शनिवार, १४ मे, २०११

अनुग्रह- एक विज्ञान


अनुग्रह
अनुग्रह कोण देऊ शकतो?
दर्शनात् स्पर्शनात् शब्दात् कृपया शिष्यदेहके।
जनयेद्यः समावेशं साम्भव स हि देशिकः।।
         योगवासिष्ठ- (निर्वाण प्रकरण)
अर्थः- जे दर्शनाने, स्पर्शाने, शब्दाने व कृपापुर्वक शिष्यांच्या देहामध्ये शिवभावाची मंगलमय अनुभूति करु शकतात त्यांनाच श्रीसद्गुरु असे म्हणतात.
अशी सद्गुरुंबद्दलची स्पष्ट व्याख्या वशिष्ठ मुनींनी केलेली आहे. जे कोणी या पदाला आरुढ झालेले असतात ते शिष्यांना उत्तम प्रकारे अनुग्रह देऊन त्यांना मोक्षाचे अधिकारी बनवतात.
जे आत्मज्ञानी असतात, जे विश्वस्वप्नातुन जागे झालेले असतात, ज्यांचे दोष पुर्णपणे नाहिसे झालेले असतात, जे आत्मस्वरुपावर निरंतर जागे असतात असे सद्गुरुच शिष्यांना अनुग्रह देऊ शकतात.
जे आत्मज्ञानाच्या किंवा, अनुग्रहाच्या मोबदल्यात काहिही न घेता निस्वार्थ भावनेने समाज सदृढ व्हावा या उद्देशाने अनुग्रह देतात तेच खरे सद्गुरु होत. व अशाच आत्मज्ञानी महापुरुषांकडुन अनुग्रह घ्यावा.
जो प्रसिद्धी पासुन दूर रहातो, लोकांच्या निंदेने वा स्तुतीने विचलित होत नाही, जो मान अपमान समान मानतो, ज्यास समत्व योग प्राप्त झालेला आहे, तोच खरा सद्गुरु व अशाच सद्गुरुंकडुन अनुग्रह घ्यावा.
ज्यांच्या मनात शिष्यांविषयी कळकळ असते, जे शिष्यांच्या उद्धाराची काळजी वाहतात, शिष्यांना या भयानक संसार सागरातुन तरुन जाण्यासाठी यथार्थपणे मार्गदर्शन करतात तेच खरे सद्गुरु व खरे संत होत. व अशा संतांच्या समागमाने संसार सागर पार केला जातो व आपण आपल्या कर्माशयाचा नाश करु शकतो. अशाप्रकारे सद्गुरुंच्या वचनावर दृढ विश्वास ठेवल्याने आपण मुक्त होऊ शकतो.
खरे सद्गुरु आपणाला ज्ञानयोग, भक्तियोग आणि कर्मयोग शिकवतात व आपल्याला त्यांच्या इतकेच परिपुर्ण करुन सोडतात. 
संत समागमु धरावी आवडी। जाशी पैलथडी भवसिंधू।।
संतांचे वचन अंतरी लक्षुनी। आपुल्या जीवनी मुक्त होशी।।
संत हेची बाप संत हेची माय। भक्तालागी सोय सर्वकाळी।।
संत उपदेश हाची गीता सार। कैवल्याचा भार दत्ता म्हणे।।
हल्ली मात्र गुरु म्हणविणाऱ्यांचा सुळसुळाटच झाला आहे. ते स्वतः आत्मदृष्टीने निजलेले असुन बाहेर वैराग्याचा देखावा उभा करुन शिष्यांना अनुग्रह देऊ पाहतात. स्वतः विश्वस्वप्नातच गुंग राहुन शिष्यांना विश्वस्वप्नातुन जागे करण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात व शिष्यपण विश्वस्वप्नातुन जागे झाल्याच्या गप्पा मारतात. स्वतःला आत्मज्ञान, आत्मसाक्षात्कार झाल्याचे सांगतात. स्वतःची प्रसिद्धि करतात. हे सारे भयावह आहे. यामुळे समाजाचे भले न होता नुकसान मात्र होते. समाज भलत्याच शक्तिकडे ओढला जातो. हे सारे थांबायलाच पाहिजे. जन्मोजन्मीची अविद्यारुपी महामारी नाश न करता पुन्हा विश्वस्वप्नातच गुंग रहाणाऱ्याला कोणते नाव द्यावे तेच कळत नाही. त्यामुळे सुज्ञांनी गुरु निवडतांना डोळे उघडे ठेवुनच निवडावा. कोणाच्याही सांगण्यावर विश्वास न ठेवता स्वतः जागरुक राहुन सद्गुरुंची परिक्षा घ्यावी. तरच गुरु करावा. बरेच विद्वान माझ्या या विधानाला हसतील. त्यांना हसण्याचे काम करु द्या. आपण आपले काम मात्र चोखपणे करा.
सदुगुरु कसे असतात?
गुरु चरणांची शोभा। भोळा राजा असे उभा।।
याशी नाही मानपान। दिले नामाचे साधन।।
नामरुप ऐक्य करी। भवव्याधी दूर सारी।।
दत्ता म्हणे माझा भाव। गुरु जाहला स्वभाव।।
भगवान रामकृष्ण म्हणत- साधू दिवसा ऐकावा व रात्री पहावा तरच त्यावर विश्वास ठेवावा. या त्यांच्या सांगण्यात खूपच सत्य सामावलेले आहे.
ज्यास  घरादाबद्दल  मोह, ममत्व किंवा  आसक्ति नसते, सर्व लोकांत जो निःसंग वृत्तीने रहातो, जो मायेत कधीही बांधला जात नाही, जो परब्रह्माची नियमित उपासना करतो, जो भगवंताचे नियमित गुणवर्णन करतो असा भक्तिमान सत्पुरुष म्हणजेच खरा ज्ञानी सदुगुरु होय. अशा भक्तिमान सद्गुरुंकडुनच अनुग्रह घ्यावा.
जे बोले तैसा चाले या वृत्तीवर आरुढ असतात, जे शिष्यांना अध्यात्म शिकवतांना विज्ञानाचेही रहस्य समजाऊन सांगतात असे श्रेष्ठ अधिकारी पुरुष म्हणजेच सद्गुरु होय व अशाच ज्ञानमय, विज्ञानमय सद्गुरुंजवळुन अनुग्रह घ्यावा.
जे लोकोपवादाने हर्षित वा दुःखी होत नाहीत, जे संयमी व ब्रह्मचारी असतात, ज्यांची दृष्टी सदा पवित्र व स्वच्छ असते, परद्रव्य व परदारा यांच्याबद्दल ज्यांना आसक्ति नसते, जे कर्म करत असतांना निष्काम कर्मयोग साधतात, ज्यांचे शरीर, मन, वागणे व बोलणे हे नादमय झालेले असते अशा निष्काम कर्मयोगी सद्गुरुंकडुनच अनुग्रह घ्यावा.
जो कोणी देवतांबद्दल शिष्यांच्या मनात भेद करत नाही. नाना संप्रदायांमुळे जो संशयात सापडत नाही, जो शिष्य शिष्यांमध्ये भेदभाव करत नाही. अशा जीवन्मुक्त पुरुषांकडुनच अनुग्रह घ्यावा.
जे निस्वार्थी व परोपकारी असतात, जे शिष्यांच्या पारमार्थिक उन्नती बरोबरच राष्ट्राची उन्नती होण्यासाठी झटत असतात. जे खऱ्या अध्यात्मज्ञानाचा प्रसार होण्यासाठी कार्य करतात, जे खरा स्वधर्म जगाला समजाऊन सांगतात अशा राष्ट्रसंत महापुषालाच सद्गुरु म्हणावा. अशा राष्ट्रसंतांकडुनच अनुग्रह घ्यावा व अशाच सद्गुरुंकडुन अध्यात्म विद्येची धुळाक्षरे शिकावित. त्यांनाच मनोभावे शरण जावे. त्यांच्याजवळुन अनुग्रह घेतल्यास शिष्यपण त्यांच्या सारखाच प्रखर आत्मज्ञानी बनतो हे लक्षात ठेवावे.
                             
