. नाम हे संतसंगतीशिवाय मिळत नाही आणि मिळाले तरी टिकत नाही हे त्यांना चांगलेच ठाऊक आहे. किंबहुना सर्वच संतांचा हा अनुभव आहे. म्हणूनच तुकाराम महाराज, "न लगे मुक्ती धनसंपदा । संत संग देई सदा ॥" हे मागणे भगवंताकडे मागतात. योगमार्ग हा सामान्यजनांसाठी सहज नाही याची जाणीवही  ज्ञानदेवांना होतीच.म्हणूनच त्यापासून दूर राहण्याचा सल्ला हरिपाठाच्या पाचव्या अभंगात ते देतातच. "तू मन हे मीचि करी" हे जरी भगवंतांनी गीतेत सांगितले असले तरी आपले मन हे सहजच इंद्रियांना सन्मुख आहे. इंद्रिये स्वभावतःच बहिर्मुख आहेत. स्वस्वरूपाच्या विसरात आपली  जाणीव देहबुद्धीच्या अधिष्ठानावर विषयात सुखाचा शोध घेऊ लागते. स्वरूपाच्या विसरात नांदणाऱ्या जाणीवेच्या संकल्प-विकल्पात्मक स्फुरणाला  मन असे संबोधिले जाते. इंद्रियांच्या द्वारे सुखाच्या आशेने मन विषयांकडे धाव घेते. ही मनाची गती म्हणजेच अधोगती होय. मनाच्या ह्या अधोगतीला "उफराट्या नामे" वळवून देहबुद्धीचे रुपांतर आत्मबुद्धीत करणे आणि "आनंदाचे डोही आनंद तरंग" अनुभवणे संतांना अभिप्रेत असते. भगवंताच्या सान्निध्यात राहण्याची योग्यता मनाला येणे म्हणजेच मनाचे "उन्मन" होणे हे नामस्मरणात अभिप्रेत आहे. "उन्मनीच्या सुखाआड । पांडुरंग भेटी देत॥" असे जे म्हटले आहे ते उगाच नाही. माणसाच्या मनात जागेपणी विचारांचा प्रवाह सतत चालू असतो. भगवंताच्या मार्गात वाटचाल सुरू झाली की तो प्रवाह क्षीण होऊ लागतो. मन स्थिर होत जाते. अखेर विचारशून्य होऊन कोणतीही वृत्ती उठत नाही. मन बहिर्मुख होण्याचे टाकून अंतर्मुख होऊ लागते. समजणे, उमजणे आणि आकळणे ह्या ज्ञानप्राप्तीच्या ३ पायऱ्या आहेत. जाणीव जशी तरल होत जाते तसा ह्यामध्ये विकास होत जातो. मनाच्या या आत उतरण्याच्या प्रक्रियेलाच संतांनी सांगितलेला अध्यात्ममार्ग म्हणतात. आत उतरता उतरता मन सूक्ष्म आणि निर्मळ होते. पवित्र झालेले असे मन भगवत्स्वरूपच होते.
रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा । आत्मा जो शिवाचा रामजप ॥

भगवंताचे नाम वाचेने अखंड घेणे, स्मरणात स्फुरणे हा वास्तविक जीवाचा भाव, स्वभाव म्हणजे स्वधर्म होय. या स्वधर्माला जीव मुकला म्हणूनच तो अखंड सुखाला आंचवला. या स्वधर्माची दीक्षा देण्यासाठी संत साधकाला नाम देतात. नामातून देवाची स्मृती जागृत होते, प्रेम उत्पन्न होते. साक्षात शिवही रामनामाचाच जप करत असत. रामजप हा त्यांचा आत्माच होता. आत्मा म्हणजे प्रिय असण्याची परमसीमाच.
एकतत्त्व नाम साधिती साधन । द्वैताचे बंधन न बाधिजे ॥
नाम हेच एक तत्त्व आहे, साक्षात परब्रह्म आहे असे समजून नामस्मरणाची साधना केली असता द्वैताचे बंधन बाधत नाही. बंधनाचे मूळ दृश्यामध्ये आहे. दृश्याला मी पूर्ण खरे मानतो आणि भगवंताला विसरतो. त्या विस्मरणामुळे मी भगवंताहून निराळा झालो. तेथे द्वैत उत्पन्न झाले.द्वैतातून अनेकपणा पसरला. भगवंताचे सतत स्मरण राहण्यास त्याच्या नामासारखा अन्य उपाय नाही. नामाच्या उपासनेने "चित्ताचे चैतन्य होऊन विश्व म्हणजे प्रभूचा चिद्विलास" असा बोध साधकाला होतो. या बोधाने जीवाला द्वैताचे बंधन तर राहत नाहीच,उलट द्वैताच्या द्वारे तो अद्वैताचा भोग घेत राहतो. हा भोग घेण्याची प्रत्यक्ष प्रक्रिया म्हणजे नामामृताचे सेवन.

नामामृत गोडी वैष्णवां लाधली । योगियां साधली जीवनकळा ॥
नामाच्या द्वारे ज्याची वृत्ती विष्णुरूप झाली अशा वैष्णवालाच या नामामृताचे सेवन करण्याचे भाग्य प्राप्त होते. "जिव्हे गोड तीन अक्षरांचा रस । अमृत जयास फिके पुढे॥" असे तुकाराम महाराजही म्हणतात.

माणसामध्ये जी जाणीव आहे ती बुद्धीहून जेंव्हा सूक्ष्म होते तेंव्हा ती कमालीची तरल होते. ती तरल जाणीव म्हणजे माणसाच्या हृदयामध्ये राहणारी जीवनज्योत होय. तिलाच जीवनकला म्हणतात. वृत्तींचा निरोध करता करता महत्प्रयासाने योग्याला ही जीवनकला साधते. नामभक्त आणि योगी दोघेही एका अतींद्रिय गोडीमध्ये जगाला विसरतात. फरक इतकाच की भक्त डोळे उघडे ठेवून नामामृत चाखतो तर योगी ध्यानात पूर्णं मग्न होऊन जीवनकलेच्या प्रकाशात तीच गोडी चाखतो. भक्ताला नामस्मरणात साधनाचे कष्ट पडत नाहीत ही नामस्मरणसाधनेची अपूर्वता आहे.

सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला । उद्धवा लाधला कृष्ण दाता ॥
श्री.ज्ञानदेव दोन भक्तांची उदाहरणे देतात. एक... निष्पाप,निरागस आणि निर्मल असा बाळ प्रल्हाद ज्याला नारदमुनींच्या कृपेने भगवन्नाम लाभले आणि दोन... सात्त्विक,बुद्धिप्रधान आणि धारणाशक्ती चांगली होती असा उद्धव ज्याला ज्याला प्रत्यक्ष श्रीकृष्णाने आपले ज्ञान दिले. पण या भगवन्नामाचे माहात्म्य जाणणारे या जगात फार थोडे लोक असतात.

ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ । सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे ॥
भगवंताचे दर्शन करून देणारी अनेक साधने आहेत. पण त्या सर्व साधनांमध्ये भगवंताचे नामस्मरण हे साधन सुलभ आहे असे ज्ञानदेव आवर्जून सांगतात. कारण नामस्मरण कोणताही माणूस करू शकतो, त्याला स्थल-कालाची अट नाही, परिस्थितीची अनुकूलता हवीच असेही नसते, भगवंताचे नामच आरंभापासून अखेरपर्यंत मार्गदर्शन करते, नामस्मरणाने मनात सहज बदल घडून येतात, संसारात राहून नामस्मरण करता येते,  इतर साधने मीपणाने केलेली असतात. त्यांच्या मध्ये शरणागती कठीण जाते. नामस्मरणात आरंभच मुळी शरणागतीने होतो आणि महत्त्वाचे म्हणजे नाम- नामी अभेद! भगवंत त्याच्या नामाहून निराळा राहू शकत
नाही. म्हणून नाम घेणारा सतत भगवंताच्या संपर्कात असतो.

तरीही नामाला वाहून घेतलेला माणूस दुर्लभ असतो. कारण नामावर श्रद्धा कमी आणि माणसाला काहीतरी कष्ट करण्याची असलेली हौस! सर्वांनी या नामस्मरणाने आपले कल्याण करून घ्यावे म्हणून ज्ञानदेव सांगतात,

"हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा । पुण्याची गणना कोण करी ॥
                                    

                       "॥ सद्गुरुचरणी समर्पित ॥"

मनाला भावलेले असे हरिपाठाचे अभंग 7

॥ श्री‌सद्गुरुनाथाय नमः ॥
अभंग # ७.
पर्वताप्रमाणे पातक करणे । वज्रलेप होणे अभक्तासी ॥
नाही ज्यासी भक्ति ते पतित अभक्त । हरिसी न भजत दैवहत ॥
अनंत वाचाळ बरळती बरळ । त्या कैचा दयाळ पावे हरी ॥
ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान । सर्वांघटी पूर्ण एक नांदे ॥
पाठभेदः त्या कैचा दयाळ= त्या कैसेनि गोपाळ

आपण व्यावहारिक, सामान्य माणसे ! आपली पापपुण्याची समज आणि कल्पना ही सामान्य, व्यावहारिक असते. पण संतांची आणि ज्ञानियांची आध्यात्मिक अथवा पारमार्थिक पाप-पुण्याची समज अतिशय वेगळी आहे. "पुण्य ते स्मरण । पाप ते विस्मरण" असे एका अभंगात स्पष्टच लिहिले आहे. "मी"तत्वतः व वस्तुतः शुद्ध चैतन्यस्वरुप असता "मी"स्वतःचा संकोच करून स्वतःला देहाइतकेच मानणे, देहाच्या अपेक्षेतच स्वतःची ओळख करून देणे म्हणजे पारमार्थिकदृष्ट्या फार मोठे पातक होय! तर आपल्या स्वस्वरूपाची ओळख ठेवून अखंड स्वरुपी राहणे म्हणजे पारमार्थिकदृष्ट्या पुण्यच! स्वस्वरूपाच्या विसरामुळे दृश्य जगतालाच सत्य मानून आपले व्यवहार चाललेले असतात. स्वरूपाचा विसर, म्हणजे भक्तीच्या भाषेत भगवंताचा विसर, हे पाप मानले तर मग त्या विसरात आणि कर्तेपणाच्या अभिमानातून जे काही केले जाईल त्यातून पापाचे डोंगरच उभे राहणार ना ? हे पापच आपल्या प्रपंचाचे मूळ आहे. म्हणूनच प्रपंच हा दुःखरूप झाला आहे. असे पाप म्हणजेच संस्कार वज्रलेप होवून अभक्तांना चिकटतात. ते संस्कार इतके घट्ट असतात की सामान्य उपायांनी ते क्षीण होवून नष्ट होणारच नाहीत. त्यासाठी भगवंताचे स्मरण म्हणजेच नामस्मरणाचे पुण्य करावे लागते. नामाची कास धरली म्हणजे पुण्यसंचय होऊन भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव जागी होऊन पाप क्षीण होतात. प्रेमाने त्याचा आठव करणे व आवडीने त्याच्या नामाचे संकीर्तन करणे, सर्व कर्मांचा कर्ता हरीच आहे असा भाव दृढ असणे याचे नाव भक्ती. या भक्तीनेच भगवत्कृपा होऊन साधकाची देहबुद्धीच्या महापातकापासून मुक्तता होते.