                                         ......डीसिताराम

















साधक भगिनींसाठी सुचना

साधक भगिनींसाठी सुचना
स्री ही देवीस्वरुप आहे तिला आदराने आदिशक्ती असे म्हटले आहे. कारण ती या साऱ्या त्रैलोक्याची जननी आहे. सारे भूतमात्र तिच्याच पोटी निर्माण झाले आहे. तिचा गौरव करायला आपण शिकले पाहिजे.
एकविसावे शकत उजाडले तरीही पुरुष आणि स्री यांच्यात समानता आलेली नाही. तिला नाना प्रकारे छळले जाते. तिच्याकडे केवळ उपभोग्य वस्तु म्हणुन पाहीले जाते. याकरीता भगिनींनी प्रथम स्वतःला बदलले पाहिजे. तिने स्वतःचा सम्मान केला पाहिजे. जी भगिनी सद्गुरुंकडे जाऊन अनुग्रह घेते, तिने तर स्वतःला अबला कधीच समजु नये. कारण तिची परमात्म्याशी एकतानता साधली जाते. नाम जपता जपता ती प्रत्यक्ष भगवंताला प्राप्त करुन घेते. प्रत्यक्ष पांडुरंग मागेपुढे उभा राहुन तिचा सांभाळ करतो. संत जनाबाई, संत मुक्ताबाई, महाराणी ताराबाई, जिजामाता, महाभारत कालिन मैत्रैयी, द्रौपदी, उलपी इ. भाग्यवान स्रिया कणखर होत्या. कोणाचाही अन्याय त्यांनी सहन केला नाही. समाज कणखर व बलवान होण्यासाठी त्या आयुष्यभर झटल्या. प्रत्येक भगिनीने अशा तेजस्वी स्रियांचा आदर्श ठेवावा. असो.
प्रपंच करीत असतांना पांडुरंगाची सतत आठवण ठेवावी. मुलाबाळांवर अध्यात्मिक संस्कार करावेत. त्यासाठी सकाळ संध्याकाळ आरती, हरिपाठ, स्तोत्रे इ. नियमित म्हणण्याचा परिपाठ ठेवावा. मुलांचे फाजील लाड न करता, त्याच्या ममतेत न अडकता, प्रसंगी कठोर होऊन तो चुकल्यास त्यास त्याच्या चुकीचा जाणिव करुन द्यावी. योग्य वेळी मौन राखावे, मुलांना मांसाहाराचे वळण न लावता त्यास शुद्ध शाकाहाराचे महत्व सांगावे. उद्याची चिंता करु नये. सासु-सासरे, नणंद, दीर व पती यांच्याशी प्रेमाने वागावे. अन्याय सहन करु नये. अन्यायाचा शक्तीनिशी प्रतिकार करावा. शेजारणींशी सलोख्याचे संबध ठेवावेत. मनातील गुपीत मनातच ठेवावे. संसारातील न्यून, कमीपणा, मनातील शल्य चारचौघात सांगुन त्याचे प्रदर्शन करु नये.
स्रियांमध्ये शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, लोकमान्य टिळक, राम, कृष्ण यांसारखे तेजस्वी महापुरुष घडवण्याची शक्ती आहे. त्यामुळे भगिनीने स्वतःचा मान ठेवावा. स्री सुखी असेल तर घर-परिवार सुखी व समृध्द होईल. म्हणुन घरातील प्रत्येक पुरुषाने घरातील स्री वर्गाचा आदर व सम्मान करावा. कारण त्यात सर्वांचेच हित सामावलेले आहे.
पुरुषातील वाईट प्रवृत्ती स्रियांना ओळखता येते. त्यामुळे तिने त्या वाईट प्रवृत्तींना खतपाणी न घालता, उत्तेजन न देता त्यांचा निषेध करावा. वाईट प्रवृत्तींचा नायनाट करण्याचे सामर्थ तिच्याजवळ नक्कीच आहे.
नारींचा सन्मान ज्या घरात, ज्या गावात व ज्या देशात केला जातो, त्या घरात, त्या गावात व त्या देशात लक्ष्मी, स्वधर्म व परमार्थ वास करत असतात, तेथे अध्यात्म स्थिर असते.
भगिनी जर अशिक्षित व अडाणी असेल तर सज्ञान होण्याचा प्रयत्न करावा. मुलाबाळांना चांगले ज्ञान द्यावे. मुलांची अंघोळ करतांना प्रत्यक्ष पांडुरंगाचेच स्नान करीत आहोत असाच भाव ठेवावा. सारा परिवार व घर हे पांडुरंगाचेच निवास आहे असे चिंतन करावे. मुलांतील सद्गुणांना वाव द्यावा. समर्थ घर, समर्थ गाव व समर्थ देश घडवण्यास हातभार लावावा. म्हणतात ना.....
।।जिच्या हाती पाळण्याची दोरी। ती राष्ट्राते उद्धारी।।
साधक भगिनीने दैवावर हवाला न ठेवता, मुलांना दैववादी बनवु नये. त्यांना कर्तव्य व ज्ञानार्जन करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. रामायण महाभारत यांतील विररसाच्या गोष्टी सांगुन त्यांचे मन बलवान करावे. भुताखेताच्या गोष्टी सांगुन त्यांना भित्रा व पळपुटा करु नये. व्यायामाचे महत्व सांगुन त्यांची शरीर संपदा वाढवावी. असे प्रत्येक भगिनीने मनापासुन आचरण केल्यास संसार हा सुसह्य होईल व ईश्वराची सेवा आपोआपच होईल यात संशय नाही.

                                                            ..........डी सिताराम












शुक्रवार, १३ मे, २०११

साधकाचे आचरण


साधकाचे आचरण
ज्या भाग्यवान शिष्याने सद्गुरुंकडुन अनुग्रह घेतला आहे, त्याने प्राप्त झालेले नाम कोठल्याही परिस्थितीत सोडु नये. गुरुवचनावर विश्वास ठेवावा. गुरुंच्या भेटीसाठी अवश्य जावे. गुरु आपल्या घरी आल्यावर सत्संगाच्या मिषाने प्रवचनादी ठेवावे. श्रवणाचा लाभ घ्यावा. इतर बांधवांना गुरुंचे दर्शन उपलब्ध करुन द्यावे. त्यात देखावा, वरवरपणा किंवा दांभिकपणा नसावा. स्वभाव नम्र ठेवावा. गुरुंचे प्रदर्शन करु नये. किंवा, गुरुंना चमत्काराच्या वलयात अडकवु नये. माझा गुरु खुप मोठा व श्रेष्ठ आहे, असे म्हणुन त्यांना लहान करु नये. कारण गुरु हे अद्वैत भुमिकेवर असतात. त्यांच्या दृष्टीपुढे लहान-मोठा, आप-पर, मान-अपमान आदि भाव नसतात. गुरुंची प्रसिद्धि करु नये. काही शिष्यांना आपल्या गुरुंबद्दल अवास्तव सांगण्याची सवयच असते. त्यामुळे गुरु या पदाविषयी सामान्य जनतेच्या मनाविषयी संशय निर्माण होतात, या कारणासाठी असे करणे टाळावे.
शिष्याने गुरुंजवळ घरादाराबद्दल रडगाणे न गाता त्यांच्या मार्गदर्शनाखाली नामजपात प्रगती करुन घ्यावी. काही शंका आल्या असतील तर त्यांच्याशी निःसंकोचपणे पत्रव्यवहार करावा. किंवा, प्रत्यक्ष भेटुन शंका निरसन करुन घ्याव्यात. प्रत्यक्ष गुरुंना शंका विचारल्यास शिष्य चटकन संशयरहित होतो. आपले अनुभव, किंवा, आपल्याला झालेल्या दिव्यदर्शनादि गोष्टी फक्त जाणकार साधकांजवळ किंवा आपल्या गुरुंजवळ सांगव्यात. ज्याला साधनादि, ध्यानयोगाचा अनुभव नाही अशा व्यक्तिंजवळ आपले अनुभव कधीही प्रगट करु नये. त्यायोगे अध्यात्ममार्गावरील आपली घसरण होते, व आपला मधुर भक्तिभाव नष्ट होतो. म्हणुनच दुर्जन, नास्तिक, संशयीत व्यक्तिंच्या संपर्कापासुन सदैव दूर रहावे. इतकेच नव्हे तर दांभिक भक्तांपासुनही चार पावले दूर रहावे.
दुसऱ्या गुरुंना भेटण्याचा योग आला तर अवश्य जावे. त्यांना मनोभावे वंदन करावे. त्यांचे देखील मार्गदर्शन घ्यावे. कारण आपल्या गुरुंचे गुरुत्व त्यांच्यात देखील असते, हे सदैव लक्षात ठेवावे. त्यांच्याजवळ आपल्या गुरुंचे दोष वा अवास्तव महत्व सांगु नये. किंवा, आपल्या गुरुंजवळ देखील दुसऱ्या सांप्रदायातील वा दुसऱ्या गुरुंचे दोष सांगु नये. कारण अशा प्रकारे शिष्य संशयात सापडतो. त्याचे मन क्षणोक्षणी चंचल बनते. असा शिष्य भित्रा वा पळपुटा बनतो. त्याचा गुरुंवरील विश्वास उडू लागतो.
आपला जो सांप्रदाय आहे तो आईप्रमाणे प्रेमळ, पित्याप्रमाणे ज्ञानी व सद्गुरुंप्रमाणे ब्रह्मज्ञानी असा आहे. म्हणुन ज्याप्रमाणे आपण आपल्या आई-वडिलांवर मनाप्रमाणे प्रेम करतो तसेच प्रेम आपण आपल्या सांप्रदायाबद्दल व आपल्या सद्गुरुंबद्दल ठेवावे. ज्याप्रमाणे आपण दुसऱ्यांच्या आई-वडिलांचा आदर करतो, त्यांच्याविषयी पूज्यभाव ठेवतो तसेच आपण दुसऱ्या सांप्रदायाबद्दल पूज्यभाव ठेवावा. यामुळे आपले मन गोंधळात पडत नाही व आपण संशयरहित होतो.
बरेच साधक दुसऱ्यांच्या सांप्रदायाला नावे ठेवतात, दुसऱ्या गुरुंबद्दल वाट्टेल ते बोलतात. हे सर्वथैव अयोग्यच आहे, हे सदैव लक्षात ठेवावे. दुसऱ्यांच्या सांप्रदायाबद्दल आपल्याला अस्वस्थ वा क्रोधित होण्याचे कारणच काय? त्यांना त्यांचे काम करु द्या. आपण आपले काम मात्र स्वच्छ, शुभ्र, सूर्यासारखे प्रकाशमान करा. आपण ज्ञानाने इतके परिपुर्ण बना की, सर्व सांप्रदाय हे आपल्याकडे ओढले जातील.
दुसऱ्यांचे अज्ञान पाहाण्यापेक्षा आपण ज्ञानी होण्याचा प्रयत्न करावा. आपण आपले दोष क्षीण करत जावे, दुसऱ्यांच्या सद्गुणांकडेच लक्ष ठेवावे. गुरुंच्या वचनांवर विश्वास ठेऊन वाटचाल चालु करावी. कोणाच्या निंदेने भडकुन जाऊ नये. ज्याठिकाणी आपल्या गुरुंचा अपमान होत असेल तर, आपण प्रतिकार जरुर करावा पण तो हिंसक नसावा. किंवा, ती जागा बदलावी. असो, आपण गुरुंच्या मार्गावरच वाटचाल चालु ठेवावी.
गुरुंचा मारग भला। त्यांच्या पाठी जाऊ चला।।
गुरुंचा आशीर्वाद घेऊ। त्यांचे नाम मुखी घेऊ।।
सारे परब्रह्म होऊ। कर्मी अकर्मता राहू।।
दत्ता म्हणे सोडा गाठी। गुरुपायी घाला मिठी।।
साधकाने प्रत्येक काम मनापासुन करावे. दुबळे बनु नये. मनाने कणखर बनावे. कोणाचा अन्याय सहन करु नये. स्वधर्मावर वाटचाल करावी. प्रत्येक कर्म हे विश्वासाने केल्यास ती गुरुसेवा होते व अशाच सेवेने गुरु संतुष्ट होतात. जर आपण कामात भ्रष्टाचार, खोटेपणा किंवा, स्वैराचार केला तर त्यायोगे सद्गुरु हे दुःखी, कष्टी होतील यात शंकाच नाही. म्हणुनच आपले आचार व विचार शुद्ध ठेवावेत