      "नाही ज्यासी भक्ति ते पतित अभक्त । हरिसी न भजत दैवहत ॥"
याच्याउलट जे या भक्तिमार्गाने जात नाहीत ते अभक्त. भगवंताला विसरून इंद्रियसुखात रमलेला माणूस(अभक्त) मनाने भगवंतापासून दूर जातो.हरिची भक्ती न करणारे व त्याच्या भजनाला विन्मुख असणारे हे अभक्त खरोखरीच पतित व दैवहत होत. कारण दिव्य भगवंताचे विलक्षण सुख भोगण्याचे सामर्थ्य आणि संधी फक्त मनुष्ययोनीतच आहे. असा दुर्लभ देह लाभूनही तो (अभक्त) विषयसुखात रमतो आणि दिव्य सुखापासून वंचित राहतो. कर्तेपणाच्या अभिमानातून विषयसुखासाठी तो (अभक्त) निसर्गव्यवस्थेला बाधा आणतो आणि अंतिमता दुःखच निर्माण करतो.

अनंत वाचाळ बरळती बरळ । त्या कैचा दयाळ पावे हरी ॥
इंद्रियांना दिसणारे जगच सर्वस्वी खरे आहे असे अभक्त मानतात आणि त्यातच रमतात. सारासार विचार न करणारी ही मंडळी आपल्या वागण्याचे समर्थन करतात. देवाचे नाम मात्र चुकूनही वाचेने घेत नाहीत. उलट नामस्मरण व ईश्वरभक्ती करणाऱ्यांची वाटेल तशी निंदा, कुटाळकी करतात. भक्तांना देव दयाळू आहे खरा. पण अशा भ्रमाने बरळणाऱ्या बहिर्मुख लोकांना तो कसा पावणार? दृश्याच्या पलीकडे ज्यांची ज्ञानदृष्टी जाऊच शकत नाही त्यांना भगवंताबद्दलचे अनुभव थोतांड वाटतात.

ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान । सर्वांघटी पूर्ण एक नांदे ॥
श्री.ज्ञानदेव आत्मज्ञानाचा आधार / प्रमाण देऊन सांगतात की भगवंत आत्मस्वरूप आहे.तोच एक पूर्ण आहे. सर्व दृश्य चराचरामध्ये तोच एक पूर्णत्वाने नांदत आहे. संतांचाही हाच अनुभव आहे.तुकाराम महाराज म्हणतात,"अणुरेणू हा थोकडा । तुका आकाशाएवढा ॥" तर
गजाननविजय मध्ये प्रथम अध्यायात लिहिले आहे,"अवघे चराचर । ब्रह्मे व्याप्त साचार।"(१३९ अध्याय १)
संतांचा हा अनुभव "असोनि संसारी" घेण्यासाठी  सोपा मार्ग म्हणजे नामस्मरण. म्हणूनच ज्ञानदेव उपदेश करतात...

"हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा । पुण्याची गणना कोण
करी॥"                                     

                       "॥ सद्गुरुचरणी समर्पित ॥"

मनाला भावलेले असे हरिपाठाचे अभंग 6

॥ श्री‌सद्गुरुनाथाय नमः ॥
अभंग # ६.
साधुबोध झाला तो नुरोनिया ठेला । ठायीच मुराला अनुभवे
कापुराची वाती उजळली ज्योति । ठायीच समाप्ती झाली जैसी ॥
मोक्षरेखे आला भाग्ये विनटला । साधूचा अंकिला हरिभक्त ॥
ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी । हरि दिसे जनी आत्मतत्त्वी ॥
पाठभेदः अनुभवे=अनुभव ; दिसे जनी= दिसे जनीं वनीं
              हा अभंग म्हणजे ज्ञानदेवांनी एकाच अभंगातून व्यक्त केलेले पारमार्थिक वाटचालीचे मार्गदर्शनच! खरे सद्गुरू भेटले की त्यांच्याकडून साधकाने नेमकी कशाची अपेक्षा ठेवावी आणि त्याची अंतिम फलश्रुती काय असावी ह्याचे नेमके मार्गदर्शन ह्या अभंगातून ज्ञानदेवांनी केले आहे.
               ह्या अभंगातील "साधु" हा शब्द "सद्गुरू"च्या अपेक्षेतच असावा. साधू,संत किंवा सद्गुरू उपदेश सर्वांनाच करतात. बऱ्याच वेळा प्रवचन, कीर्तनातूनही आपल्याला अध्यात्मशास्त्रातील सिद्धान्तांवर निरूपण ऐकायला मिळते. ज्यांचे भाषाप्रभुत्व आणि वाक्प्राविण्य विलक्षण असते ते श्रोत्यांना काही काळ खिळवून ठेवतात. पण शेवटी ते "बोलाची कढी, बोलाचा भात" असेच होते. दासगणूमहाराज रचीत "गजानन विजय" ह्या पोथीत श्री.गजानन महाराजांच्या जीवनातील एक प्रसंग आठव्या अध्यायात लिहिला आहे.ब्रह्मगिरी गोसाव्याचे श्रीमदभगवतगीतेतील "नैनं छिन्दन्ति शस्त्राणी । नैनं दहति पावक।" ह्या श्लोकावर निरूपण चालू होते. श्री.गजानन महाराज समोरच सागाच्या पलंगावर बसले होते. त्यांनी आपल्या शिष्याकडे चिलीम भरून मागितली. चिलीम ओढताना एक ठिणगी पडते आणि ज्या  पलंगावर महाराज बसलेले असतात त्यालाच आग लागते. महाराज शांत असतात. ते आपल्या शिष्यांना त्या ब्रह्मगिरीला बोलावण्यास सांगतात आणि त्याला शेजारी बसण्याचा आग्रह करतात. भीतीने तो ते नाकारतो. तेंव्हा महाराज त्याला म्हणतात "नैनं छिन्दन्ति"श्लोकावर।व्याख्यान केले एक प्रहर। आता का मानिता दर। या पलंगी बसण्याचा?॥१७॥आणि मग मध्यरात्रीच्या समयाला।ब्रह्मगिरीस बोध केला।आजपासून चेष्टेला। तू या सोडून देई रे॥४६॥ ज्यांनी राख लावावी।त्यांनी उपाधी दूर ठेवावी।अनुभवावीण न सांगावी। गोष्ट कोणा न निरर्थक॥४७॥नु
सते शब्दपांडित्य।माजले जगी अतोनात।तेणेंच आहे झाला घात। आपुल्या या संस्कृतीचा॥४८॥
           काही वेदांती प्रवचनकार तर घट आणि पटात इतके गुरफटलेले असतात की त्यांना ह्यातून बाहेर कोण काढणार हा श्रोत्यांनाच प्रश्न पडतो.
           बोध हा दोन प्रकारचा असतो. एक तर्काच्या अधिष्ठानावर झालेला समजुतीचा बोध व दुसरा अनुभवाच्या अधिष्ठानावर झालेला प्रत्यक्ष बोध. जो साधक नामात रमलेला असतो, सद्गुरूचरणी लीन झालेला असतो त्यालाच
सद्गुरू पारमार्थिक गुह्य "हे हृदयीचे ते हृदयी" देऊ शकतात. तेंव्हाच साधकाला आत्मानुभव सहज प्राप्त होतो. ही सद्गुरूंची आंतरिक साद असते.तिला साधकाने बाह्य बंधने झुगारून ओ दिली की मगच सद्गुरू आपला बोध देतात.साधकाला आपल्या खऱ्या स्वरूपाचा बोध होतो. ह्या बोधाने साधक जीवभावाने मरतो आणि आत्मरुपाने उरतो. मी देहच आहे ही देहबुद्धी संपून मी आत्माच आहे ही आत्मस्मृती उदय पावते. परंतु मी देह आहे हे जसे एक प्रकारचे "मी"पण आहे तसे मी आत्मा आहे हेही दुसऱ्या प्रकारचे "मी"पणच आहे.त्याला भले "सोहंभाव" म्हणोत. साधक जसजसा ह्या भावात स्थिरावतो तसतसा त्याचा हा भावही परमात्मस्वरूपात विलीन होऊन जातो. मग अनुभव घेणारा मीच न राहिल्याने आत्मतत्त्वी हरीच दिसू लागतो.
कापुराची वाती उजळली ज्योति । ठायींच समाप्ती झाली जैसी ॥
ज्याप्रमाणे कापुराला अग्नीचा स्पर्श झाला की तो अग्नीरूप होतो आणि शेवटी अग्नीसुद्धा नाहीसा होऊन केवळ आकाश शिल्लक राहते.त्याप्रमाणे जीवाला आत्मानुभवाचा स्पर्श झाला की त्याच्या अहंभावाचे सोहंभावात रुपांतर होते. त्याच्या जीवभावाचा लोप होऊन त्याच्या ठिकाणी आत्मभाव उदयाला येतो. आत्मानुभव झालेल्या साधकाच्या ठिकाणी काही काळ "मी आत्मा आहे" हा भाव स्फुरत राहतो. शेवटी हा भावसुद्धा स्वरूपात मुरतो आणि केवळ नाम तेवढे शिल्लक राहते. असा साधकच

"मोक्षरेखे आला भाग्ये विनटला। साधुचा अंकिला हरिभक्त॥"

           
हरिभक्त म्हणजे भगवंताच्या नामस्मरणात रमलेला साधक. असा साधक साधूच्या कृपेला पात्र ठरतो. नाम मुखात येणे हे माणसाचे भाग्य. नामात मन रमणे हे साधकाचे सौभाग्य आणि केवळ नामच स्फुरणे हे परमभाग्यच! एकदा का साधक सद्गुरुकृपेला पात्र ठरला आणि त्यांच्या कृपेचा वर्षाव होऊ लागला की त्याच्या ठायी भगवंताचे अनुसंधान अखंड राखले जाते. अखेर सायुज्यता मुक्तीपाशी येऊन त्यावर सद्गुरुकृपेचा वर्षाव होऊन तो आत्मस्वरूपात कायमचा विलीन होतो.
"ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी । हरि दिसे जनी आत्मतत्त्वी ॥"
सज्जनांच्या म्हणजेच संत, सद्गुरूंच्या सहवासात एकदा का नामाची गोडी लागली की त्या नामातूनच "अद्वैतानुभव" साधकाला लाभतो. साधकाला प्रथम आपल्या हृदयामध्ये वास करणाऱ्या आत्मतत्त्वातच हरिरुप दिसते. "पिंडी ते ब्रह्मांडी" ह्या न्यायाने तेच आत्मतत्त्व सर्व दृष्यामध्ये पसरलेले दिसते. ज्याला ह्या आत्मानुभवाची गोडी संतसंगतीत राहून नामस्मरणाने चाखायला मिळते तो साधक भाग्यवानच.

हा अनुभव सत्शिष्याला जरूर येतो. म्हणूनच ज्ञानदेव सांगतात,

"हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा । पुण्याची गणना कोण करी॥"
                      "॥ सद्गुरुचरणी समर्पित ॥"

मनाला भावलेले असे हरिपाठाचे अभंग 5

॥श्री‌सद्गुरुनाथाय नमः ॥   
अभंग # ५.
योगयागविधी येणे नोहें सिद्धी । वायाची उपाधि दंभधर्म ॥
भावेविण देव न कळे निःसंदेह । गुरूविण अनुभव कैसा कळे ॥
तपेंविण दैवत दिधल्याविण प्राप्त । गुजेविण हित कोण सांगे ॥
ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात । साधूचे संगती तरणोपाय ॥
पाठभेदः कळे निःसंदेह=तुटे संदेह ,सांगात
ज्ञानदेवांनी हरिपाठ लिहिला आहे तो संसारात राहून भगवतप्राप्तीची इच्छा असलेल्या संसारी माणसांसाठीच. "असोनी संसारी जिव्हे वेगु करी" नामस्मरण केल्याने  "समाधी संजीवन"प्राप्त करून घेता येते हे त्यांना सांगायचे आहे. ते स्वतः योगमार्गातप्रवीण असावेत हे ज्ञानेश्वरीतील ६व्या अध्यायातून कळतेच. नव्हे! ते तर"योगिराज"होते असे इतर संतांनी त्यांच्याबद्दल लिहिले आहे. योगमार्गातीलअडचणी त्यांना ठाऊक होत्या. संसारी माणसांना हा मार्ग सोयीचा नाही हेत्यांना कळत होते. ज्ञानेश्वरीतील सहाव्या अध्यायात ते लिहितात,
"नाहीतरी योग । साधन जे होय ॥
सर्वही ते काय । अप्रमाण ॥
परी अभ्यासाची । गाठावया तड ॥
आपणासी जड । ऐसे म्हण ॥"
मनाच्या सामर्थ्याची त्यांना जाणही आहेच. म्हणून ते त्याच अध्यायात लिहितात,
"पार्था जरी होय । अंगी योगबळ ॥
त्यापुढे चपळ । मन किती ॥"
इतर संतांनीही सर्वसामान्य साधकाला बजाविले आहेच,
"योग मार्ग धरू नका ।कष्ट उरतील जे का ॥
कर्मधर्म नव्हती सांग । उण्या अंगे पतन ॥
अष्टांगयोग
साधनेत जी बाह्य अंगे आहेत ती म्हणजे यम ( अहिंसा,सत्य,अस्तेय,ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह),नियम(अंतर्बाह्य शुचिता,संतोष,तप,अभ्यास आणि परमेशपूजन), आसन ( सहज आणि स्थिर अशी बैठक),प्राणायाम ( प्राणवायूच्या गतीचे नियमन). हीच सर्वसामान्य संसारीजणांना करण्यास कठीण असतात. खरी आंतरिक साधना सुरू होते ती प्रत्याहार( इंद्रियांना त्यांच्या विषयातून परतवून चित्तरूपात त्यांची स्थापना करणे) पासून. हळूहळू धारणा,ध्यान आणि मग समाधि असाहा प्रवास आहे.समाधीतून योग्याला काही शक्ती प्राप्त होतात. त्यांचा मोहटाळणे अतिशय कठीण असते.त्यामुळे जगांत मोठेपणा येतो. पण ह्यापायी असे साधकयोगभ्रष्ट होतात. प्रसिद्धीचा परिणाम दंभधर्मात होऊन साधक शेवटी अधोगतीलाजातात.  याग म्हणजे यज्ञ. प्राचीन वेदग्रंथ आणि धर्मशास्त्रांत अनेकयज्ञ सांगितले आहेत. त्यामधील कर्मकांड अतिशय गुंतागुंतीचे आणि खर्चिकअसते. बहुतेक यज्ञांचे ध्येय हे स्वर्गप्राप्ती हेच असते. पण पुण्यसंचयसंपला की त्याला परत यावेच लागते.ज्ञानेश्वरीत ज्ञानदेव लिहितात,
"स्वर्गात पुण्यात्मके पापे येईजे । पापात्मके पापे नरकात जाईजे ॥
मग माते जेणे पाविजे । ते
शुद्ध पुण्य ॥"
ही अध्यात्मसिद्धी जर योग,याग आणि विधीनेप्राप्त होणार नाही तर मग कशाने होईल? हा प्रश्न सहजच मनात निर्माण होईल.त्याचे उत्तर ज्ञानदेव देतात.
"भावेविण देव न कळे निःसंदेह । गुरूविण अनुभव कैसा कळे॥हरिपाठात चौथ्या अभंगात भावाचे महत्त्व ज्ञानदेवांनी विशदकेले आहे. भावाशिवाय भक्ती नाही हे त्या अभंगात सांगितले. तर पाचव्याअभंगात एक पायरी पुढे जाऊन ते सांगतात की भावाशिवाय देव कळणारच नाही. पणत्याचा अनुभव मात्र फक्त श्रीगुरूच देऊ शकतात हे निर्विवाद सत्यही तेसांगून जातात. देव आहे असे सगळेच सांगतात. पण त्यांच्या म्हणण्याचा खराअर्थ त्यांनाच कळत नाही. कोणीतरी सांगितले म्हणून ते पुढे चालत आलेले असतेइतकेच. पण स्वतःला प्रचिती मात्र काहीच नसते. केवळ सद्गुरू हेच असेअसतात जे साधकाच्या मनातील संशय दूर करून देवाच्या अस्तित्वाबद्दल साधकालाखात्री करून देतात. देवाची प्रचिती साधकाच्या अंतर्यामी परिवर्तन घडवूनआणण्यात पाहायची असते. हे सद्गुरूच समजावून देतात.
तपेवीण दैवत दिधल्याविण प्राप्त । गुजेविण हित कोण सांगे ॥"
तप म्हणजेतपश्चर्या! ध्येय साध्य होईपर्यंत चिकाटीने कष्ट सहन करीत साधनाचा आलंबघेणे म्हणजे तपश्चर्या ! देवाचे दर्शन हे सर्वोत्तम मानवी ध्येय आहे हेएकदा नक्की झाले की त्याच्या प्राप्तीसाठी जे करायचे ती तपश्चर्या!त्याशिवाय दैवत नाही. हरिपाठात साधन आहे ते देवाचे नाम! त्याचा अभ्यासकरण्यासाठी, ते अखंड होण्यासाठी देवाची अथवा सद्गुरूंची कृपा हवीच. पणकाही दिल्याशिवाय हवे ते मिळत नाही हा आपला रोजचा अनुभव आहे. परमार्थातह्या देण्यालाच त्याग असेही संबोधतात. पण खरा त्याग आहे तो "कर्तेपणाचा अभिमान"किंवा "मी"पणाचा! ह्यासूक्ष्म त्यागाचे महत्त्व आणि मर्म कळण्यास शुद्ध भावनेने सद्गुरूंनाच शरणगेले पाहिजे. आपले अंतःकरण मोकळे करून दिले की सद्गुरू आपल्यालापरमार्थातील गूज उघडे करून सांगतात. त्यामार्गाने गेले तर साधकाचे हितम्हणजे देवाची प्राप्ती फार दूर नाही.
वरील ओव्यांमध्ये एकागोष्टीशिवाय दुसरी संभवत नाही असे निदर्शनास येते. त्याचप्रमाणे साधूचीसंगती प्राप्त झाल्याशिवाय अध्यात्मसिद्धी प्राप्त होणे शक्य नाही.
"ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात । साधूचे संगती तरणोपाय ॥"
याचे कारण असे की ज्या हरिनामाने साधकालाप्रत्यक्ष हरिची प्राप्ती होते ते हरिनाम संतसंगती शिवाय मिळत नाही आणिमिळाले तरी टिकत नाही.म्हणूनच ज्ञानदेव पाचव्या अभंगाच्या शेवटी निक्षूनसांगतात "साधूचे संगती तरणोपाय ॥" सद्गुरूसाधकाला जे नाम देतात त्याला 'सबीज' नाम असे म्हणतात. ते नाम ज्यादेवासंबंधी असते त्याची प्रत्यक्ष ओळख सद्गुरू करून देतात आणि मगच त्यानामाच्या ठिकाणी साधक स्थिर होतो. सद्गुरूंकडून मिळालेल्या त्या सबीजनामामध्ये सद्गुरूंची सारी साधना / तपश्चर्या भरलेली असते. तीचसाधकाला नामात स्थिर करते आणि साधकाचे कल्याण होते. म्हणूनच ज्ञानदेवसांगतात,
"हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा । पुण्याची गणना कोण करी ॥"
                     ॥ श्री सद्गुरुचरणी समर्पित ॥

मनाला भावलेले असे हरिपाठाचे अभंग 4

अभंग ४.
भावेविण भक्ति, भक्तिविण मुक्ति । बळेविण शक्ति बोलू नये ॥
कैसेनि दैवत प्रसन्न प्रसन्न त्वरित । उगा राहे निवांत शिणसी वाया ॥
सायासे करिसी प्रपंच दिननिशी । हरिसी न भजसी कवण्या गुणे ॥
ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे । तुटेल धरणे प्रपंचाचे ॥