                               ............डी सिताराम






















अनुग्रह कसा होतो? - एक वैज्ञानिक सत्य

अनुग्रह कसा होतो?
मनाची अनुग्रह घेण्याची तयारी झाली व सद्गुरु भेटला तर असा भाग्यवान साधक सद्गुरुंना मनोभावे शरण जाऊन अनुग्रह देण्याविषयी विनवतो. गुरुंना पण असा आर्ततेचा व जिज्ञासु वृत्तीचा शिष्य पाहुन आनंद होतो व ते मोठ्या प्रेमाने शिष्यास नामरुपी अनुग्रह देतात. नाम हे निर्गुण परमात्म्याचे असल्यामुळे ते चैतन्यरुप व ब्रह्मरुप असे असते. नाम हे कधीच स्थुल, अचेतन व अंधकारमय तमोगुणी असे नसते. नाम हे शुद्धसत्वमय असे असल्यामुळे नामधारक हा शुद्धसत्वमय बनुन जातो. ज्याचे ज्याप्रकारचे चिंतन असते, त्यास त्याप्रकारचा अनुभव येतो. हा निसर्गाचा नियमच आहे. म्हणुनच म्हणतात की,
।।जसे ज्याचे चिंतन। तसे त्याचे होते मन।।
त्यामुळे निर्गुण परमात्म्याचे नाम घेतांना मन हे परब्रह्माशी तादात्म पावते. यासाठी दररोज क्रियायुक्त नाम घेण्याची साधकाची तयारी पाहीजे. काहीजण थोडे दिवस नाम घेतात, नंतर मात्र महिनों महिने नामच घेत नाहीत. नंतर असे साधक नाम घेऊन काहीच फायदा झाला नाही असे रडगाणे गात बसतात. काहीजण अनुग्रह घेतल्यावर तात्काळ ईश्वरदर्शन वा आत्मसाक्षात्कार होतो अशी गोड (गैर) समजुत करुन घेतात. तसा अनुभव न आल्यामुळे नाम जपणे सोडुन देतात. क्रियायुक्त नाम न घेतल्याने ते (अभागी) साधक दिव्य अनुभवाला पारखे होतात. त्यामुळे गुरुंनी सांगितल्याप्रमाणे नाम घेतल्याने साधकास दिव्य अनुभव येऊ लागतात. नाम हे आपोआपच चालु होणे हे नाम समजल्याचे लक्षण आहे. असो.
अनुग्रहाच्या वेळी सद्गुरु शिष्याच्या मस्तकावर कृपाहस्त ठेवतात व त्यास नाम सांगतात. शिष्य नाम घेत असतांना गुरु त्यास एकप्रकारची गती देतात. नाम घेण्याची क्रिया समजाऊन सांगतात. शिष्याचा दृढनिश्चय, वैराग्य व ज्ञानपिपासा पाहुन सद्गुरु शक्तिपाताच्या क्रियेने दिक्षा देतात. त्यायोगे शिष्याच्या शरिरांतर्गत बदल होऊ लागतात. त्याच्या शरीरातील मानसिक घडामोडी तीव्र वेगाने किंबहुना प्रकाशाच्या वेगेपेक्षाही दुप्पट वेगाने घडु लागतात. सारे शरीर कंपायमान होते. दृष्टी कधी अर्धोन्मिलित तर कधी बंद असते. सद्गुरु नामजपास आणखी गती देतात. शिष्याचा श्वासोश्वास हा जलद गतीने पडु लागतो (भस्रिका प्राणायमाच्या वेळी जसा श्वासोश्वास होतो तसा). शरीर कधी उजवीकडे, डावीकडे तर कधी मागेपुढे जलद गतीने हलु लागते. जप हा मध्यमेतुन सुरु झाल्याने शिष्यास आणखी काही करावे लागत नाही. विशिष्ठ प्रकारची तंद्रावस्था अनुभवास येते. जड समाधिचा नकळत लाभ होतो. अंतर्मन जाग्रुतीचा बाह्य मनास स्पर्श झाल्यामुळे एक दिव्य आनंदाची नशा जडते व या नशेत साधक आनंदाने रडू लागतो. त्यास ही अवस्था बिलकुल आवरता येत नाही. त्याला कशाचीही शुद्ध रहात नाही. त्याचे डोळे अश्रुंनी डबडबलेले असतात. अष्टसात्विक भाव जागृत झाल्यामुळे तो निश्चेष्ठ पडतो. किंवा, जोरजोराने हुंदके देऊन रडू लागतो. शिष्य ज्या गुणाचा तशी अवस्था अनुग्रहाच्या वेळी प्रगट होते. रडतांना शिष्य घुटके गिळु लागतो. शरीराच्या अंतर्बाह्य एक प्रकारची सुखद संवेदना जाणवु लागते.
।। आपणा सारखे करीती तात्काळ। नाही काळवेळ तयालागी।।
असा सद्गुरुंचा महिमाच आहे. आणि हे खरेच आहे. अशा प्रकारचा अनुग्रह झाल्यामुळे कित्येक साधक आजही दिव्य आनंदाचा लाभ घेत आहेत व आजही ब्रह्मभावात आहेत.
क्रियायुक्त नाम कसे घ्यावे हे समजल्यामुळे साधक दररोज त्यापद्धतीने नाम जपतो. त्यायोगे मन प्रसन्न होऊ लागते. मानसिक ताणतणाव कमी होत जाऊन साधक मोठ्या प्रसन्नतेने व्यवहार करु लागतो. त्याच्या देहातील जडतत्वे कमी होत जाऊन साधक उच्चतर प्रांतात प्रवेश करतो. त्यास दैवी अनुभव येऊ लागतो. शरीर हलके हलके होते. शरीरांतर्गत जागृत असलेली शक्ती ही सुषुम्ना नाडीच्या तोंडाला धक्के मारु लागते. किंबहुना  सुषुन्मा  नाडीत त्या  शक्तीचा संचारही  होऊ लागतो. त्यामुळे
शिष्याच्या चेहऱ्यावर सात्विकतेचा प्रकाश चमकु लागतो. यानंतर साधकाने काही पथ्ये जरुर पाळावीत.
साधकाने पाळायची काही पथ्ये
8ब्रम्हचर्याचे पालन करावे.
8प्रत्येक स्रीच्या ठायी मातृभाव असावा.
8खोटे बोलु नये.
8चौर्यकर्म किंवा व्यभिचार करु नये.
8सर्वांशी नम्रपणे वागावे.
8गुरुंच्या भेटीसाठी नियमित जावे व त्यांच्याकडु नामजपाची गती वाढवुन घ्यावी. चुकलेल्या क्रिया पुन्हा समजाऊन घेतल्यास तो शिष्य पाहता पाहता आत्मस्वरुपाचा अधिकारी बनु शकतो.
8सत्संग व शत्शास्र यांचा सहवास करावा.
8ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, भागवत, गीता तसेच चांगदेव पासष्टी व   उपनिषदे समजुन घ्यावीत.
8मन हे जास्तीत जास्त अंतर्मुख करावे.
8दुसऱ्यांचे दोष न पाहता आपल्यातील दोष कमी करीत जावे.