भाव म्हणजे भगवंताच्या अस्तित्वाबद्दलची श्रद्धा.  भाव, श्रद्धा ह्याची गरज काय?असे विचार काहीवेळा मनात येतात. अशाने अंधश्रद्धा वाढीस लागेल असे तर्क केले जातात. आंधळ्या श्रद्धेने कसा परमार्थ घडेल? असे प्रश्न निर्माण होतात. श्रद्धावान असणे म्हणजे निर्बुद्धपणा असाही बऱ्याच जणांचा समज असतो. तर मग आपले दैनंदिन व्यवहार कसे चालतात? एकमेकांच्या विश्वासावरच ना?! हा विश्वास, ही श्रद्धा नसेल तर?? मानवी व्यवहार बंद पडायला वेळ लागणार नाही. परमार्थातसुद्धा श्रद्धेचे, भावाचे महत्त्व फार आहे. विश्वासामध्ये संशयाला जागा असते; वाव असतो. श्रद्धेमध्ये संशयाला वाव उरतच नाही. आपल्या अंतर्यामी "मी आहे व मी असणार आहे (म्हणजेच मी अमर आहे?!)" याबद्दल कुठलाच संशय येत नाही. तसेच भगवंताच्या अस्तित्वाबद्दल वाटणे हे भगवंताच्या श्रद्धेवरील लक्षण आहे.विश्वास जीवनाला वरवर स्पर्श करतो. श्रद्धा जीवनाच्या मुळाशी जाऊन भिडते. तिला अनुभवाचे ठाम अधिष्ठान असते.संत मायबापांनी देवाचा साक्षात अनुभव घेतला व त्याच्या भक्तीने जीवाचे कल्याण होते हेही सांगितले. संतवचनावर पूर्ण विश्वास ठेवून भगवंताबद्दल अंतःकरणात नितांत श्रद्धा बाळगणे ह्याला भाव म्हणतात. हा भाव नसेल तर हातून देवाची उपासनाच मुळी घडणार नाही आणि घडलीच तर तिला भक्तीचे रूप प्राप्त होणार नाही. भाव ह्या शब्दाचा 'संबंध' असाही अर्थ घेतला जातो. जसे मार्तृभाव,बंधुभाव,शत्रुभाव. "विभक्त नोहे तो भक्त" असा भक्त ह्या शब्दाचा रामदास स्वामींनी अर्थ सांगितला आहे. तर तुकाराम महाराज म्हणतात," देव आणि भक्त दुजा नाही विचार". ही एकत्वाची भावना फक्त श्रद्धेतून केलेल्या उपासनेतूनच येते. तात्पर्य, उपासनेत जर भाव नसेल तर ती उपासना नुसती कवायत होय व भाव असेल तर ती खरी भक्ती होय. या भक्तीतच मुक्ती मिळवून देण्याचे सामर्थ्य आहे. म्हणून...
कैसेनि दैवत प्रसन्न त्वरित । उगा राहे निवांत शिणसी वाया॥केवळ नामस्मरण करून भगवंत प्रसन्न होईल का? देवाचे दर्शन होईल का? मग इतरांनी जे काही केले म्हणजे व्रत,वैकल्यं, यात्रा वगैरे ते आपण केले तर त्वरित फळ मिळेल का? असे नाना प्रश्न सामान्यजनांच्या मनात येत असतात.कारण बरेच प्रापंचिक सामान्यजन हे बहिर्मुख असतात.त्यामुळे जीवनाच्या बाह्यांगाच्या आधारेच विचार करण्याची त्यांना सवय झालेली असते. आपल्या अंतरंगात एकदम झालेली उलाढालही सामान्यजनाला सहन होत नाही. म्हणून सामान्यजनांनी इकडे तिकडे धावाधाव न करता, अधिर न होता, स्वतःला विनाकारण न शिणवता निवांत होवून राहिले तर भगवंत कृपा करून दर्शन देणारच अशी श्रद्धा बाळगणे साधकाच्या हिताचे नाही का ? तुकाराम महाराजांचा एक अभंग ह्या संदर्भात चिंतनीय आहे.
"बैसोनि निवांत शुद्ध करी चित्त । तया सुखा अंत नाही पार ॥
येवोनि अंतरी राहील गोपाळ । सायासाचे फळ बैसलिया ॥
रामकृष्ण हरी मुकुंद मुरारी । मंत्र हा उच्चारी वेळोवेळा ॥"
सर्वसामान्य माणसाचा एक स्वभावधर्म असतो. तो म्हणजे जे काम आवडत नाही किंवा करायचे नसेल त्यासाठी तो काहीतरी कारणे शोधत राहतो. आपल्या प्रापंचिक अडचणींचा पाढा वाचणे ह्यासारखे आणखी मोठे कारण ते कोणते असणार नामस्मरण न करण्याला? "प्रपंच असावा नेटका" हे रामदासस्वामींनी नाही का सांगितले? असे सबळ कारण पुढे करून आपण परमार्थ पुढे ढकलत असतो. हे माहित असल्यामुळे ज्ञानदेव अशा साधकालाच (जो सबळ कारणे देण्यात पटाईत असतो) विचारतात..
"सायासे करिसी प्रपंच दिननिशी । हरिसी न भजसी कवण्या गुणे ॥"रात्रंदिवस प्रपंचाची घडी नीट बसवण्यास कष्ट करावे लागतात. हे तर आपणा सर्वांना माहित आहे. असे जरी असले तरी भगवंतासाठी वेळ काढला पाहिजे. सद्गुरू श्री. वामनराव पै परमार्थाची व्याख्या करताना म्हणतात.. प्रपंच सुखाचा करणे म्हणजे परमार्थ. त्यांच्या "जीवनविद्या मिशन"च्या संगीत जीवनविद्या ह्या ध्वनिफितीत एक गाणे आहे.
"संसाराच्या सुखी कळीतून,सहज फुले परमार्थ खरा"
  जीवनविद्या गुह्य सांगते; ह्या विद्येचा घोष करा"
प्रपंच हातावेगळा करीन आणि मग मी भगवंताकडे वळेन असे म्हणणारा मनुष्य शेवटी फसल्याशिवाय राहत नाही. प्रपंचासाठी रात्रंदिन राबणारा माणूस परमार्थाकडे वळत नाही हे पाहून ज्ञानदेव सांगतात;
"ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे । तुटेल धरणे प्रपंचाचे ॥"प्रपंचाचे धरणे तुटण्यासाठी हरिनामजप करणे ह्यासारखा दुसरा सोपा उपाय नाही. "सायासे करिसी प्रपंच दिननिशी" मधला प्रपंच हा सर्वसामान्यांना अपेक्षित असलेला बायकामुलांचा,घर-गृहस्थी आणि व्यवसायाच्या अपेक्षेत असलेला प्रपंच तर  "तुटेल धरणे प्रपंचाचे" मधील प्रपंच हा शब्द "देह" ह्या अर्थाने आहे. सद्गुरू श्री.वामनराव पै लिहितात.. पाचांचा प्रकर्ष म्हणजे प्रपंच होय. पृथ्वी,आप,तेज,वायु,आकाश या पंच महाभूतांचा प्रकर्ष देहाच्या ठिकाणी झालेला आहे. एरव्ही ही पंचमहाभुते एकमेकांना गिळू पाहतात; पण या देहाच्या ठिकाणी मात्र ती गुण्यागोविंदाने नांदतात. वास्तविक 'मी' देहापासून वेगळा आहे. पण 'मी देह आहे' हा भाव जीवाचे ठायी स्फुरू लागला. या भावबंधनालाच "प्रपंचाचे धरणे" असा शब्दप्रयोग ज्ञानदेव करतात. जोपर्यंत हा देहभाव आहे आहे तोपर्यंत जीवाने वाटेल तेवढी यातायात केली तरी ज्या सुखासाठी त्याची धडपड चालू आहे ते सुख त्याला मिळणे शक्य नाही. या देहभावाची(देहाची नव्हे)तुटी होणे, भावबंधनाची गाठ सुटणे म्हणजेच "तुटेल धरणे प्रपंचाचे"
हे प्रपंचाचे धरणे सुटण्यासाठी साधकाला अंतर्मुख होता आले पाहिजे. नामस्मरणाने साधकाचे मन अंतर्मुख होते. हळू हळू नामात दंग झालो की मनातील विचारांची गती आणि प्रमाण कमी होत जाते."जेथे उठे 'मी'चे स्फुरण तेथे म्हणा विठ्ठल विठ्ठल" अशा नामस्मरणात देहभाव विरून जातो. 'मी'ची देहाशी पडलेली गाठ सुटते. देहभाव जाऊन त्याच्या ठिकाणी देवभाव जागृत होतो. म्हणूनच ज्ञानदेव सांगतात..."हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा । पुण्याची गणना कोण करी॥"
                   "॥ सद्गुरुचरणी समर्पित ॥"

मनाला भावलेले असे हरिपाठाचे अभंग 3

॥ सद्गुरूनाथाय नमः ॥
अभंग # ३.त्रिगुण असार निर्गुण हे सार । सारासार विचार हरिपाठ ॥१॥
सगुण निर्गुण गुणांचे अगुण । हरिविण मन व्यर्थ जाय ॥२॥
अव्यक्त निराकार नाही ज्या आकार । जेथुनि चराचर त्यासि भजे ॥३॥
ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण मनी । अनंत जन्मांनी पुण्य होय ॥४॥

पाठभेदः १.अगुण=अवगुण   २.जन्मांनी=जन्मोनी
ज्ञानदेवांनी हरिपाठाच्या दुसऱ्या अभंगात "मंथुनी नवनीता तैसें घे अनंता। वाया व्यर्थ कथा सांडी मार्गु॥" हा उपदेश केला आहेच. आता तिसऱ्या अभंगातूनही ते  जरा वेगळ्या अंगाने समजावून देत आहेत. ज्यांची बौद्धिक क्षमता जरा चांगली आहे असे विचारी साधक त्रिगुणात्मक प्रकृती,पंचमहाभुतांचा पसारा ह्यांचा विचार करीत असतात. शेवटी हे असार आहे, मिथ्या आहे ह्या विचारापर्यंत ते येतात. नामधारकाने हे सगळे मार्ग न चोखाळता सार आणि असार ह्यात फार लक्ष न घालता "हरिपाठी" स्थिर व्हावे असे ज्ञानदेवांना वाटते; कारण सारासार विचार करूनच भक्तांच्या हाती संतांनी नाम दिले आहे.
" संत एकांती बैसले । सर्वही सिद्धांत शोधिले ।
ज्ञानदृष्टी अवलोकिले । सार काढिले निवडोनि ॥
ते हे श्रीहरीचे नाम । सर्व पातकां करी भस्म ॥
अधिकारी उत्तम अथवा अधम । चारी वर्ण नरनारी ॥"
असे संत निळोबा सांगून जातात. तर.. तुकाराम महाराज सांगतात,
"सत्य साच खरे । विठोबाचे नाम बरे ॥" अथवा
"सगुण निर्गुण तुज म्हणे वेद । तुका म्हणे भेद नाही नामी॥"