8एकादशीला नियमित उपवास करावा.
8नियमबद्ध काम करावे. आजचे काम उद्यावर टाकु नये.
8स्वधर्मावर वाटचाल करावी.
8अश्लिल व बिभित्स वाचणे कटाक्षाने टाळावे.
मित्रांनो, अनुग्रह घेतांना जी अवस्था होती ती दिवसेंदिवस वाढु लागते. शिष्यांचे लक्ष संसारातील घडामोडींवर रहात नाही. (याचा अर्थ असा की, तो संसार करतो पण विरक्त मनाने. सुख-दुःख मनास स्पर्शु देत नाही.) त्याचे डोळे नुसत्या भगवत् स्मरणानेच ओले होतात. गुरुंच्या भेटीसाठी तो व्याकुळ होतो. गुरुंच्या आठवणीने त्यास रडु येते. साधकांच्या संपर्कात जास्त काळ घालवतो. अशी अवस्था जास्त काळ राहु लागली तर गुरु त्याची पारख करतात. त्याच्यात वास करीत असलेले दैवी गुण जागृत होत आहेत की नाही,त्याची चाचपणी करतात. तसेच त्याचे दोष क्षीण झाले आहेत की नाही त्याचीही ते परिक्षा घेतात. नंतर मात्र शिष्य या परिक्षेला उतरला तर वेळ येते ती प्रबोधनाची. प्रबोध घेणे म्हणजे महावाक्याचा स्विकार करण्याची आलेली योग्य वेळ होय. ही सर्वश्रेष्ठ परिपुर्ण प्रक्रिया आहे. जे सद्गुरु शिष्यांना अनुग्रह देतात तेच त्यास प्रबोध देतात. शिष्याची अवस्था अंतर्मुख करतात. हा महावाक्याचा बोध प्राप्त झाल्यावर अध्यात्मिक शक्ति जागृत करुन ती उफराटी करतात. योग्य वेळ आल्यावर असे भाग्यवान शिष्य आपली शक्ति बहिर्मुख करुन ती लोककल्याणाकडे वळवतात. बहुजन हिताय, बहुजन सुखाय अशी त्यांची वृत्ती होते. नाथा घरची उलटी खूण ज्यास समजली तोच खऱ्या अर्थाने साधू बनतो. आणि ही खूण प्रबोध झाल्यावर जास्त समजते. म्हणुनच अनुग्रह घेतल्यावर प्रबोध अवश्य घ्यावा. काही सांप्रदायिक गुरु प्रथम अनुग्रहरुपी नाम देण्याएवजी प्रबोध देऊन महावाक्याचा उपदेश करतात. पण तसे करणे योग्य नाही. कारण बीज पेरण्यापुर्वी उत्तम मशागत केली  पाहीजे, तरच बीज पेरुन फायदा होतो. अन्यथा बीजांकुर होण्यापुर्वीच बीज करपुन जाते. तसलाच हा प्रकार समजावा. याठिकाणी अनुग्रह घेणे म्हणजे मनावर संस्कार करणे व मन हे भक्तिने, नामस्मरणाने नांगरुन तयार ठेवणे होय. एकदा का मन तयार झाले तर मग प्रबोधरुपी बीज पेरावयास हरकत नाही. असो.
दहावीची परिक्षा चांगल्या मार्कांनी पास झालो तर उच्च शिक्षणासाठी प्रवेश निश्चित होतो. जर आपण आयुष्यभर दहावीचाच अभ्यास केला तर प्रगती ही काहीही होणार नाही. त्याचप्रमाणे अनुग्रह घेतल्यानंतरची श्रेष्ठ वेळ येते ती प्रबोधनाची. हे लक्षात ठेवावे. जसा अनुग्रह बळजबरीने घेता येत नाही, त्याचप्रमाणे काहीही अनुभव न येता प्रबोध घेण्यासाठी उतावीळ होऊ नये. सद्गुरुंच्या संपर्कात राहीलो तर हा अनुभव लवकर येतो. निरंजन कवींनी सद्गुरुस्तवनामध्ये म्हटलेलेच आहे की,
प्रबोध करीता श्रम फार झाला। विसरु कसा मी गुरुपादुकाला।।
प्रबोध  मिळाल्यावर शिष्य  खऱ्या  अर्थाने  जीवनमुक्तिच्या क्षेत्रात प्रवेश करतो व तो हळुहळु विश्वस्वप्नातुन जागा होऊ लागतो. साधकाचे डोळे ज्ञानाने चमकु लागतात. मनातील विषयवासना कमी होत गेल्यामुळे साधकास खुपच दिव्य अनुभव येऊ लागतात. कोणाला दिव्य दर्शन, दिव्य स्वप्न स्वप्ने पडु लागतात. कोणाला देवादिकांचे दर्शन होते. कोणाला क्षुद्र सिद्धिंचा लाभ होतो. पण खऱ्या साधकाने स्वतःस वरील चमत्कारांत अडकवुन घेऊ नये.
अनुग्रह देण्यापुर्वी सद्गुरु शिष्यास काही सर्वमान्य अटी सांगतात, त्या अशा...
8दर एकादशीला उपवास करावाः- महिन्यातुन येणाऱ्या दोन्ही एकादशीस उपवास करावा. यामागे शास्रिय दृष्टीकोन आहे. उपवास याचा अर्थ निरंतर मनाने ईश्वराजवळ रहाणे व ईश्वर चिंतन करणे. उपवासामुळे मन सुक्ष्म होते. या दिवशी काहीही न खाता केवळ पाणी पिऊन लंघन करावे. कोणाला असे लंघन करणे शक्य नसल्यास फळांचा रस घ्यावा, लिंबु पाणी घ्यावे. या दिवशी पोटास पुर्णपणे विश्रान्ति द्यावी. त्यामुळे पोटातील स्नायु कार्यक्षम होतात व चेहरा तेजस्वी होतो.
8धार्मिक ग्रंथाचे वाचनः- ज्ञानेश्वरी, भागवत, योगवासिष्ठ यांसारख्या धार्मिक ग्रंथांचे वाचन करावे, मनन करावे, चिंतन करावे. असे आत्मोन्नतीपर ग्रंथ वाचल्याने अध्यात्मिक विचारांची बैठक पक्की होऊ लागते. सद्गुरुंचा बोध मनात पक्का होऊ लागतो. विचारात प्रौढत्व येते. सात्विक मन झाल्यामुळे आपले आचरण शुद्ध होते. हातुन वाईट कृत्ये होत नाहीत. मन व बुद्धि प्रगल्भ होते. ईश्वराची भक्ति दृढ होऊ लागते. त्यामुळे न कंटाळता दररोज ग्रंथांचे वाचन करावे.
8तुळसीला पाणी घालावेः- तुळशी ही पवित्र वनस्पती आहे. तिच्यामुळे घरदार पवित्र होते. जंतूंचा नायनाट होतो व प्राणशक्तीचा उदय होतो. त्यामुळे आपल्यालाही मुबलक प्रमाणात प्राणवायू मिळतो. तुळशी ही विष्णुला प्रिय आहे. त्यामुळे तुळशीत ईश्वराचे रुप पाहिल्याने सर्वाभुति ईश्वर आहे हा बोध दृढ होतो. म्हणुनच तुळशीला पाणी घालावे व तुळशीची पूजा करुन प्रदक्षिणा घालावी.

8दररोज नाम घ्यावेः- नामस्मरण तर नियमित करावेच, पण क्रियायुक्त नाम घ्यावेच. आपल्या मेंदुत जन्मोजन्मीच्या ज्या दुषित लहरी असतात त्या लहरी बाहेर पडुन वातावरण दुषित करण्याचे काम करतात. दररोज नाम घेत गेल्याने अशा दुषित लहरी नाहिशा होतात व अत्यंत पवित्र आणि सात्विक लहरी निर्माण होऊन भोवतालचे वातावरण पवित्र करतात. दररोज नाम घेत गेल्याने आपल्या बुद्धिवरील अनंत जन्माचे संस्कार नाहिसे होत जातात व आपण दिवसेंदिवस आत्मज्ञानाच्या समिप जाऊ शकतो. दृष्टी व वाणी पवित्र ठेवावीः- दुःखद वा कामोत्तेजक दृश्य पाहिल्याने मन चंचल व अस्थिर होते. दुसऱ्यांचे दोष पाहिल्याने वा विनाकारण भांडल्याने मन बेचैन होते. यामुळे साधना करतांना अडथळे येतात. मनाचे अधःपतन होते. यासाठी दृष्टी व वाणी पवित्र ठेवणे हितावह आहे.
8दररोज हरिपाठ म्हणावाः- भगवान ज्ञानेश्वरांच्या हरिपाठात हरिनामाचा महिमा गाईला आहे. नामावर चित्त हळुहळु जडु लागले की, मन हे नाममय होऊ लागते. एकदा का दैवी नामात मन तल्लिन झाले की, शरीर नादमय  होऊ लागते. कुंडलिनि शक्ति जागृत होऊ लागते. सद्गुरुंनी दिलेले नाम व ईश्वराचे सगुण रुपातील नाम यात कसलाही भेद न उरल्याने, साधकाने कोठलेही नाम जपले तरी त्यास एकच दैवी अनुभव येऊ लागतो. यासाठी हरिपाठ हा समजुन म्हणावा.

                                                                                          ..........डी सिताराम



























मंगळवार, ३ मे, २०११

दत्ता म्हणे

पांडुरंगी जडो मन।
तेचि ध्यान पाहू गेले।।
नलगे आणिक साधन।
वाचा मौन पांगुळली।।
अणु रेणु करी वास।
नाही सायास आणिक।।
दत्ता म्हणे पाही पाही।
विठु राही ह्रदयात।।

रुप सगुण बरवे।
नाम तयाचे स्मरावे।।
वेड लावियेले मना।
असा पंढरीचा राणा।।
प्रेमे पाही सर्वकाळ।
करी भक्तांचा सांभाळ।।
दत्ता म्हणे लागो ध्यान।
नलगे भजावे निर्गुण।।

निंदा स्तुती आम्हा कदा न बाधिती।
अर्पियेली वृत्ती पांडुरंगी।।
मन झाले हरि मन झाले हरि।
नसे कदा दुरी पांडुरंग।।
सकल जगत हरिरुप झाले।
जात पात गेले विलयाशी।।
दत्ता म्हणे माझा निश्चय मनाचा।
स्थिरावली वाचा पांडुरंगी।।

      ........डी सिताराम

सोमवार, २५ एप्रिल, २०११

दत्ता म्हणे

गुरु चरणांची शोभा। भोळा राजा असे उभा।।
याशी नाही मानपान। दिले नामाचे साधन।।
नामरुप ऐक्य करी। भवव्याधी दूर सारी।।
दत्ता म्हणे माझा भाव। गुरु जाहला स्वभाव।।



 

संत समागमु धरावी आवडी।
जाशी पैलथडी भवसिंधू।।
संतांचे वचन अंतरी लक्षुनी।
आपुल्या जीवनी मुक्त होशी।।
संत हेची बाप संत हेची माय।
भक्तालागी सोय सर्वकाळी।।
संत उपदेश हाची गीता सार।
कैवल्याचा भार दत्ता म्हणे।।
 ..........डी सिताराम



रविवार, २४ एप्रिल, २०११

सद्गुरुंची पूजा कशी करावी?

पुर्वी लहानपणीच मुलांना गुरुंच्या आश्रमात शिक्षणासाठी टाकले जायचे. तेथे त्याला सर्व प्रकारची शिक्षा मिळे. प्रत्यक्ष गुरुंच्या सान्निध्यात राहुन, शिष्य गुरु इतकाच, किंवा गुरुपेक्षाही वरचढ निघायचा. अशा भाग्यवान शिष्यांना प्रत्यक्ष गुरुंची सेवा करायला मिळायची. पण हल्लीच्या धावपळीच्या काळात प्रत्यक्ष गुरुंचा सहवास फारच कमी लाभतो. आपल्याला गुरुंच्या घरी रहाणे शक्य होत नाही. त्यामुळे गुरुंची सेवा कशी करावी? असा प्रश्न पुढे उभा रहातो. त्यामुळे गुरुंची खरी सेवा किंवा पूजा म्हणजे काय ते समजुन घेऊ.सद्गुरुंनी स्वधर्माचे व आत्मविकासाचे जे ज्ञान आपणास दिले आहे, त्या ज्ञानाची कास धरुन स्वधर्मावर चालणे व त्यांनी दिलेले नाम अखंड घेत जाणे म्हणजेच गुरुसेवा होय. प्राणीमात्रांवर प्रेम करणे, दयाबुद्धिने व समानतेने वागणे म्हणजेच गुरुसेवा होय. कठोर शब्दांनी दुसऱ्यांचे मन दुखावणे, अपमान करणे, शत्रुत्व करणे, व्देषबुद्धी वा आकस ठेवणे, परस्री विषयक आसक्ति ठेवणे, परधनाचा अपहार करणे इ. अधर्मकारक व अनीतिकारक गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात. वरील प्रकारची अनीतिकारक गोष्टी न करणे हीच खऱ्या अर्थाने गुरुसेवा होईल. काहीजण प्रत्यक्ष गुरुंशी उलटे बोलतात. त्यांच्यासमोर धडधडीत खोटे बोलतात व उगाच आत्मप्रौढी मिरवतात. हे कितपत योग्य आहे? व ही गुरुसेवा खऱ्या अर्थाने होऊ शकेल काय याचा सर्वांनी विचार करावा.
सद्गुरुंचा देह जरी स्थुल रुपाने दिसत असला तरी तो अतिवाहक किंवा ज्ञानमय असा असतो. त्यांच्यातील गुरुत्व हे साऱ्या विश्वात कोंदाटले आहे. त्यामुळे साऱ्या प्राणीमात्रांशी प्रेमळपणाने वागलो तर, सद्गुरुंशीच प्रेमळपणाने वागण्याचे समाधान पदरी पडेल. व तीच गुरु सेवा होईल. जे कोणी  रंजलेले वा  गांजलेले असतील  जे कोणी दुःखाने पीडित असतील त्यांची जमेल तितकी सेवा केल्यास प्रत्यक्ष सद्गुरुंचीच सेवा घडेल. कोणाचही द्वेष वा मत्सर न करता नम्रपणे वागावे, मित्रत्वाने वागावे व गुरुंनी सांगितलेल्या परमार्थ मार्गावर वाटचाल चालु ठेवावी. आपले मन हे शात ठेवावे. हिच खरी गुरुसेवा होय. अशा सेवेने सद्गुरु संतुष्ट होतात.
करा नामाचे साधन। तीच गुरुसेवा जाण।।
नाम सुलभ सोपेरे। नामे काळ थरथरे।।
करा बापांनो उच्चार। तयाविण ना उद्धार।।
दत्ता म्हणे झालो धीट। मार्ग पाहिला चोखट

     ......... डी सिताराम









सद्गुरु कसा पहावा?

सद्गुरुंना देहात पाहु नये. माझे गुरु चराचरात वास करत असुन मला ज्ञान देत आहेत, असा भाव ठेवावा. सतत ज्ञान मिळवत रहावे. हिच गुरुंची गुरुदक्षिणा होय. जसे आकाश सर्व प्राणीमात्रांना एकच एक असते, तसे सद्गुरु सर्व प्राणीमात्रांना एकच एक असतात. हे सदैव लक्षात ठेवावे. सदुरुंना देहात पाहणे म्हणजे आपली ज्ञानदृष्टी संकुचित करुन घेणे होय. म्हणुनच सद्गुरुंना विश्वरुपात पहावे. त्यांनी दिलेल्या नामसाधनेची सुलभपणे वाटचाल करावी व नाम मोठ्या विश्वासाने जपावे.

                        नाम सोपे नाम सोपे। सरतील विघ्ने पापे।।
                        नाही आणिक साधन। देव पाहायाशी जाण।।
                        हरिप्राप्तीचे लक्षण। पांडुरंग नाम जाण।।
                        दत्ता म्हणे घेई नाम। पुढे उभा घनःश्याम।।





शनिवार, १६ एप्रिल, २०११

गुरु असे असतात

आकाश हे ज्याप्रमाणे सर्वजीवांना एकच एक असते, तसेच सद्गुरु सर्व जीवांना एकच एक असतात. त्यांचा सांप्रदाय भिन्न असो, त्यांची साधना भिन्न असो, पण त्यांची ज्ञानाची पातळी एकचअसते. जीवन्मुक्तावस्था ही साऱ्यांत एकच असते. त्यांना एकाच प्रकारचे आत्मदर्शनघडत असते. त्यांची ब्रह्मदृष्टी एकच असते. आपण मात्र त्यांच्यात अज्ञानाने भेदभावकरतो. माझा गुरु एक व तुमचा गुरु दुसरा असा भेद करुन आपण मात्र आत्मस्वरुपावरुन घसरतो.