मी भावनगरला असता तेथील "दिव्य जीवन संघ" ह्या संस्थेत गीता आणि उपनिषद ह्यावर अभ्यासवर्ग चालत असत. तेथे अगदी सुरुवातीला पंचिकरणशास्त्र शिकविले जात असे. पंचमहाभूतं,त्रिगुण,पंचदेह ह्या सर्वांतून  बाहेर पडताना फार कष्ट पडायचे. मनात नाना प्रश्न आणि शंका घेऊनच आम्ही दुसऱ्या दिवशी जे स्वामीजी हे अभ्यासवर्ग घेत त्यांना भंडावून सोडत असू. हे सगळे ऐकायला, सांगायला ठीक आहे.पण आपल्याला ह्यातून हाती काय सापडले? आपल्या शंका, समस्या ह्यांचे निराकरण झाले का? असा विचार मनात येऊ लागे. मग संतांचा मार्ग अधिक भावू लागला.
सगुण निर्गुण गुणांचे अगुण । हरिविण मन व्यर्थ जाय ॥२॥
मानवी मन-बुद्धी कार्यकारण संबंधातूनच विचार करते. कार्यकारणभाव सोडून विचार करणे आपल्याला जमत नाही. जेथे मानवी बुद्धीला गुणात्मक विचार करून प्रकृतीबद्दल विचार करता आला आणि जेथे त्याची बुद्धी कुंठीत होते तेथे मग तो ईश्वराला 'निर्गुण' संबोधायला लागतो. पण या संबंधीचे निर्णय हे बुद्धीच्या पलीकडे जावून अनुभवानेच घ्यायचे असतात. म्हणून मनाला  हरिनामाचा छंद न लावता शब्दज्ञानात गुरफटवणे व्यर्थ आहे. कारण मन देवाबद्दल ज्या ज्या कल्पना करते त्या त्या शेवटी अपूर्णच ठरतात.
अव्यक्त निराकार नाही ज्या आकार । जेथुनि चराचर त्यासि भजे ॥३॥हे चराचर विश्व व्यक्त आहे. पण ते जेथून उदयाला येते ते तत्त्व अव्यक्त आहे. हे चराचर विश्व विविध आकारांनी भरलेले आहे. पण ते जेथून निर्माण होते ते तत्त्व निराकार आहे. याचा अर्थ असा की, त्या परब्रह्मतत्वाला स्वतःला विशिष्ट आकार नाही. तरीही नाना प्रकारचे आकार घेण्याचे सामर्थ्य त्याच्या ठिकाणी आहे. अशा त्या परमात्म्याचे, हरिचे तू ध्यान कर,स्मरण कर. अथर्वशिर्ष्यात एक छान श्लोक आहे.
"त्वम देहत्रयातीतः । त्वम अवस्थात्रयातीतः ॥
त्वम मूलाधार स्थितोसी नित्यम्॥ "
जेथूनी चराचर त्यासी भजे ह्या ओवीशी साधर्म्य नाही का दाखवत ?
विश्वरूपाने तोच नटलेला आहे हे लक्षात ठेवून त्याचे नामस्मरण केल्याने काय होते? तर..
"ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण मनी । अनंत जन्मांनी पुण्य होय"
साधनेचे अखंडत्व फक्त नामस्मरणातच आहे. ध्यान म्हणजे कृत्रिम स्थिती आहे. नामजप म्हणजे सहज स्थिती!  ध्यान आणि नामस्मरणाचा उद्देश्य मनोलय आणि बुद्धीलय हाच आहे. ध्यानामध्ये तात्पुरता मनोलय असतो तर नामस्मरणामध्ये मनोलय झाला की कायमस्वरूपी असतो. कारण ही सहज स्थिती असते. नामसंकिर्तनयोगात परावाणी म्हणजे समाधी.
        ध्यानी-मनी,जागृती-स्वप्नी भगवंत ही तुर्यावस्था आहे. तुर्यावस्था स्थिर झाली की तीच उन्मनी! ही उन्मनी अवस्था प्राप्त होणे म्हणजे फार मोठे भाग्य!
"उन्मनीच्या सुखा आंत । पांडुरंग भेटी देत ॥
पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी । जागृती स्वप्नी पांडुरंग ॥"

अशी ही उन्मनी स्थिती ज्याचे अनंत जन्मीचे पुण्य फळाला आले आहे अशाच भाग्यवंताला प्राप्त होते. असे जरी असले तरी ही स्थिती याच जन्मात "याच देही याच डोळा" प्राप्त करून घेण्याची सुरेख सोय संतांनी आपल्यासाठी करून ठेवली आहे. ती म्हणजे हरिनाम ! म्हणूनच ज्ञानदेव सांगतात...
हरि मुखे म्हणा,हरि मुखे म्हणा । पुण्याची गणना कोण करी ॥
    
                  ॥ श्री. सद्गुरुचरणी समर्पित ॥

मनाला भावलेले असे हरिपाठाचे अभंग 2

॥ सद्गुरूनाथाय नमः ॥
अभंग # २ चहू वेदीं जाण षट्शास्त्रीं कारण । अठराही पुराणे हरिसी गाती ॥
मंथुनी नवनीता तैसें घे अनंता । वाया व्यर्थ कथा सांडी मार्गु ॥
एक हरि आत्मा जीवशिवसमा । वाया तूं दुर्गमा न घाली मन ॥
ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ । भरला घनदाट हरि दिसे ॥

पाठभेदः
१. षट्शास्त्री = साही शास्त्रीं, २. जीवशिवसमा = जीवशिवसम

कोणताही शास्त्रज्ञ एखादे संशोधन सुरू करतो तेंव्हा त्याचे स्वतःचे एक hypothesis असते. त्यावर पूर्ण श्रद्धा ठेवूनच तो आपल्या संशोधनाला सुरुवात करतो. रात्रंदिवस वाचन,प्रयोग, मनन आणि निदिध्यासन ह्या अभ्यासप्रक्रियांचा आधार घेत तो कार्यरत राहतो. अंतिमता आपल्या hypothesisला बळकटी देणाऱ्या निष्कर्षाप्रत तो पोहचतो. निष्कर्षातून विश्वास प्रगट होतो. मानवी जीवनातील सर्वोत्तम मूल्य "आत्मज्ञान किंवा भगवंताचे दर्शन करून घेणे हे असून ते नामस्मरणाने शक्य आहे" हे ज्ञानदेवांचे hypothesis आहे; ज्याचा शेवट " समाधी संजीवन हरिपाठ" ह्यात आहे असे एकंदरीत हरिपाठ वाचल्यावर वाटते.
              hypothesis मांडल्यानंतर आपल्या hypothesis पुष्ट्यर्थ literature review देण्याची प्रथा शास्त्रीय लेख लिहिताना आढळते. हरिपाठातही ज्ञानदेव ही प्रथा सांभाळण्याचे भान ठेवतात.आपल्या hypothesis पुष्ठ्यर्थ तेही literature review देतात. भारतीय अध्यात्मशास्त्र अगदी वेदकाळापासून मानवी जीवनातील सर्वोत्तम मूल्यांचा विचार करताना आढळते. चार वेदांचे मंत्र, त्यांचे ब्राह्मणग्रंथ, आरण्यकें आणि उपनिषदे मिळून वैदिक वाड्मय तयार होते. न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, पूर्वमिमांसा आणि उत्तरमिमांसा किंवा वेदांत ही सहा दर्शनशास्त्रें आहेत. असंख्य पुराणातून (जी १०८च्या वर असून) ब्रह्मपुराण,विष्णुपुराण, पद्मपुराण, भागवत इत्यादी अठरा पुराणें अधिक प्रचलित आणि मान्य आहेत.ह्या सर्व अफाट वाड्मयामध्ये आत्मज्ञान अथवा भगवंताचे दर्शन हेच मानवी जीवनातील सर्वोत्तम मूल्य मानलेलें आढळते.
       वेदांच्या जाणण्याचा विषयही तोच ( हरी ) आहे. विश्वाच्या उत्पत्तीचे कारण शोधण्याचा षट्शास्त्रे प्रयत्न करतात. वस्तुतः आणि तत्वत्तः श्रीहरीच विश्वाच्या उत्पत्तीचे कारण आहे. म्हणूनच षट्शास्त्राच्या निर्मितीला कारणही तोच आहे. अठराही पुराणांतून हरीचेच गुणवर्णन आहे. अध्यात्मशास्त्राच्या सिद्धांत आणि साधना ह्या दोन्ही अंगांचे वर्णन वेद आणि शास्त्रांमध्ये आढळते. पण ते एकमेकांत बरेचसे मिसळलेले आढळते. शिवाय त्यांत पुष्कळ अवांतर गोष्टी वर्णन केलेल्या असतात. अशावेळी सारासार विचार वापरून आपल्या साधनेला ज्या गोष्टी उपयोगी नाहीत त्या व्यर्थ समजून त्याच्या मार्गाला जाऊ नये. त्यांच्या नादीं लागू नये. 
"मंथुनी नवनीता तैसे घे अनंता । वाया व्यर्थ कथा सांडी मार्गु ॥"        दुसऱ्या अभंगातील ही ओवी मला अतिशय आवडते.कारण ह्या एका ओवीतच ज्ञानदेव ज्ञानमार्ग (सिद्धांत) आणि साधनामार्ग ह्यातील नेमके काय घ्यायचे हे साधकाला समजावून देत आहेत. सिद्धांताच्या भागातून भगवंत  आणि साधना मार्गातून नामस्मरण घ्यावे. साधनेच्या अंगाने सद्गुरू श्री. वामनराव पै "ज्ञानेशांचा संदेश"ह्या ग्रंथात लिहितात... मंथनाने दह्यात विखुरलेले लोण्याचे कण एकत्र आणले जातात व नंतर त्याचाच एक लोण्याचा गोळा तयार होतो. त्याचप्रमाणे ज्ञानरुप जीवाचे आनंद हे स्वरूप आहे. ज्ञानात आनंद विखुरलेला आहे. म्हणून तो जीवाला अव्यक्त आहे व त्याचा भोग न मिळाल्यामुळे जीव अतृप्त असतो.ज्ञानरुप जीवाने या आनंद स्वरूपात स्वतःला समाधीच्याद्वारे विरवून घेणे हा मुक्तिसुखाचा मार्ग, तर नामसंकीर्तनाच्या द्वारे आनंदस्वरुपाला ज्ञानरुपात व्यक्त करणे हा भक्तिसुखाचा प्रकार. हरि म्हणजे आनंद असे एकनाथ महाराजांनी त्यांच्या हरिपाठात सांगितले आहे.
"सत्पद ते ब्रह्म,चित्पद ते माया । आनंदपद हरि म्हणती जया ॥"
तुकाराम महाराजही वेदांचे सार "नाम" हेच आहे असे सांगतात आणि नामस्मरण साधनेचाच घोष करतात.
"वेद अनंत  बोलिला । अर्थ इतुकाची साधला ॥
विठोबासी शरण जावें । निजनिष्ठे नाम घ्यावे ॥
सकळ शास्त्रांचा
विचार । अंती इतुकाची निर्धार ॥
अठरा पुराणी सिद्धांत । तुका म्हणे हाचि हेत॥ "
                       किंवा
"चारी वेद जयासाठी । त्याचे नाव धरा कंठी ॥
न करी आणिक साधन । कष्टसी का वायांविण ॥
अठरा पुराणाचे पोटी । नामाविण नाही गोठी ॥
तुका म्हणे सार धरी । वाचे हरिनाम उच्चारी ॥"