गुरु बद्दलची विश्वव्यापक दृष्टी

मित्रांनो आपण सद्गुरुंना ठराविक चौकटीत डांबुन ठेवतो. त्यांना देहधारी मानुन त्यांचे श्रेष्ठपण त्यातच समजण्यात आपण चुक करतो. जे भाग्यवान गुरुपदाला पोचलेले असतात त्यांचा आत्मा हा विराडात्मा, विश्वात्मा बनलेला असतो. आपल्या डोळ्यांना त्यांचा देह  जरी दिसत असला तरी ते अतिवाहक देहानेच अमर असतात. त्यांचा चराचरात वास असतो. अशा विश्वव्यापक सद्गुरुंना नमस्कार विश्वव्यापकत्वच करावा.

ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे।
त्या त्या ठिकाणी निजरुप तुझे।
मी ठेवतो मस्तक ज्या ठिकाणी।
सद्गुरु तुझे पाय दोन्ही।।    
हे सद्गुरो! माझे मन ज्या ज्या ठिकाणी जाईल, ( मनात जे जे विचार येतील, माझी दृष्टी जिकडे जाईल, किंवा जे जे दृश्य डोळ्यांनी पाहील) त्या साऱ्या ठिकाणी तुमचेच निजरुप आहे. व माझे मस्तक मी ज्या ज्या ठिकाणी ठेवील त्या त्या ठिकाणी तुमचेच पवित्र चरण असतील.
       
         ....डी सिताराम





गुरुवार, १४ एप्रिल, २०११

दत्ता म्हणे

कधी भेटशी रे सख्या पांडुरंगा।
अपराध सांगा काय झाला।।
मोह माया पाश सारियेले दुरी।
नको बा श्रीहरि दुर जाऊ।।
ओढ दर्शनाची लागली मनाशी।
येऊनी वेगेशी भेट देई।।
दत्ता म्हणे जीव झाला कासाविस।
झालो बा उदास जनीवनी।।
    ......डी सिताराम

स्वगत- एक चिंतन

मी पातोंड्याचा, आम्ही दोघं भाऊ व एक लहान बहिण, भाऊ मोठा, मी दुसरा व बहिण माझ्या पाठची.
वडिल घरच्याघरी टेलर काम करीत. आई दुसऱ्यांच्या शेतावर जाऊन मोलमजुरी करत असे.
लहानपणी आमची गरीबीची परिस्थिती होती. अत्यंत हालाखीत बालपण गेले. वडिलांनी आम्हाला वाचनाची गोडी लावली. आम्ही खड्या आवाजात कविता व पाढे म्हणत असु. आई विठ्ठलाची भक्ति करत असे. विठ्ठल मंदिरात जाऊन मी विठ्ठलास नमस्कार करत असे. व विठ्ठलास प्रदक्षिणा मारत असे. त्या बालवयात माझे व विठ्ठलाचे काहीतरी नाते आहे, असे मला सतत वाटत असे. विठ्ठलाची मुर्ति मी डोळे भरुन पाहत असे. त्यावेळी मला काळ वेळाचे भान राहत नसे. हा कालखंड माझ्या विठ्ठलाच्या अनिवार ओढीचा होता. मंदीरात जेव्हा हरिपाठ होत असे त्यावेळी माझे भान हरपुन जात असे. टाळ मृदुंगाचा ध्वनी मला बेहोष करत असे व मी तहानभुक विसरुन जात असे. मोठेपणी मला कळाले की, मी लहानपणीच नाद समाधीचा अनुभव घेतला होता.
मी लहान असतांनाची गोष्ट, माझ्या मित्राचा नवस फेडण्यासाठी आम्ही पातोंड्याहुन बैलगाडीने चाळीसगांव जवळील पाटणादेवीस निघालो होतो. पाच सहा बैलगाड्या होत्या. मी माझ्या आई सोबत होतो. रात्रीची वेळ होती. आकाशात पुर्णचंद्र होता. खुपच छान वातावरण होते. सगळीकडे पिठुर चांदणे पडले होते. आकाशात चांदण्या चमकत होत्या. बैलांच्या गळ्यातील घुंगरांचा आवाज वातावरण प्रसन्न करत होता. मी दिग्मुढ होऊन तो देखावा पाहत होतो. मीच सगळीकडे आहे असे वाटु लागले होते. सारे वातावरण मीच बनलो आहे, असा अनुभव मी घेत होतो. आकाशातील चंद्र तारे व आसमंतात पसरलेला नाद सारे काही मीच बनलो होतो. हळुहळु माझी जाणिव हरपत होती व मन दिव्य आनंदाचा वेध घऊ लागले होते. माझ्या सकल संज्ञा हरपल्या व मी निचेष्ट पडलो. कितीतरी वेळ मी त्या तंद्रित होतो कोणास ठाऊक पण ज्यावेळी मी डोळे उघडले, त्यावेळी आम्ही पाटण्याच्या डोंगराजवळ आलो होतो.  चंद्र पश्चिमेला कलला होता. हा माझा पहिला साक्षात्कार असावा. कारण या घटनेनंतर मी बऱ्याचदा नकळत या आनंदात रमुन जात असे. त्यावेळी मला काळ वेळाचे भान रहात नसे. एखादी गोष्ट हातुन होण्यास विलंब लागत असे.
आम्ही भावंडं जेव्हा कंदिलाच्या उजेडात अभ्यास करत असु त्यावेळी तो धुर ओकणारा कंदिल, माझा भाऊ व
आमच्यावर पहारा करत असलेले माझे पिताश्री व मी हे जणू काही एकाच वस्तुचे बनले आहोत आणि ती वस्तु माझ्या ह्रदयात वसली आहे असे मला सारखे वाटे व मन त्या एकात्ममतेचा अनुभव घेण्यास रमुन जात असे. अशावेळी माझे अभ्यासात लक्ष नाही म्हणुन मी वडिलांच्या हातचा मार देखील भरपुर वेळेस खाल्ला आहे.
लहानपणीच माझ्या हातुन काही साधना झाल्या, पांडुरंगाची भक्ति घडली. खुप दिव्य अनुभव आलेत.
माझे पहिले अध्यात्मिक गुरु पाटणादेवीचे थोर भक्त स्वामी प्रणवानंद हे होत. त्यांच्या प्रसादाने खुप दिव्य अनुभव आले. त्यानंतर कॉलेजचे शिक्षण पुर्ण केल्यावर मी कोकणात गेलो. तेथे वर्षभर शिक्षकाची नोकरी करुन मी नागोठण्याला आय पी सि एल कंपनीत कामाला लागलो. या मधल्या कालखंडात मनातील विकारांशी झगडत मी योगवासिष्ठ या दिव्य ग्रंथाचे वाचन करत होतो. त्या ग्रंथातील अपौरुषीय तत्वज्ञानाने मी धुंद होत असे. हा ग्रंथ समजण्यास खुपच अवघड आहे. त्यामुळे तो फारसा लोकप्रिय नाही. खुप जणांना या विषयी माहितीही नसेल. पण या ग्रंथाचा  माझ्या मनावर खुप खोलवर प्रभाव पडला आहे.
मी 1994 साली सद्गुरुंचा अनुग्रह घेतला. माझे सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद महाराज (घोटीकर) हे होत. त्यांच्या
अनुग्रह बलाने माझी अध्यात्मात चांगली प्रगती झाली. त्रिपुटींचा हळुहळु क्षय व्हायला लागला होता. जगताविषयी फारशी आसक्ती राहीली नव्हती. माझा तो काळ विश्वस्वप्नातुन जागे होण्याचा होता. पण काही कर्म बीजे शिल्लक राहील्याकारणामुळे मी संसारात रमलो होतो. उदासिन वृत्ती एकीकडे तसेच संसाराची ओढ एकाकडे. त्यामुळे मी सद्गुरुंच्या मार्गदर्शनाखाली नामस्मरणाचा मारा चालु ठेवला. प्रगती होत होती. हातातुन काही लिखाण झाले. काही काव्य निर्मिती झाली. याच सुमारास मला गायत्रीदेवीचा साक्षात्कार झाला. तो कालावधी माझ्या अध्यात्मदृष्टीने खुपच चांगला गेला. मी काही जीवन्मुक्त नाही पण जीवन्मुक्तीचा अनुभव घेतला आहे. अध्यात्माबरोबर माझा संसार देखील चांगला चालु होता. दोन मुले झाली. मोठा मुलगा अमोल व छोटी कन्या अमृता. आता दोघेही भावी कलाकार आहेत. पण त्यांना कलाकार म्हणुन घडवण्यासाठी आम्हा उभयतांची खुपच धावपळ झाली. त्या कालखंडात पाच वर्ष आमचा संसार थाऱ्यावर नव्हता. कारण मुलांची आवड जोपासण्यासाठी गुरुंचा शोध घेणे क्रमप्राप्त होते. माझ्या या वेडेपणाला माझे मित्र हसत होते. पण त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करुन माझे काम मी करत होतो. शेवटी कुटुंब हे कधी पेण कधी नागोठणे(रायगड) असे स्थलांतर करीत शेवटी पुण्याला स्थिरावले. मुलांनी कलाक्षेत्रात चांगली प्रगती केली. अमोल हा तबला स्पर्धेत देशपातळीवर तीन वेळा प्रथम क्रमांकाने आला. अमृताने तर व्हॉयलिन सारख्या अवघड वाद्यावर प्रभुत्व मिळवले, ती बासरीपण छान वाजवते. तसेच ती हार्मोनियम हे वाद्य मोठ्या तयारीने वाजवते. तिला
पं. अप्पासाहेब जळगावकरांचा आशीर्वाद व मार्गदर्शन मिळाले आहे. अमोल हा पुण्याला पं. सुरेश सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली शिकतो आहे. सध्या तो ललित कला केंद्र पुणे येथे म्युझिक करतो आहे. त्याला त्याच्या गुरुंनी छोटा पंडित ही पदवी प्रेमाने बहाल केली आहे. कॉलेजमधील सगळेजण त्याच्या तबला वादनावर खुश आहेत.
या परिस्थितीत येण्यासाठी खुपच संकटांना तोंड द्यावे लागले. काही मित्रांनी मला चांगले म्हटले तर काहींनी माझा उपहास केला. पण या साऱ्या संकटांना मी केवळ अध्यात्मामुळेच तोंड दिले. न में भक्त प्रणश्यति।। ( माझा भक्त कधीही नाश पावत नाही ) भगवान श्रीकृष्णांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी माझा व माझ्या परिवाराचा सांभाळ केला. मला प्रत्येक संकटातुन त्यानेच वाचवले. माझा पाय सन्मार्गावरुन कधीच ढळु दिला नाही. पांडुरंगाचा कृपा आशीर्वाद माझ्या व माझ्या कुटुंबाच्या पाठीशी आहे, असे मला सतत वाटत रहाते. आता तर पांडुरंगच माझा श्वास व प्रश्वास बनला आहे. मी मोठा भक्त आहे असेही नाही. तशी माझी योग्यताही नाही. पण माझा भोळा भाव मी पांडुरंगाच्या चरणी अर्पण केला आहे. तो ठेवील तसा मी रहाणार आहे. पण येवढे मात्र नक्की की,...........
जेथे जातो तेथे तु माझा सांगाती।
चालविसी हाती धरुनिया।।
या संतोक्तिनुसार मला अनुभव येत आहे.पांडुरंगाने माझा सर्वतोपरी सांभाळ केला व या पुढेही तो करीत राहील.
जय हरि.

मंगळवार, १२ एप्रिल, २०११

दत्ता म्हणे

नाम घ्यावे विठोबाचे।
गुण वाचे वर्णावे।।
तेणे झडे भवरोग।
नाही भोग संसारी।।
मनी शुद्ध भाव होई।
बाधा जाई सकल।।
दत्ता सांगे सकलाशी।।
तयापाशी नारायण।।

नाम घ्यावे सर्वकाळ।
तळमळ भावेशी।।
तेणे झडेल हा मळ।
करी निर्मळ मनाशी।।
दत्ता सांगे हाकारोनी।
करा पेरणी नामाची।।

नाम फुकाचे फुकाचे।
होई साचे अमृत।।
करा झणी उठाठेव।
काळ भेव दाववी।।
गर्जुनिया वदे वाचे।
संसाराचे बिज क्षय।।
दत्ता रंगला नामात।
केली मात कळीकाळा।।

नाम गोड तुझे देवा।
पडे हेवा ब्रह्मादिका।।
धन्य संसाराशी आलो।
रंगी रंगलो नामात।।
जन्मोजन्मी दास तुझे।
नाही ओझे संसाराचे।।
दत्ता म्हणे धन्य धन्य।
झालो अनन्य दास तुझे।।

नाम सुंदर बरवे।
मनी घ्यावे आवडिने।।
तेणे तुटती बंधन।
आत्मज्ञान प्रगटेल।।
दत्ता ध्याई विठ्ठलाशी।
ओंकाराशी पडे गाठ।।

नाम साधन सोपेरे।
घ्यारे घ्यारे सकळ।।
ध्याई आदरे गोविंद।
मनी छंद लागलासे।।
नसे आणिक साधन।
वाही आण विठोबाची।।
दत्ता झाला नारायण।
त्रिभुवनी व्यापलासे।।

गुज सांगावे देवाशी।
तयापाशी लडिवाळ।।
रक्षिल हा सर्वभावे।
त्वरे लागावे चरणी।।
होई संसाराचा नाश।
सावकाश स्मरुनिया।।
दत्ता म्हणे सखा हरी।
पार करी हा संसार।।

.............डी सिताराम




रविवार, १० एप्रिल, २०११

स्वगत- एक साक्षात्कार

गुरुंच्या आदेशानुसार मी मार्गक्रमण करण्यास सुरुवात केली. अंगात चैतन्य संचारले होते. जबरदस्त आत्मविश्वास सोबत होता.मुक्कामाचे ठिकाण खुपच लांबवर होते. पण कशाचीही तमा न बाळगता मला त्या ठिकाणी पोचायचेच होते.
त्या रस्त्यावरुन चालणारे बरेच जण होते. कोणी सावकाश गतीने चालत होता. कोणी रखडत रखडत चालत होता. कित्येक जण झाडाच्या सावली  खाली विसावा घेत बसले होते. त्यापैकी अनेक जण निराश झालेले होते. कित्येक जण मागे परतत होते. मोठा विलक्षण देखावा होता तो. त्याकडे दुर्लक्ष करुन मी एकसमान वेगाने चालु लागलो. न थांबता, न थकता.
सूर्य मध्यान्नी आला होता. उन रणरणत होते. आजुबाजुला चौकाचौकांवर शितपेये,  पाणपोईंची, मेवामिठाईंची दुकाने होती. माझ्याबरोबरीचे कित्येक जण त्या जत्रेत रमले होते. कोणी शितपेये तर कोणी पाणी पित होते. तर कोणी मस्तपैकी पक्वांन्नावर ताव मारत होते. त्यापैकी काहीजणांनी मला थांबण्यास सांगितले. जाशील सावकाश म्हणुन सांगितले. मी त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. ध्येय गाठल्याशिवाय मोहनगरीत अडकायचे नाही हे मी मनाशी ठरवले होते.  मला माझ्या मुक्कामाच्या ठिकाणी पोचायचेच होते. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करुन मी पुढे चालु लागलो. चालता चालता कसले तरी गाणे गुणगुणत होतो. आकाशात थोडेफार ढगं जमली होती. सूर्यदेव कधी कधी झाकोळला जात असे. त्यावेळी हवेची थंडगार झुळुक येवुन मनाला आनंद देत असे. किती विलक्षण दृश्य होते ते.
चालता चालता सायंकाळ झाली. सूर्य उतरंडीला लागला. घराबाहेर पडलेले श्रमिकवर्ग घराकडे परतत होते. वासरांच्या आठवणींनी गाई हंबरत परतत होत्या. त्यापाठोपाठ गुराखी देखील लगबगीने परतत होते. सगळीकडे आसमंतात धुराळा उडाला होता. त्यायोगे सूर्यबिंब अगदी लालसर दिसु लागले. बघता बघता सूर्य अस्ताला गेला व सगळी कडे काळकुट्ट होऊ लागले. गाव हळुहळु मागे पडत होते. मी आता अरण्यात प्रवेश केला होता. रस्ता साधारण होता. माझे ठिकाण अद्याप आले नव्हते. मला अंधाराची भीती वाटत नव्हती. मी गुणगुणतच चालत होतो. तोच कसलातरी आवाज कानी येत होता. बहुधा त्या रस्त्यावरुन चालणारे कोणी पांथस्थ असतील. हो, त्यांचाच आवाज येत होता. मी जसजसा पुढे जाऊ लागलो, तसतसा तो कोलाहल वाढु लागला. सभोवताली खूप अंधार होता. नीटसे दिसत नव्हते. पुढे मला भरपुर माणसे घोळक्याने उभी असलेली दिसली. मी त्यांच्या पर्यंत आलो असता मला वेगवेगळे संभाषण ऐकु येऊ लागले.....थांब मुला यापुढे जाऊ नकोस......अहो, हेच आपले मुक्कामाचे ठिकाण आहे. ....हुश्श, पोचलो एकदाचे.....बापरे काय लांबवर होते हे ठिकाण..... गुरुंनी सांगितल्याप्रमाणेच आहे हे.......थोडासा काळोख आहे इतकच काय ते........आता हा कोण पुढे चालला आणखी...... पोरगा वाटतो तो.......थांब मुला अरे हेच तुझे मुक्कामाचे ठिकाण आहे......आम्ही सगळेजण याठिकाणी थांबलो आहोत......पुढे जाऊ नकोस.... निबिड अरण्य आहे......शिवाय हिंस्र श्वापदांची भीती..... पायाला काटे बोचतील..... अरे बघ किती बोचरी हवा सुटली आहे........ थंडीने कुडकुडशील. थांब आमच्याबरोबर आनंद व्यक्त कर........ बघ आम्ही आनंदाने अगदी बेहोष होण्याच्या मार्गावर आहोत...... पोरा थांब अविचार करु नकोस....... आवाज आणखी वाढु लागला....... मीच मोठा साधु ..... मलाच खरा साक्षात्कार झाला आहे...... मी आता सच्चिदानंद स्वरुप बनलो आहे........... मला कशाचीही भीती नाही....... प्रत्यक्ष परमात्मा म्हणतात तो मीच...... मीच जगाचा पालनहार.......
मी त्यांचे बोलणे ऐकता ऐकता तसाच पुढे चालत होतो. मला माहिती होते की ते मुक्कामाचे ठिकाण नाही. ही माणसे चुकीच्याच जागेला मुक्कामाचे ठिकाण म्हणुन स्वतःची फसगत करुन घेत आहेत. वास्तविक पाहता एकतर ते थकलेले आहेत. किंवा, त्यांना आणखी पुढे जाण्याची भीती वाटत असावी.....काही असो मी पुढे चालतच रहाणार. काही झाले तरी.....
हळुहळ त्यांचा घोळका खुप मागे पडला. त्यांचा कोलाहल पण थांबला होता. मी त्यांपासुन खुप दुर व उंचीवर आलो होतो. माझ्या अंगात कसलातरी अनामिक उत्साह संचारला होता. मी चालतच होतो. बोचरी थंडी वाहत होती, पण त्याची जाणिव होत नव्हती. त्या काळोखात मी माझे स्वतःचेच आस्तित्व विसरलो होतो. माझे मन स्तब्ध झाले होते. मनात कोठलेही विचार येत नव्हते. मी तसाच पुढे पुढे जात होतो. तोच काय आश्चर्य क्षितिजावर तांबडं फुटलं होतं. सुर्यदेवाच्या आगमनासाठी सारे वातावरण आनंदित झाले होते. झुंजु मुंजु प्रकाश पडत होता. मी अंमळ मागे वळुन बघितले. बापरे मी किती उंचावर आलो होतो. ते गाव तो घोळका काहीच दिसत नव्हता.
तोच..... आकाशात सुर्यबिंब प्रगटले. सुर्यदेवास पाहुन माझी गात्रे पुलकित झाली. त्याचे दर्शन घेऊन मोठ्या श्रद्धेने डोळे बंद केले व त्यास ह्रदयात साठवु लागलो. ....... नतमस्तक झालो.....माझे भावांतर झाले...
....वत्सा डोळे उघड..... कोठुनसा आवाज कानी पडला..... मी डोळे उघडले तर काय..... साक्षात गुरुदेव समोर उभे.
माझी ब्रह्मानंदी टाळी लागली. .... बाळा हेच तुझे मुक्कामाचे ठिकाण.... या ठिकाणी खुप कमी पोचतात. बाकी तमोगुणास  देव मानुन सुखोपभोगात रममाण होतात. बाळा तुझे कल्याण असो.... तुझे मंगल असो.....
असे म्हणुन गुरुदेव समुद्राच्या लाटेप्रमाणे अंतर्धान पावले.