अगदी शेवटी नामस्मरणातून आलेल्या आत्मानुभूतीतून ते सांगून जातात...
"वेदांचा अर्थ आम्हासी पुसावा । येरांनी व्हावा भार व्यर्थ॥"
त्यांना समकालीन असणारे रामदास स्वामीही साधकाला हाच उपदेश करतात.
"नको शास्त्र अभ्यास व्युत्पत्ती मोठी । चढे गर्व ताठा अभिमान पोटी ॥
घडे कर्म खोटे बहू हा दगा रे । हरे राम हा मंत्र सोपा रे॥ "
दासगणू महाराज रचीत "गजानन विजय" ह्या गजानन महाराजांच्या चरित्रवजा पोथीत त्यांचे शिष्य श्री. श्रीधर गोविंद काळे ह्यांनाही असाच उपदेश गजानन महाराजांनी केलेला दिसतो. 
"या भौतिकशास्त्राहून । योगशास्त्र समर्थ असे ॥
योगशास्त्राहून अध्यात्मविचार श्रेष्ठ असे ॥
तो जमल्यास करूनी पाही । कोठे न आता जाई येई ॥
" (अध्याय १५ ओवी १३०-१३१)
"एक हरि आत्मा जीवशिव समा । वाया तू दुर्गमा न घाली मन ॥" 
       ही ओवी वाचताना, सर्वसामान्य साधकाला सन्मार्गाला (म्हणजे भक्तिमार्गाला,जो सहज आणि सोपा आहे) प्रवृत्त करण्याचे,वैष्णव आणि शैव पंथिय ह्यांना विचारात घेऊन त्यांच्यातच ऐक्य साधण्याचे ज्ञानदेवांचे प्रयत्न असल्याचे जाणवते. शैव आणि वैष्णव पंथिय ह्यांच्यातील वाद आपणास ज्ञात असेलच. अगदी दृश्य स्वरूप म्हणजे एका पंथाचे अनुयायी कपाळाला आडवा गंध लावतात; तर दुसऱ्या पंथाचे अनुयायी उभा गंध लावतात. प्रत्येकाची भगवंत प्राप्तीची साधना भिन्न आहे. ज्ञानेश्वरीत ज्ञानदेवांनी हे सविस्तर सांगितले आहे. एकदा का आत्मतत्त्व साधकाच्या हाती आले की मग शिव, हरी आणि जीव हे सगळे एकच(आत्मा) आहे हे त्याला अनुभवता येते. तसेच साधक  शब्दज्ञानात शिरला की आपण मोठे ज्ञानी आहोत असा भ्रम त्याच्या ठिकाणी निर्माण होतो.याचा परिणाम इतका विपरित होतो की त्या साधकाला परमार्थ सिद्धी तर नाहीच प्राप्त होत पण त्याची अधोगती मात्र होते.
"नाश केला शब्दज्ञाने । अर्थे लोपली पुराणे ॥"दुसरे कारण म्हणजे तत्त्वज्ञानांत सांगितलेले अंतिम सिद्धांत हे खऱ्या अर्थाने समजूच शकत नाही. कारण ते बुद्धीच्या 'पलीकडले' असतात. ते अंतिम सिद्धांत समजून घेण्याचा मार्ग एकच आणि तो म्हणजे अनुभव. हा अनुभव साधकाला ईश्वरीकृपेने किंवा सद्गुरूकृपेनेच शक्य आहे. साधक जर अखंड नामात रंगला तरच ह्यांची कृपा सहज होत असते.
           म्हणूनच साधकाने शब्दज्ञानात, शब्दजालात आणि इतर साधनामार्गात स्वतःला अडकवून ने घेता अखंड नामस्मरणाचाच अभ्यास करावा असा ज्ञानदेव महाराज त्याला उपदेश करतात. ज्ञानदेवांचाच अनुभव आहे....
"ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ । भरला घनदाट हरि दिसे ॥"हरिपाठाच्या म्हणजेच अखंड नामस्मरणाच्या प्रभावाने दृष्टी हरिरूप झाली व सर्वत्र हरिच घनदाट भरलेला दिसत आहे. हा भूलोकच त्यांना वैकुंठासमान वाटतो. ज्ञानी म्हणतात "सर्वम् खल्विदम् ब्रह्म" आणि नामधारक भक्त म्हणतात "भरला घनदाट हरि दिसे" ह्या दोन सिद्धान्तात काय फरक आहे? मला तरी काहीच दिसत नाही. ज्ञानदेव म्हणतात ते सत्य, भक्तिमार्ग आणि नामस्मरणसाधना, स्वीकारण्याशिवाय नामधारकाला काही पर्याय नाही. म्हणूनच ज्ञानदेवांचा उपदेश...
"हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा । पुण्याची गणना कोण करी ॥"साधकाने का स्वीकारू नये ??
                        ॥ श्री. सद्गुरुचरणी समर्पित ॥

मनाला भावलेले असे हरिपाठाचे अभंग

॥ श्री‌सद्गुरुनाथाय नमः ॥   
अभंग # १.देवाचिये द्वारी उभा क्षणभरी । तेणे मुक्ति चारी साधियेल्या ॥
हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा । पुण्याची गणना कोण करी ॥
असोनि संसारी जिव्हे वेगु करी । वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ॥
ज्ञानदेव म्हणे व्यासाचिया खुणा । द्वारकेचा राणा पांडवा घरी ॥पाठभेद...
ज्ञानदेव म्हणे व्यासाचिया खुणे । द्वारकेचे राणे पांडवा घरी ॥