   ............डी सिताराम

गरीबी- एक काव्य

गरीबीचे भिषण चटके
मी आहेत अनुभवले
खाण्यास पुरते धड नसे
पोट पाठीस भिडलेले

बाप उपाशी, माय उपाशी
बहिण भाऊ सारे उपाशी
माय करी मोलमजुरी
बाप असाच कष्ट उपशी

शिकण्यासाठी पैका नव्हता
चिमटा पोटी पैका साठवी
खुप शिकुनी मोठे व्हारे
म्हणुनी आम्हा शाळा पाठवी

शिकुनी आम्ही मोठे बनलो
कृपा माय पितयांची
गरीबी नव्हे शाप कोणाचा
आहे ताकद दृढ मनाची

रंजुनी गांजुनी करुनी गोंधळ
दोष नशिबी देऊ नये
मार्ग काढुनी स्थिर चित्ताने
प्रयत्ना वाचुनी राहु नये

गतकालाचे भिषण दिवस
पुनः कधी ते येऊ नये
सन्मार्गाची कास धरुनी
सत्याचा मार्ग सोडु नये

   ...........डी सिताराम

शनिवार, ९ एप्रिल, २०११

दत्ता म्हणे

एक
खरा तोचि जाणा साधु।
नाही विकारांशी बाधु।।
करी परउपकार।
नाही सरती माघार।।
निंदा साहे जनी वनी।
स्थिर अंतरी लक्षुनी।।
दत्ता म्हणे असा साधु।
करी सकलांशी बोधु।।

दोन
आयुष्य हा खातो काळ।
कशी जीवा पडे भुल।।
हिच मायेची करणी।
नये कवणाच्या ध्यानी।।
संसारात रमे जीव।
तन मन अर्पी भाव।।
दत्ता म्हणे सावधान।
सोडी सोडी अभिमान।।

   .....डी सिताराम

मानव जन्म- एक काव्य

नाना विकार, वासना घेऊनी
मानव देही आला
गत जन्मींचे कर्म भोग तो
कसा विसरुनी गेला

जीवास सुखी करण्यासाठी
पैशापाठी धावतो
परि सुख कोठे, भास तयाचा
मृगजळापरी फसतो

कर्तृत्वाचे पंख लाऊनी
गगनी झेपावतो
तसाच व्यसने, छंद लाऊनी
अधःपतीत होतो

एक दुर्गुणी रावण होतो
एक सद्गुणी राम
कधी जिंकतो रावण दुर्गुण
कधी जिंकतो राम

खरी लढाई मनात होते
भाव भावनांची
नसे शेवट या युद्धाचा
ठाऊक नसे विरंची

   .....डी सिताराम

सुनामी

जपानच्या सागर किनारी
धरणीकंप झाला
लाटा उसळल्या गगनचुंबी
काल स्तब्ध झाला

नसे कोणाला माहित यातले
सारे सुरळीत होते
उद्याची चिंता मनी ठेऊनी
व्यवहार करीत होते

साऱ्या जगाशी स्पर्धा तयांची
विसरुनी गतकाल
ताठ मानेने उभा राहीला
होता उषःकाल

परि तयांचे नशिबी अजुनी
भोग सरले नव्हते
होऊनी काळ कृतांत लाटा
सारे केले वाहते

होते नव्हते वाहुन गेले
संसार उघडा झाला
पाहुनी करुण दृश्य तयांचे
यमही थरकापला

      ......डी सिताराम

अण्णा हजारे- एक तुफान

सन्मार्गाने मागता येते
लढाई झगडा न करता
सारा देश येतो साथीला
अण्णा हजारे नेता

राजवट ही ढवळुन गेली
हादरले राजकारणी
भ्रष्टाचाराला भय सुटले
जणु थरथरे धरणी

बापुजींच्या मार्गावरती
अण्णा चालत होते
त्यांच्या मागुन सारी जनता
अनुशिलन करते

असा स्वच्छ सद्गुणी नेता
साऱ्या जगाने पाहिला
वंदन करुनी तया मुर्तीस
साथ देऊ तयाला

      .........डी सिताराम

गुरुवार, ७ एप्रिल, २०११

दत्ता म्हणे

गुरु कृपेची पहाट।
राम सर्वत्र चोखट।।
राम शरीरी बाहेरी।
राम राही चराचरी।।
राम चेईले निदेले।
रामे घरकुल केले।।
राम जळी स्थळी काष्ठी।
एक्या मुखी करा गोष्टी।।
दत्ता शरण शरण।
राम राजीव लोचन।।

   .......डी सिताराम

दत्ता म्हणे

एक
संत उदार उदार।
सारा आटवी संसार।।
दृश्यजगाचा नाश केला।
सत्य स्वरुपे पातला।।
मजविण कोणी नाही।
अनुभव हाचि येई।।
दत्ता म्हणे सांगो किती।
ऐशी संतांची महती।।

दोन
गुरु चरणांची शोभा।
भोळा राजा असे उभा।।
यांशी नाही मानपान।
दिले नामाचे साधन।।
नामरुप ऐक्य करी।
भवव्याधी दूर करी।।
दत्ता म्हणे माझा भाव।
गुरु जाहला स्वभाव।।

तीन
संतसमागमु धरावी आवडी।
जाशी पैलथडी भवसिंधु।।
संतांचे वचन अंतरी लक्षुनी।
आपुल्या जीवनी मुक्त होशी।।
संत हाची बाप संत हाची माय।
भक्तालागी सोय सर्वकाळी।।
संत उपदेश हाची गीता सार।
कैवल्याचा भार दत्ता म्हणे।।

चार
करा नामाचे साधन।
तिच गुरुसेवा जाण।।
नाम सुलभ सोपे रे।
नामे काळ थरथरे।।
करा बापांनो उच्चार।
तयाविण ना उद्धार।।
दत्ता म्हणे झालो धीट।
मार्ग पाहिला चोखट।।

पाच
नाम सोपे नाम सोपे।
सरतील विघ्ने पापे।।
नाही आणिक साधन।
देव पहायाशी जाण।।
हरिप्राप्तीचे लक्षण।
पांडुरंग नाम जाण।।
दत्ता म्हणे घेई नाम।
पुढे उभा घनःश्याम।।
   
      ...... डी सिताराम