श्री.ज्ञानदेवांना "ज्ञानियांचा राजा" का म्हणतात ह्याची झलक हरिपाठातील ह्या पहिल्याच अभंगातून नजरेत भरते. आधुनिक शास्त्रीय भाषेत सांगायचे झाल्यास हरिपाठ हा "ज्ञानियांच्या राजांचा" अद्वैताची बैठक न मोडता लिहिलेला अध्यात्मशास्त्रातील नामस्मरणसाधनेवरील एक शोधनिबंधच आहे. एखाद्या scientific journal मध्ये जेंव्हा शोधनिबंध प्रसिद्ध होतो तेंव्हा प्रामुख्याने Abstract, Methods & methodology, results आणि शेवटी conclusion  अशा ४  भागात ढोबळमानाने लिहिलेले असते. ह्या धर्तीवर म्हणायचे झाल्यास अभंग#१ हा ज्ञानदेवांच्या शोधनिबंधातील abstract म्हणायला हरकत नसावी. त्यांचे हे लेखन ललितलेखन नसून अध्यात्मविषयातील शास्त्रीयलेखनच आहे हे म्हणायला भरपूर वाव आहे. अध्यात्मशास्त्रातील वेद,शास्त्रं,पुराणे ह्या ग्रंथांचे त्यांनी दिलेले संदर्भ आणि नामस्मरणासंबंधी केलेले स्वतःचे अनुभवकथन...
"ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी । धरोनी श्रीहरी जपे सदा ॥" हे त्यांचे अनुभव लक्षात घेऊन शेवटी त्यांनी काढलेले अनुमान
"लटिका व्यवहार सर्व हा संसार । वाया येरझार हरीवीण ॥" हेही ज्ञानोत्तर भक्तीची फलश्रुतीच आहे. वरील अनुमान आणि "अहं ब्रह्मास्मि" च्या अनुभूतीतून " ब्रह्म सत्य । जगत् मिथ्या ॥"ही वेदांतांच्या अभ्यासकांनी केलेली गर्जना ह्यात काय फरक आहे? मला तरी काही दिसत नाही.
          "देव"ही संकल्पना मानवी जीवनात कशी अस्तित्वात आली असावी ? सर्वसामान्य माणूस म्हणतो की 'मी' देव मानतो किंवा देव मानत नाही.पण हे दोन्हीही त्याच्या कल्पनेचेच खेळ असतात.वास्तव फार दूर असते. "मी" हा प्रत्येकाच्या ठायी आहेच. परंतु "मी जीव ऐसा करिता संकल्प । प्राणि झाला अल्प देहबुद्धीचा". सर्वसामान्य माणसाच्या मनात असलेली भिती,वासना ही ह्याचीच फलनिष्पत्ती आहे. सर्वात मूलभूत भिती आहे ती मरणाची आणि लालसा आहे ती जगण्याची.मात्र "किती वेळा जन्मा यावे । किती व्हावे फजित ॥ " ही त्याची शोकांतिका आहे.प्राचीन भारतीय ज्ञानी अभ्यासकांनी ह्या "मी"चा आणि मरणाचा विचार केला,चिंतन केले आणि अध्यात्मशास्त्र जन्माला आले असावे. भारतीय ज्ञानवंतांची एक खुबी आहे. त्यांनी अंतिम सत्य तर शोधलेच. पण तेथपर्यंत सर्वसामान्य माणूस कसा पोहचेल हेही पाहिले. अध्यात्मशास्त्रातील स्वतःला आलेली दिव्य अनुभूती इतरांनाही यावी ह्या शुद्ध हेतूनेच त्यांनी देव ही संकल्पना उभी केली असावी.       
            सर्वसामान्य माणसाची देवाबद्दलची कल्पना वेगळी आहे. ज्ञानदेवांनी हरिपाठात मांडलेला विषय लक्षात घेवूनच "देव" ही संकल्पना विचारात घेतली पाहिजे.ज्ञानदेवांनी लिहिलेला "हरिपाठ" हा अध्यात्ममार्गातील साधक, मुमुक्षू ह्यांच्यासाठी आहे. ज्ञानदेवांसारखा 'ज्ञानियांचा राजा' शब्दप्रयोगाबाबतीतही तेवढाच सावध असणार हे मान्य करायलाच हवे. त्याप्रमाणेच आपण त्या शब्दांकडे पाहिले पाहिजे.
'देव' हा शब्द 'दिव्य' ह्या संस्कृत शब्दाच्या अपभ्रंशातून तयार झाला असावा असे मला वाटते. स्वामी अरविंदबाबूही आपल्या लिखाणात divine mother असा शब्दप्रयोग करतात.प्रत्यक्ष सद्गुरू जेंव्हा देवाची ओळख करून देतात आणि त्याच्या स्वरूपाची अनुभूती येते तेंव्हा आपल्या जाणीवेलाही त्या दिव्यत्वाचा स्पर्श होतो.
अध्यात्मशास्त्राच्या अपेक्षेत देवाची ३ रूपे आहेत.
१. निर्गुण स्वरूप... हे जीवाला सर्वथैव अगम्य आहे.
२‌‌. सगुण रूप...  म्हणजे सच्चिदानंद रूप जे आकळण्याच्या पलीकडे आहे पण प्रतीतीला मात्र येते. ह्या रूपाची तीन पदे आहेत. सत्, चित् आणि आनंद.
समजुतीसाठी जरी तीन पदांचा वेगवेगळा विचार केला तरी प्रत्यक्षात ही पदे वेगळाली नाहीत. इतकेच नव्हे तर त्यांना वेगळे करताही येणे शक्य नाही.
३. साकार रूप... स्वतः निराकार असूनही अनंत आकार घेण्याचे सामर्थ्य त्याचे ठिकाणी आहे.
       असा हा देव "हृदयात" राहतो असे म्हणतात. मी एका हृदयरोगतज्ञाच्या व्याख्यानाला गेलो असता त्यांनी 'हृदय' ह्या शब्दाची फोड केली होती. ती अशी...
री द य म्हणजे जेथून येते आणि जेथे जाते ते ठिकाण. स्थूल देहाबाबतीत हे पटकन लक्षात येते. शरीरातील रक्त जेथून जाते आणि जेथे परत येते ते हृदय. स्थूल शरीरातील रक्ताप्रमाणे आपल्या ठिकाणी असणाऱ्या सूक्ष्मदेहातील"मी"ह्या स्फुरणाबाबतही असे म्हणता येईल. ते ठिकाण हे शरीरातील हृदयापेक्षा वेगळे आहे. पण हरिपाठात ज्ञानदेव नामजपाच्या अपेक्षेत देवाकडे पाहत आहेत.
"परेहुनि परते घर । तेथे राहू निरंतर ॥
सर्वांचे जे अधिष्ठान । तेचि माझे रूप पूर्ण ॥"
नामदेवांचा वरील अभंग लक्षात घेतला आणि ज्ञानदेवांचे (नामजपाद्वारे वाणीचा हात धरून) संजीवन समाधीसुखाचे अनुभवकथन पाहिले तर"देवाचिये द्वारी" लक्षात येईल. नामसाधनेला वैखरीपासून सुरूवात होते आणि हळूहळू ह्या नामाला सूक्ष्मता येते आणि ते आतल्या आत सहज चालते. या वाणीला मध्यमा म्हणतात. मध्यमेत स्थिर झालेले नाम अंतःकरणाला व्यापणास सुरूवात होते. तेथे नामाचा पश्यंती वाणीमध्ये प्रवेश होतो. साधक स्वप्रयत्नाने येथवर पोचतो. पण पुढे परा वाणीत जप होण्यासाठी एकतर ईश्वरीकृपा तरी हवी किंवा सद्गुरूंनी अनुग्रह केला पाहिजे. सद्गुरू काही काळ ह्याचा अनुभव देतात. मी तर असे म्हणेन की जे संत असा अनुभव साधकाला / शिष्याला देऊ शकतात तेच खरे सद्गुरू! तो अनुभव खरंच दिव्य असतो. सद्गुरू सत्शिष्याला परा वाणीची एक झलक दाखवून साधकाला साधनेची दिशा देतात. देवाच्या दारात नेऊन उभे करण्याचे काम सद्गुरू करतात. पण त्यासाठी आपल्या मनाची कवाडे उघडता आली पाहिजेत. त्यासाठी हवी श्रद्धा! श्रद्धेने जर देवाच्या दारात जीवनातील प्रत्येक क्षण नामाने भरत राहिलो तर "चारी मुक्ति" साधता येणे सोपे आहे. काही ठिकाणी "क्षणभरी" म्हणजे क्षणभर असा अर्थ घेतात. पण  ज्ञानदेवांनीच हरिपाठाच्या २७व्या अभंगात सांगितले आहे,
" सर्वसुख गोडी साही शास्त्री निवडी । रिकामा अर्धघडी राहू नको ॥ "ह्यावरून असे समजायला हरकत नसावी की प्रत्येक क्षण नामाने भरता आला पाहिजे. प्रत्येक क्षणाच्याठायी 'उभा' राहा म्हणजे सावध राहा. तसे पाहिले तर ट्रॅफिक हवालदारही नोकरीवर 'उभा' असतो. पण त्याचे अधिक लक्ष असते ते कोणता वाहनचालक नियमभंग करतो आणि मी त्याच्याकडून हप्ता वसूल करतो.देशाच्या सीमांचे रक्षण करणारा जवानही 'उभा'असतो. पण तो सावध असतो ते शत्रूंकडून काही हमला होणार नाही ह्याची काळजी घेत सीमांचे रक्षण करण्याबाबतीत. भक्तांचे ४ प्रकार गीतेत वर्णनिले आहेत. अर्थार्थी,आर्त,जिज्ञासू आणि ज्ञानी ! ज्ञानदेव 'हरिपाठ' हा जिज्ञासू / मुमुक्षू साधकासाठीच लिहीत आहेत. त्याची तुलना फक्त देशरक्षणासाठी सावध असणाऱ्या जवानाशीच व्हावी असे वाटते. मुमुक्षू साधक जर सावधपणे देवाच्या दारात उभा राहिला तर चारी मुक्ती साधता येतात.
मुक्तीची भाषा फक्त ज्ञानीच करतात. साधेनेची फलश्रुतीच ती आहे. संत मात्र  " न लगे मुक्ती धनसंपदा । संतसंग देई सदा ॥" हेच मागणे मागतात.  किंवा
"मोक्ष तुमचा देवा । दुर्लभ तो तुम्ही ठेवा ॥ "हे देवाला ठणकावून सांगतात. जन्ममृत्यूतून सुटण्याची भाषा त्यांची नसते. उलट ते सांगतात,
"का रे न घ्यावा जन्म । प्रेम लुटावे नाम॥"
समाधिसुखाचीही आस त्यांना नसते. कारण त्यांनी नामसंकीर्तनातून ब्रह्मरसाचे सेवन केले असते.म्हणूनच ते म्हणतात,
"समाधिचे सुख सांडा ओवाळूनी । ऐसा या किर्तनी ब्रह्मरस॥"
मुक्ती ही, काही सर्वसामान्य माणसे समजतात तशी मेल्यावर मिळविण्याची गोष्ट नाही. मेल्यावर जीवाचे काय होते यापेक्षा जीवंतपणीच त्याचे काय झाले पाहिजे याचाच संत अधिक विचार करतात.म्हणूनच ज्ञानेश्वर महाराज एके ठिकाणी सांगतात,
"मेल्यावरी मोक्ष मिळती । ऐसे जे म्हणती, ते अति मूर्ख ॥"ह्याचवेळी संतांना अपेक्षित असेलेले मरण कसे असावे?तर ते असावे...
"आपुले मरण पाहिले म्या डोळा। जाहला तो सोहळा अनुपम्य॥" असे!
संतांचा मोक्ष हा उधारीचा नसून रोकडा आहे.ते सांगतात,
"मुखी नाम हाती मोक्ष।ऐसी साक्ष बहुतांसी॥"नामसंकिर्तनातूनही ही मुक्ती साधता येते. अध्यात्मशास्त्रात सांगितलेल्या मुक्तीचे चार प्रकार आहेत.
१. सलोकता...
   "मद्भक्ता यत्र गायंति तत्र तिष्ठामि नारद"
२. समीपता... नामधारकाला देवाच्या सान्निध्याने ही मुक्ती लाभते. कारण
"जेणे नाम धरिले कंठी। धावे त्याच्या पाठीपाठी ॥"३. सरूपता... "प्रभुच्या नामाचा उच्चार व त्याच्या स्वरूपाचे स्मरण" असे नामस्मरण सतत केल्याने 'मी' देह नसून 'ज्ञानरूप,चिद्रूप,चैतन्यरूप आहे' याचा बोध सद्गुरूकृपेने त्याला प्राप्त होतो. ही नामधारकाची सरूपतामुक्ती होय.
४. सायुज्यता...म्हणजे एकरूपता‌. साधक आपल्या आनंदस्वरुपाशी समरस होतो आणि त्याचे मुखी येते,
'ब्रह्मानंदी लागली टाळी । कोण देहाते सांभाळी॥'देवाच्या दारात नामाने क्षण भरीत राहिले तर मुक्ती मिळणारच. पण हे आहे अंतिम साध्य!
"हरि मुखे म्हणा । हरि मुखे म्हणा॥" ज्ञानदेवांच्या ह्या आज्ञेचे "असोनि संसारी जिव्हे वेगु करी" असे पालन केले तर अगणित पुण्यप्राप्ति होते. नामस्मरणाचे अनेक प्रकार आहेत. मला स्वतःला जिव्हेने वेगात घेतलेले नामच अधिक छान वाटते; फलदायी वाटते. जिभेच्या ठायी ज्ञानेंद्रिये आणि कर्मेद्रिये वास करतात हे सहज कळते. पण ह्याच जिभेच्या ठायी मन हे गुप्त रुपाने वास करीत असते. मन नामावरून इतरत्र भरकटू लागले की जिभेचा वेग मंदावतो. साधक खरेच सावध असेल तर त्याला हे लगेचच कळते आणि तो पुन्हा जोमाने नामस्मरण करू लागतो. त्याचा आंतरिक प्रवास अधिक सुलभ होतो.  वेदशास्त्रें बाह्या उभारुन नामधारकाला आपलेसे करतात. त्यातील शिकवणीची गोडी लागली की ज्ञानलालसा अधिक तिव्र होते. अशा साधकाला ज्ञानदेव विश्वास देतात तो असा,
"ज्ञानदेव म्हणे व्यासाचिया खुणा।द्वारकेचा राणा पांडवाघरी॥ज्ञानदेव 'पांडव' हा शब्द ज्ञानेश्वरीत अर्जुनालाच उद्देशून वापरतात.
"परि तयापाशी पांडवा । मी हारपला गिवसावा ॥
जेथ नामघोषु बरवा । करिती माझा ॥"
गीतेत संवाद आहे तो गुरु-शिष्यांचाच! अर्जुन जेव्हा श्रीकृष्णाला शरण जातो आणि त्याचा सद्गुरु म्हणून स्विकार करतो; तेव्हाच श्रीकृष्ण त्याला गीता उपदेश करतो.हरिपाठातही 'पांडव' हा शब्द अर्जुनाच्याच अपेक्षेत ज्ञानदेव वापरतात. त्याचे मुख्य कारण म्हणजे अर्जुन हा एक श्रेष्ठ नामधारक होता. हरिपाठात ज्ञानदेवांना "नामसाधने"बद्दलच सांगायचे आहे. मग 'पांडव' हा शब्द अर्जुनाशिवाय आणखी कुणाच्याबाबतीत ते वापरतील? इथे एक गोष्ट मात्र बऱ्याचदा दुर्लक्षिली जाते. 'द्वारकेचा राणा'श्रीकृष्ण असा जेव्हा ज्ञानदेव उल्लेख करतात तेव्हा त्यांना शिष्याच्या अपेक्षेत सद्गुरू हेच अपेक्षित आहे. कारण सद्गुरूच साधकाला देवाच्या दारात क्षणभर तरी उभे करून त्याला चारी मुक्तींचा अनुभव करुन देवू शकतात. किंबहुना सद्गुरू म्हणजे सर्वेश्वराचे साकार रूपच! कदाचित म्हणूनच संत म्हणतात,
"सद्गुरूवाचुनि सापडेना सोय । धरावे ते पाय आधि-आधि॥"
               ॥ श्री सद्गुरुचरणी समर्पित ॥

शनिवार, ११ जून, २०११

दत्ता म्हणे

             ।।भारूड।।
जाणा खोटा रे खोटा। नाही गुरूचा बेटा।।धृ।।
गर्वात राही सिद्धि मिळुनी। मुखी बोले ते होई जाण।
स्वये कामात राही लोळुन। लोका शिकवी ब्रह्मज्ञान।।
कुंडलिनीस जागवुन। ब्रह्मरंध्रा नेली जाण।
स्वये वासना अधिन। राहे वैराग्य भासवुन।।
प्राणीमात्रा भेद करून। नाही ओळखे नारायण।
उच्च नीच भाव ठेऊन। तिरस्कारले सारे जन।।
साही शास्रे केली पाठ। चारी वेद मुखी म्हणत।
झाला पंडित विख्यात। नाही तुटे कामिनी संगत।।
दत्ता म्हणे जो ओळखे सद्वस्तुशी। जो जाई झणी गुरूपाशी।
जेणे त्यागिले देहभोगासी। तोची देखे परब्रह्मासी।।
तोचि मोठा रे मोठा। जाण गुरूचा बेटा।।  
        
                          .....डीसिताराम 





शुक्रवार, १० जून, २०११

दत्ता म्हणे

आलो वैखरीच्या गावी। अहं सोहं बोध होई।।
वेगी जाऊ मध्यमात। ध्वनि ऐकु अनाहत।।
जीव शिव ऐक्य झाले। नाद पुढे प्रगटले।।
झाले देवाचे दर्शन। क्षीणदोष झाले मन।।
झणी पश्चंतीच्या गावा। घेऊ घडीचा विसावा।।
ओळखली परावाणी। साऱ्या विश्वाची जननी।।
पाहू सुखाचे सोहळे। नादब्रह्म पांगुळले।।
दत्ता गेला परेपार। स्वये झाला ब्रह्माकार।।


सहस्रदळावरी तेज प्रगटले।
स्वरूपी लावले आत्मत्त्वी।।
आत्मत्त्वपुढे आटले आटले।
ब्रह्मतेज ठाकले कौतुकाने।।
अहंब्रह्म भाव तोही मावळला।
सोहं पांगुळला अळुमाळु।।
दत्ता म्हणे संती ठेवा हा विश्वास।
कौतुके सायास करू नका।।

     .....डीसिताराम












गुरुवार, ९ जून, २०११

दत्ता म्हणे

श्रीरामाचे श्लोक

वंदन करीतो गणेशा पुढती।
आरुढ व्हावे जी बसावे पुढती।।
वीणा हस्तकी वंदीली माय देवी।
जाण बाळक अज्ञानी कृपा व्हावी।।

मी मी करीत गर्वात वाया गेलो।
तू तू करीत स्वरुपी नष्ट झालो।।
धाव अनंता कृपा सर्वदा राहो।
आत्मस्वरुपी मलिन नाश पावो।।

बरा पावला मानव जन्म मना।
उगा सांडशी योगी केशव राणा।।
पाठी रामचंद्र उभा घनःश्याम।
त्याचेनी योगे पावशी सर्व काम।।

हनुमंत ज्याशी पुजी सर्वकाळी।
असा रघुविर स्मरे चंद्रमौळी।।
त्याशी स्मरीता बाणली वृत्ती शान्ति।
जीवा दाटली वास केली विश्रान्ति।।

नाना भोगुनी मानव जन्म झाला।
अहंता क्रोधात उगा शिणवला।।
घेई घेई रे राम नाम मुखाने।
तेणे पाविशी जन्मोजन्मी सुखाने।।

आधी रामनाम मग राम रुप।
त्याच्या स्वरुपी नाही मुळी माप।।
घडोघडी त्याशी स्मरीता स्वभावे।
सदा संकटी कळवळुनी धावे।।

सदा रामधुन मनात वसु दे।
कैवल्य आनंद ह्रदयी वसो दे।।
पाहतो पाहतो राम रघुविर।
राहतो राहतो सारे चराचर।।

नको रे स्मरु गतकाळ शोकाचा।
नाही मानवा भरवसा कशाचा।।
नाशिले आयुष्य नाही काळ वेळ।
सदा स्मरा वेगु भक्त प्रतिपाळ।।

तृषार्त मनी नाम वदत जावे।
सर्व कामना वेगी सांडी स्वभावे।।
दिनानाथ राम आहे एक बाणी।
सदा रक्षी मागे पुढे चक्रपाणी।।

सर्व जिवांचा एक आराम आहे।
करुणाकरा श्रीहरि तोषताहे।।
सदा भक्त रक्षी आघात सोसुनी।
रघुरायाचे पाय स्मरितो मनी।।

सकल जिवांचा करीतो सांभाळ।
तेजस्वी शोभतो वीर घननिळ।।
धर्म रक्षण्या धावी युगानुयुगी।
आत्मतेजस्वी शोभे श्रीमान योगी।।

नको मानवा राघवेविण आशा।
नास्तिक्ये होईल जीवन निराशा।।
उठ सांड वेगी आलस्य प्रमाद।
नको करु उगा कशाचा रे खेद।।

प्रभु रामराजा धावे भक्त काजा।
जीव शीव ऐक्य करी आत्मराजा।।
उन्मनी दाटली खळाळुन आली।
सकल कामला ह्रदयी निमाली।।

राम राम श्वासे रोम रोम बोले।
पाऊली पाऊली हनुमंत डोले।।
गर्जने हुंकारे घेई राम नाम।
असा हनुमंत शोभे पुर्णकाम।।

ज्याचा सखा राम सर्वदा आराम।
आत्मरती रमे पाही घनःश्याम।।
जानकी रमणा भक्तकल्पदृमा।
नमस्कार तुज कोटी कोटी रामा।।

तुझे गुण वर्णिँता जिव्हा थकेना।
पाऊली पाऊली जानकी रमणा।।
नाही आदि मध्य नाही त्याशी अंत।
सदा पाठीराखा उभा बळवंत।।

अरे दुःख भोग कोणाशी टळतो।
जे जे कर्म केले तैसेची भोगतो।।
पहा रे रावणा गर्वे नष्ट झाला।
अकस्मात लंकेसहित बुडाला।।

पित्यासाठी ज्याने वनवास केला।
असा रामचंद्र आदरे पुजीला।।
राक्षसा करुनी खंडण मंडन।
तेजे तळपे राम कैवल्य जाण।।

लक्षुनी पाही रे अंतरी आपणा।
दुर्गुणी भरला काम क्रोध नाना।।
रिक्त करुनिया गुणदोष सारे।
श्रीराम स्थापना वेगेशी करारे।।

राम नाम ध्याता एकरुप झाला।
मनाच्या गाभारा श्रीराम ठसला।।
विश्वस्वप्न वाटे स्थिति आरुढला।
ब्रह्म ऐक्य झाला स्वरुपी निमाला।।

राम नाम घेता कोण वाया गेला।
गर्वे अधांतरी उगाच सांडला।।
स्मरी सिताकांत कौसल्या नंदना।
अति आदरे पुजी वल्लभ राणा।।

रामनामी विश्व मृगजळ वाटे।
तुर्यातितवस्था अंतरी प्रगटे।।
हीच योगियांची ब्रहमानंद टाळी।
सदैव निमग्न राही चंद्रमौळी।।

प्रेमे स्नेहभरे पुजावे तयाशी।
अति आदरे तोषवावे प्रभुशी।।
सख्य जोडता भय लोपले मनी।
चराचरी त्याचा वास राही गुणी।।

चराचरी भक्त एकरुप झाला।
ब्रह्म ऐक्य रसी न्हाऊनी निघाला।।
विश्व त्याचे घर प्रभुचे निवास।
नाही भेद मनी अखंड स्थितीस।।

राम नाम घेता ब्रह्मरुप झाला।
जन्म मरणाचा फेरा चुकविला।।
ब्राह्मी दृढावली जीव शिव ऐक्य।
दृढ मना भासे एकची अनेक।।

जे जे काही एक गतिमान आहे।
ते ते श्रीराम वास करुनी आहे।।
घेई ध्यानी मनी परब्रह्म रुप।
सहज चिंतनी प्रगटे स्वरुप।।

अरे मानवा उठ संदेह सांडी।
रुप सगुण जोडी विकल्प मोडी।।
ज्ञानदृष्टी फाकवी जाणुन घेई।
वसले चैतन्य सर्व भूतां ठाई।।

आहे श्रीराम माझा कोदंडधारी।
काळाते थरारी भक्ता तारी तारी।।
त्याचे गुण गाता जिव्हा थकेना।
नमस्कार माझा तुज नारायणा।।

भटकु नको रे उगा तीर्थ नाना।
पडे बंधनी काम करी ठणाणा।।
स्मरी वेगु मनी भक्त प्रतिपाळा।
सदा संकटी धावे प्रभु कळाळा।।

ठायाची बैसोनी अंतरी लक्षी रे।
प्रभुची स्थापना ह्रदयी करारे।।
स्मरा सिताकांत त्याचे गुण गाता।
नमस्कार तुज कृपाळु अनंता।।

कृपाळु मवाळु स्नेहाळु दयाळु।
प्रभू रघुविर असे घननिळु।।
त्याशी स्मरीता बाणे वैराग्य जीवा।
हसत मुखाने करी ऐक्य शिवा।।

घाल उडी नको पाहू काळ वेळ।
प्रभू रामराजा रक्षी सर्व काळ।।
तया आठविता सख्य वाटे जीवा।
कृपाळु केशवा गोविंद माधवा।।

दत्ता झाला वेडा पायी मिठी केली।
मन पुष्पांजली प्रभुशी वाहिली।।
तेणे तुष्टला रे सखा घनःश्याम।
अति आदरे घडे जीवा आराम।।

         ..... डी सिताराम











 





 








 


















शनिवार, ४ जून, २०११

दत्ता म्हणे

नरदेह तुम्ही जाणा नाशिवंत।
काय ते जाणत, जन्मोनिया।।
खोटा गोतावळा, लटका प्रपंच।
मार्ग धरी साच, जन्म खरा।।
वायाचि फिरशी उघडी तु डोळे।
गपिष्टका न कळे, खुण याची।।
दत्ता म्हणे करा, हिताचा संसार।
वाया घरदार सोडु नका।।
    
              .............डीसिताराम

मंगळवार, ३१ मे, २०११

दत्ता म्हणे

पुत्र. बंधु, कांता, मज भ्रमविती।
भुललो मी चित्ती, विषयांच्या।।
संसाराचे सुख, गोड वाटे जीवा।
भुललो केशवा, नाठवेना।।
विश्वस्वप्न साच, दृढावले मनी।
काढेल यातुनी, कोण मज।।
दत्ता म्हणे माझा, असे भोळा भाव।
सद्गुरु सावेव. धाव घेई।।

                .....डीसिताराम